रोहित शर्मा ६००

Author: Share:

आज मुंबईचा लाडका फलंदाज रोहित शर्मा अवघ्या देशाच्या हॉटलिस्ट वर आहे. अचाट गुणवत्ता लाभलेल्या ह्या फलंदाजाने आज तिसरे वन डे द्विशतक पूर्ण केले. एकाच दिवशी एकाच फलंदाजाने ५० षटकांच्या सामन्यात एकट्याने दोनशे रन्स पूर्ण करणे, तेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, सोप्पे नाही महाराजा! आणि ह्या इसमाने ते तीन वेळा केले आहे. असे करणारा ह्या भूतलावरचा अद्यापपर्यंत तो एकमेव माणूस आहे. आणि तो मुंबई क्रिकेटचा शिलेदार आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

मुंबई क्रिकेटच्या फलंदाजीत काही वेगळेच पाणी आहे. हे पाणी इथल्या हवेत आहे, पाण्यात आहे, हॅरिस शिल्ड नंतर कोच खायला घालतात त्या वडापाव मध्ये आहे की इथल्या पिचेस मध्ये आहे, की मुंबई क्रिकेटच्या सशक्त स्थानिक ढाच्यात आहे? मुंबई क्रिकेट ने एकाहुन एक अचाट क्रिकेटर्स दिले आहेत. ही अचाटता धूमकेतूसारखी एकदा दिसून नष्ट होणारी नाही. सातत्य आणि चिकाटीने तेवत राहणाऱ्या ज्योतीसारखी आहे. मुंबई क्रिकेटचा ‘खडूस’ स्वभाव ह्याही बाबतीत सातत्य दाखवून जातो.

कुणीतरी म्हटलंय, एखाद्या उत्तुंग माणसाची उत्तुंगता कशात असते? तो जे काम करतो ते जगातील सर्वात सोप्पे काम आहे असे आपल्याला वाटते, इतक्या सहजतेने तो करतो. लतादीदी गात असताना आपण गायलो तर हे किती सोप्पे आहे असे आपल्याला वाटते, पण ते बंद करून आपण गायला गेलो की आपल्या आवाजाची ‘पोच’ समजते. तसा सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह. तशीच रोहित शर्माच्या फलंदाजीची नजाकत! अगदी षटकारासाठी तो चेंडू बॅटला थडकावतो, तेही इतके मुलायम-नजाकतभरे असते, की असे वाटते की जणू तो मुलायम पिसे फिरवतोय, आणि हा चेंडू फार फार नॉन स्ट्रायकर फलंदाजांच्या पायापर्यंत जाऊन पडेल. पण इतक्या मुलायमपणे मारलेला फटका सीमापलीकडे जातो तेंव्हा आधी चेहऱ्यावर येते ते आश्चर्य, नंतर येतो आनंद! ”मास्टर’ कुणाला म्हणावे? जो करताना, कठीणातील कठीण कार्य सुद्धा सोप्प्यात सोप्पे वाटते..रोहित शर्मा निर्विवाद फलंदाजीचा मास्टर आहे. म्हणूनच त्याचा प्रत्येक स्ट्रोक मास्टरस्ट्रोक असतो! त्याने पहिल्या वीस धावा केल्यानंतर तो आज दोनशेही मारू शकतो, इतकी ‘सकारात्मक अशाश्वतता’ त्याच्याबद्दल वाटते.

रोहित शर्माने झळकावलेली तिन्ही द्विशतके म्हणजे अफलातून फलंदाजीचे अविश्वसनीय नमुने! अविश्वसनीय असणे स्वाभाविक, कारण वन डे मध्ये जिथे एका संघाच्याच वाट्याला फक्त ३०० चेंडू येतात तेंव्हा एखादा फलंदाज एकटा दोनशे करतो म्हणजे त्याने उत्तुंग फलंदाजीच केली असली पाहिजे त्याशिवाय हे अशक्य आहे. इतर फलंदाजांनीही द्विशतके झळकावली आहेत. पण सचिन, वीरू आणि रोहित हे असे तीन फलंदाज आहेत, ज्यांनी स्वतःची शैली न सोडता, अक्रिकेटिय वाटेल असा एकही शॉट न खेळता, आणि विशेष म्हणजे फलंदाजीच्या तंत्राला धरूनच फलंदाजी केली आहे. काही फलंदाज आक्रमक फटके खेळतात तेंव्हा एकतर असे वाटते की हा त्यांचा दिवस आहे, आणि चेंडू लाच खाल्ल्यासारखा बॅटवर मध्यावर येऊन धडकतो आहे. त्यांच्या चेहऱ्यावर निर्ढावलेल्या मारेकऱ्यांची क्रूरता आणि डोळ्यात लाली दिसते. रोहितची फलंदाजी पाहताना असे काही वाटत नाही. ब्रेडवर बटर लावावा तसा पुढे येऊन किंवा कधी जागेवरूनच तो कव्हर वर चेंडू टोलवतो. फारातफार साठ यार्डापलीकडे टप्पा पडून चौकार गाठेल असे तेंव्हा वाटते. पण चेंडूवर जादूटोणा केल्याप्रमाणे हवेतल्या हवेत तरंगत, गुरुत्वाकर्षणाचे नियम धाब्यावर बसवून, लॉन्ग ऑफ आणि डीप कव्हरला वाकुल्या दाखवत, प्रेक्षकात जाऊन विसावतो. हे असे कसे झाले असा विचार करतानाच पुढील चेंडूवर रोहितने फास्ट बोलरला पुढे येत डीप स्क्वेअरलेग वर भिरकावून दिलेला असतो. फार तर दोन धावा काढण्याच्या लायकीचा तो चेंडू पॅराग्लायडींग करत स्टेडियम बाहेर कधी जातो हे त्यालाही कळत नाही. मिडलस्टम्प ते पायावर तुम्ही रोहितला फुलटॉस दिला की बॉल सीमेपलीकडून परत येईपर्यंत वाट पाहात तुम्ही पुन्हा बलिंग क्रीज कडे जाऊ शकता. पण ४० व्या षटकानंतर तुम्ही बॉलिंग करीत असाल तर, तर तुमचा ऑफचा बॉल सुद्धा लेगला अगदी स्क्वेअरलेगला सुद्धा सीमेपलीकडे सहज जाऊ शकतो.

रोहित केवळ हवेतल्या कसरती दाखवतो असे नाही. ऑफ साईडला थोडासा शॉर्ट पडलेला चेंडू ऑन द राईज तो कव्हरमधून बाहेर धाडतो. हे करणारा तो एकमेव प्राणी नाही. फरक हा आहे, की हा चेंडू खेळताना तो बॅटची बॅकलिफ्ट इतकी घेतो आणि त्याला पाहिजे त्या वेळेस तो चेंडू टोलवतो. ह्या बॅकलिफ्ट आणि चेंडूला बॅटचा स्पर्श होण्यामध्ये इतका वेळ असतो, की असे वाटते की टप्पा पडल्यावर चेंडूला जणू अनंत काळाचे अंतर पार करून यायचे आहे, आणि चेंडू टप्पा पडल्यावर बॅटवर कधी येणार हे केवळ आणि केवळ रोहितच्या हातात आहे. हे पाहायला इतके सुंदर वाटते, की ते पाहण्यासाठी तुम्ही प्रेयसीलाही दोन क्षण थांबायला सांगू शकता. तीच गोष्ट एक्स्ट्रा कव्हर वरून ओव्हर द टॉप तो खेळतो त्या फटक्याची! हा फटका खेळताना फास्ट बॉलर, ऑफ स्पिनर आणि लेग स्पिनर यात भेदभाव नसतो. मुंबईत भेदभाव चालत नाही हे सूत्र रोहितने प्राणपणाने जपले आहे. बरे, तिघांनाही खेळताना कुठलीही घाई नसते. रविवारच्या थंडपणाने, प्रत्येक सेकंदाचा आनंद घेत तो खेळतो. जणू फास्ट बॉलर आणि स्पिनरच्या स्पीड मधील अंतर आणि लेग किंवा ऑफ स्पिनमधील फरक याने रोहितला काहीच फरक पडत नसावा.आज प्रदीपला स्वीप करून मारलेला चौकार तर लाजवाब होता. भले यात काय विशेष! तर बापेहो, प्रदीप हा ऑफ स्पिनर नाही, श्रीलंकेचा फास्ट बॉलर आहे.जमिनीशी एकनिष्ठ राहात सीमापार जाणारा कव्हर ड्राईव्ह हे तर मुंबईच्या फलंदाजांचे पेटंट. मुंबईच्या फलंदाजीची हि लीगसी रोहीतसुद्धा त्याच समर्थतेने निभावतो. तो कव्हर ड्राइव्ह डोळ्याचे पारणे फेडणाराच असतो. यात सुद्धा तो व्हरायटी दाखवतो. एकाच इनिंग मध्ये कव्हर ते मिडऑफ या मैदानाच्या उजव्या चतकोरीच्या प्रत्येक भागात चेंडू जाईल अशा शॉट्सच्या व्हरायटी त्याच्याकडे आहेत.आणि ते सगळे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स. शुद्ध प्रेम! विवाहबाह्य फ्लर्टींग नाही!

आजचे त्याने झळकावलेले तिसरे द्विशतक पुन्हा अविश्वसनीय फलंदाजीचा अप्रतिम नमुना होते. आज काय विशेष घडले? आज रोहितने तब्बल बारा षटकार मारले. सोबत तेरा चौकार लोणच्याला होतेच. १५३ चेंडूत रोहितने नाबाद २०९ धावा केल्या. पहिल्यांदाच तो नाबाद राहिला आहे. दोनशे करून नाबाद राहणारा तो तिसरा फलंदाज आहे. असणारच राव, आत्तापर्यंतच्या सात द्विशतकांपैकी तीन त्याचीच आहेत. आजच्या द्विशतकाचे वैशिष्ट्य म्हणजे सामन्याला प्रचंड प्रेशरची किनार होती. पहिला सामना श्रीलंकेने जिंकलेला. जिंकला म्हणजे काय, भारतीय फलंदाजीला झोपवले, आणि वर रावणाच्या सैन्यासारखे थयाथया नाचले! त्यामुळे आज विजय आणि फलंदाजीचा कॉन्फिडन्स दोन्ही खेचून आणायची जबाबदारी भारतीय संघावर होती आणि रोहित कप्तान असल्याने त्याच्यावर अधिक. त्यामुळे आजचे द्विशतक एका कप्तानाने जबाबदारीने खेळलेली कप्तानी इनिंग होती. त्यामुळे त्याचे महत्व अधिक!

रोहितचे पहिले द्विशतक झळकले कठीण प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध. म्हणून त्याचे महत्व वाढते! आधीच हिरा त्यातून कोहिनुर.अमृततुल्य दूध केशर घातलेले. समोर फ़ॉक्नर सारखा आग ओकणारा फास्ट बॉलर. तयातून ३८ व्या षटकात भारताची अवस्था ४ बाद २१८ अशी होती जेंव्हा रोहित ९९ वर खेळत होता. म्हणजे रोहित आउट झाला असता तर निम्मा संघ तंबूत परतला असता. अशा वेळेस टिकून राहणे, आणि नुसते टिकूनच नव्हे तर आक्रमक ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक होऊन द्विशतक झळकावणे, यात रोहितने आपण ‘अंगात धग आणि डोक्यावर बर्फ’ असलेला फलंदाज आहोत हे सिद्ध केले.रोहित ४९व्या षटकात २०९ वर बाद झाला, तेंव्हा भारत पाच बाद ३७४ अशा पर्वतासारख्या सुस्थितीत पोचला होता. म्हणजेच सलामीला येऊन, शेवटच्या षटकापर्यंत टिकून द्विशतक झळकावून संघाला विजयी धावसंख्या गाठून देणे, ह्या सर्व आघाड्याच्या त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले.या खेळीत त्याने बारा चौकार आणि १६ षटकार लगावले.

दुसरे द्विशतक म्हणजे कुणाही मनुष्यप्राण्याने आत्तापर्यंत वन डे इंटरनॅशनल मध्ये झळकावलेल्या सर्वाधिक धावा. श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांच्या अक्राळविक्राळ इनिंगची हि गोष्ट. श्रीलंकेला आता रोहित रावणाप्रमाणे भासला ती ही कथा. त्याला दहा तोंडे होती, रोहित जणू दहा हातांनी खेळत होता. २०१४ ची गोष्ट असावी, म्हणजे आहेच! ज्याचे नाव नंतर ‘रोहितगार्डन’ पडले अशा कोलकातामधील ईडन गार्डनची. ह्या सामन्याआधीची हकीकत रोहीतनेच एका मुलाखतीत सांगितली होती. सालाबादाप्रमाणे इंज्युरी नंतर कमबॅक करीत असल्याने तो टेन्शन मध्ये होताच. समोर श्रीलंका. तरी मालिका हरण्याची भीती नव्हती, त्यामुळे सामन्याचे टेन्शन नव्हते. सामन्याच्या आदल्या सायंकाळी कोलकात्यातील काही तरुण रोहितला भेटायला आले. त्यांनी रोहितला सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि ‘यह ईडन गार्डन नाही रोहित गार्डन है’ असे म्हणून त्याला एक ग्रीटिंग कार्ड दिले, अशी हकीकत रोहित सांगतो. या एका घटनेने त्याला प्रचंड उभारी मिळाली. दुसऱ्या दिवशी ती मिळालेली उभारी किती गगनचुंबी होती हे त्याच्या धावांच्या आकड्यांनी सांगितले. अगदी डावाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. म्हणजे येथेही सलामीला येऊन पूर्ण ५० षटके तो खेळला. टेम्परामेंट म्हणतात ते हेच! या डावात त्याने ३३ चौकार आणि ६ षटकार लगावले.

त्याच्या तिन्ही अर्धशतकांचे वैशिष्ट्य जे कुठल्याही गतीने त्याने फलंदाजीला सुरुवात केली तरी नंतरच्या काळात तो त्याचा स्ट्राईक रेट कमालीचा वाढवू शकतो. किती कमालीचा? हे पहा! ऑस्टेलिया विरुद्ध द्विशतक झळकावताना पहिल्या पन्नास धावांसाठी रोहितने खाल्ले होते ७२ चेंडू, शंभरीसाठी घेतले ११४ चेंडू आणि द्विशतक झळकावले १५६ चेंडूत. म्हणजे दुसऱ्या शतकासाठी त्याने घेतलॆ फक्त ४२ चेंडू. जशा धावा वाढतात तसे लागणारे चेंडू कमी होत जातात हा व्यस्त चेंडूंचा अर्थशास्त्रीय सिद्धांत म्हणजे रोहितने अर्थशास्त्राला दिलेली देणगीच आहे!

आजच्या सामन्यातही त्याने पन्नाशी गाठली ६५ चेंडूंमध्ये! शंभर करण्यासाठी त्याने ११५ चेंडू घेतले, आणि पुढची शंभरी अवघ्या ३५ चेंडूत गाठली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुद्धा पहिले शंभर सामनाच्या ३८व्या षटकात आले होते, ह्या सामन्यात आले ४०व्या षटकात. ह्यालाच स्फोटक असणे म्हणतात. अशी माणसे फार घातक. सध्या ती किती शांत आहेत, ह्यावरून पुढील पाचव्या मिनिटाला ती काय धुडगूस घालू शकतात याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. आणि दहाव्या मिनिटाला, आम्ही दुसऱ्या डावात फलंदाजी करणे गरजेचे आहेच का? असे वाटण्याइतपत समोरच्या टीमच्या आत्मविश्वासाचे खोबरे करू शकतात. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या द्विशतकावेळी तर अजून बत्तर अवस्था होती. त्याने पहिल्या २१ चेंडूत अवघ्या ६ धावा केल्या होत्या, आणि २२व्या चेंडूवर पट्ठ्याने पहिला चौकार लगावला होता. पहिले अर्धशतक येण्यास ७२ चेंडू खाल्ले होते आणि तोपर्यंत २४ ओव्हर्स झाल्या होत्या. त्याने शतक झळकावले १०० चेंडूत म्हणजे पुढील ५० त्याने ३० चेंडूत मारल्या होत्या. दीडशे करण्यासाठी घेतले त्याने १२५ चेंडू आणि द्विशतक झळकावले १५० चेंडूत. म्हणजे दुसरे शतक अवघ्या ५० चेंडूत आले आहे. अडीचशे केले १६६ चेंडूत म्हणजे द्विशतकानंतरचे ५० त्याने मारले अवघ्या १६ चेंडूत, आणि एकूण २६४ धावांची त्याने घेतले १७२ चेंडू! म्हणजे शतकानंतरच्या दीडशे धावा पठ्याने ७२ चेंडूत केल्या! म्हणूनच तर एका मुलाखतीत रोहितने आठवण सांगितली, की पॅव्हिलियन मध्ये परतल्यावर कोच डंकन फ्रेचर म्हणाला की सुरुवातीला थोडा फास्ट खेळला असतास तर ३०० पण मारले असतेस. रोहित म्हणाला डंकन २६४ बस्स नही हुआ क्या? काय सांगू रोहित, हा आता एकच विक्रम होण्याची वाट आम्ही पाहतो आहोत!

रोहितचा उल्लेख नेहमीच असामान्य गुणवत्तेचा पण सातत्य न राखणारा फलंदाज म्हणून केला जातो. रोहितच्या फॅन्सनाच काय, भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनाच काय पण अस्सल फलंदाजीचा शौकीन असणाऱ्या कुणालाही त्यामुळे दुःख होते. मागील दोन वर्षांपासून ही इमेज सुधारण्याचा रोहित प्रयत्न करतोय. विशेषतः पाच महिन्यांच्या इंज्युरीमुळे सक्तीच्या विश्रांतीनंतर परतल्यावर तर तो अधिक सातत्याने खेळ खेळतोय. सचिन-वीरू नंतर रोहित-धवन च्या रूपाने एक दमदार ओपनिंग फलंदाजीची जोडी आपल्याला मिळाली आहे. रोहित- अजिंक्य रहाणे ह्या मुंबईकर जोडीनेही भारताला उत्तम ओपनिंग पार्टनरशिप दिली आहे. त्यामुळे फलंदाजीतील सातत्याचा सूर रोहितला गवसला आहे अशी ‘टचवुड’ म्हणत घाबरत घाबरत भाषा रोहितचे फॅन्स करू लागले आहेत.

रोहितने श्रीलंकेविरुद्ध २६४ केल्या तोपर्यंत १२५ सामन्यात त्याच्या ३५.८७ च्या एव्हरेज ने ३४७९ धावा झाल्या होत्या आणि त्याचा स्ट्राईक रेट होता ७८.३. यात २३ अर्धशतके आणि ४ शतकांचा समावेश होता. आजच्या सामन्याच्या आधी रोहितने १७३ सामन्यात ६२०९ धावा केल्या होत्या, ३४ अर्धशतके आणि १५ शतकांनीशी! त्याचा स्ट्राईक रेट आहे  ८६.१ आणि एव्हरेज आहे ४४.०४! कुठल्याही ‘उत्तम’ म्हणवू शकणाऱ्या फलंदाजीची ही लक्षणे. म्हणजे त्याचं सातत्याच्या आणि विश्वासार्ह्यतेत वाढ होते आहे.

आजच्या तिसऱ्या द्विशतकानंतर जागतिक क्रिकेटमध्ये त्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तीन द्विशतकांबाबतीत तो सध्याचे सर्व फलंदाज पाहता अढळस्थानी आहेच, पण पहिल्या ओव्हरला येऊन शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकण्याचे टेम्परामेंट आणि सलामीला येऊन शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये उत्तम फिनिशिंग करू शकणाऱ्या खूप कमी सलामी फलंदाजांमध्ये रोहितने आपले नाव कोरले आहे. पुढील विश्वचषकाबाबतीत त्याचा हा फॉर्म  संघाला प्रचंड ऊर्जा देईल.

रोहितने आपली तीन द्विशतके बंगलोर, मोहाली आणि कोलकात्याला ठोकली आहेत. चौथे द्विशतक घरच्या मैदानावर वानखेडेवर ठोकावे नव्हे ते पहिले त्रिशतक असावे हीच क्रिकेटवेड्या मुंबईकरांची अपेक्षा आहे!

रोहित.. तू फलंदाज नाहीस, तू जादूगार आहेस! मुंबई क्रिकेटला तुझा अभिमान आहे.

Previous Article

पिंपळपान

Next Article

११ डिसेंबर 

You may also like