पिंपळपान

Author: Share:

रोजचाच एक सामान्य दिवस, कालचा तसाच आजचा! फरक नाहीच काही. तीच ती कामं.. तोच तो दिनक्रम!! आयुष्य मागील पानावरून पुढे फक्त. त्याच त्या कामांचा रुक्ष उन्हाळा आणि गोठलेल्या माणूसपणामध्ये थिजलेल्या भावनांचा हिवाळा या द्वंद्वात मन मात्र पुरतं गांजून गेलं होतं. नेमकं काय हवंय तेच समजेनासं! देह यंत्रवत सगळी कामं उरकत होता, पण मन मात्र गोठ्यातल्या वासरागत दावं तोडू पहात होतं, आणि मी शिंपटी लावून त्याला पुन्हा जागेवर बसवत होते. हेही आता रोजचंच झालेलं..

इतक्यात अचानक वाऱ्याची एक झुळूक डोकावली. तिला बघूनही आधी जरा आठ्याच पडल्या कपाळावर. आता हि येनेर आणि पुन्हा माझं नीटनेटकं घर विस्कटणार! ज्या त्या कप्प्यात बसवलेलं घर..मन.. सगळंच पुन्हा पसरणार! पुन्हा त्या हसऱ्या झुळकीने विनवलं- ‘ए, घे की गं आत..फार त्रास नाही देणार तुला’ शेवटी घेतलंच तिला घरात, म्हटलं “ये बाई-” खुदकन हसत ती घरात शिरली, आणि ठाणंच मांडून बसली की! खरं खरं सांगू- सगळंच घर नाचरं झाल्यासारखं वाटलं. खिडकीतली छोटीशी झाडं, तिथेच खिळ्याला लटकून पडलेला शोपीस, पलंगावरची नीटनेटकी ताणून घातलेली चादर, हळूच थरथरले,चमचाळ्याला टांगलेले चमचे मंद किणकिणले.. टेबलावर पडलेलं वर्तमानपत्र उगीच थोडंस फडफडलं.. आणि त्याच्या शेजारीच पडलेल्या डायरीची काही पानं उलटून पुन्हा मागे गेली..!
रोजचं जगताजगता मागे पडून गेलेली काही पानं पुन्हा समोर आली. त्या पानांवर लिहिल्या होत्या काही आठवणी, सुगंधी माणसांच्या सुगंधी आठवणी!

या आठवणीना सुगंध होता तो डायरीत जपलेल्या बकुळफुलांचा..मंद आणि हवाहवासा. काय नव्हतं या आठवणींमध्ये? उडत्या पाचोळ्यामधून अलगद येऊन हातावर विसावणाऱ्या पिंपळपानासारखी तुम्हा सगळ्यांची मैत्री! त्यावेळी खूप खूप हौसेनी जमवली होती ही सगळी पिंपळपानं.काही तांबूस कोवळी, तर काही हिरवीकंच- मखमली. काही किडकी- फाटकीसुद्धा निघालीच! ती तशी निघाल्यावर झालेलं अतोनात दुःख.. सगळं सगळं पुन्हा ताजं झालं! आयुष्यात आलेल्या वादळांमध्ये त्यातली कित्येक पानं हातून उडून गेली, निसटून गेली.

फार थोडी जवळ उरली. पण उरी ती मात्र अजूनही ताजी आणि तशीच हिरवीकंच आहेत. जराही न सुकलेली!!तुझंही पान हातून निसटून गेलंय असंच वाटत होतं इतके दिवस. पण आजच्या झुळकीने सगळ्या पानांच्या मागे राहिलेलं तुझं पान पुन्हा वर आणलं. आणि लक्षात आलं की सगळ्यात वेगळं होतं ते! कारण माहित आहे? ते बाकीच्यांसारखं हिरवंकंच राहिलं नव्हतं आणि उडून गेलेल्या पानांसारख किडून किंवा फाटूनसुद्धा गेलं नव्हतं! त्याची एक सुंदर जाळी तयार झाली होती, मनात सदैव जपून ठेवावी अशी जाळी! सुख-दुःख सगळं आरपार! काही म्हणून स्वतःवर साठू न देणारी जाळी! प्रत्येक पानाची अशी जाळी होतेच असं नाही. आणि इतक्या कमी वेळात तर नाहीच नाही!! व्हायला हवी न खरं तर! पण प्रत्येक पान वेगळंच असतं. एकाच झाडाची असली न तरी! जाळी होण्याची क्षमता प्रत्येकात असेलच असं कुठे आहे? इच्छा असली तरी असं जाळीदार होणं नाही जमत सगळ्यांना. कुणाला पत्रावळी-द्रोण व्हावेत म्हणून टाचून- दुमडून घ्यावं लागतं, तर कुणाला अंगावर नैवेद्य वागवत देवाच्या पायाशी पडून राहावं लागतं.

बहुतांश पानांचा अंत शेवटी कचऱ्यात होणं ठरलेलं- निर्माल्य म्हणू फार तर! शब्द कोणताही घेतला, तरी परिणीती तीच- कचरा! कचऱ्याचं खत- खताची माती आणि मातीतून पुन्हा उगवणे- या चक्रातून सुटका नाहीच कोणाची! तू मात्र सुटणार आहेस! खात्रीच आहे! तुझं जाळीदार असणं-‘तुल्यनिंदास्तुतीर्मौनि संतुष्टो येनकेनचित’ असं तुझं जगणंच तुला यातून सोडवणार आहे! किती विचारांची आणि भावनांची गर्दी झाली आहे मनात! त्या सगळ्याच तुझ्यातून झिरपून जाणार आहेत अंशसुद्धा शिल्लक न ठेवता- हे ही माहित आहे. पण माझ्या सगळ्या पिंपळपानांमधल्या या जाळीदार पानाचा अभिमानच वाटतो इतकंच पोचावं तुझ्यापर्यंत!

अवचित आलेल्या त्या झुळूकीवर मी आधी वैतागले खरी, पण तिच्यामुळेच तुझं गर्दीत हरवलेलं पिंपळपान पुन्हा सापडलं याबद्दल ऋणीच राहीन मी तिची! खूप खूप बरं वाटलं. मनातलं लहान मूल हरखून गेलं, आणि प्रपंचातले उन्हा-हिमाचे चटके काही काळासाठी विसरून गेलं! या आठवणींवर पुढचा काही काळ तरी सुगंधी जाईल यात शंका नाही!

लेखिका: मैत्रेयी जोशी

Previous Article

१७ डिसें.ला ‘चला, वाचू या’चे २४ वे पुष्प; अभिनेत्री लतिका सावंत यांचा सहभाग

Next Article

रोहित शर्मा ६००

You may also like