समुद्र

Author: Share:

आज परत समुद्रावर आलोय..म्हंजे असं होतं एकेकदा की अचानक वाटतं  की आज समुद्रावर जायला हवं…ओढ वाटते तिथल्या शांततेची!

संध्याकाळी  फार काय गर्दी नसावी नि आपण असावं तिथं, त्याचं गरजणं ऐकावं, चालताना ती तळव्यांना हुळहुळणारी वाळू, सरत्या सुर्यास्ताच्या प्रकाशात ती चमचम…नुसतं निरखत रहावं..नंतर आपण फक्त बसून रहायचं, तसा माणूस रिकामा बसून राहिला की उगाचच बरेच विचार येत राहतात डोक्यात – दिवसभराचे, कामाचे, माणसांचे नि जास्त करून आपल्या जवळच्या माणसांचे…! विचार येतात, आठवणी येतात पण मग मधेच झटकून द्यायच्या आठवणी, सालं सेंटी व्हायला एक मिनीट पुरेसा असतो पण तिथून पुढचा बराच वेळ त्या सेंटीपणाची सावली राहते आपल्या मनावर….

कधी कधी वाटतं लाईफ खूप क्रिप्टीक आहे, तर कधी वाटतं सालं एवढ्या मोठ्या पृथ्वीवर आपला इवलासा जीव नि कशाला खूप विचार करायचा? पण असं नसतचं ते, विचार येतायेत तर येऊदेत  हे माझं मला पटतं नि मग आयुक्षाचे भरपूर हिशेब आठवतात… तुझी आठवण न यावी तरच नवल म्हंजे मला प्रेम ही आठवतं नि ब्रेकप पण…!

तू काही लाईफमधे परत येणार नाही पण ब्रेकप नंतरचा कठीण काळ आपण पचवलाय हे कधी कधी फार मोठं काहितरी वाटतं. कधी कधी आपलचं आपल्याला कौतुक वाटतं (हे पण वाटू द्यायच)

तुझ्यासोबत  समुद्रावर जायचं स्वप्नं… खैरातीतच मिळालं होतं म्हंजे आपण सोबत असताना बोलण्यातून रंगलेलं, ते ही अगदी अचानकच…असचं कधे मधे किनार्‍यावर आलो की आठवतं, एखादं गलबत उभं असतं काठावर, सायंकाळी ते एकटं वाटतं, एकाकी…तसच त्या स्वप्नाचं झालय…वाईट वाटतं थोडं पण म्हणून तुझ्यासोबतचा घालवलेला वेळ खोटा ठरत नाही, ते त्याकाळचं सत्य भूतकाळ म्हणून आठवणीत राहील नेहमीच…

समुद्र समुद्रच असतो, एखादी लाट पायाला स्पर्शून जातो नि, मग वाराही आपली जाणीव देतो, अंधाराची वेळ होते मग घरीही जायची…भिरभिरणारं डोकं शांत होत जातं, पावलं आपली नेहमीची वाट पकडतात.

बघ ना, कसही का असेना, लाईफ एनक्रिप्शन डिक्रीप्शन तत्वावर  चालते अस मी गृहीत धरून चालत असतो, म्हंजे कसं प्रोब्लेम गुढ असला तरी सोल्युशन सापडलेच अस वाटत राहतं….वर्तमानात येवढा भरोसा पुरेसा आहे जगायला…!! तसही स्वप्नं वेगळी पडतात आताशा म्हंजे जगण्याची उर्मी अजून संपलेली नसावी, हो ना?

अजय..

अजय सूर्यवंशी ,मुंबई 

Previous Article

२६ मार्च

Next Article

२५  मार्च 

You may also like