गावाकडे पहा

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


अलिकडे गावात रोजगार उरला नसल्याचे जाणवत आहे. असे दिसते आहे की सगळी मंडळी गावाकडून शहराकडे धाव घेत आहे. आम्ही रोजच असे अनुभवतो आहोत.

आता गावंही गावासारखं राहिलेलं नाही. या गावात आज शहरीकरणाचा आभास होत असुन तिथे मिळत असलेल्या सोयी सुविधा ह्या काही अंशी सारख्याच वाटतात. अगदी पाण्याच्या नळापासुन तर रस्त्यापर्यंतच्या सुविधा…..

गावातील रस्ते आता डांबरीकरणाचे उरलेले नाहीत. त्याची जागा आता सिमेंटीकरणानं घेतलेली आहे. गावागावात आता सिलेंडरही पोहोचलेला असून त्यांच्याही बँक खात्याला आधार जोडलेला आहे. फरक मात्र एकच दिसतो. तो म्हणजे स्नेहभाव. तो मात्र गावात निराळा आणि शहरात निराळा आहे.

शहरी भागातही पुर्वी स्नेहभाव होता. मानमरातबाने माणसे वावरत होती.सकाळी उठल्याबरोबर माणसे गुड मार्नींग न म्हणता नमस्कार म्हटल्याशिवाय आपल्या कामाची सुरुवातच करीत नसत. तसं पाहता हीच मानमरातबाची प्रथा ही ग्रामीण भागातही होती. पाहुण्यांचा पाहुणचार आठ आठ दिवसपर्यंत चालत होता. त्यांचं आठ आठ दिवसाचं जेवण खावण. त्यातही त्या पाहुण्यांना खारट तिखट, गोड या सर्व चवींचं चविष्ट भोजन दिलं जायचं. जेणेकरुन पाहुण्यांनी नाव ठेवुन जावु नये. हा उद्देश होता. काळानुसार महागाई जरी वाढली तरी त्याची झळ गावात ब-याच उशिरापर्यंत पोहोचली नाही. आज मात्र गावात तेवढा मान सम्मान उरलेला नाही. आजचा पावणा गावात आठ दिवस सोडा, चार दिवसही टिकत नाही.कारण महागाई.

पुर्वी एका एका परीवारात दहा दहा मुलं राहायचे. या मुलांना जगवायला तेवढा नेट लागायचा नाही. सर्वांना पुर्ण कपडे मिळाले पाहिजेच याचं बंधन नव्हतं. कोणाला शर्ट मिळायचं तर कोणाला……लोभ नव्हता. वासनाही नव्हती. लहान मुलांना तर वयाच्या दहा वर्षापर्यंत कपडेच मिळायचे नाहीत. त्यांच्या नाकातुन सतत शेंबुड वाहात राहायचं. पण त्यांना दवाखान्यात जायची गरज नव्हती. शिवाय साबण सोड्याचीही आवश्यकता नव्हती. जवळच्या नदीवर किंवा तलावावर जावुन महिला वर्ग आपले कपडे धुवायच्या. साबण न वापरता त्याऐवजी रिठ्याचा वापर होत होता. त्या रिठ्याच्या परिसस्पर्शाने साबनाहुनही चांगले स्वच्छ कपडे धुतल्या जायचे. प्रेस नसल्याने प्रेसचे कपडे घातलेच पाहिजे असं बंधन नव्हतं. चार दोन श्रीमंताच्याच घरी प्रेसचे कपडे घालायची प्रथा होती. तीही मंडळी प्रेस करताना गडव्यामध्ये विस्तव भरुन ते गरम होताच त्यावर कापड बांधुन प्रेस करीत असत.

खर्रा, जुवा यांचा शौक नव्हता. ते शौकं फक्त श्रीमंत मंडळी करायची. दारुची तेवढी किल्लत नव्हती. हर गावागावात घरोघरी दारु काढली जायची. ह्यातील मद्य एक शौक म्हणुन न पिता कुटूंबातील सर्वच सदस्य केवळ रोगरोधक पदार्थ म्हणुन प्यायचे. मनोरंजनासाठी कोंबड्याची काती अर्थात कोंबडे लढविणे, रेड्याची झुंज. बैलाच्या शर्यती (शंकरपट) यासारख्या गोष्टी होत्या. अगदी आनंद वाटायचा ग्रामीण जीवन जगतांना.

मोटारगाड्यांचा शोध लागला. त्यानुसार गावातील माणसे शहरात येवु लागली. व्यापार करु लागली.व्यापार करता करता शहरी संस्कृतीही ते खेड्यात नेवु लागली. शहरातील लोकांच्या राहण्याच्या सवयी, पोशाख, मनोरंजन ह्या गोष्टी ग्रामीण भागातही आवडायला लागल्या. ते शंकरपट, कोंबड्याची झुंज कालबाह्य झाली. त्याची जागा क्रिकेटने घेतली. पोशाखातही तोकडे कपडे आले. कबड्ड्या, लंगड्या लगो-या सारे खेळ कालबाह्य झाले.

मानमरातब, आदर ह्याही गोष्टी नष्ट झाल्या. सरपणावर शिजणारं अन्न ही गायब झालं. तसेच मातग्यातील भाजीही गायब होवुन त्याची जागा स्टील कलईने घेतली. सकाळी पेय म्हणुन घेतला जाणारा दुध, त्याजागेवर चहा आला. रोगसंख्येत यामुळेच वाढ झाली आणि आता शहरातला डाँक्टर खेड्यातही आला.

पुर्वी खेड्यात जास्त बिमा-या नव्हत्या. आता मात्र बिमा-या वाढल्या. तसेच रिठ्याची जागा साबनाने घेतली. तसेच मुला मुलींच्या वासनेचेही रंग बदलले. शहरात बागेमध्ये फिरणारी तरुण तरुणी खेड्यात कानबैरीत, गव्हाच्या व तुरीच्या शेतात जावु लागली आणि भलत्याच नादात पडुन कुवारपणी गर्भधारणा करु लागली. खांद्यावरचा सेव गेला. लुगडे गेले. धोतर गेला. सा-याच गावच्या गोष्टी या शहराने खेचुन नेल्या. एखाद्या स्मशानागत. आज गाव हे गाव राहिलेलं नाही. त्याचंही शहर झालं आहे.

शहरातील मानमरातब खेड्यातुनही गहाळ झाला आहे. माणसे खेड्यातही विकली जात आहेत. शेते पिकत नाही. मुलं शेतावर काम करीत नाही. ते दारुच्या अड्ड्यावर, जुव्व्याच्या अड्ड्यावर, तसेच पानठेल्यावर दिवस रात्र दिसतात. हे सारं परीवर्तन केवळ शहरीकरणानं नाही तर महागाईच्या भष्मासुरानं केलं. शहरातील महागाई खेड्यात शिरल्यानच सारं खेड्याचं सुख नष्ट केलं. पुर्वीची वस्तुविनिमयाची पद्धती खेड्यातुन नष्ट झाल्यानं सलोखा उरला नाही. मानमरातब तर नाहीच नाही. आता लग्नाचा एक दिवसाचा पाहुणा जड जातो.

आम्हाला आज शहर नको आहे. पुर्वीचे खेडे हवे आहे. जिथे मानमरातब होता. दुस-याच्या सुखदुःखात धावुन जाणारी माणसे होती. एखाद्या गरीबाच्या घरी जर लग्न असलं तर परतफेडीचा हव्यास न करता सढळ हाताने गावातील श्रीमंत मंडळी त्या गरीबाला मदत करीत. गावातील एखादा वयस्क माणुस रस्त्याने जात असला तर त्याच्या पुढून महिला डोक्यावर पदर घेवुन जायच्या. लहान मुलंही वयस्कासमोर तोंडाला तोंड देत नसत. त्यांच्या आज्ञेत वागत. नव्हे तर गावच्या मास्तरसमोर विद्यार्थी नतमस्तक होवुन पुढे येत नसत. गावात पाहिजे तेवढा पैसा नव्हता. पण पाहिजे तेवढा सम्मान होता.

बदलत्या काळानुसार परीवर्तन झालं. पण बदलत्या काळानुसार काही खेडे आजही आपली प्रत टिकवुन आहेत. आजही तिथे मानमरातब आहे. पण आम्ही त्यांच्याकडे अत्यंत हीन भावनेने पाहतो. त्यांची इज्जत करीत नाही.त्यांना मागासलेले समजतो. त्यांना आदिवासी म्हणुन झिडकारतो. ते मानसन्मान करतात. पण आम्ही त्यांची भावना समजुन न घेता त्यांच्या योजनाही गडप करुन आपल्या स्वार्थासाठी दोन चार शहरातल्या लोकांना त्या योजना देतो.

आमचे हे वागणे आम्हाला बरे वाटत असले तरी ते रास्तपणाचे नाही. आम्ही आमचे वागणे बदलावे. आम्ही आमच्या सवयी बदलवाव्या आम्ही आमचे जगणेही बदलवावे. जेणेकरुन संस्कार मुलांमध्ये पेरता येईल. मुली मुलांमध्ये प्रेम जरी झाले तरी ते प्रेम मर्यादा ओलांडणार नाही. कुमा-या माता बनणार नाही. देश स्वावलंबी बनेल.जेणेकरुन मानमरातब सगळीकडे निर्माण होईल.

आज खेड्याकडे पाहण्याची गरज आहे. त्यांच्याकडुन बरंच काही शिकण्याची गरज आहे. त्यांना ब-याच गोष्टी देण्याची गरज आहे. केवळ त्यांना शहरी प्रवाहात आणून शहरातील विभत्स संस्कृती देण्याची गरज नाही. तर त्यांचा विकास व्हायला हवा म्हणुन योजना देण्याची गरज आहे. याचा अर्थ असा नाही की ह्या शहराने खेड्यातील लोकांना गुलाम समजुन त्यांना गुलामासारखे वागवावे. त्यांना हीन समजुन नावे ठेवावीत नव्हे तर त्यांचे स्वातंत्र्य नष्ट करुन त्यांना जाणुनबुजून आपल्यासारखे जगण्यास बाध्य करावे. तेही आपलेच भाऊबहीण असुन भारतमातेची लेकरं आहेत. म्हणुन त्यांच्याकडेही आपला पाहण्याचा दृष्टिकोण सहिष्णु असावा. जेणेकरुन खेड्याचेही सौंदर्य टिकविता येईल.

लेखक: अंकुश शिंगाडे नागपुर
संपर्क: ९३७३३५९४५०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे अंध अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Next Article

प्लास्टिक बंदसाठी तरुणाईने साधला नागरिकांशी संवाद…

You may also like