Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

तेलाची गोष्ट भाग: १

Author: Share:

आमच्या एरियामध्ये एक कुत्रा आहे. त्याला एक पाय नाही. कोणीही या कुत्र्याला पाहिलं की टचकन काळीज तुटेल. कसा जगत असेल? काय खात असेल? इतर कुत्रे याला कसे वागवत असतील? पाय नाहीये बिचाऱ्याचा तो जन्मापासून की अपघातामुळे असले प्रश्न नैसर्गिकपणे छळायला लागतात. मी जस्ट सुचवून पाहतो, त्याची तब्येत नीट बघा. मग दयेची जागा आदरयुक्त विनोद घेतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गल्लीतले कुत्रे दुचाक्यांचा पाठलाग करतात तेंव्हा सगळ्यात पुढे हा तीन पायांचा कुत्रा असतो.

तेलपुरवठा करणाऱ्या अनेक देशांची सद्यकथा साधारण अशीच आहे.

आपला अडीच हजार वर्षापासूनचा आणि सख्खा म्हणावा असा इराण हा शेजारी. यांच्यापासून आपली तेलाची कथा सुरु होते. मध्ये पाकिस्तान आल्याने गेल्या सात दशकांपासून केवळ अंतराने लांब गेलेला. आपल्या देशातल्या एका मोठ्या समूहाला मुसलमानांचं वावडं असल्यामुळे इराणबद्दल ऐकण्या वाचण्यात बिलकुल रस नाही. अवघा इस्लाम एक आहे आणि तो जगाच्या जीवावर उठलाय असं मानणाऱ्या लोकांसाठी इराण हा साहजिकच घृणेचा विषय. इराण, सौदी अरेबिया आणि इराक आणि अरबस्तानातले अनेक देश अनेकांना सारखेच वाटतात. म्हणूनच या विषयाकडे अगदी सुरवातीपासून पाहायला हवे. इराण या देशाचं पूर्वीचं नाव पर्शिया. झोराष्ट्रीयन धर्माच्या सायरस राजापासून या पर्शियन साम्राज्याची सुरवात झाली. आजच्या युगातले टर्की, इराक, सिरीया, जॉर्जिया, आर्मेनिया, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, अझरबैजान, लिबिया, इजिप्त आणि ताजिकिस्तान हे पर्शियन साम्राज्याचे भाग होते. दरायस या राजाने जगातल्या एका मोठ्या साम्राज्याला सांभाळले. भारताचे या प्रदेशाशी संबंध जुळले ते तेंव्हापासून. पुढे अलेक्झांडर आणि नंतर सहाव्या शतकात इस्लामच्या उदयानंतर आणि अरब आक्रमणानंतर या साम्राज्याला कायमची उतरती कळा लागली. पारशी आणि इराणी लोक भारतात स्थायिक झाले आणि इराण झाला शिया मुस्लिम प्रदेश. दुसऱ्या महायुद्धानंतर इराणचे प्रमुख होते मोहम्मद रझा शाह पेहेलवी . यांच्या काळात इराणची भरभराट झाली. इराण जगातला सौदी अरेबियाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा तेल निर्यातदार देश बनला. अर्थात अरब काय किंवा कोणीही स्थानिक काय, स्वत:च्या भूगर्भाखाली संपत्ती आहे, ती आपली आहे आणि त्यचा फायदा आपल्याला भरभराटीसाठी करून घेता येईल असा दृष्टीकोनच कोणी विकसित केला नाही. व्हेनेझुएलाचा जुआन पाब्लो पेरेझ अल्फान्सो हा महापुरुष तेलमंत्री आणि सौदी अरेबियाचे शेख अहमद झाकी यामानी तसेच राजे फैझल यांनीच काय ती व्यावसायिक वृत्ती जोपासली. अमेरिकेच्या एग्झोन, मोबिल, अराम्को आणि टेक्साको या कंपन्या आणि ब्रिटनची शेल कंपनी यांना महापुरुष सोडून इतर बिनडोक प्रमुख हवेच होते. अहमद रझा पहलवी बिनडोक नव्हते पण अमेरिकेपुढे मवाळ होते. शिवाय आपणच सुधारणावादी आणि आधुनिक उद्धारकर्ते असल्याची मिजास ज्यांना होती. श्रद्धाळू समाजाला हे नाही आवडत.

जगभरात भांडवलशाहीचे अनेक मोठे शत्रू आहेत. सर्वात मोठा शत्रू म्हणजे ज्याला तिचा फायदा झाला नाही तो. म्हणजे धन्यकोठार फुटलंय आणि स्वत:ची झोळी फाटकी आहे असा इसम याचा शत्रू असतो. व्यवस्थेत असून इतर लोकांना जास्त यश मिळतंय हे अनेकांना खुपत असतं.

दुसरा शत्रू म्हणजे धर्मांध मंडळी. “अगं मुली तू शाळेत किंवा कॉलेजला विष पीत असतेस, ते विष म्हणजे इंग्रजी भाषा बर का. आणि त्यावर इलाज म्हणून तुम्हाला हे धर्माचं आचरण करायला हवं”. याच जागतिक कंपूतल्या आयातोल्ला खोमेनी यांनी शाह अहमद रझा पहलवी यांची सत्ता उलथवून टाकली

फ्रांस आणि अमेरिकेने चिथावणी देऊन खोमेनींच्या शिडात हवा भरली. खोमेंनीनी आबादान इथल्या तेलशुद्धीकरण कामगारांचा संप घडवून आणला. हळू हळू जनमत आपल्या बाजूने वळवून खोमेनीनी शह यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. खोमेनींनी इराण मध्ये शिया इस्लामिक क्रांती आणली. सत्ता हाती घेतल्या घेतल्या खोमेनींनी आपली भूमिका जाहीर केली. “इराणच्या तिजोरीत भरपूर शिल्लक आहे, तेंव्हा आम्हाला तेल विकायची अजिबात गरज नाही.” झालं. तेल कंपन्यांचे नळ बंद झाले.

या सगळ्याचे परिणाम इराणला २००८ पर्यंत भोगावे लागले. याचं कारण असं की विहिरीतून तेल काढणं पाणी काढण्याएवढी सोपी बाब नाही. तेलाची विहीर पाण्यासारखी दिसत नाही. बऱ्याच वेळा तेल दगडांना, वळूला चिकटलेलं असतं. भूगर्भातल्या भेगांमध्ये विखुरलेलं असतं. ते वर आणणं म्हणजे दिव्य असतं, कधी साबणाच्या पाण्याचा मोठा फवारा जमिनीत सोडून तेल दगड धोंड्यांपासून वेगळं करावं लागतं, तर कधी अतितीव्र दाबाने वायू जमिनीत सोडून त्याला वर आणावं लागतं. हे सगळं कुराणात नसल्याने खोमेनींना माहित असण्याची शक्यताही नव्हती आणि कुराणात नाही ते माहित करून घ्यायच्या लायकीचंच नाही असा त्यांचा विश्वास असल्याने त्यांना याची जाणीव होण्याची शक्यताही नव्हती.

१९७३ साली यों किप्पुर या ज्यूंच्या पवित्र दिवशी इस्रायलवर इराक, सिरीया, इजिप्त, जॉर्डन, लिबिया, ट्युनिशिया, कुवेत, क्युबा, मोरोक्को अल्जेरिया या देशांनी कडाडून हल्ला चढवला. अमेरिकेने दिलेल्या मदतीमुळे तिसऱ्या दिवसअखेरपासून इस्रायलने प्रतिकार दाखवला आणि शेवटी सगळी अरब राष्ट्रे नेस्तनाबूत झाली.

या पराभवामुळे जर कोणाला ठेच लागली तर ती सौदी अरेबियाला आणि इतर तेलसंपन्न देशांना. म्हणजे ‘आपल्याकडून तेल घेऊन वर युद्धात मात्र आपल्या शत्रूंना’ असा अमेरिकेबद्दलचा आकस तयार झाला. १९७३ साली तेलसंपन्न निर्यातदार देशांच्या ओपेक या संघटनेने तेलबंदी पुकारली आणि बहुताश जगाला अश्मयुगात ढकलायचा विडा उचलला. ओपेक देशांचा अरब चेहरा जगासमोर आला तो तेंव्हापासून.

या झटक्यातून धडा शिकलेला पहिला देश म्हणजे अमेरिका. जगाच्या जवळपास २५ टक्के तेल एकटी अमेरिका पिते. परंतु जगाच्या २४ टक्के सकल उत्पादन अमेरिकाच तयार करते. त्यामुळे अमेरिकेने धडा शिकणं हि त्यांना धडा शिकवण्यापेक्षासुद्धा मोठी गोष्ट सिद्ध झाली. या तेल बहिष्कारानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी तेलाव्यातिरिक्त इतर उर्जा साधने विचारात घ्यायला सुरवात केली. अपारंपरिक उर्जा स्रोत वगैरे गोष्टी मोठ्या प्रमाणात अभ्यासात यायला लागल्या त्या या काळानंतर. मधल्या काळात अमेरिकेने वाळवंटात १२० किमी चा वेग घेणारी पण लिटरला १ किमी चालणारी हमर गाडी बंद करून टाकली. (आणि ही असली तेलापिपासू गाडी आपल्याकडे संजय दत्त, सुनील शेट्टी हरभजन सिंग आदींनी घ्यायला सुरवात केली)

क्रमशः

लेखक: सौरभ गणपतये

Previous Article

पथनाट्य : स्वच्छता अभियान

Next Article

सिद्धिविनायक मंदिराची रोमहर्षक कथा

You may also like