इफ्तार प्रीतिभोज : काही विचार – अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या; सबका साथ सबका विकास ह्या घोषवाक्याविषयी सर्वसामान्य माणसाच्या मनात संदेह, शंकाकुशंका आणि गोंधळ निर्माण होईल अशाप्रकारे काँग्रेस पक्ष ,राहुल गांधींपासून संजय निरूपमपर्यंत अनेक नेते जिवाचा आटापिटा करीत आहेत ० अशावेळी मला नानी पालखीवाला ह्यांच्या केम्ब्रिज विद्यापीठातील एका भाषणाची आठवण येते ० तेथील ट्रिनिटी महाविद्यालयात त्यांनी १९९० मध्ये जवाहरलाल नेहरू स्मृतिप्रीत्यर्थ हे भाषण केले आणि त्यांच्या ‘ वुई , द नेशन ‘ ह्या पुस्तकात ते समाविष्ट आहे ० ते म्हणाले, ” प्रजासत्ताक भारताने आपल्या पहिल्या चाळीस वर्षात दगडविटा ,कारखाने आणि यंत्रसामुग्री ह्यांच्यात जेव्हढी गुंतवणूक केली त्यापेक्षा फार कमी गुंतवणूक मानव संसाधन विषयात म्हणजे शिक्षण, कुटुंब नियोजन, पोषण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या ठिकाणी केली ० त्यामुळे संख्यात्मक वाढ झाली पण गुणवत्तात्मक विकास झाला नाही ० आमचे सकल राष्ट्रीय उत्पादन वाढले पण सकल राष्ट्रीय समाधान वृद्धिंगत झाले नाही ० ही आमची फार मोठी चूक होती आणि इतिहास त्याची नोंद घेतल्यावाचून राहणार नाही ० ” सगळ्यांना संगे घेऊन विकास साधायचा असे मोदी म्हणतात तेव्हा त्यांना सगळ्यांच्या मुखावर समाधान झालेले पाहण्याची इच्छा असते ० आपण आपल्या घरी आल्यानंतर जे समाधान होते ते समाधान लोकांना झालेले पाहण्याची मोदींना आकांक्षा आहे ० आपले घर ही भावना म्हणजेच स्वातंत्र्य ०

आपण स्वतंत्र झालो , प्रजासत्ताक झालो पण येथे जिवंत लोक राहतात हे आपण विसरलो ० आम्ही लोकांचे हिंदू आणि मुसलमान असे दोन भाग केले आणि दोघे सुखासमाधानाने नांदणार नाहीत ह्याची काळजी घेतली ० वास्तविक विश्व हिंदू परिषदेचे एक संस्थापक स्वामी चिन्मयानंद म्हणत असत त्याप्रमाणे भारतात दोनच जाती आहेत ; जे हिंदू आहेत ते आणि जे हिंदू होते ते ० जे हिंदू होते त्यांनी आपण फार वर्षे लोटली नाहीत तोपर्यंत हिंदू होतो आणि आपले पूर्वज समान आहेत हे मान्य करावे इतकीच हिंदूंची अपेक्षा होती ० परंतु टिळक युग संपले आणि गांधी युग सुरु झाले ० हिंदूंमध्ये मानसिक परिवर्तन करण्यात येत आहे , त्यांनी आपल्याशी ह्यापुढे न लढण्याचा निर्धार केला आहे आणि केवळ प्रेमाने जिंकण्याचे अहिंसात्मक व्रत त्यांनी घेतले आहे हे मुसलमानांना कळले ० राजकीयदृष्ट्या हिंदूंपेक्षा मुसलमान अधिक जागरूक असल्यामुळे बाराशे वर्षे तलवारीला तलवार भिडवून आणि क्रौर्याची परिसीमा गाठून जे मिळाले नाही ते आपले स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र स्थापन करण्याची नामी संधी आयती चालून आली आहे हे मुसलमानांनी ओळखले आणि त्यांनी पाकिस्तान मिळवून दाखविले ० गांधींना आणि काँग्रेसला हे अपयश लपविणे कठीण जात होते ०

गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळ फसली असा लोकांचा समज होत होता ० म्हणून गांधींनी आणि नेहरूंनी भारताची न्यूनतम हानी व्हावी म्हणून आम्ही धूर्तपणे पाकिस्तान दिले असले तरी ते आर्थिकदृष्ट्या टिकणार नाही असे सांगून हिंदूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला ० मात्र त्याच वेळी त्यांनी एक नवा सिद्धांत मांडला की हिंदू आपले हिंदुत्व झाकून जगायला शिकले तर भारतात जे मुसलमान राहत आहेत त्यांच्या मनात आणखी एक पाकिस्तान निर्माण करण्याची इच्छा निर्माण होणार नाही ० हिंदुत्व झाकणे म्हणजे हा देश आपला आहे असे न म्हणणे ० हा देश आपला आहे असे म्हटले की मुसलमानांच्या मनात आपल्याला दुय्यम नागरिकत्वाची वागणूक मिळणार अशी भीती उत्पन्न होते असे काँग्रेस संस्कृतीचे म्हणणे ० हा देश आपला आहे असे अभिमानाने म्हणायचे सोडणे म्हणजे हळूहळू ह्या देशावरील आपला स्वामित्वाचा हक्क सोडून देणे होय हे भोळ्या हिंदूंच्या लक्षात आले नाही ० ते लक्षात आणून देण्याचे काम सावरकरांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आणि आज ते काम अप्रत्यक्षपणे मोदी करीत आहेत ० ते मानसिकता बदलत आहेत ० हा देश आपला आहे असे हिंदूंनी प्रथम म्हटले पाहिजे ० आपलेपणात सौदेबाजी नसते उलट समर्पणाची भावना असते ० आपली सगळी ऊर्जा एकवटून ती देशाच्या विकासाच्या कामी लावली तर देश समृद्ध होईल आणि मग मुसलमानांनाही हा देश आपला आहे असे म्हणावेसे वाटेल असा हा साधासरळ तोडगा आहे ० थोडक्यात सांगायचे तर सबका साथ सबका विकास ह्या घोषणेला प्रत्यक्षात आणून मोदींना समाधानाची लुप्त झालेली गंगा पुन्हा प्रवाहित करायची आहे ०

नानी पालखीवाला ह्यांचे सगळेच भाषण ह्या संदर्भात मनन करण्यासारखे आहे ० त्यांना जे ठसवावयाचे आहे ते थोडक्यात असे आहे ० भारताचा सापेक्षतेने अभ्यास करणारे जे नामवंत विद्वान आहेत त्यांना नेहमी एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ० अव्यक्त असे प्रचंड मनुष्यबळ आणि विपुल नैसर्गिक साधनसामुग्री जवळ असतांना भारत देश दरिद्री कसा काय राहू शकतो ? पालखीवालांचे उत्तर असे आहे की निसर्गाने आम्हाला काही कमी दिले आहे म्हणून नव्हे तर आमची धोरणेच अशी आहेत की आम्हाला वरती उठता येऊ नये ० दारिद्र्याचा पाठपुरावा करण्यात जे कौशल्य लागते त्यात पारंगत असलेला अग्रगण्य देश म्हणून भारताची ख्याती झाली आहे ० आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे कार्यकारी उपाध्यक्ष सर विल्यम रायरी हे १९८९मध्ये भारतात आले होते आणि त्यांनी म्हटले आहे की नवे उद्योग सुरु करतांना अतिशय उच्च प्रकारची सृजनशीलता दाखविणारे लोक भारतात आहेत , व्यापारउदीमात चैतन्यशाली धुरीण आहेत , अर्थशास्त्रात ज्यांना सूक्ष्म गती आहे असे पंडित येथे आहेत ० पालखीवाला म्हणतात की सर विल्यम ह्यांचे निरीक्षण खरे असेल तर भारताला दरिद्री ठेवण्यात आपल्या राजकीय नेत्यांना केव्हढे प्रचंड परिश्रम घ्यावे लागले असतील ह्याची कल्पना येते ०

भारताचे दुर्दैव हे आहे की फाटाफूट हा विकार त्याला जडला आहे ० एकाचे दोन होणे हा भारताला लागलेला ‘ एडस ‘ सारखा भयंकर रोग आहे ० तो अतिशय वेगाने आणि सगळीकडे पसरतो आहे ० लोकांचे मन त्याने काळवंडले आहे आणि त्यावर अद्याप उपाय सापडलेला नाही ० जातीय विद्वेष, फाजील भाषिक उत्साह आणि प्रादेशिक निष्ठा ह्यांनी भारताची एकता आणि एकात्मता ह्यांच्या मुळावर घाव घालण्यास सुरवात केली आहे ० जात,धर्म आणि भाषा ह्यातील मतभेदावरून अतिरेकी आणि धंदेवाईक गुंड आपल्याच बांधवांच्या सरसकट हत्या करीत आहेत ० नागरिकांच्या अंत:करणामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना उत्पन्न झालेली असली पाहिजे ० तशी ती झालेली नसेल तर सैन्य, सरकार आणि संविधान कितीही चांगले असले तरी त्याचा काही उपयोग नसतो ० परंतु दुसऱ्याही बऱ्याच गोष्टी आहेत ०

भारत हा तसा गबाळा आणि निष्काळजी देश म्हणून प्रसिद्ध आहे ० पण भारतात एक आश्चर्यही लपलेले आहे ० तुम्ही जर सर्वोत्तमाचा आग्रह धरला तर जागतिक मानकानुसारही सर्वोत्तम असलेली वस्तू भारतात तुम्हाला निर्माण करून मिळू शकते ० गुणवत्तेशी तडजोड करायची नाही असे ठरविलेत तर भारतात त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो ० जॉन केनेथ गॅलब्रेथ नावाचे मुत्सद्दी अमेरिकेचे राजदूत म्हणून भारतात काम करून गेले आहेत ० ते म्हणायचे की त्यांनी जगातल्या अनेक देशात दारिद्र्य पाहिले आहे ० पण भारतातील दरिद्री लोकांमध्ये जी विशेषता आहे ती अन्य कुठेही पाहायला मिळत नाही ० भारतात दारिद्र्यताही श्रीमंती पाहावयाला मिळते ० भारताकडे ही जी आंतरिक शक्ती,क्षमता आणि शांत सहनशीलता आहे ती पाश्चात्त्यांना अद्भुत वाटते ०

तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या विकास योजना सुरु केल्या आहेत त्यामुळे ऐहिक प्रगती होईलच पण राष्ट्रीय एकात्मता साधली जाईल ० जे सुखवस्तू नाहीत त्यांच्या मुखावर समाधान विलसत असलेले पहावयाचे असेल तर जे सुखवस्तू आहेत त्यांनी थोडा त्याग करायला हवा असे मोदी सांगत आहेत आणि लोक ते ऐकत आहेत ० हे विशेष आहे ० एका घटकाचा दुसऱ्या घटकाशी संबंध जोडून राष्ट्रीय एकात्मता सांधण्याचे काम लाल बहादूर शास्त्रींनीं पूर्वी युद्ध चालू असतांना पंतप्रधान म्हणून केले होते ० त्याचा अपेक्षित परिणाम काही प्रमाणात तरी झाला होता ० प्रशासन आणि समाज ह्यांना एकत्र गुंफून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय अभियान म्हणून मोदींनी सुरु केले आहे आणि ते निरंतर चालू राहणारे काम आहे ०

भारताच्या दारिद्र्यताही श्रीमंती आहे असे गॅलब्रेथ म्हणत आहेत ० श्रीमंती म्हणजे लाचारीचा अभाव ० देवावरचा अभंग विश्वास आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समाधान ० हे पाच हजार वर्षाचे संचित आहे ० हा रामायण -महाभारताच्या संस्कारांचा वारसा आहे ० हे ऋषिकुलाचे योगदान आहे ० हा हिंदुविशेष आहे ० दीडशे वर्षाच्या ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त होतांना हिंदू आणि मुसलमान भारत आणि पाकिस्तानच्या रूपाने राष्ट्र म्हणून उभे राहिले ० पाकिस्तान सदैव वखवखलेला राहिला ० त्याने लुटारूपणाच केला ०

भारत तसा काहीसा मागासच राहिला पण शांत, समाधानी आणि स्वाभिमानी राहिला ० तो आध्यात्मिक राहिला ० त्याने आपल्या धर्माला विधिनिषेधशून्य राजकीय पक्षाचे स्वरूप येऊ दिले नाही ० पाकिस्तानचे हुकूमशहा असतांना झिया-उल-हक्क ह्यांना भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यातील फरक काय असा प्रश्न विचारला होता ० ‘ इस्लाम ‘ असे एका शब्दात त्यांनी लगेच उत्तर दिले ० एके काळी एकच असलेल्या एका लोकसमूहाचे इस्लामने परस्परविरोधी मानवीय घटक असे दोन भाग केले ० त्यातल्या एका घटकाला मानवीय संबंधात आणण्याचे सकारात्मक प्रयत्न अलीकडे पुन्हा सुरु आहेत ० हे प्रयत्न अनुनयात्मक नसून ” याल तर तुमच्यासह ” पठडीतले आहेत ० म्हणून काही संस्था आणि संघटना इस्लाम धर्मीय नसूनही ह्या रमजान मासात इफ्तार प्रीतिभोज आयोजित करीत आहेत ० विकासातून राष्ट्रीय एकात्मता आणि एकात्मतेतून सुरक्षित सार्वभौमता आणि अखंडता अशी ही सोनसाखळी आहे ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी

संपर्क: ०९६१९४३६२४४


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

तुम्ही नक्की शेतकरीच ना ?

Next Article

पुस्तक

You may also like