पत्रकार दिन- अर्थात पहिले मराठी वर्तमानपत्र “दर्पण’ सुरु झाले तो दिवस

Author: Share:

आज पत्रकार दिन.

का? मराठीतील पहिले वर्तमानपत्र “दर्पण” हे आज दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु झाले. आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित झाला. आणि या वर्तमानपत्राचे प्रवर्तक होते बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर. आणि त्यावेळी त्यांचे वय अवघे २० वर्षे होते. मराठी आणि इंग्रजी असे दोन स्वतंत्र कॉलम वर्तमानपत्रात असायचे.

ब्रिटीश राजवटीचा सुर्य न मावळणारे दिवस ते. हि राजवट अस्तास न्यायची असेल तर लोकांमध्ये जागृती घडवूनच होऊ शकते, आणि त्यासाठी लेखणी हे माध्यम आहे या विचारातून या देशभक्त सामाजिक जाणीवेच्या तरुणाने हा प्रकल्प हाती घेतला. या अर्थाने केवळ मराठी पत्रकारिताच नव्हे तर पत्रकारितेच्या मुलभूत जाणीवेचा आणि जबाबदारीचा पाया ह्या दिवशी घातला गेला.

सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात जांभेकरांचा जन्म झाला. लहानपणापासूनच ते प्रचंड हुशार होते, विविध विषयात त्यांचा अभ्यास होता. मराठी संस्कृत इंग्रजी हिंदी, बंगाली, गुजराती,ग्रीक, फ्रेंच आणि लेटिन अशा विविध भाषात ते पारंगत होते.

दर्पणचा शेवटचा अंक जुलै १८४० मध्ये निघाला.दर्पण मधून त्यांनी विविध सामाजिक विषयांवर भाष्य केले, विशेषतः विधवा पुनर्विवाह!. याची परिणती पुनर्विवाहासाठी मोठ्या चळवळीत झाली. विविध विषयांवर शास्त्रीय दृष्टीकोन जागृत झाला पाहिजे हा दर्पण मधून त्यांचा प्रयत्न होता. अवघ्या ८ वर्षांच्या काळात दर्पण यात यशस्वीही झाले असे म्हणावे लागेल. मात्र त्याहूनही, समाजमन घडवण्याचा हा प्रयत्न यापुढील सर्व लेखनिक क्रांती आणि प्रयत्नांचा पाया ठरला. पुढे, सर्व समाजसुधारकांनी लेखणीचा सक्षम वापर केल्याचे आपल्याला दिसते, या विचाराची सुरुवात जांभेकरांनी केली.

याच वर्षी ‘दिग्दर्शन’ नावाचे मासिक त्यांनी सुरु केले. दिग्दर्शन ह्या नावातच त्याच्या अस्तित्वाचा अर्थ होता. मराठी तरुणांना विविध विषयात मार्गदर्शन करण्याचे काम पुढील पाच वर्षे या मासिकाने केले. भौतिक, विज्ञान, इतिहास, भूगोल अशा विविध अंगांना ह्या मासिकाने स्पर्श केला.

ह्या व्यक्तिमत्वाचे कार्य इथेच संपत नाही. विद्येच्या या भक्ताने इतर माध्यमातून समाज घडवण्यासाठी प्रयत्न केले. ज्ञानेश्वरीची पहिली मराठी प्रत १८४५ साली जांभेकरांनीच प्रसिद्ध केली. ते पहिले भारतीय होते ज्यांचे एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात रिसर्च पेपर छापून आले. तरुणांसाठी “बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी” या वाचनालयाची स्थापना त्यांनी केली.

महाराष्ट्रात ठराविक कालांतरानी विविध तज्ज्ञ, विचारवंत, अभ्यासक आणि बुद्धिमंतांनी जन्म घेतला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय जीवन त्यांनी समृद्ध केले आहे, महाराष्ट्र घडवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. १८३२ ते १८४६ हा काळ असाच दर्पणकारांच्या विद्वत्तेने भारून गेला होता.

या विद्यावंताचे १८ मे १८४६ रोजी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी निधन झाले.

दर्पणकार बाळ गंगाधरशास्त्री जांभेकरांना प्रबोधकतर्फे विनम्र आदरांजली!

Previous Article

ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच ती वेळ, हाच तो क्षण

Next Article

६ जानेवारी 

You may also like