राजियांचे मन

‘….छत्रपती शिवाजी महाराज हे हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते. त्यांच्या आजूबाजूच्या सर्व माणसांना, अगदी शत्रूंनाही हे माहित होते, की आपण एका अलौकिक पुरुषोत्तमाच्या सानिध्यात वावरत आहोत, रयत देखील, ह्या पुरुषोत्तमाच्या छत्रसावलीत सुखी होती, स्वतःला भाग्यवान समजत होती आपण पुण्यश्लोक शककर्ते स्वामींच्या राज्यात आहोत. स्वराज्याचे शिलेदार तर आपण शिवरायांचे मावळे आहोंत ह्यात आपले जीवन कृतार्थ झाल्याच्या भावनेत होते. अवघे वातावरण शिवमय झाले होते.

स्वराज्यासाठी शिवराय देव असले तरी ते एक माणूस होते. सुखाने सुखावत होते दुःखाने दुखत होते. स्वराज्याचे आधारवड म्हणून त्यांना सर्व भावना स्पष्टपणे मांडता येत नव्हत्या. महाराज धीरोदात्त होते आणि त्यांचे मन विशाल होते. गळ्यात घातलेली कवड्यांची माळ त्यांचे निष्काम कर्मयोगी जीवन अधिक यथार्थ करीत होती. मात्र घडत असलेल्या घटनांचे पडसाद त्यांच्या मनःपटलावर उमटत होतेच. त्यांचे मन कधी आनंदाने फुलासारखे उमलत असेल होत असेल, कधी दुःखाने कष्टी होत असेल, कधी त्रासून जात असेल.. अंगावर सतत येणारी संकटे त्यातून सुटण्यासाठी खर्च झालेली शक्ती त्यांचे शरीर जसे झिजवत होती तसे मनही. स्वराज्याचा संसार हाकताना त्यांची मेहनत, त्यात कधी बाहेरचे कधी आपलेच शत्रू म्हणून काटे फेकत होते, एकाच वेळेस राज्यविस्तार आणि संरक्षणाचे सामरिक युद्ध पेलताना, दुसरीकडे स्वराज्य फुलवण्याची आणि रयतेला सुखी ठेवण्याची अशा दोन्ही जबाबदाऱ्या महाराजांच्या अंगावर होत्या. जीवाला जीव देणारे साथीदार होते. महाराजांचे माणूस जोखण्याचे कसब अद्वितीय होते, तसेच माणूस जपून ठेवण्याची कलाही होती.
त्यांचे शरीर आणि मन सदैव स्वराज्याच्या विचारताच असे..एक मोहीम संपवताना, कधी दुसरी आपसूक येऊन ठेपलेली असे. नसेल तर महाराज स्वतः काढत. त्यांच्या मनात स्वराज्याचे नीलचित्र तयार होते. महाराजांच्या पुढच्या मोहिमेची माहिती मिळाली की मावळे थक्क होत. कधी सुरत, कधी कर्नाटक, कधी करंजा.. महाराजांच्या मोहीमा आधी मनात पक्क्या होत मग कागदावर त्याचे पूर्ण नियोजन असे.. महाराजांच्या मनाचा वारू इतका सुसाट कसा धावतो ह्याचे त्यांच्या सहवासातील मुत्सद्द्यांनाही आश्चर्य वाटे. याचे कारण होते त्यांचे त्यांच्या मनावर पूर्ण नियंत्रण होते. महाराज म्हणजे भगवद्गीतेतील भगवंतांनी सांगितलेल्या सांख्ययोग, कर्मयोग आणि ज्ञानविज्ञानयोगाची जिवंत प्रतिकृती होते.
पण.. अशा सुसाट वाहणाऱ्या मनाच्या वारूला, सिंधुदुर्गावरील एखाद्या सायंकाळी विश्राम मिळायचा. मग ते सिंधू सागरांच्या लाटेत डुंबायचे कधी खडकावर शांतपणे समोरचा सूर्यास्त पाहत बसायचे. एखाद्या सायंकाळी रायगडाच्या वाऱ्याशी झोम्बत बाजारपेठेतुन फेरफटका मारायचे. कधी राजगडाच्या संजीवनीवर जाऊन बाजूच्या मावळावर नजर फिरवायचे..
काय विचार येत असतील महाराजांच्या मनात? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, जिथे इतिहास थबकतो तिथे प्रांत सुरु होतो कलाकारांचा… असाच एक फेरफटका मारून येऊ राजगडावर, सिंधुदुर्गावर आणि रायगडावर.. महाराजांच्या मनाचा ठाव घेत!
राजियांचे मन!