पंडिता रमाबाई सरस्वती

Author: Share:

जन्मदिन २३ एप्रिल १८५८

स्मृतिदिन: ५ एप्रिल १९२२

पंडिता रमाबाई सरस्वती समाजातील वाईट चालीरीतींविरुद्ध झगडणारे एक सन्माननीय नाव आहे. परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी विदुषी होत्या.

पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. त्यांनी आपली पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली.

दीडशे वर्षांपूर्वीचा समाज अज्ञान, पारंपरिक विचारसरणीच्या अंधकारात अडकला होता. मुलींना तर बाहेर पडणे शक्यही नव्हते. त्या काळात अनंतशास्त्रीनी मुलीला संस्कृत शिकवले. मुलीवर लग्नासाठी दबावही आणला नाही. उलट शक्य तेवढे ज्ञान ग्रहण कर असा उपदेशच केला. पंडिता रमाबाईनी पुढे केलेले कार्य ते पाहू शकले असते तर त्यांना धन्यता वाटली असती. मात्र रमाबाईंच्या वयाच्या १७व्य वर्षीच त्यांचे पिता आणि माता यांचे निधन झाले. पंडित रमाबाई आणि त्यांचा भाऊ अनाथ झाले.

पित्याने दिलेल्या संस्कृताच्या शिदोरीच्या जोरावर रमाबाई भारतभर हिंडल्या. आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी अनेकांना चकित केले. कोलकत्याला सिनेट हॉलमध्ये प्रचंड मोठा समुदाय त्यांना ऐकण्यासाठी आला होता. इथेच त्यांना ‘सरस्वती’ आणि ‘पंडिता’ ह्या [पदव्या मिळाल्या आणि रमाबाईंच्या विद्वत्तेला लोकमान्यता मिळाली. पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या त्या काळातील एकमेव महिला होत. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.

१८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलाशी त्यांनी लग्न केले. हा विवाह सुद्धा त्या काळातील क्रांतिकारी होता. कारण पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते. पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते.

दुर्दैवाने १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर,सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. १८८३ साली त्या इंग्लंडला गेल्या. तेथे चेल्टनहॅम लेडीज कॉलेज या महिला महाविद्यालयात त्यांनी संस्कृत शिकवले. १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या. भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले.

१८८३ साली सरकारच्या शिक्षणासाठी नेमलेल्या हंटर आयोगासमोर त्यांनी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला, हे विशेष!

११ मार्च १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली. त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले. २४ सप्टेंबर १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला.

आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. ’मुक्तिसदना’ त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या मदतीने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली.

महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. ‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते.

१९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च पुरस्कार कैसर-ए-हिंदने गौरविण्यात आले.  १९२२ मध्ये केडगाव येथे निधन झाले.

१९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीट काढण्यात आले. स्त्रियांना सर्व तर्हेच्या कुचंबणांना सामोरे जावे लागण्याच्या काळात संस्कृत भाषेसहित इतर भाषांचे अध्ययन करून आणि , स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी भरघोस प्रयत्न करून भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व कार्याचा ठसा उमटवला आहे.

या थोर विदुषीला स्मार्ट महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!

संदर्भ: मराठी विकिपीडिया

Previous Article

ओझं

Next Article

कवी, कविता आणि मानधन

You may also like