पीएचडी – अजून खूप काही भाग १

Author: Share:

माझ्या पीएचडीच्या अभूतपूर्व संघर्षावरील लेख सप्टेंबर १६मध्ये मी फेसबुकवर पोस्ट केला होता. त्याला किमान पन्नास शेअर्स मिळून प्रत्यक्ष पोस्ट आणि इनबॉक्समध्ये थोरामोठ्यांचे सुमारे दोन हजार लाईक्स नि तेवढ्याच कमेंट्स मिळाल्या असतील. हा लेख वाचून प्रपंच दिवाळी अंकाचे संपादक महेंद्र कानेटकर यांनी हा लेख विस्तारित स्वरूपात प्रसिद्ध केला. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी आकाशवाणीवर; मराठी भाषा दिनानिमित्त माझी या संदर्भात मुलाखत घेतली गेली. लवकरच १० मार्च रोजी तृप्ती राणे यांनी नवशक्ती दैनिकात या संदर्भात माझ्यावर लेख लिहिला होता. विशेषतः ; ‘तुमची कहाणी आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे’ असा सूर वाचकांच्या प्रतिक्रियांत होता.

हा लेख ज्यांना वाचायचा असेल त्यांच्यासाठी लिंक पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे. म्हणजे तो लेख ज्यांनी वाचला असेल त्यांनाच आजच्या नवीन लेखाचे संदर्भ कळू शकतील.

९ मे २००४ रोजी प्रा. मीना गोखले यांचा फोन आला, “गाईडशिवाय पीएचडी करायची परवानगी विद्यापीठाकडून तुला मिळाली आहे. लवकरच अधिकृत पत्र मिळेल”. बरेच दिवस पत्र मिळालं नाही. चौकशी केल्यावर कळलं, ‘पाठवून खूप दिवस झाले’. तेव्हा चार वर्षांपूर्वी ठाण्याला राहत असताना केलेल्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर ते पाठवलं गेलं होतं! नव्याने पत्रव्यवहार केलेला पत्ता त्यांनी पाहिलाच नव्हता. मग झेरॉक्स प्रत मिळवली.

पीएचडीच्या सबमिशननंतर विद्यापीठापुढे रेफरीजचा प्रश्न निर्माण झाला. विद्यापीठाला अंतर्गत परीक्षक मिळेना. अनेक प्राध्यापकांकडे विचारणा केली गेली. अनेक बैठका झाल्या. काही रद्दही झाल्या. एखादी बैठक ५-६ महिन्यांनी असे. फोनवर अधूनमधून मी विचारणा करत होते. कंटाळून विषय डोक्यातून काढून टाकला होता. ‘सबमिशन झालं, आता द्या पीएचडी हवी तेव्हा…!’ अशीच मानसिकता बनवली.

२१ जुलै २००६ रोजी ऑफिसात काम करत असताना डॉ. गीता मांजरेकर यांचा फोन आला, “तुमच्या शहापूरच्या फोनवर फोन केला होता. तुमच्या आईला तुमचा पत्ता माहीत नाही. ८ ऑगस्टला व्हायवा आहे. छाया दातार घेतील. मी अंतर्गत परीक्षक असेन”. मी मीरा रोडला राहत होते. छाया दातार सोडून कोणीच माझा प्रबंध वाचला नव्हता. मीनाताई म्हणालेल्या, “रिराईटची तयारी ठेव”. तरी पीएचडी मिळण्याची मला खात्री होती. परीक्षकांच्या दृष्टीने माझं काम excellent होतं. पीएचडी मिळाल्याच्या ‘धक्क्या’तून सावरायला काही दिवस लागले. या क्षणासाठीच सोस सोस सोसलं. चर्चगेटला व्हायव्हा झाल्यानंतर शहापूरला तडक घर गाठून सर्वांना पेढे दिले.

पीएचडीच्या वाटचालीत काही सिंधी नामवंतांची आर्थिक मदत झाली होती. तशी पूर्वओळख कोणाशीही नव्हती. संघर्षाच्या धबडग्यात त्यांच्याशी पीएचडी होईपर्यंतच्या काळात काही संपर्क राहिला नव्हता. पेढे देण्यासाठी सगळ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. काही जण काळाच्या पडद्याआड गेलेले.

१९९७च्या सुमाराला सिंधी लिटररी असोसिएशनचे अध्यक्ष व एका सिंधी वर्तमानपत्राचे संपादक ठाकूर चावला या असामीशी ओळख झाली. त्यांनी असोसिएशनच्या एका मनोरंजनपर कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केलं. झुलेलाल देवाचं पैंडण असलेली चेन माझ्या गळ्यात घालून सन्मानित केलं. जेवण होतं. जेवले. त्यांच्या वर्तमानपत्रात त्यांनी माझ्याबद्दल छापलं. मी आर्थिक मदतीची विचारणा केल्याने ”असे साप्ताहिक कार्यक्रम असतात. नेहमी या, जेवून जा” म्हणाले. मी काही गेले नाही. त्यांचं घर नि ऑफीस माहीमला होतं. ”तुमच्या प्रबंधाच्या टायपिंगचा १५००० रुपये खर्च सी. ठकूर या गृहस्थांनी ( हे सी. ठकूर कोण होते हे इच्छा व्यक्त करूनही कळू शकलं नव्हतं ) स्पॉन्सर केला आहे ( पैसे त्यांच्याचकडे होते ). याच बिल्डिंगमध्ये माझी मुलगी शोभा हिचं कॉम्पुटर सेंटर आहे. तिथे काम सुरू करा”, म्हणाले. ऑपरेटर सिंधी होती. तिला मराठी कळत नव्हतं. ‘आहे’ हा शब्द ‘ओह’ असा टाईप होई.

इतर शब्दांची वाटच लागे. पहिलं प्रूफ तपासून झाल्यावर दुसरं प्रूफ आपण फक्त टॅली करतो. पण इथे तर पहिल्या प्रुफात नसलेल्या चुका दुसऱ्या प्रुफात, नि दुसऱ्या प्रुफात नसलेल्या चुका तिसऱ्या प्रुफात! शब्द, ओळी, परिच्छेद गायब होत. काम वाढलं. आंटीला सांगितलं तरी पुन्हा पुन्हा तेच! हतबल झाले. डोकंच सटकायचं. एकदा न लिहिता तोंडी एक परिच्छेद मी तिला डिक्टेक्ट केला होता. नंतर तो कधी आठवला नाही. …तरी रेटून नेलं. पण हे कमी म्हणून की काय, चक्क फुकट्यासारखंच ट्रीट केलं त्यांनी!! मी कुर्ल्याला होस्टेलला राहत होते. नोकरी करत होते. कधी कामाला रजा टाकून या कामासाठी अपॉइंटमेंट घेऊन गेलं तरी इतर ‘महत्त्वाची गिऱ्हाईकं’ आली, की ‘थोडा वेळ’ थांबायला सांगून चार चार तास बसवून ठेवत, कधी जायलाही सांगत. कित्येकदा आंटीला माहीतही नसे, ऑपरेटर परस्पर निर्णय घेत. तक्रार तरी कशी नि कोणाकडे करणार? हा प्रकार इतका वाढला, की अखेर पेशन्स संपला नि एकदा काम अर्धवट सोडून मी जी निघून गेले ती परत फिरकलेच नाही! काही दिवसांनी त्यांचा फोन आला, ‘तुम्हाला पैसे द्यावे लागतील.’ अर्थात, ते देणं शक्य नव्हतं! अखेर, शहापूरहून अपडाऊन करून दादरला प्रबंध नव्याने टाईप केला.

चावला नि आंटींना पेढे देण्यासाठी सुमारे दहा वर्षांनी अपॉइंटमेंट घेऊन गेले. आधी आंटीकडे गेले. कोरडं स्वागत झालं. तिथून चावलांना फोन लावला. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी पेढे गड्यामार्फत मागवून घेतले. त्यांच्या वृत्तपत्रात बातमी छापण्यासाठी कागदपत्रंही पाठवली. बातमी काही आली नाही.

सुंदरी उत्तमचंदानी या कथाकार लेखिकेशी माहीमच्या एका रस्त्यावर ओळख झालेली. तेव्हा कळलं, की त्या ठाकूर चावला यांच्याच कॉलनीत राहतात. आमची थोडीफार भावनिक जवळीकही निर्माण झाली होती. त्यांनी काही आर्थिक मदतही केली होती. पीएचडीनंतर भेटायचा प्रयत्न केला तेव्हा कळलं, की त्यांचा नवरा वारला नि त्या दुबईला मुलीकडे राहतात. अधूनमधून मुंबईत येतात. चावलांच्या कन्या म्हणालेल्या, त्या आल्या की कळवते. पण फोन काही आला नाही. एकदा कुठून तरी त्यांचा दुबईचा फोन नंबर मिळवला नि पीएचडीची बातमी देण्यासाठी लावला तर त्यांची मुलगी म्हणाली, ”आई दोन वर्षांपूर्वीच गेली!”

सिंधू साहित्य सभेचे अध्यक्ष झमटमल वाधवानी यांनी ३-४ वर्षं अत्यल्प पण नियमित मदत केली होती. वाधवानी यांचा बदललेला फोन नंबर कित्येक दिवस मिळत नव्हता. वरळीतलं त्यांचं ऑफीस हुडकूनच काढलं. भेट झाली नाही. मग फोन नंबर मिळवून बोलले, तर त्यांना काही आठवत नव्हतं. ”कशाला त्रास घेता? मी पेढे खातही नाही”, म्हणाले.

मुंबईत ज्यांच्या मोठ्या संस्था आहेत, कदाचित काही मदत करू शकतील अशा काही सिंधी लोकांपर्यंत प्रयत्न करूनही प्रत्यक्ष पोचू शकले नाही. एक संस्थेने ५०० रुपयांची मदत केली. त्यांच्यावर एक लेख लिहून छापवून आणायला संस्थाप्रमुखांनी सांगितलं. लेख लिहिला, पण वर्तमानपत्रांनी काही छापला नाही. मग मदत बंद झाली. प्रबंध सादर होण्यापूर्वी पुन्हा एकदा त्यांना विचारणा केली. ‘आमच्याकडे अशी provision नाही,’ त्यांचं उत्तर आलं. त्यांना प्रत्यक्ष भेटून पेढे दिले. नोकरीबाबत बोलायचं होतं. फोन करा, म्हणाले. फोन केल्यावर त्यांनी विचारलं, ”काय काम आहे?” ”नोकरी” ”बायो डेटा पाठवून द्या,” म्हणाले. खरंतर, प्रत्यक्ष भेटून मला त्यांना माझ्या माहीत नसलेल्या पार्श्वभूमीबद्दल बोलायचं होतं.

पंडित भारद्वाज हे सिंधीतले नामवंत ज्योतिषी. सायनला काही काळ त्यांच्याकडे कारकुनी केली. नोकरीचा अनुभव फारसा चांगला नव्हता. पेढे देण्यासाठी त्यांचं नवीन घर शोधून काढलं. गेल्या गेल्या त्यांची बायको भेटली. त्यांचा चेहरा सुतकी वाटला. ”काय काम आहे?” त्यांनी विचारलं. ”पंडितजी आहेत? पीएचडीचे पेढे द्यायचे होते”. ”हो बस,” म्हणून आत गेल्या. बराच वेळ आल्या नाहीत. आल्यावर म्हणाल्या, ”जा आत”. गेले तर त्यांचा मुलगा ज्योतिषाच्या वेशात बसला होता. कामावर असताना पंडितजींच्या कुटुंबाने मला बराच त्रास दिला होता. मनात शंकेची पाल चुकचुकली. ”बोला”, मुलगा म्हणाला. ”पेढे द्यायचे होते. पंडितजी?” ”He is no more !” पेढे पुढ्यात ठेवले. ”सॉरी,” त्याला नि बाहेर आंटीलाही बोलून विषण्ण मनाने बाहेर पडले.

डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या शिफारसीमुळे मी अनेक मदतकर्त्यांपर्यंत पोचू शकले होते. पेढे देण्यासाठी खूप तंगडतोड करून त्यांना उत्तनला भेटले. “अहो, कशाला पेढे? पैसे लागतात त्यासाठी!” ते म्हणाले. असं म्हणण्यामागे त्यांच्या सद्भावनाच होत्या.

पेढ्यांपासून कोणालाही वगळलं नाही. अनेकांना ग्रीटिंग कार्ड्स दिली. मराठी विभागातल्या सगळ्या प्राध्यापकांना पेढे दिले. अगदी मार्गदर्शकांनाही! प्रबंधात त्यांचे आभारही मानले. कारण त्यांनी मार्गदर्शकत्व पत्करलं नसतं तर मी पीएचडी करूच शकले नसते. नंतर छळवाद मांडून त्यांनी त्यांची जबाबदारी झटकली तो भाग पूर्ण वेगळा! तर – मी पेढे द्यायला आलेलं पाहून ते जवळच कुठेतरी गेले.
मी आल्याचा शिपायाने त्यांना निरोप पाठवला. “मला वेळ नाही”, त्यांचा निरोप आला. मग पेढा त्यांच्या टेबलवर ठेवून मी गेले. तासाभरात ते आले. मी विभागातच असल्याने त्यांना भेटलेच. “forget & forgive हा तुमचा गुण वाखाणण्याजोगा आहे,” म्हणाले. प्रा. वसंत पाटणकर म्हणाले, “माफ करा. आम्ही काहीच करू शकलो नाही”.

एका फौंडेशनच्या सिंधी असलेल्या संचालकांना प्रबंध सबमिशनच्या काळात आर्थिक मदतीसाठी विचारणा केलेली. विद्यापीठाच्या कुलगुरू संचालक मंडळात होत्या (होस्टेल प्रकरणात त्यांचा संबंध आलेला ). त्यांना विचारलं, “फाऊंडेशनतर्फे काही मदत होईल का?” “हो” म्हणाल्या. त्यांच्या सांगण्यानुसार संचालकांसाठी मॅडमना ताबडतोब अर्ज लिहून दिला. “कळवते,” म्हणाल्या. बरेच दिवस वाट पाहून त्यांना विचारलं, “Appointment घेऊन सरांना परस्पर भेटलं तर चालेल का?” “हो” म्हणाल्या. त्याप्रमाणे सरांना भेटले. पण अर्ज त्यांच्यापर्यंत पोचलाच नव्हता. माझ्याबद्दल शक्य तेवढं त्यांना सांगितलं नि विचारलं, “मॅडमचा संदर्भ वगळून मदतीसाठी तुम्ही कृपया कन्सिडर करू शकता का? किंवा त्यांना फोनवर बोलायला सांगितलं तर चालेल का?” “सांगा,” म्हणाले. सरांच्या केबिनबाहेरून मोबाईलवरून बाईंना फोन लावला. “सरांना फोन करते,” म्हणाल्या. सरांना बराच वेळ फोन आला नाही.

हाच प्रकार पुन्हा दोनदा झाला. शेवटी “सर, सॉरी, काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. बाईंना तुमच्यासमोर फोन लावते. बोलाल का?” विचारलं. ( मोबाईल १००० रुपयांचा सेकंड हँड होता. सरांसमोर तो काढायचा नव्हता. नाइलाजानेच काढावा लागला ). सरांचा नकार. “त्यांनाच करू द्या” या त्यांच्या म्हणण्यावर ते अढळ राहिले. त्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला. अखेर, बाहेर प्यूनकडे बायोडेटा देऊन “मॅडमचा फोन आलाच तर कृपया कळवा,” मी म्हणाले. बसस्टॉपवर येताना नि आल्यावरही कोणालाही कलणार नाही याची दक्षता घेत हमसाहमशी रडले… बाईंना अर्ज दिलेला तेव्हाच कल्याणच्या जयप्रकाश पठारेंनाही मदतीसाठी भेटायचं बाईंनी सुचवलं होतं. पठारेंनी काही आर्थिक मदत केली. बाईंना पेढे व थँक्स कार्ड आवर्जून द्यायला मोठ्या मुश्किलीने विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात भेटले. पीएचडी झाल्यावर एका मासिकासाठी बाईंची मुलाखत घेतली होती. बरेच दिवस त्यांची अपाईमेंट मिळत नव्हती. एकदा फोन केल्यावर अनपेक्षितपणे मिळाली. पण तासाभरातच त्यांच्याकडे पोचायचं होतं. मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात होते. काहीतरी छोटी भेटवस्तू घ्यायची होती. कुडत्याच्या खिशात जेमतेम वीस रुपये होते. फक्त पंधरा रुपयांची शिंपल्यांची गणपतीची मूर्ती दादर पश्चिमेला जाऊन शोधून काढली…

क्रमशः

@डॉ. उषा गायकवाडअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 

Previous Article

चीन नावाचा ससा आणि जग नावाचं कासव.

Next Article

व्यावसायिक अंध त्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे प्रशासनाची भूमिका.

You may also like