Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

सदा सर्वदा योग तुझा घडावा: विवेचन

Author: Share:

गणपती विराजमान झाले आहेत. सर्वत्र मंगलमय वातावरण भरून राहिले आहे. बाप्पांच्या आगमनाने एक चैतन्य आसमंतात भरून जाते. चैतन्य हा शब्द हिंदू तत्वदर्शनात सर्वोच्चशक्तीसाठीच वापरला जातो. बाप्पांच्या सुंदर मूर्ती सर्वत्र आहेत. भक्तांची लगबग आहे. देव्हारे विशेष सजले आहेत. सुगंधाचा घमघमाट पसरला आहे. नैवेद्याच्या ताटांनी सकाळ संध्याकाळ देव्हारा सजून जातो आहे. आरत्यांचे आणि टाळांचे मधुर नाद ऐकू येत आहेत.

गणपतीच्या आरत्यांची मौज अगदी या उत्सवासारखीच असते. एका विशिष्ट मध्यम लयीत सुखकर्ता सुरु होते तेंव्हा भक्त त्यात तल्लीन होतात आणि घालीन लोटांगण पासून ती जो वेग धरते तो अगदी हरे राम हरे राम पर्यंत भक्त डोलू लागतात. उत्सव म्हणजे आनंद! गणपतीची आरती म्हणजे या आनंदाचा उंच बिंदू, जेथ गणपतीच्या दिवशी रोज दोनवेळा, भक्त पोहोचतो, म्हणूनच गणरायाच्या आरत्या लहान मोठ्यांपर्यंत सर्वांना हव्याश्या वाटतात.

सदा सर्वदा योग तुझा घडावा, ही समर्थांनी रघूनायकाला म्हणजे रामचंद्रांना केलेली आळवणी, गणरायांच्या आरतीचे अविभाज्य अंग आहे. आरतीच नव्हे, वातावरण मंगलमय करण्यासाठी अनेक वेळेस आपण ती म्हणतो. मात्र, घालीन लोटांगणपासून देहभान हरपलेले शरीर आणि मन, सदा सर्वदा सुरु झाल्यावर शांत होते, हे आपण सर्वांनी अनेकवार अनुभवले असेल. तत्वज्ञानात सांगितलेली सत-असत नसलेली पोकळी म्हणजे काय ती कदाचित आपण इथे अनुभवत असू!

आज आपण या सदा सर्वदावरच बोलूया थोडेसे..

समर्थांनी प्रत्येक शब्द घासून पुसून वापरला आहे. माउलींपासून , तुकाराम महाराजांपर्यंत, सर्वांच्याच पद्यामध्ये हे आपल्याला आढळून येते. शब्द फार मोजके आणि प्रत्येक शब्दाची खोली विचाराइतकीच गभीर! समर्थच म्हणतात, विचारे प्रकटावे!!

सदा सर्वदा योग तुझा घडावा..

पहिलेच वाक्य फार विचारघन आहे. समर्थ म्हणतात तुझा योग घडावा.. कधी ? सदा सर्वदा.. समर्थांनी दोन शब्द का बरे योजले असतील? सदासर्वदा आपण आजही जोडशब्द म्हणूनच वापरतो. मात्र अध्यात्माने विचार करता, यातील अर्थभेद अधिक स्पष्ट करून सांगता येतो.. माउलींनी पसायदानातही असेच जोड शब्द वापरले आहेत.

चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

सर्वांना सोयरे होवोत इतके म्हणून माउली थांबत नाही, सर्वांना सदा सोयरे होवोत असे म्हणतात. सदा म्हणजे नेहमी प्रत्येक वेळी! आणि सर्वदा म्हणजे अनंतकाळ. प्रत्येक क्षणी, सर्व ठिकाणी आणि अनंतकाळ तुझा योग आम्हाला घडावा..

काय घडावा? योग घडावा..  योग हा शब्द आपण संधी, भाग्य अशा अर्थानेही वापरतो. इथे तोही अर्थ लागू होऊ शकेल. तुझ्या सान्निध्यात राहण्याची संधी, भाग्य मला मिळावे, तुझ्या सान्निध्याचा, सेवेचा, भक्तीचा लाभ मिळावा, त्याअर्थानेसुद्धा हा अर्थ घेता येईल.  पण योग हा शब्द खूप मोठा अर्थ हिंदू आणि एकूणच भारतीय तत्वदर्शनात सांगून जातो. हिंदू तत्वदर्शनात योग हे एक दर्शन आहे, एक सूत्र आहे आणि हिंदू विचारसरणीचे ते अविभाज्य अंग आहे.

योग आणि सांख्य हि दर्शने तत्वविचारांनी एकमेकांच्या अगदी जवळची मानली जातात.  सांख्य हे वैचारिक तत्व विचार सांगते, आणि योग हे ती स्थिती मिळवण्यासाठी लागणारे चित्ताचे नियमन करण्याचे सूत्र सांगते.

योग म्हणजे काय? योग शब्द युज धातूपासून बनला आहे, ज्याचा अर्थ आहे, एखाद्या कार्यात जोडले जाणे. सांख्याशी योग शब्द जोडून आपण असे म्हणू शकतो, की योग म्हणजे अंतिम सत्याशी जोडले जाणे, आणि त्यासाठी मनाच्या साऱ्या शक्तीस त्या कामास जुंपणे. पण फक्त काम करणे म्हणजे योग का? नाही! भगवद्गीतेतील अर्थ अजून गहन आहे.

योगः कर्मसु कौशलम। अधिक कुशलतेने कार्य करणे, म्हणजे योग.

कार्य कुठले आहे? अंतिम सत्याच्या जवळ जाणे. तुमच्या नेहमीच्या विहित कार्यातून तुम्ही हे करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्या जीवनात योग असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही काय करणे आवश्यक आहे? पतंजली योगसुत्रात सांगतात, “योगश्चित्तवृत्तीनिरोध:”.. योग म्हणजे काय  तर चित्ताच्या वृत्तीचा निरोध!!

चित्ताची वृत्ती काय आहे? सतत भरकटत राहणे, इथून तिथे उडणे, असंख्य विचार मनात येणे, ही चित्ताची चल वृत्ती आहे. योगदर्शनच्या मते चित्त जड पदार्थ आहे. चित्त सत्वप्रधान आहे.. म्हणजे पुरुषाच्या चैतन्याचा प्रकाश चित्त परावर्तित करते. सोप्प्या भाषेत सांगायचे तर तुम्ही जो विचार करता, तसा तुमचा आचार असतो, आणि म्हणून तुमच्या मनावर नियंत्रण अतिशय आवश्यक आहे , जे योगाचे साध्य आहे. (म्हणून योग हे अंतिम सत्याकडे पोहोचण्याचे साधन आहे). समर्थांना निश्चित, योग या शब्दात हा अर्थ अपेक्षित असावा, कारण समर्थांनी मनाच्या श्लोकातून याच मनावर नियंत्रण ठेऊन ते सन्मार्गाकडे वळावे यासाठी प्रयत्न केला आहे.

मग कसला योग घडावा.. माझे इतरत्र भरकटणारे हे जे मन आहे, ते तुझ्याठायी स्थिर होऊन, अंतिम सत्याकडे पोहोचण्यासाठी फक्त तुझ्यात लीन होणे आवश्यक आहे, हे माझ्या मनाला समजावे, एवढा मोठा अर्थ त्या एका योग शब्दामध्ये समर्थांना अपेक्षित असावा असे मला वाटते. आणि हा योग कसा असावा? सदा, सर्वदा म्हणजे नेहमी सर्व ठिकाणी आणि अनंतकाळ!

एकदा सदा सर्वदा या ओळीचा अर्थ ध्यानी आला, आणि साधकाच्या तो मनात पक्का बसला तरच पुढील वाक्यांना काही अर्थ उरतो. जर हा योग नसेल आणि तोही सदा सर्वदा नसेल तर, माझा देह त्याच्या कारणे कसा पडेल?

देह हा शब्द आपण हे शरीर म्हणून वापरतो. पुरुष आणि प्रकृती ही दोन महत्वाची अंगे आहेत. प्रवृत्ती सदोष अथवा निर्दोष असेल असेल, पुरुष हा मूलतः निर्दोष आहे. त्यावर प्रकृतीचे परिणाम झाले की त्याची कर्मे चांगली किंवा वाईट अशी होतात. वर आपण चर्चा केली आहे, तुमचे मन तुमच्या आचारातून प्रकट होते. म्हणजे, प्रकृतीचे परिणाम नियंत्रित करून पुरुषाला मूळ निर्मल निरामय स्वरूपात आणणे शक्य आहे, हे हिंदू विचार मान्य करतात. म्हणूनच माउली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो.. म्हणजे दुर्जनांचे दुर्जनत्व गाळून पडो!

इथे समर्थांना हिंदू तत्वदर्शनातील पुरुष हा शब्द देहासाठी अपेक्षित असावा. म्हणूनच ते म्हणतात, तुझे कारणी, देह माझा पडावा.. म्हणजे हा देह म्हणजे माझा पुरुष तुझ्या कारणात लीन होऊ दे..एकरूप होऊ दे..

आता हे सर्वस्वी तुझ्या हाती आहे. म्हणजे मी तयार आहे, तुझ्यात विलीन होण्यासाठी. तू आता मला दूर लोटू नकोस! उपेक्षू नको गुणवंता अनंता.. अनंता हा शब्द आपण अनेकवेळा ऐकला आहे.. ज्याला आदी नाही अंत नाही.. गुणवंता हा शब्दही असाच गहन अर्थाचा आहे. मात्र त्यावर विस्तारभयास्तव इथे भाष्य करत नाही. समर्थ म्हणतात, मी तयार आहे.. माझे अस्तित्व तुझेच आहे.. अहं ब्रह्मास्मि हे सत्य समजून घेण्यासाठी मी तयार आहे, आता तू माझी उपेक्ष करू नकोस. हेच एकमेव मागणे मी हे रघुनायका, तुझ्याकडे मागतो आहे..

समर्थांनी या चार ओळीत फार प्रदीर्घ अर्थ सांगून ठेवला आहे. हिंदू विचारदर्शनातील भक्ती परंपरा फार मोठी आहे. भक्तीमार्गात, ईश्वराच्या चरणी लीन होऊन भक्तांनी देहाच्या तिजोरीत फक्त त्याच्या भक्तीचा ठेवाच भरावा, हे अपेक्षित आहे. त्यासाठी योग आवश्यक आहे. सदा सर्वदा हा जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे. या चार ओळीत पुन्हा समर्थ जीवन जगण्याचे सार उघडे करतात.

पुढील वेळी हा श्लोक म्हणाल, तेंव्हा किती व्यापक मागणे तुम्ही तुमच्याच मनात वसलेल्या रघूनायका कडे मागत आहात हे लक्षात घ्या!

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Previous Article

२८ ऑगस्ट

Next Article

सेतू माधवराव पगडी

You may also like