पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी

Author: Share:

जन्म:  २४ डिसेंबर १८९९

स्मृतिदिन: ११ जून  १९५०

आईचे हृदय लाभलेले पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरूजी हे प्रेमळ व्यक्तित्व. स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी, विचारवंत, साहित्यिक अशा विविध स्वरूपात साने गुरुजी आपल्याला भेटले आहेत. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण.

गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातून केवळ साने गुरुजी घडले नाहीत, तर शामची आई पुस्तकातून त्यांनी महाराष्ट्रातील लाखो मुलांवर संस्कार केले. साने गुरुजींच्या संस्कारी शिक्षक आणि लेखकाची बीजेही त्यांच्या लहानपणी झालेल्या या संस्कारातच आढळतात.

साने गुरुजी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. झाले आणि अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले.

त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यावेळेस ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. फैजपूर येथील अधिवेशनावेळेस महात्मा गांधींच्या विचाराला अनुसरून त्यांनी मैला वाहण्याची आणि ग्रामस्वच्छतेची कामे केली.

स्वातंत्र्यचळवळीतील सहभागाबरोबर तरुणांमध्ये राष्ट्रधर्म वाढीस लागावा यासाठीही गुरुजींचे कार्य मोठे आहे. साने गुरुजींच्याच प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून राष्ट्र सेवा दल ही देशव्यापी संघटना १९४१ साली सुरु झाली आणि गेली ७० वर्षे कार्यरत आहे. ‘पत्री’ या काव्यसंग्रहातून त्यांच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो ह्या कवितेची ओळख शालेयवयात प्रत्येक विद्यार्थ्याला होते. गुरुजींनी लिहिलेली ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही कविताही जागतिक प्रेमाचे प्रतीक म्हणून मराठी वाङ्मयाला ज्ञात आहे. राष्ट्रधर्मासोबत भारतीय संस्कृतीवर त्यांची खूप भक्ती. भारतीय संस्कृती ह्या पुस्तकात त्यांनी भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. भारतीय संस्कृतीची मूलतत्त्वे समजून घेण्याच्या दृष्टीने हा प्रबंध अत्यंत उपयुक्त आहे, समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ या शब्दात त्यावेळी गुरुजींचा गौरव केला गेला.

१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ज्ञांशी त्यांच्या संबंध आला होता. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटली. यातूनच ‘आंतरभारती’ची संकल्पना पुढे आली. प्रांतीयता भारताच्या एकत्वाला बाधक ठरू नये, प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. ते स्वतः तमिळ, बंगाली या भाषा शिकले होते. आजही हे कार्य सुरु आहे. माणगाव रायगड येथे आंतरभारती केंद्र आहे.

१९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच झाले आहे. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे ‘दु:खी’ या नावाने आणि डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत ‘मानवजातीचा इतिहास’ असे भाषांतर केले. ओ टॉलस्टॉय याने  स्वतःची कलाविषयक भूमिका स्पष्ट करण्यासाठी लिहिलेल्या ग्रंथाचा अनुवाद कला म्हणजे काय? ह्या नावाने साने गुरुजींनी केला. आई वडिलांच्या प्रेमावर ‘मोलकरीण’ नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. शामची आई या कादंबरीवर आचार्य अत्रेंनी चित्रपट बनवला ज्याला पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला (१९५४).

साने गुरुजींच्या स्मरणार्थ ‘सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक’ या नावाची संस्था रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर या निसर्गरम्य गावात आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात.

अशा या मातृहृदय माणसाने ११ जून १९५० रोजी आत्महत्येच्या मार्गाने आपले जीवन संपवले याचा चटका महाराष्ट्राला कायमचा लागून राहिला आहे.

Previous Article

२४ डिसेंबर

Next Article

१९ डिसेंबर

You may also like