१ टक्का अब्जाधीश  भारतीयांकडे देशाचे ७३% उत्पन्न:  ऑक्सफॅमचा आर्थिक विषमता दाखवणारा डोळ्यात अंजन घालणारा रिपोर्ट 

Author: Share:
ऑक्सफॅम ह्या जागतिक दृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सामाजिक संस्थेने जागतिक आर्थिक परिषदेकच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या अहवालाने सरकारच नव्हे सामान्यांच्याही डोळ्यातील झोप उडवली आहे. जागतिक आणि भारतामधील उत्पन्नाच्या असमानतेविषयी नेहमीच बोलले जाते. जागतिक आणि भारतीय विकास असमान आहे असे वाक्य नेहमी केले जाते. मात्र त्या असमानतेचे संख्यात्मक वर्णन ऑक्सफॅम च्या अहवालात केले गेले आहे, आणि मागील वर्षापेक्षा ते भयानक आहे.

भारताविषयी बोलायचे तर १ टक्के अब्जाधीशांकडे भारतातील ७३% संपत्ती आहे, असा निष्कर्ष ऑक्सफॅमच्या अहवालात काढला गेला आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ५८% होते. २०१७ मध्ये ह्या १% अब्जाधीशांच्या संपत्तीत तब्बल ४.८९ लक्ष कोटी वाढ होऊन ती २०.७ लक्ष कोटी झाली आहे. भारतात नवीन १७ अब्जाधीश तयार झाले. उरलेल्या सर्व भारतीयांच्या उत्पन्नात मागील वर्षी केवळ १% ने वाढ झाली आहे. याचा अर्थ, २०१७ मध्ये देशाचे ७३% उत्पन्न १% अब्जाधिशांना वाटले गेले आणि ९९% भारतीयांना उरलेल्या २७% मध्ये आपली गुजराण करावी लागली. ह्या अब्जाधिशांच्या संपत्तीत १३% वाढ झाली आहे.

जागतिक स्तरावर हे प्रमाण अधिक भयंकर आहे. १% अब्जाधीशांकडे जगाची ८२% संपत्ती आहे आणि साडे तीन अब्ज लोकांच्या संपत्तीत काहीही वाढ झाली नाही.पुढील २० वर्षांमध्ये जगातील ५०० अब्जाधीश आपली २.४ ट्रिलियन डॉलर संपत्ती आपल्या वारश्यांना देतील, जी भारताच्या जीडीपी पेक्षा जास्त आहे.

भारतातील १०० अब्जाधीशांमध्ये केवळ ४ महिला आहेत पैकी ३ ह्यांना कुटुंबांची संपत्ती वारसा हक्काने मिळाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत १० अब्जाधीशांमध्ये १ महिला आहे. ही असमानता किती असावी तर, एक भारतीय ग्रामीण कामगार आपल्या कार्यकाळात (५० वर्षे मानू) जेवढी संपत्ती निर्माण करतो, एका भारतीय अब्जाधीशाला तेवढी संपत्ती कमवायला केवळ १७.५ दिवस पुरेसे आहेत.

आर्थिक विषमता जगण्यातील गुणवत्तेतही झळकते. अहवाल म्हणतो भारतात दिवसाचे दोन डॉलर पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांमध्ये मृत्युदर जगाच्या सरासरीच्या तिप्पट आहे. वस्त्रोद्योगात दोन पैकी एका कामगाराला किमान पगारापेक्षा कमी पगार मिळतो. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक भेदभाव होतो, म्हणजेच समान वेतनाचे संविधानातील तत्व पाळले जात नाही.

ऑक्सफॅम भारतच्या सीईओ निशा अगरवाल म्हणतात की हे भयंकर आहे की भारतात आर्थिक विकासाचा लाभ काही मूठभर लोकांना मिळत आहे. अब्जाधीशांची वाढती संख्या सुदृढ अर्थव्यवस्थेचे नव्हे तर कमजोर अर्थव्यवस्थेचे दर्शक आहे. जे मेहनत करीत आहेत, देशासाठी अन्न पिकवीत आहेत, पायाभूत सुविधा निर्माण करीत आहेत, कारखान्यात काम करीत आहेत ते  मुलांना शिक्षण देण्यासाठी, कुटुंबासाठी औषधे विकत घेण्यासाठी, दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. हे विभाजन लोकशाही कमजोर करून भ्रष्टाचाराला रान मोकळे करेल.

ऑक्सफॅम इंडिया अशी आशा व्यक्त करते, की भारत सरकार अर्थव्यवस्थेचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून प्रयत्न करेल. त्या भारतात भांडवलाची आवश्यकता लागणाऱ्या उद्योगांपेक्षा (कॅपिटल  इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज) कामगारांची आवश्यकता असलेले उदयोग (लेबर इंटेन्सिव्ह इंडस्टीज) अधिक निर्माण केले जावेत, शेतीतील गुंतवणूक वाढावी. निशा अगरवाल पुढे हेही म्हणतात की भारतीय लोक बदलाची अपेक्षा ठेवत आहेत.त्यांना कामगारांना अधिक पगार घेताना पाहायचे आहे, महिला कामगारांना समान अधिकार मिळताना पाहायचे आहे, अतिश्रीमंतांना जास्त कर भरताना पाहायचे आहे, संपत्तीचे काही हातांमध्ये होत आलेले केंद्रीकरण त्यांना नियंत्रित झालेले पाहायचे आहे.”

_______________________________________________

          ऑक्सफॅम जानेवारी २०१८ अहवाल : REWARD WORK NOT WEALTH
Previous Article

ग्रामीण भागातील तरुणाईने केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

Next Article

ग्रामपंचायतींना मिळणार स्वत:ची इमारत: बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस मान्यता

You may also like