देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुरमीत राम रहीम सिंग केस मध्ये, रोहतक येथील सुनारिया कैदेत भरलेल्या सीबीआय च्या विशेष न्यायालयात न्यायाधीश जगदीप सिंग यांनी आरोपी गुरमीत राम रहीमला दोन गुन्ह्यासाठी प्रत्येकी दहा अशा वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा एकानंतर एक अशा भोगायची आहेत, असे स्पष्टीकरण न्यायालयाने आता दिले आहे.
डेरा च्या दोन महिला समर्थकांवर बलात्कार केल्याप्रकरणी २५ ऑगस्टला न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. यासाठी सात वर्षे ते जन्मठेपेशी शिक्षा होऊ शकते असे अंदाज वर्तवले जात होते. आज त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली. याविरोधात गुरमीत रामरहीम पंजाब-हरियाणा उच्च न्ययालयात जाण्याची शक्यता आहेच, मात्र पीडित महिला सुद्धा, त्याला जन्मठेप मिळावी यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याची शक्यता आहेत.
सच्चा डेरा सौदा या नावाने हरयाणा मध्ये या तथाकथित बाबाचा दरबार भरत असे. त्याच्या डेराचे अनुयायी देशभरात पसरल्याचे सांगण्यात येते, आणि त्यात काही मोठ्या नावांचाही समावेश आहे. भाजप ला हरयाणातील निवडणुकीत त्याने केलेल्या मदतीमुळे मते वाढायला मदत झाली होती. कैद झाल्यावरही हरयाणा सरकारने त्याला दिलेल्या पंचतारांकित वागणुकीबद्दल, हरयाणातील खट्टर सरकारवर प्रचंड टीका झाली होती.
गुरमितला दोषी जाहीर केल्यावर हरयाणा आणि पंजाब मध्ये डेरा समर्थकांनी हिंसाचार केला होता. त्यात ३८ लोक मृत्युमुखी पडले होते. शिक्षेच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडू नयेत म्हणून हरियाणा शासनाने खबरदारी घेतली होती आणि कैदेच्या १ किलोमीटर च्या आसपास कुणालाही फिरकू देण्यास मज्जाव केला होता, तसेच गाड्यांची कसून तपासणी केली होती.
आज दोन गाड्यांची जाळपोळ झाल्याचे वृत्त आत्तापर्यंत समोर आले आहे.
- Tags: रामरहीम