संकोचुणी काय झालासे लहान..!

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


मानवी जीवन हे अत्यंत गुंतागुंतीची आणि बहूजिनशी अशी बाब आहे. इतिहासाच्या प्रारंभिक अवस्थेत माणसाचे जीवन सहज सोपे असेलही, मात्र आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात ते फार क्लिष्ट बनले आहे.जगण्याचा संघर्ष, प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा,जबाबदाऱयांच ओझं आणि यशा-अपयशाची चिंता, आदींमुळे माणूस आपल्या क्षमता विसरत चालला आहे.प्रापंचिक सुखाच्या शोधत एक चाकोरीबद्ध जीवन जगतांना एकादी साधी घटनाही त्याला निराशेच्या गर्तेत ओढून घेते.डिप्रेशन अर्थात नैराश्य म्हणजे नेमकं काय? याची तात्त्विक व्याख्या करता येत नाही, पण मनाची उदासीन अवस्था म्हणजे निराशा, अशी याची ढोबळमानाने व्याख्या करता येईल. कोणतंही काम करावंसं न वाटणं, दु:खी असणं, सतत काळजी, चिडचिड करणं, स्वत:ला दोषी समजणं, दैनंदिन कामात अजिबात रस नसणं म्हणजे डिप्रेशन येणं होय. दिवसेंदिवस वाढणा-या स्पर्धेमुळे हे डिप्रेशन माणसाच्या आयुष्यात डोकावू लागलं आहे.

जीवनात वेळोवेळी समस्या उभ्या राहतात. आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यावेळी आपण यातून सहीसलामत बाहेर पडू की नाही अशी भीती प्रत्येकाला वाटते. ज्यांची मनोवृत्ती तग धरण्याची, लढण्याची असते, मनात आत्मविश्वास असतो; त्यांना अशावेळी तरून जाता येते. मात्र ज्यांना हे जमत नाही त्यांचे मन कच खाते. कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहानसहान वाटणा-या गोष्टींमुळे कित्येक जण नैराश्याच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं. त्यांची आयुष्याकडे बघण्याची नजरच बदलून जाते. हे असे का होते?? यामागे आर्थिक समस्या, बेकारी, वैयक्तिक स्तरावर येणारं यशापयश, आर्थिक नुकसान, जोडीदाराचा वियोग, घटस्फोट आदी जी असंख्य कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे नकरात्मकता..

नकारात्मक विचार आपल्याला निराशेच्या गर्तेत घेऊन जातात. तर सकारात्मक विचारांची शक्ती आपल्या जीवनाला नवी ओळख निर्माण करून देते. खळखळणाऱ्या नदीच्या प्रवाहमार्गात अनेक खड्डे येतात, म्हणून तो प्रवाह थांबत नाही. तर ते खड्डे भरून तो आपला प्रवास निरंतर सुरु ठेवतो. हे नदीचं वाहणार पाणी आपल्याला साकारत्मकता शिकवीत असते. माणसाच्या आयुष्यातही अनेक चढउतार येतात, त्याने विचलित व्हायचं नसत तर आपला प्रवास नदीच्या पाण्यासारखा अविरत सुरु ठेवायचा असतो. त्यासाठी आपले विचार सकारत्मक असले पाहिजे. विचारांचं सामथ्र्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं..माणूस स्वतः ला दुबळा समजू लागला कि त्याच्या मनात नकारात्मक विचार सुरु होतात. त्यामुळे आपल्याला हवे तसे कमी आणि नको तसे जास्त घडताना दिसते. असे का होत असावे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनातला आहे.

मध्यंतरी एक कीर्तन ऐकण्यात आलं. त्यात, कीर्तनकाराने नैराश्य बीज उत्पत्तीचं सुदर विवेंचंन केलं होत. आपण सर्वात जास्त विचार कश्याचा करतो? जे आपल्याला हवे आहे त्याचा, कि जे नको त्याचा? साधं उदाहरण आहे.. आपण बस पकडायला चाललो तर पहिला विचार ‘बहुतेक भेटणार नाही आता..!!’ असाच येतो. एकाद्या उंच डोंगरकड्यावर चढलो आणि खाली पाहिले कि ‘इथून पडलो तर!!’ असा विचार गरज नसताना बहुतेकांच्या मनात डोकावतो. अर्थात, अशा विचारांची काही गरज आहे का? पण ते माणसाच्या मनात उत्पन्न होतात आणि त्यामुळे मानवाची सकरात्मक ऊर्जा खर्च होते. यासाठी एक सोप्प उदाहरण अजून..पावसात भिजल्यावर सर्दी होते. पण, प्रत्येक वेळी ओले झाल्यावर आपल्याला सर्दी होते का? नाही ना..मग, केंव्हा होते? तर, ज्या दिवशी आपण पावसात भिजलो आणि, ‘आता मला सर्दी होणार!!’..असा विचार मनात आला, कि सर्दी हमखास होते. कारण, पावसात भिजल्याने होणाऱ्या सर्दीला जी प्रतिबंधात्मक ऊर्जा होती, ती आपल्या नकारात्मक विचाराने नष्ट केली. नकरात्मकता माणसाची ऊर्जा कमी करते, हे सत्य मानसशास्त्र सुद्धा मान्य करते. शिवाय हे अनुभवनही फार सोपं आहे.. आपण एखादं महत्वपूर्ण काम करण्यासाठी निघालो आहोत, आणि सातत्याने आपल्या मनात नकारात्मक विचार सुरु असतील. तर त्याचा परिणाम बहुतांशवेळा त्या कामावर होताना दिसतो.

माणसाचे मन अथांग आहे.. “मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर..” या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेप्रमाणे ते चंचल देखील आहे. त्यामुळे मनाला आवर घालणे किंव्हा त्यावर नियंत्रण मिळविणे बहुतांशवेळा अशक्यच..पण तरीही मनात कायम सकारात्मक विचार सुरु असतील तर त्याचा जीवन जगताना फायदाच होतो. ‘Every Thought is Application to God “, असं म्हटलं जात. आपल्या मनात उत्पन्न होणार प्रत्येक विचार जर विधात्यासमोर निवेदन असेल तर तो चांगलाच नको का??”अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन अशा” समुद्राला हिणवणाऱ्या या ओळीतून सावरकरांनी मानवाची क्षमता विशद केली आहे. “संकोचून काय झालासे लहान..||”

या अभंगातून तुकाराम महाराजानीही माणसाने संकोच सोडून ‘स्व’ ची ओळख करून घेण्याचा सल्ला दिला आहे. माणसाची क्षमता अगदी ब्रम्हांड कवेत घेण्याइतकी आहे.मात्र त्याचा संकोच त्याच्या क्षमतेला मर्यादा घालतो. एकद काम मी कस करणार, मला यात यश मिळणार का, लोक काय म्हणतील हा संकोचचं माणसाला खाली खेचतो. त्यामुळे माणसाने आपल्या क्षमतांची ओळख करून नवनव्या यशाच्या शिखरांना गवसणी घालावी असा मार्मिक सल्ला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिला आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकोचित आणि नकारातमक न ठेवता सकारात्मक ठेवण्याची गरज आहे. तसेही, रक्तगट पॉजिटीव्ह, निगेटिव्ह असल्याने काही होत नाही.. माणूस पॉझिटिव्ह असला पाहिजे.!!

लेखक: हरीदास उंबरकर


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

शेती विकणे आहे

Next Article

भास्कर कदम यांचा एकसष्टी समारंभ संपन्न

You may also like