Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पवित्र रमजानचे महत्व – शकील जाफरी

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


मुस्लीम कालगणनेनुसार वर्षाच्या 9 व महिना म्हणजेच रमजान मास. या महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वीपासून सूर्यास्तानंतरापर्यंत अन्न व पाणी न घेता कडक उपवास ठेवतात.

हे उपवास ठेवणे वृद्ध, आजारी, प्रवासी, गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलं मुलींव्यतिरिक्त वयात आलेल्या सर्वच स्त्री पुरुषांवर बंधनकारक आहे. सूर्योदयापूर्वी सहरी (काही न काही खाऊन, पिऊन) करून ठेवलेला रोजा (उपवास) सूर्यास्तानंतर इफ्तार (काही न काही खाऊन, पिऊन) करून समाप्त केला जातो.

तस पाहिले तर केवळ इस्लाम धर्मातच नव्हे तर प्रत्येक धर्मात उपवास आहेतच. मानवाच्या शुद्दीकरणासाठी उपवासाला अनन्य महत्व आहे. पवित्र कुराणाच्या दुसरा अध्याय सुराह बकराच्या आयत नं. 183 मध्ये ही सांगण्यात आले आहे की तुमच्या पूर्वीच्या लोकांवर ज्याप्रमाणे उपवास बंधनकारक होते त्याचप्रमाणे तुमच्यावरही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या उपवासाच्या लाभ काय हे पुढे सांगतांना कुरआनचा म्हणणे आहे की उपवसामुळे माणूस संयमी बनतो. ” हे इमान धारकांनो तुमच्यावर ही उपवास ठेवणे बंधनकारक ठरविले आहे ज्या प्रमाणे पूर्वीच्या लोकांवर बंधनकारक ठरविले होते जेणे करून तुम्ही संयमी (मुत्तकी) बनाल ” (पवित्र कुरआन, सुराह -2, आयत- 183) तस पाहिले तर रमजान या शब्दाची उत्पत्ती “रम्ज” या शब्दा पासून झाली आहे. रम्ज या शब्दाचा अर्थ जाळणे होय. या महिन्यात उपवासाच्या सहाय्याने माणूस आपल्या पापांना जाळून टाकतो आणि स्वतःला शुद्ध करतो. रमजान महिन्यातील रोजा (उपवास) ने सुध्दा माणसाची शारिरीक, मानसिक, व वैचारिक शुध्दी होते.

या रमजान महिन्यात उपवास ठेवल्याने शारीरिक, मानसिक आणि आत्मिक स्थरावर अनेक फायदे होतात यात शंकाच नाही पण त्याच बरोबर एक मोठा सामाजिक फायदा पण होतो. रोजा हा श्रीमंताला गरीबीची जाणिव करून देतो. एखादा गरीब जेव्हा उपाशी राहतो तेव्हा त्या भुकेला व्यक्तीला होणारी वेदनेची जाण श्रीमंताला या रोजामुळे होते आणि या श्रीमंतांच्या मनात गरीबांबद्दल दया, आणि करूणेची भावना या उपवासामुळे उत्पन्न होते याचा परिणाम स्वरूप दान धर्माची इच्छा प्रबळ होऊन गोर गरिबांना मदत मिळते. अहंकार नष्ट होऊन गरिबांचा आदरपूर्वक मदत करण्याची प्रवृत्ति वाढते.

या महिन्याच्या शेवटच्या काही दिवस (आपल्या व्यस्त जीवनातून काहि वेळ काडून, जेणे करून शक्य तितके अल्लाहची भक्ती करता यावे या हेतूने) घरदार सोडून काहीलोक एकांतवासात मशिदी मध्ये बसतात. या विधिला “एतेकाफ” म्हणजेच एकांतवास म्हणतात. प्रेषित साहेब (स.अ.व.स.) यांच्या काळात स्त्रियांना ही मशिदीत “एतेकाफ” मध्ये बसण्याची मुभा होती आणि आज ही इस्लाम धर्माच्या काही पंथात स्त्रियाही “एतेकाफ” मध्ये बसतात.

रमजान म्हणजे अल्लाहने ठरवून दिलेल्या नियमानुसार जीवन जगण्याचा प्रशिक्षण देणारा महिना. या महिन्यात जीवनाच्या प्रत्येक पैलूंचे इस्लामच्या शिकवणी नुसार पालन करण्याचा अभ्यास मुसलमान करीत असतो.

अखिल मानवजातीला पाऊलो पाऊली मार्गदर्शन करणारा पवित्र कुरआन हा धर्मग्रंथ याच महिन्यात प्रेषित मोहंमद साहेब (स.अ.व.स.) यांच्यावर अवतरले आहे. “रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले. मानवजाती करिता मार्गदर्शन आणि मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. (पवित्र कुरआन, सुराह 2, आयत185 ) म्हणून या महिन्याला इस्लाम धर्मात अनन्य महत्व आहे. या महिन्यात जास्तीत जास्त पवित्र कुरआनाच्या पठण करून समजून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक मुस्लिम करत असतो. परिणामी अल्लाहने निषिद्ध ठरविलेल्या क्रोध, मद, मत्सर, माया या सारख्या षडरूपी विकारांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करत हिंसा, हत्या, दारू,जुगार, व्याज, व्यभिचार,चोरी,चुगली या सारख्या मानवी जीवनात दुःख आणून जीवनाला नरकमय बनविणाऱ्या गोष्टींपासून लांब राहण्याच्या प्रशिक्षण घेत असतो आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी अणून आनंदी जीवन जगन्याचा सराव या महिन्यात करीत असतो. या महिन्यात मिळालेल्या प्रशिक्षणाचा प्रभाव उरलेल्या 11 महिन्याच्या जीवणालाही सफल बनवेल.

रोजा म्हणजे केवळ उपाशी राहून शरीराला त्रास देणे नक्किच नाही तर आपल्या अनंत वासनांवर नियंत्रण ठेवणे होय. शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याच्या शुद्दीकरण होय. रोजा केवळ पोटाचा नसून पूर्ण शरीर, मन, बुध्दी आणि आत्म्याचा व्हायला पाहिजे. डोळ्यांचा रोजा (वाईट न पाहणे), कानचा रोजा (वाईट न ऐकणे) , जिभेचा रोजा (वाईट न बोलणे) , हाथांचा रोजा (दुष्कृत्य न करणे) , पायांचा रोजा ( ईश्वराने मना केलेल्या वाईट ठिकाणी न जाणे) , म्हणजेच रोजा हा शारीरिक , मानसिक , वैचारिक आणि आत्मिक कृत्य असून ते नुसता उपाशी राहण्या पुरता मर्यादित नाही. आपल्या स्वतःच्या शुद्दीकरणासाठी आणी केवळ अल्लाहला खुश करण्यासाठी केला गेलेला उपवास म्हणजेच “रोजा”. जर असा होत नसेल तर प्रेषित साहेब (स.अ.स.) यांच्या पहिले उत्तराधिकारी हजरत इमाम अली इब्न अबू तालिब अलैहिस्सालाम यांनी सांगितल्या प्रमाणे रोजा म्हणजे केवळ शरीराला कष्ट देण्या पलीकडे जास्त काहीच नसतो.

“कित्येक उपवास ठेवणारे असे आहेत की त्यांच्या पदरी भूक आणि तहाणा शिवाय दुसरा काहीच पडत नाही आणि कित्येक लोकांची भक्ती पण केवळ शरीराला थकवणारीच ठरेल.” म्हणूनच हजरत इमाम अली इब्न अबू तालिब अलैहिस्सालाम यांचा कथन आहे की ” मूर्ख आणि अविश्वासी व्यक्तीच्या रात्रभर केलेली भक्ती प्रार्थना पेक्षा बुद्धिमान आणि विश्वासपूर्ण व्यक्तीचा रात्रभर निवांतपणे झोपणे श्रेष्ठ आहे. तसेच अज्ञानी व्यक्तीचा दिवसभराच्या उपवासा पेक्षा ज्ञानी व्यक्तीचा जेवण श्रेष्ठ आहे. ” (पुस्तक मफातील जिना, खंड – 1, पुष्ट क्रमांक 167)

या महिन्यात जास्तीत जास्त अन्नदान आणि वस्त्रदान केला जातो. जास्तीत जास्त दान धर्म करण्यात येतो. हे करतांनाच त्या गरीब लोकांच्या स्वाभिमानाला न दुखावण्याची पुरेपुर काळजी घेणेही महत्वाचे मानले जाते. प्रत्येक मुस्लिम आपल्या कमाईतून मिळवलेल्या आणि बचत केलेल्या संपतीतून काही भाग गोर गरीब नातेवाईक, गरजू, वाटसरू, शेजारी राहणारे तसेच मागणाऱ्या गरजूवंतासाठी साठी देणे बंधनकारक असल्याने मोठ्या प्रमाणात दान धर्म केला जातो. या दानाला जकात, खुम्स, सदका आणि फितरा असे वेग वेगळे नाव आहेत. जेणे करून समाजात श्रीमंती आणि गरिबीच्या दरी कमी करण्यासाठी हा दान अत्यंत उपयुक्त आहे.

काही मुस्लिम या महिन्याचा 19, 21 आणि 23 या तारखेला तर काही मुस्लिम या महिन्याच्या 27 तारिखेला ‘शबे कद्र’ मानतात. या ‘शबे कद्र’ च्या दिवशी पूर्ण रात्र नमाज पठन आणि पवित्र कुरआनचा पठन करून प्रार्थनेत रात्रभर जागरण करतात.अल्लाहची स्तुती आणि आपल्या कडून घडलेल्या पापांसाठी क्षमा याचना मागतात.

या महिन्याचा 19, 21 तारखेला मुस्लिम शिया बांधव मातम आणि मजलिस (शोक सभा) करून दुःख ही साजरा करतात, कारण 19 रमजानच्या दिवशी प्रेषित साहेब (स.अ.व.स.) यांचे पाहिले उत्तराधिकारी हजरत इमाम अली इब्न अबू तालिब (अ.स.) यांना पवित्र काबा मध्ये नमाज पठन करीत असतांना अब्दुल रहमान इब्न मुलजीम नावाच्या राक्षसाने तलवारीने मारला होता याच जखमेने हजरत इमाम अली इब्न अबू तालिब (अ.स.) हे 21 रमजानच्या दिवशी शहीद झाले होते.
या व्यतिरिक्त ‘शबे कद्र’ च्या रात्र पवित्र कुरआन अवतरल्याचा स्पष्ट उल्लेख पवित्र कुरआनातआढळतो. ” आम्ही (अल्लाहने) याला (पवित्र कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे.”
(पवित्र कुरआन, 97:1)
या रात्रीत केला जाणाऱ्या भक्तीला विशेष महत्व आहे. कारण पवित्र कुरआन प्रमाणे “कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.”
(दिव्य कुरआन, 97:3)

अरबी भाषेच्या ‘रम्ज’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. या शब्दाचा एक अर्थ भूक आणि तहाण पण आहे . या महिन्यात पूर्ण जगाला सत्य आणि धर्मासाठी बलिदान द्यायला शिकवणाऱ्या करबला ची आठवण करून देतो. त्या काळच्या आतंकवादी राक्षस याजीद (ला.) यांनी आतंकवाद आणि अधर्माला इस्लामच्या नावाने राजमान्यता देण्याच्या प्रयत्नात होता पण या कट कारस्थानच्या विरोधात आवाज उठविलेल्या प्रेषित साहेब (स.अ.व.स.) यांचे नातू आणि त्यांचे तिसरे उत्तराधिकारी हजरत इमाम हुसैन (अ.स.) यांच्या वर आणि त्यांच्या मित्र परिवार आणि पवित्र कुटुंबियांवर करबालाच्या वाळवंटीत अन्न पाणी बंद करून यातना दिले आणि त्यानंतर एकाच दिवशी 72 लोकांना शहीद करविला होता. शहीद होतांना या शहीद 3 दिवसाचे भुकेले आणि तहाणलेले होते . आणि या शहीदांमध्ये 6 महिन्याचे बाळ अली असगर (अ.स.) ते वयोवृद्ध हबीब इब्न मजाहिर (अ.स.) हे ही होते. उपवासाच्या या दिवसात भूक आणि तहाण त्या शहीदांच्या बलिदानाच्या स्मरण करून देतो आणि सत्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळते.

30 दिवसानंतर शव्वाल महिन्याचा चंद्र दिसल्यावर ईद साजरा करतात. खर म्हणजे ईद हा दिवस एका अर्थाने मोबदल्याचा दिवस असतो. (याच दिवशी पवित्र रमजान महिन्यात केलेल्या सत्कर्म आणि भक्तीचा मोबदला अल्लाह(सु.) कडून मिळणार म्हणून) ईदचा दिवसअल्लाहला कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. ईद साजरा करतांनाही आपल्या आनंदात गोर गरीब, शेजारी, नातेवाईक आणि वाटसरूंना सामील करून घेतात. घरोघरी शीरखुरमा (दूध आणि खजूर पासून बनविलेल्या गोड पेय) सारख्या अनेक खाद्यपदार्थ बनवतात.

प्रिय मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर रमजान हा पवित्र महिना इस्लाम (शांती) च्या प्रशिक्षण देणारा महिना. कारण इस्लाम म्हणजेच शांती आहे. इस्लाम हा अरबी भाषेचा शब्द. या अरबी शब्दाचा अर्थ शांती असून त्या व्यतिरिक्त इस्लाम म्हणजे परिशुद्धता, परिपूर्ण समर्पण व अल्लाहच्या आज्ञापालन असा पण आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर इस्लाम म्हणजे मानवाचे अल्लाहला आत्मसमर्पण आणि तसेच अल्लाहचे परिपूर्ण आज्ञापालन होय. अल्लाहने ठरवून दिलेल्या नियमानुसार जीवन जाण्याची पद्धत म्हणजेच इस्लाम. आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूंचे इस्लामच्या शिकवणी नुसार पालन करणारा खरा मुस्लिम आहे.

प्रेम, दया, करूणा आणि गोर गरीब व सर्वांचाच आदर शिकवणारा, मानवतावादाला पुरस्कृत करून जाती, धर्मापलिकडे एक माणूस म्हणून जगायला शिकवणारा आणि असल्या जगण्यातून या पृथ्वीला स्वर्ग बनविण्याचा प्रशिक्षण देणाऱ्या या पवित्र रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच अल्लाह (सु.)च्या चरणी प्रार्थना करून थांबतो की ” हे अल्लाह (सु.) ! पूर्ण जगाला सुख व शांती प्रदान कर विशेष करून माझ्या या भारत देशात सुख, शांती, समृद्धी प्रदान कर. तसेच या माझ्या मातृभूमीला उच्च वैभव ही प्रदान कर , आमीन (तथास्तु, असाच होवो) !
जय मानवता ! जय हिंद !! जय भारत !!!

लेखक: मो. शकील जाफरी (मंचर) पुणे
9867929589


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

भास्कर कदम यांचा एकसष्टी समारंभ संपन्न

Next Article

‘चला, वाचू या’ २९ व्या पुष्पामध्ये ‘ऍनेस्थेशिआ’ आणि ‘सृजनरंग’

You may also like