Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

भारताची ‘टायटॅनिक’ – रामदास बोट

Author: Share:

१७ जुलै १९४७…… सत्तर वर्षांपूर्वी भाऊच्या धक्क्यावरून मुलं-माणसं पोटात भरून एसएस रामदास बोट रेवसला जाण्यासाठी निघाली होती. उत्तर कोकणातील चाकरमाने गटारीसाठी सामानसुमान घेऊन गावाकडे निघाले होते. मुंबईपासून केवळ दहा मैलांवर काश्याच्या खडकाजवळ लाटांच्या माऱ्यामध्ये सापडलेली रामदास समुद्रात बुडाली आणि सुमारे ६२५ प्रवासीही…. !- त्या घटनेची ही आठवण …… !

बरोबर ७० वर्षांपूर्वी, १७ जुलै १९४७ रोजी मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जाण्यासाठी एसएस रामदास बोटीने सकाळी ८ वाजता प्रवास सुरू केला. मुंबईत मिलमध्ये काम करणारे बहुतांश कामगार गटारीच्या दिवशी (आषाढ अमावस्या) उत्तर कोकणातील आपापल्या गावांकडे जायला म्हणून मुलाबाळांसह, सामानसुमानासकट या बोटीत बसले होते. मुंबईपासून केवळ दहा मैलांवर असणाऱ्या काश्याच्या खडकाजवळ रामदास बोट आली. करंजा ‘बॉय’जवळ काही पिंपे समुद्रात वाहत येताना बोटीचा कप्तान सुलेमान शेख यांना दिसली. ती बोटीवर आदळू नयेत, म्हणून त्यांनी पिंपांना वळसा घेण्याचा हुकूम दिला. पण बोट वळवताना नेहमीपेक्षा ती थोडी जास्तच कलली. नेमकी त्याच वेळेस स्टारबोर्डच्या दिशेने, म्हणजे उजव्या दिशेने एक मोठी लाट जहाजावर आदळली आणि बोट तिरकी होत गेली. या लाटेच्या तडाख्यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले. त्यामुळे ते दुसऱ्या बाजूला धावले. या गडबडीत बोटीचा तोल सावरण्याच्या आतच दुसरी मोठी लाट बोटीवर आदळली आणि एक-दोन मिनिटांच्या आत पाणी घुसून बोट बुडाली.

इंडियन को-आॅपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीने ही बोट १९३६ साली बांधली होती. सुरुवातीच्या काळात युद्धासाठी वापरल्यानंतर प्रवासी वाहतुकीसाठी असणाऱ्या या बोटीवर दुर्दैवाने संपर्काची कोणतीच साधने नव्हती. त्यामुळे दोन्ही किनाऱ्यांवर अपघाताची काहीच कल्पना नव्हती. प्रवाशांमध्ये काही चांगले पोहणारे लोक होते, त्यांनी पोहत दुपारपर्यंत ससून डॉक गाठला आणि या भीषण अपघाताची बातमी मुंबईला दिली. तोपर्यंत इकडे उत्तरेस उरण आणि दक्षिणेस रेवस परिसरामध्ये मृतदेह मोठ्या संख्येने वाहून जाऊ लागले. त्याच दिवशी रेवसचे कोळी समुद्राची वादळाची स्थिती पाहून समुद्रात गेले नव्हते. पाणी थोडे शांत झाल्यावर त्यांनी समुद्रात बोटी घातल्या. …..पण अचानक इतके मृतदेह वाहून येऊ लागल्यावर, काहीतरी अघटित घडल्याची कल्पना कोळ्यांना आली. मागचा-पुढचा विचार न करता, त्या कोळ्यांनी काश्याच्या खडकाच्या दिशेने बोटी हाकारल्या. तिथले भीषण दृश्य पाहून त्यांना परिस्थितीचा अंदाज आला. अजूनही पाण्यावर तरंगणाऱ्या काही लोकांना पाहून कोळ्यांनी आपल्या बोटींमधली दोन हजार रुपयांची मासळी सरळ फेकून दिली आणि लोकांना वाचवायला सुरुवात केली. साधारण ७५ लोकांना वाचवण्यात त्यांना यश आले. या अपघातातून एकूण २३२ प्रवासी जिवंत किनाऱ्याला लागले. (ही आकडेवारी अनेक ठिकाणी वेगवेगळी आहे.)

पूर्वीच्या काळी महत्त्वाच्या तारखा माळ्यावर किंवा आढ्यावर खडूने लिहायची पद्धत होती. जसे की, १५-८-१९४७ स्वातंत्र्य दिन. त्याचप्रमाणे, गांधीजींची हत्या झालेला दिवस, घरातील बाळाचा जन्म, म्हैस घेतल्याची तारीख आढ्यावर लिहून ठेवली जायची. कुलाबा जिल्ह्यातील लोकांनी रामदास अपघाताची तारीखही यामध्ये समाविष्ट केली होती.

बोडणीचे कोळी :- रेवसजवळ पाच किलोमीटर अंतरावर रामदास बोटीतून वाचलेल्या लोकांना ‘बोडणी’ येथे राहण्यासाठी जागा देण्यात आली. एके काळी केवळ मॅन्ग्रोव्हचे गचपण असलेल्या या जागेवर वसलेले बोडणी गाव आता मोठे झाले आहे. आता इथे पक्की वस्ती झाली आहे. यांच्याच आज्या-पणज्यांनी जीव धोक्यात घालून रामदासच्या काही प्रवाशांना वाचवले होते. ते आजही अभिमानाने सांगतात, ‘इंग्रज सरकारने आम्हाला बक्षीस म्हणून जंब्या (पेले) दिले होते.’

सत्तरीतला ‘दर्यावर्दी’ :- ‘दर्यावर्दी’ या जिवाजी शंकर तांडेल यांच्या मासिकामध्ये ७० वर्षांपूर्वी आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये रामदासवर लेखमाला प्रसिद्ध झाली होती. उरणच्या कोळ्यांनी ९ आॅगस्ट रोजी बोटीचे अवशेष शोधण्यासाठी बोटी पाण्यात घातल्या आणि पाच धाडसी कोळ्यांनी तेलाच्या तवंगावरून आणि मृतदेहांच्या कुबट वासावरून बोटीचे वरचे अवशेष शोधून काढले. या कामगिरीसाठी सरकारने त्यांना खर्चापोटी दोन हजार आणि बक्षिसापोटी एक हजार रुपये दिल्याचेही ‘दर्यावर्दी’ ने लिहिले आहे. प्रवाशांना वाचवणारे रेवस-उरणचे कोळी, बोट शोधणारे कोळी, तसेच बारकूशेठ यांचे इंग्रज अधिकारी कौतुक करत असल्याची छायाचित्रेही त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. गेली सात दशके चालवले जाणारे, केवळ समुद्री जीवनाशी संबंधित असलेले हे मासिक आजही जिवाजी सरतांडेल यांचे पुतणे अमोल यांनी चालू ठेवले आहे. त्यांच्याकडे असणारा हा ठेवा खरेच जपला गेला पाहिजे.

अशी होती ‘रामदास बोट’:- किनाऱ्यालगत फिरताना ‘रामदास’ बोटीवर १०५० उतारू आणि ४२ खलाशांना नेण्यास परवानगी होती. गोवा वगैरे भागात ही बोट जाई, तेव्हा ६९५ उतारू आणि १० हॉटेलनोकर व ४२ खलाशांना परवानगी असे. पण रामदास बुडाली, त्या दिवशी गटारी अमावास्येमुळे जास्त प्रवासी बोटीवर चढले असावेत. त्या वेळेस माझगाव वगैरे भागात राहणाऱ्या कोकणी कामगारांना बोटीचा पर्याय सर्वात जवळचा व स्वस्त होता. स्कॉटलंड यार्डच्या प्रसिद्ध स्वान अँड हंटर या जहाजबांधणी कारखान्यात ही बोट बांधली गेली. मुंबई-गोवा असा तिचा नेहमी प्रवास असे आणि मुंबई-रेवस अशी आठवड्यातून एकदा तिची फेरी व्हायची. १७९ फूट लांब आणि २९ फूट रुंद असणारी रामदास वाफेच्या ‘ट्विन स्क्रू आॅफ ट्रिपल एक्सपान्शन’ या इंजिनमुळे ताशी १४.५ नॉटिकल वेगाने पुढे जाई.

या अपघातातून वाचलेले व अद्याप जिवंत असलेले – बारकूशेठ (विश्वनाथ) मुकादम :- या अपघातामधून वाचलेले कोणी जिवंत सापडणे अशक्य होतेच, पण बारकूशेठ (विश्वनाथ) मुकादम
अद्याप ह्यात आहेत. इस्रायल आळी, घट्टे बाग, कोळीवाडा, अलिबाग येथे ते सध्या राहत आहेत. ७० वर्षांपूर्वी बोट बुडाल्यानंतर ‘दर्यावर्दी’ या मासिकात ‘मी कसा वाचलो?’ अशा शीर्षकाखाली त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. १२ वर्षांचा मुलगा रामदास फुटल्यावर पोहत कसा किनाऱ्याला लागला हे वाचताना अंगावर शहारे येतात.
अलिबागला वडिलांच्या भाजीच्या दुकानासाठी मुंबईहून भाजीपाला आणि लिंबं खरेदी करून ते निघाले होते. कडोसरीला (तेव्हाचे) २० रुपये होते. बोट फुटल्यावर सुदैवाने त्यांच्या हाताला रबरी पिशवी लागली होती. तिच्याच आधाराने ते बारा तास पाण्यात पोहत तरंगत राहिले. लोकांच्या किंकाळ्या, बायका-मुलांचा आक्रोश, डोळ्यांसमोर मरणारे लोक असे ते भीषण दृश्य होते. ‘त्यावेळी तुझ्या मनात कोणता विचार आला?’ – असा प्रश्न दर्यावर्दीच्या ‘खास प्रतिनिधी’ने बारकू या पोरगेल्या मुलाला त्यावेळेस विचारला होता. उत्तर होते- ‘मी मरेन असं काही मला वाटलं नाही. पण माझ्या आतेभावाने नुकत्याच सर्व्हिससाठी चार नव्या मोटारी घेतल्या आहेत, मी मेलो तर त्या मला आता पाहायला मिळणार नाहीत याचंच वाईट वाटत होतं !’ यावर दर्यावर्दीच्या खास प्रतिनिधीने तेव्हाच्या शैलीत केलेली टिप्पणी आज वाचायला तितकीच मजेशीर वाटते. हा प्रतिनिधी लिहितो.. किती निर्मल मन हे! विश्वनाथ अजून बालक आहे, त्याची छाती निधड्या पुरुषाची असली तरी अजून त्याने बालवृत्तीचा त्याग केलेला नाही हे दिसून येत नाही काय? – संध्याकाळी सहा-साडेसहाच्या आसपास हा विश्वनाथ मुंबईच्या किनाऱ्याला लागला, तेव्हा दोरीच्या साहाय्याने त्याला एका बोटीवर चढवण्यात आले. भाकरी आणि बिस्किटे खायला मिळाली. हा विश्वनाथ शाळेत जात नाही, पाटी-दप्तर भाताच्या गवतात लपवून खेळायला जातो, असंही दर्यावर्दीच्या मुलाखतीत लिहिलं आहे. हा मुलगा भावी आयुष्यात एखाद्या बोटीचा कॅप्टन होणार की अलिबागच्या दुकानात भाजी विकत बसणार हा प्रश्न माझ्या मनात घर करून राहिला आहे, अशा वाक्याने ही मुलाखत त्या प्रतिनिधीने संपवली आहे.
अपघातातून वाचल्याबद्दल इंग्रज अधिकारी त्यांचे अभिनंदन करत असल्याचा एक फोटो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापला होता. बारकूशेठनी आजही तो फ्रेम करून जपलाय.
रामदासची घटना घडल्यावर भरपूर लोक त्यांना भेटायला येत होते. पण नंतर मधल्या काळात सगळेच हे विसरून गेले. नंतर अचानक टायटॅनिक पिक्चर आल्यावर लोक भेटायला येऊ लागले. सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये मुलाखती येऊ लागल्या. ‘भारताची टायटॅनिक रामदास बोट’ अशा चर्चाही तेव्हा झाल्या होत्या…

गेली सत्तर वर्षे संपूर्ण कोकणपट्टी या दु:खद आठवणीने झाकोळली आहे. कित्येक मुलांची बालपणे रामदासच्या अपघाताच्या गोष्टी ऐकत गेली आहेत. रामदास बोट, भाऊचा धक्का, काश्याचा खडक, बुडालेल्या लोकांचे वाहून आलेले मृतदेह, रेवस बंदर या सगळ्या परिसराच्या भरपूर कथा सांगितल्या जातात. कोळी लोकांनी या घटनेवर भरपूर गाणी रचली आहेत. …‘रामदास निंगाली रेवस बंदरावर’, ‘रेवसला चालली रामदास बोट’, ‘ऐका हो तुम्ही चित्त देऊनी-बोटीची कथा हो रामदास बोटीची’, ‘जुलय महिन्याच्या सतरा तारखेला-रामदास निंगाली परवासाला’ अशी अनेक गाणी आहेत.

अपघातानंतर दहा वर्षांनी रामदास बोटीचे अवशेष मुंबईत बलार्ड पिअरच्या किनाऱ्याला लागले होते. हे अवशेष नंतर बुचर आयलंडजवळ टाकण्यात आले. ओहोटीच्या वेळेस कधी-कधी हे अवशेष अजूनही दिसतात.

एवढी मोठी दुर्दैवी घटना घडूनही त्याची फारशी आपणास माहिती नाही. ‘टायटॅनिक’ बुडाली आणि परदेशातील लोक त्यावर लेख, पुस्तके, पिक्चर वगैरे काढून ती घटना कायम जिवंत ठेवतात. तसेच त्यातून त्यांचा इतिहास प्रदर्शित करतात. ‘टायटॅनिक’ व इतर अनेक जहाजे बुडून जाऊन कित्येक वर्षे झाली तरी ती का बुडाली ? जिज्ञासेपोटी त्यामागचे शास्त्रीय कारण शोधून काढतात. त्या जहाजांचे अवशेष प्रदर्शनात मांडतात. त्याची जाहिरात करून पर्यटकांना आकर्षित करतात…….
अशा घटना आपल्याकडे घडूनही आपल्याला त्या माहिती नसतात…. हेच दुर्दैव…..

सदरचा लेख दि. १६ जुलै २०१७ रोजीच्या दै. लोकमत मधील श्री. ओंकार करंबेळकर (उपसंपादक, दै. लोकमत, मुंबई) यांच्या लेखावरून संकलित केलेला आहे.

– अनिकेत यादव (पुणे)

Previous Article

उज्ज्वल भविष्य पेलतो आम्ही

Next Article

डोंबिवली विषयी

You may also like