सचिनमय…

Author: Share:

सचिन म्हटला की मुंबईच्या क्रिकेटवेड्या पोरांमध्ये वेगळीच भावना येते. ती भावना देवत्वापेक्षा कमी नसते हे सांगायला कुणीही लाजणार नाही. देशाने आणि जगाने त्याला क्रिकेटचा देव करण्याच्या खूप आधी, मुंबईच्या पोरा-पोरींनी त्याला आपल्या हृदयात देवत्व देऊन ठेवले होते. ती जागा अबाधित आहे. सचिनच्या स्ट्रेट ड्राइव्हची सात्विकता कुणाच्याही आडदांड शॉट ला नाही. सकाळी अंघोळ करून तुळशीसमोर हात जोडणाऱ्या मराठमोळ्या स्त्रीच्या पावित्र्यतेची तुळणा नाही.. तसेच!

मुंबईच्या दादर मध्ये शिरा…शिवाजीपार्क कडे तुमची पावले ओढली जातात. ह्या शिवाजी पार्कवरच आमच्या लहानग्या सचिनची विश्वविजयी पाऊले उमटली होती. आधी ती दिसली अजित दादाला. त्याचे उपकार थोर! आणि नंतर गुरुवर्य रमाकांत आचरेकर सर. मराठी घराघरात ही दोन नावे आदराने घेतली जातात. तशी देशभरात, पण सद्ध्या आपण फक्त मुंबईपुरते बोलू. मुंबई म्हणजे क्रिकेटची पंढरी.. मुंबईने भारताचे क्रिकेट किती पोसले ह्याला शब्द नाहीत. मुंबईकर ह्याबाबतीत फार सुदैवी आहे. दीनानाथ किंवा शिवाजी मंदिरने महाराष्टाची नाट्यसंपदा जपली, वाढवली , त्याची साक्ष मुंबैकरासमोरच. तसेच क्रिकेटची बसून न घेतली जाणारी मोठमोठी नावे येथीलच! सिकेंनी राजाबाई टॉवरचे घड्याळ कसे फोडले ह्याची हकीकत मुंबईकर नेहमी सांगतो, त्यानेच तो षटकार पाहिल्यासारखे. मांजरेकर, गावस्कर, मर्चंट ही नावे मुंबईच्या काळातीत क्षितिजे भरून राहिली आहेत. मुंबईकर खरा क्रिकेटप्रेमी! कारण त्याचे प्रेम इंडियन टीम पासून सुरु होत नाही. क्रिकेटवेडे मुंबईकर नसलेल्यांना हे समजत नाही. आमचे क्रिकेट प्रेम सुरु होते कांगा लढतींपासून. आझाद किंवा क्रॉस वर मॅच सुरु असली कि कामाच्या गडबडीत असलेला मुंबईकर एक पाऊल थबकतो. किंवा हिंदू जिमखान्यावरील मॅच बघताना, मरिन लाईन्स च्या ब्रिजवर मुंबईकर थांबतात, हे वेड साधे नाही!

असो मुंबईच्या क्रिकेटवेडाविषयी मागेच लिहिले आहे. आजचा दिवस फक्त आमच्या सच्चूचा!

तर सचिन हे नाव देवत्वाने घेतले जाते हे सांगताना आम्ही लाजत नाही. कारण त्याने केलेले काम तेव्हडेच महान आहे. अहं.. मी फक्त त्याच्या रेकॉर्ड बद्दल बोलत नाहीये. म्हणजे संख्येयबद्दल बोलूच नंतर पण आधी त्याच्या गुणवत्तेविषयी बोलू. सचिन आला तेव्हा तो अवघा १४ वर्षाचा होता. म्हणजे रणजीमध्ये. रणजी ही भारतातील सर्वोत्तम अंतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे. सचिन आला तो काळ म्हणजे दिग्ग्ज खेळाडू मुंबईतून खेळण्याचा होता. सचिन त्याआधी भारताच्या कॅम्पमध्ये कपिलची बॉलिंग खेळून झाला होता. सचिन रणजी मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करू लागला ते शेवटपर्यंत. मुंबईकरांची नाळ कांगापासून जोडली जाते. इथल्या साध्या स्पर्धांना सुद्धा गर्दी होते. त्यामुळेच मुंबईच्या क्रिकेट परिवारात रणजी मध्ये खेळणे सुद्धा भूषणावह होते, आजही आहे. सचिन मुंबईच्या संघात आला आणि ताईत बनला. चार अधिक लोक स्टेडियम कडे खेचू लागला. पुढे पुढे, आंतरराष्ट्रीय सामन्यांसारखे वानखेडे ब्रेबॉर्न सचिन खेळात असताना भरलेले मी माझ्या डोळ्यांनी पहिले आहे. खरंतर सचिनला बॅटिंग करताना पाहत नसतो, आम्ही अनुभवत असतो. डोळे बंद केले तरी वानखेडेची हवा सांगते, सचिन क्रीझ वर आहे. आणि तो प्रसिद्ध मंत्र.. सचिन.. सचिन.. तो युद्ध घोष नाही, ते नुसते चिअर अप सुद्धा नाही.  त्याची तुलना एखाद्या उत्तम रंगलेल्या गाण्यांशीच होऊ शकेल. चाळीस पन्नास हजार वेडे एकत्र सुरेल गाणे गुणगुणत असावेत तसा तो घोष वानखेडेवर ब्रेबॉर्नवर चाले. आजही चालतो. कारण वानखेडेच्या रोमारोमात अजून सचिनचे कव्हरड्राइव्हस स्ट्रेट ड्राइव्ह आणि स्वेअर कट भरून राहिले आहेत.

सचिनच्या  एकेका शॉट वर दिवाणे होत असू आम्ही. कारण ते होतेच त्या नजाकतीचे. तिथे जोर नव्हता, अरेरावी पणा नव्हता, अग्रेसिव्हनेस ‘दाखवला’ जात नव्हता. पुलं म्हणतात ना, तुम्ही शास्त्रीय संगीत शिकायला किती त्रास घेतलाय हे दाखवण्याची मैफिल ही जागा नव्हे! शरीर वेडे वाकडे करून मारण्याचे शॉट्स सचिन खेळला नाही. अगदी तो हॅलिकॉप्टर शॉट सुद्धा खेळलाय. पण तोही बघताना एका लयबद्धतेचा आलाप वाटतो, त्या शॉटच्या उगमकर्त्यापेक्षा सुंदर साचेबद्ध दिसतो तो शॉट. त्याचा स्ट्रेट ड्राइव्ह आणि एक्स्ट्राकव्हर ड्राइव्ह. अहाहा…वर्ल्ड कप फायनल ला त्याने मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह आठवतो? खाली मान घालून, जिलेबी काढावी तसा तो गेला. बॅटला टच केल्यावर शहाण्या मुलासारखा  बॉल अध्यात न मध्यात येता सरळ सीमापार झाला. असे कितीतरी शहाणे बॉल असंख्यवेळा सीमापार गेले आहेत. फोर सोडा त्याचे सिक्स आठवा. ‘शिअर पावर’ म्हणतात तसे तसूभरचेही काही नसायचे हो! बॉलला कसायासारखा तासलाय असे नसायचेच! खेकडा सोलावा तितक्या नजाकतीने आणि चवीने तो बॉल सीमापार असायचा. मग स्ट्रेट सिक्स असो किंवा मिडविकेट वरून फेकून दिलेला हुक असो किंवा पुढे येऊन एक्स्ट्रा कव्हर वर मारलेला सिक्स. ऑफ स्पिनरला तो बसून स्वीप सिक्स मारायचा त्याने त्या बॉलरचेही पारणे फिटत असेल आणि बॉलला बॉलचा जन्म मिळाल्याचे सार्थक वाटत असेल.

तशी पिसे त्यानेही काढली आहेत. इंग्लंडमध्ये कॅडीच ला धुतले होते, किंवा शारजाला आणि भारतात वॉर्नची धुलाई केली होती ते कसे विसरू आपण. पण ते सगळे शॉट्स देखणे होते. कापले होते बकरेच, पण कुठेही कसायाचा आवेश नव्हता.

तर सचिन ने काय दिले. सचिनने जगण्याचा आत्मविश्वास दिला. अतिशयोक्तीपूर्ण नाही हे स्टेटमेंट. आठवा. परदेशी जमिनीवर काय त्रेधातिरपीट असायची आपल्या बॅटींगची? वाकाची खेळपट्टी वाका वाका म्हणून हसायची. न्यूझीलंडमध्ये मॅच सुरु व्हायची भारताच्या पहाटे. माणूस उठेपर्यंत अर्धी टीम पॅव्हेलियन मध्ये असायची. त्या बॅटिंगला कणा दिला तो सचिनने. वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलर ला न घाबरता उभे राहून ऑन ड्राइव्ह कसा मारावा हे जसे दाखवले सुनील गावस्करांनी, तसे ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या गोलंदाजांना फेकून कसे द्यावे हे दाखवले सचिनने!

सचिनने अजून एक महत्वाची गोष्ट केली. फक्त आक्रमकपणा नाही, त्याने शिस्तबद्ध पद्धतीने विचार कसा करावा, डेडिकेशन म्हणजे काय, परफेक्शन कशास म्हणतात हे त्याने दाखवून दिले.

सचिनचे आयुष्य ही एक शाळा आहे. तो आयुष्याचे एक ध्येय घेऊन जगला. त्यासाठी अपरिमित मेहनत घेतली. ते स्वप्न जगात असताना त्याने फक्त त्याचा आणि त्याचाच (म्हणजे स्वप्नाचा) विचार केला. क्षणाक्षणाला स्वतःला अधिकाधिक एक्सलंट करण्यासाठी प्रयत्नशील राहिला. म्हणूनच त्याने ते यश पहिले जे फार कमी लोकांच्या वाट्याला येते. मोठमोठे क्रिकेटर, सेलिब्रिटी त्याला भेटण्यासाठी झटतात, त्याला भेटून सार्थक झाले असे त्यांना वाटते. जगातील सर्वोत्कृत्ष्ट फलंदाज त्याच्यात स्वतःला पाहतो आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज त्याला गोलंदाजी टाकायला मिळाली म्हणून आनंद व्यक्त करतात. कर्मनिष्ट माणसाने जगावे कसे, ‘भगवद्गीता कशी आचरावी’ तर सचिनसारखे असे श्रीकृष्णसुद्धा सांगतील.

आणि एवढे मिळवून त्या माणसाला काडीचा ‘ग’ नाही, वानखेडेच्या मैदानकर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेऊन बोलणारा सचिन असो किंवा अगदी काल  परवा व्हायरल झालेल्या व्हिडिओत रस्त्याच्या कडेला खेळणारा सचिन असो..सेलिब्रिटी आणि सामान्य चाहत्यांना तो तितक्याच आत्मीयतेने भेटतो.

सचिन हे एक पर्व आहे आणि मी आणि नव्वदीत जन्मलेले सर्व सुदैवी आहेत ज्यांनी ते पर्व घडताना पाहिले. म्हणूनच आज कोहली किंवा धोनीचे फॅन त्याची तुलना करू पाहतात तेंव्हा हसू येते…आज मिसाईल तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती होऊन काल पेक्षा आज अधिक उंच ते उडू शकेल..पण म्हणून आजच्या तंत्रज्ञाची तुलना कलामांशी होऊ शकेल?

सचिन तुला पंचेचाळीसच्या शुभेच्छा…दीर्घायुषी हो..आनंदी रहा!!

Previous Article

नावीन्याच्या शोधातून जगणे अधिक परिपूर्ण

Next Article

पुस्तका… पत्रास कारण की…

You may also like