Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

चित्रकार रघुवीर शंकर मुळगावकर

Author: Share:

रघुवीर मुळगावकरांचा जन्म गोव्यातील अस्नोडा येथे १४ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. त्यांचे वडील शंकरराव मुळगावकर हेही चित्रकार होते. प्रसिध्द चित्रकार त्रिंदाद हे मुळगावकरांच्या शेजारी राहत असत. त्यामुळे लहानपणी मुलगावकरांना  त्यांची चित्रे पाहण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर रघुवीर मुळगावकर मुंबईला आल्यानंतर चित्रमहर्षी एस.एम. पंडित यांच्यासोबत राहिले. त्यांची शैलीसुद्धा त्यांना जवळून अनुभवता आली.

गिरगावात स्थायिक झाल्यावर कुलकर्णी ग्रंथागार, केशव भिकाजी ढवळे, परचुरे, रायकर यांच्या प्रकाशनांच्या पुस्तकांच्या वेष्टनांची कामे मिळू लागली. तो काळ मराठी साहित्यातला सुवर्णकाळ होता. पुस्तके, मासिके याचसोबत कॅलेंडर्सही मोठया प्रमाणात प्रकाशित होत असत. मुळगावकरांना त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काम मिळालेच पण ते ह्या चित्रांद्वारे प्रत्येक मराठी कुटुंबाचा हिस्सा बनले. देवदैवतांची त्यांनी रंगवलेली चित्रे प्रसिद्ध झाली आहेत. देवदैवतांना त्यांनी मानवी चेहरा दिला.

मुळगावकरांनी देवदेवतांप्रमाणे काही व्यक्तिरेखाही अमर केल्या. मुखपृष्ठांसोबत मुळगावकरांनी कथाचित्रेही खूप काढली बाबुराव अर्नाळकरांचे धनंजय, छोटू, झुंझार-विजया, काळापहाड, धर्मसिंग, चारूहास हे आजही मराठी वाचकांच्या स्मृतीत घर करून राहिलेले गुप्तहेर मुळगावकरांनी चित्ररूपाने जिवंत केले होते  कृष्णधवल रंगांमध्ये अनेक पौराणिक व ऐतिहासिक चित्रमालिका त्यांनी प्रसिध्द केल्या. त्यामध्ये गणेश पुराण, रामायण, महाराष्ट्रातील संत आदी मालिका प्रसिध्द आहेत.

दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक मासिकांची व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली आहेत. दीपलक्ष्मी’ मासिकासाठी १९५८ ते १९७६ पर्यंत एकूण अठरा वर्षे काम केले.आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी यांच्यासह अनेक साहित्यिकांची पुस्तकेसुद्धा मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली.

स्त्रीसौंदर्य हा त्यांच्या चित्रकलेचा अजून एक विशेष होता. लोभस, गोड चेहरा, लाडिक भाव, डोळयांतील बोलकेपणा, केशसंभार, वस्त्रे यामुळे ती चित्रे आकर्षक वाटत मात्र त्यात कधीही अश्लीलता दिसत नाही. स्त्रीचे सौंदर्य त्यांच्या चित्रातून जसे दिसते तशीच गोड, सोज्वळ बालकांची चित्रेही त्यांच्या कुंचल्यातून उमटली.

त्या काळात म्हटले जायचे की कोणताही पुरुष आपणास पत्नी कशी हवी, तर ‘मुळगावकरांच्या चित्रातील स्त्रीप्रमाणे’ असे सांगे व कोणतीही स्त्री इच्छा धरी कीआपणास होणारे बाळ हे ‘मुळगावकरांच्या चित्रातील बालकाप्रमाणेच सुंदर व गुटगुटीत हवे’… त्यांच्या चित्रांतील दागिने व पोषाखांच्या फॅशनच्या नकलाही स्त्रिया करत असत.

सुमारे पाच हजारांवर चित्रसंपदा त्यांनी निर्माण केली. त्यांच्या कुंचल्यावरील रंग कधीच सुकत नाही, असे त्यांच्या गौरवार्थ म्हटले जाते. आपण काढलेले चित्र चांगले छापले जावे याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे कित्येक प्रकाशकांना, त्यांची चांगला प्रिंटर निवडण्याची ऐपत नसल्यास, त्यांनी स्वत: चित्रे छापून दिली आहेत. कित्येक मराठी मासिकांना त्यांनी विनामूल्य चित्रे दिली आहेत. ‘रंगसम्राट’ या पदवीबरोबरच मुळगावकरांना ‘चित्रसार्वभौम’ ही पदवी शंकराचार्यांनी दिली होती.

रंगांच्या मैफलीत बेभानपणे रंगलेल्या या कलावंताला अचानक कर्करोगाच्या व्याधीने ग्रासले आणि ३० मार्च १९७६ रोजी वयाच्या केवळ अठ्ठावन्नाव्या वर्षी मुळगावकर अंतर्धान पावले.

संदर्भ: प्रा. मं.गो. राजाध्यक्ष,  जादूगार रंगसम्राट रघुवीर मुळगावकर, थिंक महाराष्ट्र

 

Previous Article

३१  मार्च  

Next Article

नांदगाव पंचायत समितीद्वारे स्वच्छ भारत अभियानातर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण

You may also like