Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पाऊले चालती आनंदाची वाट…

Author: Share:

तत्त्वज्ञानात विशेषतः भारतीय तत्त्वज्ञानात आणि अध्यात्मात ‘ध्यानाचे’ स्थान अध्ययनाच्या व स्वाध्यायाच्या बऱ्याच पुढच्या टप्प्यावर येते. पतंजली योग्य सूत्रात, महर्षी पतंजलींनी ‘अष्टांग योग'(यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी) सांगितला आहे. त्यात ‘ध्यान’ हे सातवे अंग आहे; म्हणजेच ‘समाधीच्या’ एक पातळी आधीचे.वेदांतामध्येही ‘ध्यानाचे’ स्थान पुढच्या टप्प्यावर आहे. आत्मसाक्षात्काराकडे होणाऱ्या वाटचालीत ‘ध्याना’ची महत्त्वाची भूमिका असते.

योगाभ्यास, योग साधना, अध्यात्म, नित्य साधना, दैनंदिन साधना या सगळ्याच्या पद्धती वेग – वेगळ्या आहेत. आदर्शानुसार, अष्टांग योगाचा मार्ग अनुसरताना यम – नियमांपासून (यम – अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आणि नियम – शौच, संतोष, तपस्, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान) सुरुवात केली जाते. आपल्याला याची कल्पना असेलंच. काही वेळा सर्वसाधारणपणे आपला हा समज असतो की योग साधना करायची म्हणजे थेट आसनांचीच सुरुवात करायची. त्याने कदाचित काही त्रास होणारही नाही; पण एखादी पद्धती आत्मसात करायची असेल तर ती जशी आहे त्या शिस्तबद्धतेनुसारंच आपणही त्याचे अनुसरण केले तर ते योग्य ठरेल, असे मला वाटते.

पतंजली योग सूत्रात ‘यम’ ही ‘निषेधात्मक बंधने’ व ‘नियम’ हे ‘आदेशात्मक बंधने’ या स्वरूपात मांडली आहेत. ‘निषेधात्मक बंधने’  म्हणजे त्यात ‘काय करू नये’ हे सांगितले आहे व ‘आदेशात्मक बंधने’ म्हणजे त्यात ‘अमुक करावे’ असे सांगितले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार यांना ‘बहिरंग’ असे म्हटले जाते व धारणा, ध्यान आणि समाधी यांना ‘अंतरंग’ म्हटले जाते. ‘बहिरंग’ म्हणजे बाह्य योग किंवा  बाहेरचा / बाह्य मार्ग. उदा.: त्राटक.’अंतरंग’ म्हणजे अंतरंग चेतना; अंतस्थ योग किंवा आतील मार्ग. अंतरंग चेतना म्हणजे योगी / साधक ध्यानस्थ अवस्थेत जे अनुभवतात ‘ते.’

तपस्, स्वाध्याय, आणि ईश्वरप्रणिधान या तीन नियमांना योगमार्गात खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. या तिन्ही नियमांना मिळून ‘क्रियायोग’ असे म्हटले जाते. संपूर्ण अष्टांगमार्गाऐवजी योग्याने / साधकाने निष्ठेने हा क्रियायोग आचरणात आणला तरी त्याला योगाचे संपूर्ण फल प्राप्त होते, असे पतंजली स्वतः म्हणतात.

यम – नियमांचे पालन करणे हे आसने अधिक छान आणि लाभदायी होण्यासाठी पूरक ठरते. आसने केल्यावर शरीराला जो व्यायाम होतो त्याने पुढे प्राणायाम व ध्यानही अजून चांगले होण्यास मदत होते. आपल्याला हलके वाटते. ध्यान अजून जास्त खोलवर होते.

‘अष्टांग मार्गाचा हा असा क्रम असतानाही आपण ‘ध्यान’ कारण्याविषयीच सुरुवातीपासून का बोलत आहोत?’ – असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. त्याचे कारण असे की आपण घर बसल्या किमान अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल सुरु करू शकतो. एखादी व्यक्ती – गृहिणी असो अथवा नोकरी करणारी असो, तरुण असो वा निवृत्त असो; प्रत्येक व्यक्ती घर बसल्या सहजपणे ध्यान करू शकते.

अध्यात्माचे बरेच पैलू आहेत. त्यापैकी पुढील तीन पैलूंवर माझे गुरु ‘श्री श्री’ भर देतात – “ध्यान, ज्ञान और गान.” ‘ध्यान’ केल्याने चित्त स्वस्थ होते. ‘ज्ञानातून’ शहाणपण येते. जेव्हा आपले मन स्थिर नसते, विचलित झालेले असते किंवा आपण कोणत्यातरी गोष्टीमुळे निराश असतो / हताश असतो तेव्हा हे ‘ज्ञानंच’ आपल्याला आधार देते, आपले मनोबल वाढवते. तसेच जीवनातील चढ – उतारांना सामोरे जाण्यास बळ देते. खडतर परिस्थितीतून वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करते. ‘गाण्यामुळे’ / ‘संगीतामुळे’ मनस्थितीवर सकारात्मक परिणाम होऊन आपले मन प्रसन्न, आनंदी राहते (Music uplifts our state of mind). या सगळ्यातून आपल्याला हे दिसून येते की योग किंवा कोणतीही पद्धती एक प्रकारचे अनुशासन आहे आणि हे अनुशासन कोणीही आपल्यावर लादलेले नसून ते आपण स्वखुशीने स्वीकारलेले असते. यामुळे सद्हेतू, सदाचरण आणि सचोटीची व सूज्ञ वागणूक विकसित होण्यास मदत होते.

या सगळ्यांच्या समन्वयातून जेव्हा आपण समतोल साधू शकतो तेव्हा आपल्याला एक अननुभूत असा परमोच्च आनंद अनुभवायला मिळतो. आपण जर योग साधना किंवा आपली जी दैनंदिन साधना असेल ती नियमित आणि सातत्याने करत राहिलो तर या आनंदाशी आपली घनिष्ट मैत्री होईल आणि हा आनंद आपल्या मनात घर करून राहील. हळू हळू ‘आनंद’ (आनंदी राहणे) हा आपला स्थायी भावंच होऊन जाईल आणि आपण आनंदयात्री होऊ!

– आभा पांडे – बागाईतकर

aabha.akp6@gmail.com

© Copyrights reserved

Previous Article

नवीन वर्षाची पहिली सुरुवात नफ्यामध्ये: सेन्सेक्स ची २८६ पॉइंट्सची उसळी

Next Article

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर: अण्णासाहेब किर्लोस्कर 

You may also like