प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे

Author: Share:

जन्म : १७ सप्टेंबर  १८८५

स्मृतिदिन: २० नोव्हेंबर  १९७३

 प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे हे पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचा विचार आणि स्थापना यामध्ये प्रबोधनकारांचा मोठा वाट होता.

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे त्यांचा जन्म झाला. महात्मा फुले हे त्यांचे आदर्श होते. आणि त्यांच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले.

सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. बालविवाह, विधवा केशवपन, देवळामधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, अस्पृश्यता, हुंडाप्रथा याविरोधात त्वेषाने लढत राहिले. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी लढा दिला.

समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो, अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे त्यांचे मत होते. अर्थात, त्यांचा राग हा ब्राह्मणशाही वर होता, ब्राह्मणांवर नाही, धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मणांची भूमिका मांडली.

त्यांच्या कार्यामुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराजांनी जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.

मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले.

प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटकेही क्रांतिकारी समाजसुधारणावादी आहेत. महाराष्ट्र सरकारने प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्‌मय (५ खंड) प्रसिद्ध केले आहे ज्याचे संपादक पंढरीनाथ सावंत आहेत.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा. त्यांनी या चळवळीला सर्वस्व वाहिले, नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले.

लढा यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आपला मुलगा बाळ ठाकरे ह्याच्याकडे परप्रांतीयांची दांडगेशाही आणि वाढती बेरोजगारी मराठी अस्मितेची होणारी कुचंबणा याविरुद्ध लढण्यासाठी लढाऊ संघटनेची आवश्यकता बोलून दाखवली. त्या विचारातूनच शिवसेनेची स्थापना झाली.

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात म्हणूनच प्रबोधनकारांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

साहित्यकृती प्रकार
ऊठ मऱ्हाठ्या ऊठ लेखसंग्रह
कुमारिकांचे शाप वैचारिक
कोदंडाचा टणत्कार इतिहास संशोधन
खरा ब्राह्मण नाटक
ग्रामण्याचा साद्यंत इतिहास इतिहास संशोधन
जुन्या आठवणी ललित
टाकलेले पोर नाटक
दगलबाज वैचारिक
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे वैचारिक
देवांची परिषद वैचारिक
प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी इतिहास संशोधन
भिक्षुकशाहीचे बंड इतिहास संशोधन
रंगो बापूजी चरित्र
पं. रमाबाई सरस्वती चरित्र
वक्‍तृत्वशास्त्र माहितीपर
संगीत विधिनिषेध नाटक
शनिमाहात्म्य वैचारिक
शेतकऱ्यांचे स्वराज्य वैचारिक
श्री. संत गाडगेबाबा चरित्र
संगीत सीताशुद्धी नाटक
हिंदू जनांचा ऱ्हास आणि अध:पात अनुवाद

संदर्भ: मराठी विकिपीडिया

prabodhankar.org

Previous Article

शिवसेना कशासाठी? अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण

Next Article

२० नोव्हेंबर 

You may also like