पीएचडी – अजून खूप काही भाग २

Author: Share:

१८ डिसेम्बरला पदवीदान समारंभ ठरला होता. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम अध्यक्षस्थानी असणार होते. पण कार्यक्रम पुढे ढकलला गेला. नवीन तारीख चार दिवस आधीपर्यंत कळू शकली नव्हती. फोन उचलले न जाणं, कोणालाच माहीत नसणं अशी कारणं. १४ जानेवारीला समारंभ झाला. नियोजन आयोगाचे अध्यक्ष मॉटेंगसिंग अहलुवालिया अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला पांढरी साडी किंवा पंजाबी ड्रेस परिधान करणं अनिवार्य होतं.

मीरा रोडच्या आठवडी बाजारात एरव्ही भरपूर पांढरे लखनवी ६० रुपयांत मिळायचे. पण नेमका त्या सोमवारी मिळाला नाही. मग १३ तारखेला दादरहून १०० रुपयांतला एक ड्रेस आणला, फिटिंगला होईना. ड्रेसच्या संग्रहात जुना पण फारसा न वापरलेला एक पांढरा ड्रेस होता. पण शोधूनही तो मिळाला नाही! पुढेही कधीच मिळाला नाही!! माहीमच्या आत्याकडे “तुझ्या सुनेचा पांढरा ड्रेस आहे का?” चौकशी केली. पण तिच्या सुनेचाही होईना. समारंभाला वेळेत पोचण्याच्या दृष्टीने हातात वेळ कमी होता. १०० रुपयांतला ड्रेस घेतला तेव्हाच व्यवस्थित असलेला १५० रुपयांतला एक ड्रेस पाहिलेला. तो शोधून काढला. पांढरी सलवार, दुपट्टा आधीच परिधान केला होता. नवीन ड्रेसमधला कुडता छबिलदास शाळेच्या टॉयलेटमध्ये गुपचूप जाऊन बदलला नि कॉनव्होकेशन हॉल वेळेपूर्वीच गाठला. प्रचंड गर्दी होती. चारच्या सुमाराला जाहीर केलं, की काउंटरवरून सर्टिफिकेट्स मिळायची वेळ संपली. सगळ्यांनी एकच गिल्ला केला, “धिस इज नॉट फेअर”. मग वेळ वाढवली गेली.

पदवी, पदव्युत्तर नि पीएचडीचे विद्यार्थी प्रभातफेरीप्रमाणे रीतीनुसार क्षणभर हॉलमध्ये आलो. नंतर बाल्कनीत जाऊन बसलो.
गोल्ड मेडलिस्ट स्टेजच्या पुढे होते. विद्यार्थ्यांची नावं वाचून त्यांना स्टेजवर पाचारण केलं जात होतं. रीतीप्रमाणे ठरलेली काही वाक्यं कुलगुरू पुन्हा पुन्हा त्या त्या फॅकल्टीच्या नामनिर्देशापूर्वी उच्चारत होते. मात्र पीएचडीधारकांना स्टेजवर जायची संधी मिळाली नाही. माझ्याशेजारी अर्थशास्त्रात पीएचडी केलेल्या एक प्राध्यापिका बसल्या होत्या. आम्हा दोघींचं एकमत झालं, की पीएचडीधारकांची निदान नावं तरी वाचून दाखवायला हवी होती…

”माझ्या पीएचडीची ‘पब्लिसिटी’ मी केली नाही तर कोणीच करणार नाही” असा विचार करून ‘बातमी’साठी सगळ्या वृत्तपत्रांना अप्रोच झाले. सर्वात आधी मटात गेले. तिथले एक उपसंपादक कधीही भेटले, की पीएचडीची चौकशी करायचे. विद्यापीठाचं पत्र मिळण्यापूर्वीच पीएचडीची बातमी त्यांना सांगितलेली. हो हो म्हणता त्यांनी बातमी छापलीच नाही. जानेवारीत एकदा भेटल्यावर म्हणाले, “बातमी पुन्हा द्या, छापतो”. तोवर इतर वर्तमानपत्रांत येऊन ती शिळी झालेली. मग शहापूरचे मटाचे वार्ताहर प्रकाश परांजपे ( तत्कालीन विधान सभाध्यक्ष अरुण गुजराथी यांचे पीए ) यांची भेट घेतली. त्यांनाही मला भेटायचं होतंच. त्यांनी बातमी’मागील’ सविस्तर बातमी दिली. ती ७ फेब्रुवारीच्या अंकात आली. फोटो Convocationच्या ड्रेस कोडमधला होता. युनिव्हर्सिटीच्या फोटोग्राफ्ररकडून एकच प्रत मिळाली होती.

मटाच्या संबंधित महिला उपसंपादकाला स्कॅन केलेल्या फोटोची सीडी दिली. मात्र त्यांना मूळ प्रतच हवी होती. ती त्या परत करणार होत्या. पण त्यांच्याकडून तो हरवला. बातमीही जागेअभावी खूपच लहान छापली गेली. माझ्या दृष्टीने महत्त्वाचा बराच भाग आला नाही. लोकसत्ता, सामना, नवा काळ, लोकमत, नवशक्ती, महानगर, ठाणे वैभव, ललित यांनी बातमी छापली. मी स्वतः कोणालाच लिहून दिली नाही. संबंधित कागदपत्रं दिली. त्यांत माझ्या वाटचालीतले बरेच तपशील होते. पण तपशिलात जायचे फारसे कष्ट कोणी घेतले नाहीत. याबाबत अनुभवलं ते असं, की वार्ताहरांना बातमी ‘तयार’ करून द्यावी लागते. कोण बातमी कधी छापेल, माहीत नव्हतं. काही वर्तमानपत्रांतल्या बातम्या काही दिवसांनी हुडकून काढल्या. काहींच्या शेवटपर्यँत वाचायला मिळाल्याच नाहीत.असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnlineपीएचडीची बातमी देणं लोकसत्ताच्या धोरणात बसणारं नव्हतं. पण ‘अपवाद’ म्हणून तरी आपल्याला स्थान मिळेल असं वाटलेलं. बहुतांश वर्तमानपत्रांत संपादकांशी माझी आधीच ओळख असली तरी मी संबंधित शैक्षणिक प्रतिनिधीलाच आधी गाठायचे. लोकसत्ताच्या शैक्षणिक प्रतिनिधी म्हणाल्या, ”वरिष्ठ नाही म्हणाले”. मग कुमार केतकरांना खासगी पत्र लिहून फॅक्सद्वारे पाठवलं. ते त्यांच्यापर्यंत पोचलंच नाही. मग प्रत्यक्ष त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांना व्यक्तिशः भेटून ‘त्रास’ द्यायचा नव्हता, म्हणून विचारणा केल्यावर रवीन्द्र पांचाळ यांना भेटायला सांगण्यात आलं. त्यांच्याकडे जाता जाता साक्षात केतकरच कॉरिडॉरमध्ये भेटले. फॅक्सची प्रत त्यांना वाचायला दिली. त्याच काळात; लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीतली; एका पीएचडीधारकाची त्यांनाही माहीत नसलेली बातमी त्यांना दाखवली. पत्र वाचल्यावर त्यांचं मत अनुकूल झाल्यासारखं वाटलं. म्हणाले, ”नक्की विचार करतो”. मग पांचाळांना गाठलं. तोवर केतकरांचं त्यांच्याशी बोलणंही झालेलं. दुसऱ्या दिवशी पुरवणीच्या तिसऱ्या पानावर स्वतंत्र बातमी झळकली.

सगळ्या वर्तमानपत्रांनी दखल घेतली खरी, पण एका बाबतीत वाईट वाटत राहिलं. मला हे अजूनही कळलेलं नाही, की ही बातमी फक्त मुंबईची होऊ शकते का? कारण सगळ्याच वर्तमानपत्रांनी त्यांच्या मुंबई आवृत्तीतच बातमी छापली ! अगदी; ठाणे शहरातल्या माझ्या कित्येक ओळखीच्यांना वृत्तपत्रांतून ही बातमी समजली नव्हती. मुंबई नि परिसरापलीकडे ही बातमी पोचल्याचं जाणवलं तरी नाही. प्रा. अ. का. प्रियोळकर पुरस्कारांची बातमी नेहमी ५ सप्टेंबरच्या काही वृत्तपत्रांत येत असते. त्या वर्षी ती आलीच नाही! चौकशी केली तर वृत्तपत्रांना विद्यापीठाच्या मराठी विभागाने पाठवलेली बातमी मिळालीच नव्हती. मग मीच धडपड करून ती छापवून आणली. हा पुरस्कार डॉ. सरोज वसंत पाटणकर व मला विभागून देण्यात आला होता. १२५० रुपयांचा चेक घरी पोस्टाने आला.

‘ई’ मराठी वाहिनीवरील ( आताचं कलर्स ) ‘संवाद’च्या रूपाने माझ्या धडपडीला सर्वप्रथम थोडाफार न्याय मिळू शकला. नोव्हेम्बर ०६मध्ये ‘संवाद’संदर्भात राजू परुळेकरांशी संपर्क साधला. आमची ओळख नव्हती. पण माझ्याबद्दल त्यांना बरीच माहिती होती! फोन केल्यावर ”तुम्हाला नुकतीच पीएचडी मिळालीय ना! ‘… ‘त काम करता ना?…” वगैरे माहिती मी बोलण्यापूर्वीच त्यांनीच दिली. परुळेकरांना मुद्दा पटण्याचा मुद्दाच आला नाही! ४-५ दिवसांतच त्यांचा फोन आला, ”परवा मुलाखत करून टाकू. थोडा वेळ बोलू.” मुलाखतीच्या दिवशी तब्येत ठीक नव्हती. रात्री झोप नव्हती. स्टुडिओत कशीबशी वेळेत पोचले.

मुलाखतीला बराच वेळ लागला. मुलाखतपूर्व बोलण्यासाठी परुळेकरांना वेळ देता आला नाही. डायरेक्ट मुलाखत सुरू झाली. वाटलेलं – परुळेकर प्रश्न काय विचरणार ते कळून जुजबी तयारीला थोडा तरी अवधी मिळेल. पण ते बिझी असल्याने अगदीच आयत्या वेळी त्यांनी ठरवलं. अकादमिक, textual प्रश्न कितपत असतील नि पीएचडीच्या वाटचालीसंदर्भात कितपत असतील – काहीच अंदाज नव्हता. अकादमिक प्रश्नच जास्त विचारले गेले. १७ वर्षांच्या वाटचालीतलं पुस्तकी ज्ञान स्मरणशक्तीच्या आधारे मांडायचं असल्याने कन्टेन्टबाबत मी तात्पुरती ब्लँक होते. थोडीफार गांगरले. अडखळले. मनासारखं, नेमकेपणाने नाही बोलता आलं. बरंच बोलायचं राहून गेलं. खूप रुखरुख लागून राहिलेली. मुलाखत आटोपल्यावर मेकअपच्या त्याच अवतारात फ्रीलान्स काम करत असलेल्या दादरच्या ऑफिसात गेले. हातात ‘संवाद’चा मोमेंटो. बॉसनी प्रश्नार्थक कौतुकाने पाहिलं. मग मुलाखतीचं त्यांना सांगितलं.

मुलाखत झाली तो दिवस होता ७ नोव्हेम्बर २००७. “टेलिकास्ट व्हायच्या दहा दिवस आधी प्रसारणाची तारीख कळवतो”, परुळेकर म्हणालेले. २९ नोव्हेम्बरला सकाळी ८.३५ला बुलढाण्याहून एक फोन आला, “मी डॉ. खेडेकर बोलतोय. छान झाली तुमची मुलाखत… ” मी गडबडले. अनेक ठिकाणांहून फोन येत होते. मुलाखतीची मला काहीच कल्पना नव्हती. ‘संवाद’च्या ऑफिसने मला कळवलंच नव्हतं. ओळखीच्या सगळ्यांना ‘वर्दी’ द्यायची होती. मोबाईलमधला बॅलन्स संपलेला. जवळ पैसे नव्हते. दुपारी ‘अभिधानानंतर’च्या कामाचे पैसे हेमंत दिवटेकडून दुपारी कांदिवलीला त्याच्या घरी जाऊन आणणार होते. मग समोरच्या भाभींकडून उसने घेतले. घरी पेइंग गेस्ट ठेवलेले. ते रात्री घरी आल्यावर त्यांनी जल्लोषच केला.

बोरिवलीला ‘नवचैतन्य’ प्रकाशनात गुरुनाथ मराठेंना भेटण्याचं आदल्या दिवशी ठरलेलं. ते रद्द झालं. चालत-चालत, रिक्षा, बस, ट्रेनमधून काही लोकांना प्रत्यक्ष कळवत होते, sms पाठवत होते. ”आज रात्री ११. ३०ला रिपीट टेलिकास्ट बघा”.

प्रत्यक्ष मुलाखत पाहिल्यावर मी अवाक् झाले. कारण मला ठाशीवपणे, प्रभावीपणे बोलताच आलं नव्हतं. वाटलं, इतकं वाईट बोलू शकतो आपण? एक मुद्दा लक्षात आला, की अन्य लोक मुलाखतींत सराईतपणे बोलतात तेव्हा मुलाखत बहुदा त्यांच्या व्यवसायाशी संबंधित असते. ग्राहकांशी बोलण्याचा त्यांना सराव असतो. किंबहुना, समाजातल्या विविध घटकांशी ती लोकं सतत बोलत असतात!

मुंबईत दोन उत्स्फूर्त सत्कार झाले. बोरिवलीतील उपनगरीय साहित्य संमेलनात एका कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. प्रवेशद्वारावरच स्वागत मंडळातल्या आणि १५ वर्षांपूर्वी ओळख झालेल्या सुरेखा पाटील यांनी अभिनंदन करून स्वागत केलं. ही बातमी त्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितली. त्यांनी पत्रकार वैजनाथ भोईर यांना सांगितली. कार्यक्रम संपल्यानंतर निघायच्या तयारीत असताना पाटील यांच्या बहिणीने सांगितलं, “भोईर तुम्हाला बोलावताहेत”. भोईर यांनी समारोपाच्या कार्यक्रमापूर्वी स्टेजवर चिठ्ठी दिली, “या बाईंचा सत्कार करण्यात यावा”. शाल, श्रीफळ नि मोमेन्टोसह डॉ. विजया वाड यांनी सन्मानित केलं. मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाने एका कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं. त्यांचा ‘हेतू’ लक्षात आलेला. मृणाल गोरे यांच्या हस्ते हा सत्कार झाला. लवकरच शांताबाई भांडारे पुरस्काराने याच संस्थेने सन्मानित केलं. गावात काही सत्कार झाले. पहिला स्थानिक मसाप शाखेने आजोजित केला होता.

पण त्यांना एका वेगळ्या कार्यक्रमात माझा उत्स्फूर्त सत्कार करायचा होता. कार्यक्रमाला उपस्थित राहयचं त्यांचं निमंत्रण आईने फोनवरून वाचून दाखवलं. पण वेळेअभावी जाणं जमलं नाही. त्यांचा ‘हेतू’ नंतर कळला. तो सत्कार त्यांनी नंतर केला. तत्पूर्वी व्यापारी मंडळातर्फे आणि नंतर राष्ट्रवादीच्या युवा विभागातर्फे सत्कार झाला. या सत्कारावेळी आईवडील आले होते. माझ्या समाजात मी नक्की काय केलंय हे माहीत असण्याची शक्यता नसल्याने अभिनंदन होऊ शकलं नाही.

पीएचडी झाल्यानंतर ‘पोस्ट डॉक्टेरॉल’ पदवी मिळवण्यासाठी काय करावं लागतं याची चौकशी केल्यावर कळलं, ‘तुम्हाला १६००० भरावे लागतील’.

पीएचडीतून ‘मुक्त’ झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नव्हते. प्रश्न, परिस्थिती बदलली नाही. अस्थिरता, असुरक्षितता तीच राहिली. प्रत्यक्ष व्यवहारात घोर नैराश्य पदरी पडलं. पदवी मिळवून पायांवर उभं राहण्याचं स्वप्न कुचकामी ठरलं. व्यावसायिक भवितव्य उलट दिवसेंदिवस अधिकच कठीण बनत गेलं. माझी गुणवत्ता, धडपड माहिती असणाऱ्यांकडूनही दारुण अपेक्षाभंग होऊन जगणंच ओझं बनलं. फक्त जगणंच कसंबसं चालू होतू. त्या’पलीकडे’ जाऊन सर्वार्थाने सक्षम व्हायचं स्वप्न पाहू शकत नव्हते. अपमान, उपेक्षा, मनःस्ताप, फरफट…! ना आर्थिक स्थैर्याचा, ना मानसिक स्थैर्याचा मार्ग शोधूनही सापडत नव्हता. कौटुंबिकपेक्षाही डाॅमिनेटेड बाहेरचे संघर्ष होते. शिक्षण, न्याय नि माणुसकीवरचा उरलासुरला विश्वासच उडाला होता. प्रत्यक्ष राजकारणातही नसेल असं सत्तेचं हिडीस, ओंगळ रूप चोहोकडे अनुभवलं. विद्यापीठातला भोंगळ, अकार्यक्षम नि बेशिस्त कारभार तसेच वाढलेल्या कंपूशाहीमुळे विद्यापीठाचं नावही नकोसं झालं. शिक्षण की शिक्षा? असाच प्रश्न पडावा. दारिद्र्य, बेकारी, निवारा, प्रकृती अशा जगण्याच्या प्रश्नांशी कायम झुंजत राहिले.

घरीदारी मला तर कोणी वालीच नव्हता. ‘पाया’रहित आयुष्य जगावं लागल्याने नि ‘पार्श्वभूमी’ माहीत नसल्याने आणि आकसापोटी माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल गैरसमजच अधिक पसरले, हेतुपुरःसर पसरवलेही गेले. सुशिक्षित समाजाकडून सामावली गेले नाही. पीएचडीच्या गुणवत्तेचं चार जाणकारांकडून चारचौघांत कौतुक होण्यापलीकडे काही झालं नाही. तरी प्रयत्नपूर्वक शाबूत ठेवलेला आत्मसन्मान नि संवेदनशीलता मरू दिली नाही. खूपच प्रॅक्टिकल, सिलेक्टिव व जागरूक झाले. ताक फुंकून पितानाही १०० वेळा विचार करायला लागले. पीएचडीबाबत होईल / करू या अपेक्षा भ्रामक, मृगजळ ठरल्या. अडथळे अमर्याद होते, तरी पीएचडीला कधीच ‘गुंडाळावं’सं नाही वाटलं. पूर्ण समाधान झाल्यावरच प्रबंध सादर केला. जीव अडकला होता तिच्यात! फारच थोडे लोक ज्ञानासाठी शिकतात. सर्वस्व पणाला लावून जीवाची बाजी करणं काय असतं याची कल्पना कोणालाही येऊ शकणार नाही… तपश्चर्या, सत्त्वपरीक्षा हे शब्दही त्यापुढे फिके पडतील!

पदवीपर्यंत परीक्षार्थी, वरवरचं, पोकळ, दिखाऊ व औपचारिक शिक्षण लादलं गेलं. पण या पीएचडीने नि तिच्यामुळे जगण्यातल्या मिळवलेल्या पीएचडीने मला श्रीमंतीच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलंय याचा मला कोण सार्थ अभिमान आहे हे सांगायला शब्द शतशः अपुरे आहेत…

शिक्षणाबाबत फारशी मजल न गेलेल्या, स्वतंत्र विचारसरणीची कुवत नसलेल्या, लाचार जिणं खितपत जगत असलेल्या माझ्या समाजातल्या कित्येक स्त्रियांची दाहक आयुष्यं समोर दिसत असतात. तेव्हा वाटतं – माझ्या उदाहरणाने मी त्यांच्यापुढे काय ‘आदर्श’ ठेवू शकले? ‘खूप शिका, स्वतःच्या पायांवर उभ्या राहा’ असा संदेश दुर्दैवाने मी त्यांना नाही देऊ शकत. एकीकडे स्त्रीस्वातंत्र्य व समानतेचा गाजावाजा होत असताना उपेक्षित पण अनधिकृत दुर्बल सामाजिक घटक म्हणून प्रस्थापित समाजव्यवस्थेकडून आणि शिक्षणक्षेत्राकडून अपेक्षा एवढीच, की ‘माझ्या’सारख्यांच्या प्रश्नांकडे व्यक्तिगत किंवा वैयक्तिक बाब म्हणून न पाहता ‘विशुद्ध’ सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं गेलं तरच यापुढील सगळ्याच उपेक्षित घटकांना योग्य न्याय मिळेल !!!

@डॉ. उषा गायकवाडअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 

Previous Article

झुंडशाहीचे बळी..!

Next Article

निमगाव (वा) येथे कृषीदुतांचे आगमन

You may also like