Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मुखर्जींनी मार्ग मोकळा केला…

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


भूतपूर्व राष्ट्रपती आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी ह्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप सोहळ्याला संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात उपस्थित राहून आणि विशेष अथिती म्हणून भाषण करून इतिहास घडविला आहे ० तृतीय वर्ष प्रशिक्षणाला संघजीवनात असाधारण महत्व आहे ० संघाच्या माध्यमातून देशात मूलभूत परिवर्तन घडवून आणण्यासाठी संघविचार आणि जीवनपद्धती समजून घेणे आवश्यक असते ० त्यासाठी सर्व भारतातील निवडक स्वयंसेवक महिन्याहून अधिक काळ ह्या निमित्ताने सलग २४ तास एकत्र राहतात ,खेळतात आणि हे त्यांचे संबंध आयुष्यभर अतूट राहतात ० जसे अटलबिहारी वाजपेयी आणि गायक सुधीर फडके ह्यांचे तृतीय वर्ष एकाच वेळी झाल्यामुळे वाजपेयी मुंबईत आले की रात्री शिवाजी मंदिरला नाटक वा प्लाझाला मराठी चित्रपट पाहून नंतर बाबूजींच्या घरी जाऊन आणि रात्रभर त्यांना गीत रामायण गायला लावून पहाटेचे विमान पकडून दिल्लीला जात असत ०

तृतीय वर्षात सरसंघचालकांशी बौद्धिक संवाद साधण्याची आणि मनातील शंकाकुशंकांचे निरसन करून घेण्याची संधी मिळते ० ते संचित अमूल्य असते ०तृतीय वर्षानंतर प्रशिक्षणार्थी प्रचारक म्हणून बाहेर पडतात आणि आयुष्याची बहुमूल्य वर्षे संघ कार्याला समर्पित करतात ० तृतीय वर्ष म्हणजे संघाच्या भावी अखिल भारतीय नेतृत्वाचे औपचारिक आणि अनौपचारिक असे सुंदर संगम झालेले संमेलन असते ० राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शेवटच्या वर्षाला जे ते महत्व संघात तृतीय वर्षाला आहे ० म्हणून स्वयंसेवकांच्या मेळाव्यात स्वतःची ओळख करून देतांना लौकिक शिक्षण अभियंता इत्यादी आणि संघीय शिक्षण प्रथम ते तृतीय वर्ष जे असेल ते ऐकावयास मिळते ०अशा ह्या वर्गाला कालपरवापर्यंत राष्ट्रपती असलेले मुखर्जी उपस्थित राहिले आणि समरस झाले ० त्याचे महत्व मार्मिक आहे ०

ही काँग्रेसला मोठ्या अडचणीत टाकणारी आणि मोदींना लाभार्थी करणारी राजकीय कृती आहे ० नेहरूंचा समाजवाद बाजूला सारून जागतिकीकरणाला अनुकूल असे आर्थिक उदारीकरणाचे धोरण नरसिंह रावांनी प्रस्तुत केले ह्याला जेव्हढे महत्व आहे तेव्हढे महत्व गांधीनेहरुची राजकीय अस्पृश्यता दूर करून राष्ट्रजीवनातील कोंडलेला महामार्ग मुखर्जींनी मोकळा केला ह्या घटनेला आहे ० काँग्रेसच्या विशिष्ट हिंदी राष्ट्रवादाच्या तत्वज्ञानात गांधीयुग सुरु झाल्यावर मुसलमानांना फाजील महत्व आल्याने तदनुसार संघाकडे संशयाने आणि उपेक्षेने पाहण्याचा आणि संघ स्वयंसेवकांना अपमानित करण्याची संधी न सोडण्याचा पायंडा काँग्रेसने पाडला होता ० बदल असा झाला की संघाला दुय्यम नागरिकत्वाची वागणूक देता येणार नाही तर त्याला त्याचे लोकजीवनातील वाजवी स्थान मिळाले पाहिजे हे मुखर्जींनी आपल्या उपस्थितीने दाखवून दिले ० नेहरूंचे निधन झाल्यावर राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील राजकीय अस्पृश्यता उठविली ० पासष्टच्या युद्धातील महत्वाच्या घडामोडी अधिकृतपणे त्यांना कळविल्या जातील अशी व्यवस्था केली ०

स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांना मानधन अर्पण केले ० डॉ हेडगेवार भारतमातेचे महान सुपुत्र आहेत असे उद्गार संघाच्या कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून काढून मूल्यमापनात काँग्रेस विचाराकडून उद्दामपणे होत आलेली अक्षम्य आणि असभ्य चूक मुखर्जींनी दुरुस्त केली ० मुखर्जींनी नरेंद्र मोदी ह्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली ० असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही की नागपुरात ह्या विशेष समारोहात सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून मोहनराव भागवतांच्या सरसंघचालकत्वाला राष्ट्रीय सर्वमान्यता मिळण्याच्या दृष्टीने जी थोडीफार उणीव राहत होती त्याची पूर्ती मुखर्जींनी करून टाकली ० म्हणजे गमतीने म्हणायचे तर मुखर्जीच्या हातून दोन शपथविधी समारंभ पार पडले ० मोदींचा आणि मोहनरावांचा ०
राष्ट्रपती मुखर्जी आणि पंतप्रधान मोदी ह्यांचे संबंध त्या मर्यादित कार्यकाळात नेहमी सौहार्दाचे राहिले ०

संघाचा प्रचारक शासनप्रमुख म्हणून व्यवहार्यता आणि आदर्शवाद ह्याची सुरेख सांगड घालीत तळागाळातल्या माणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीने किती घोर परिश्रम करू शकतो ह्याचे रोल मॉडेल त्यांना मोदींच्या रूपात पाहावयास मिळाले आणि ते बदलले असे म्हटले जाते ० ते नेहमी मोदींच्या स्वास्थ्याची आपुलकीने चौकशी करीत ० मोदींच्या हातून देशाची सेवा घडली पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि ती काँग्रेसला संकट वाटू शकते ० मुखर्जींचे भाषण भावनाप्रधान होऊन केलेले नाही० ते बुद्धीने आणि पुष्कळ पुढचा विचार करून केलेले आहे ० घटनाधीन देशभक्ती म्हणजे राष्ट्रवाद असा विचार संघाच्या व्यासपीठावरून त्यांनी मांडला ० हाच विचार शेषराव मोरे गेली कित्येक वर्षे मांडत आहेत ० सावरकरांचे हिंदुराष्ट्र व्यवहारात येतांना हिंदी राज्य बनून येणार असून डॉ आंबेडकरांनी सिद्ध केलेल्या संविधानाचे निष्ठांपूर्वक पालन केले की एकात्म आणि प्रगत राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने अनके गोष्टी साध्य होतील असे मोरे म्हणत आले आहेत ०

संघाला घटनाविरोधी वर्तन मान्य आहे असे इतिहास सांगत नाही ० गांधीहत्येनंतर संघावर बंदी येताक्षणी गोळवलकर गुरुजींनी आधी संघ विसर्जित केला होता आणि नंतर संघ पुन्हा सुरु करण्यासाठी सनदशीर मार्गाने चळवळ सुरु केली होती ० संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नेहरूंना करू देऊ नये अशी भूमिका समाजवाद्यांपासून कम्युनिस्टांपर्यंत अनेकांनी घेतली होती ० तेव्हा शिवाजी महाराजांना वंदन करण्यास पंतप्रधान येत असतील तर त्यांचे स्वागत केले पाहिजे असे पत्रक गुरुजींनी काढले होते ० विद्वेषाच्या भूमिकेतून इंदिरा गांधींचा छळ करणे योग्य होणार नाही अशी उदारमनस्कतेची भूमिका सरसंघचालक बाळासाहेब देवरस ह्यांनी घेतली होती ० ह्याच मार्गावरून मोदी चालणार आहेत ०

घटनेच्या मार्गदर्शक तत्वांना अपेक्षित असणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयाने आग्रह धरलेल्या समान नागरी संहितेचा प्रश्न मोदी देशासमोर ऐरणीवर आणतील तेव्हा त्या मुखर्जी प्रणित घटनाधीन देशभक्तीचा विरोध करतांना काँग्रेसला आणि अन्य सेक्युलर पक्षांना दहावेळा विचार करावा लागेल ० मुखर्जींनी मुखातून एकही अधिकउणा शब्द जाऊन न देता मोदींचा आणि मोहनरावांचा मार्ग प्रशस्त केला आहे ० अर्थात कार्यक्रम झाल्यावर मुखर्जी मुखर्जीच राहतील आणि संघ संघच राहील असे भागवत म्हणाले त्याला भरपूर अर्थ आहे ० सगळ्या घटकांनी आपापल्या मर्यादांचे उल्लंघन न करता देशहिताच्या दृष्टीने एकजुटीने काम केले पाहिजे असे त्यांना सुचवायचे असावे ० जिचे सभासद गेली ९० वर्षे प्रतिदिन क्रीडांगणावर एकत्र येतात , खेळतात , कौटुंबिक चौकशी आपुलकीने करतात, सरकारकडून काही घेत नाहीत आणि निष्काम बुद्धीने अनेकानेक सेवाप्रकल्प राबवून एकात्मता साधण्याचे व्रत आचरतात अशी संघ ही ह्या देशातील एकमेव संघटना आहे ० अस्पृश्यतेपासून अधिमान्यतेपर्यंत अनेक अडचणी ह्या संघटनेसमोर उभ्या असतांना त्या दूर करण्याच्या दृष्टीने भूतपूर्व राष्ट्रपतींनी महत्वाचे पाउल उचलले आहे एव्हढे निश्चित ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

सातार्‍यातील उठाव

Next Article

निबंध स्पर्धा: तुम्हाला भावलेलं मुंबईचं रुप

You may also like