संकल्प नववर्षाचा: सवयी बदला आरोग्य सुधारेल…

Author: Share:

नवीन वर्ष आनंदी आरोग्यमय व उत्साहाचे जावे म्हणून आपण सर्वच जागरूक असतो नि असायलाच हवे. चला तर मग सज्ज होऊयात नवीन बदलांसाठी. आरोग्याचा संकल्प करायचा असेल तर जुन्या वाईट सवयी बदलून नवीन चांगल्या सवयी अंगिकारायलाच हव्यात. बदल हवा असेल तर बदलायलाच हवं !

आज 21 व्या शतकात सर्व संपत्तीच्या मागे धाव घेत आहेत. आरोग्यास दुय्यम स्थान दिले जात आहे.    माणुस सवयींचा गुलाम झाला आहे. आरोग्यप्राप्तीसाठी एखादी सवय सोडा म्हटले तर रुग्ण तो डाॅक्टर सोडतो. एखादी सवय सोडल्याने विना औषधी आजार बरा होईल असे सांगितले तर काही जण, पण हे काही आपल्याच्याने जमायचे नाही असे म्हणतात. एखाद्या व्यसनाप्रमाणे आज माणूस वाईट सवयीत पुरता अडकून गेलाय. जान जाए पर वचन न जाए  या म्हणी प्रमाणे जान जाए पर आदत न जाए असे जणू काही अभिमानाने मिरवल्याप्रमाणे काही जणांची बाॅडी लॅंग्वेज झाली आहे. मोडेन पण बदलणार नाही  अशा वागणूकीने आपण स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारत आहोत हे सुद्धा कसे यांना कळत नाही.

बरेच रुग्ण सांगेल त्याप्रमाणे सर्व काही करतात व अप्रतिम गुण ही पहायला मिळतात.पण या लेखात उत्तम क्षमता असूनही नापास होणार्‍यांबद्दल मुद्दाम चर्चा करतोय. आरोग्यासाठी सुचवलेले सोपे बदलही न करता यांना मुळापासून कसे बरे करणार.आयुर्वेद सुखी व निरोगी आयुष्य जगायला शिकवते, पण आजकाल लोकांना औषधांवर जगणे नि औषधांसह मरणे  हेच जणू आवडू लागले आहे. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही, तसेच आरोग्य केवळ डाॅक्टरांनी उत्तम निदान करुन, चांगले समुपदेशन करुन व प्रभावी उपचार करून मिळत नाही.

सर्व शारीरीक, मानसिक व आगंतुक (कृमिसंसर्ग, आघात इ.बाह्य कारणांनी उत्पन्न होणारे) आजारही बहुतांशी प्रज्ञापराधामुळेच निर्माण होतात. प्रज्ञापराध म्हणजे एखादी गोष्ट आरोग्यास हानिकारक आहे हे माहीत असूनही ती करण्याचा मोह टाळता न येणे.चांगल्या गोष्टि शिकवायला गेलं तर आयुर्वेदात खूप पथ्य असतात म्हणून आयुर्वेदालाच बदनाम केलं जात. अहो पण लोक हेच समजून घेत नाहीत, कि ज्यांना जास्त पथ्य सांगितली जातात, त्यांच्या बर्‍याच गोष्टि चुकत होत्या, म्हणून जास्त पथ्य सुचवावी लागली. ज्यांना कमी पथ्य सांगितले जाते, त्यांच्या बर्‍याच गोष्टि बरोबर असतात, म्हणून कमी पथ्य सांगितले जाते.

एका रुग्णाची केस ऐकूयात.

एका रुग्णाला जीवनशैलीतले बदल सुचवले व आयुर्वेदिक औषधांनी बी.पी.ची गोळी 21 दिवसात बंद झाली. युरीक ऍसीड वाढले होते, ती गोळी 1 महिन्यात बंद झाली. अतिरीक्त वजन 5 किलोने कमी झाले, पण व्यायाम न केल्यास व दुपारी जेवल्या जेवल्या झोपल्यास बी.पी. वाढणे, हे लक्षण अजून शिल्लक होते. पण रिपोर्ट नाॅर्मल आल्यामुळे व लवकर रिझल्ट मिळायला लागल्याने, पुन्हा आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष सुरु झाले. पथ्य नकोसे वाटू लागले, पूर्वी मांसाहार व डाळींचे प्रमाण आहारात अधिक होते, व्यायाम कमी व आहार जास्त होता. स्वतःच्या आरोग्यासाठी काही नियम पाळणे, हे नंतर त्रासदायक वाटू लागले. व्यायाम, वेळेवर जेवण यामुळे व्यवसायाचे नुकसान होते, असे वाटू लागले, व काळजीवाहू बायकोशी चिडचिड व वादविवाद सुरु झाले. यांसारखी काही ईतरही उदाहरणे पाहीली म्हणून या लेखाचा प्रपंच.

नियम न पाळता 1-2 वर्षात गाडी गॅरेजला लागली, तर कमवलेल्यापेक्षा जास्त पैसा व वेळ वाया जातो, शिवाय जीवनाची पण शाश्वती नाही, त्यापेक्षा नियम पाळून लाईफटाईम गाडी चांगली राहीली तर जास्त पैसा व सुख कमवू शकाल त्याचं काय.? सर्व भौतिक गोष्टी पैशाने विकत घेता येतात, पण आरोग्य नुसत्या पैशाने विकत घेता येत नाही.

आता दुसऱ्या एका रुग्णेचा वृत्तांत ऐकूयात.

एक स्त्री रुग्णा मानसिक आघातामुळे तिचे मूड स्विंग होऊ लागले, रात्रीची झोप नाहीशी झाली, बायपोलर डिसआॅर्डर असे निदान झाले.त्यासाठी अलोपॅथिक औषधे सुरु केली, त्यानंतर भूक वाढली, वजन खूप वाढले. डायबिटिज सुद्धा झाला. रोज जेवणानंतर गोड खायची सवय होती.

संध्याकाळचा नाष्टा सूजी रस्क, नमकिन बिस्किट, पापड, तळलेली भजी, चकली, मैद्याचा वाटाणा  आणि ईतर बरेच अद्भूत व अतुल्य असे कधीही न ऐकलेले पण अपथ्यकर पदार्थ. हा सगळा चुकिचा रतिब कमी करत, बंद करायला सांगितला, त्यामागील कारणही समजावले. तर रूग्णा म्हणाली, हे सगळ बंद करायचं मग खायच काय? मी म्हटले उपमा, पोहे, दिरडे, थालिपिठ हे खाऊ शकता. रुग्णेने लगेच तोंड वाकडे केले.

 नवीन वर्षांच्या नवीन सवयी:

आज आपल्यासमोर इंग्रजी नवीन वर्षासाठी काय संकल्प करावा जेणेकरुन आपली नय्या सुखरुप पार होईल ते थोडक्यात मांडणार आहे.

सर्वप्रथम रोज लवकर झोपायला सुरुवात करा. हे मी रात्रीच्या झोपेबद्दल बोलतोय बरं का! नाहीतर काही झोपप्रेमी झोपायलाच टपलेले असतात, म्हणून सविस्तर सांगितलेले बरे.

फक्त सकाळी उशीरा उठा म्हटले तर, रात्री उशीरा झोपायची सवय तशीच ठेवल्याने, बर्‍याच जणांचा संकल्प निवडणुकीतल्या जाहिरनाम्याप्रमाणे कागदावरचं रेंगाळतो. म्हणूनच प्रथम झोपेची सेटिंग लावावी म्हटलं. रात्रीच्या झोपेची वेळ सुनिश्चित केली की आपले जैविक घड्याळ लवकर सेट होते. रात्री साधारण १० – ११ पर्यंत झोपण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी रात्री जेवल्यावर दंतमंजन चूर्णाने बोटाने दात घासून कोमट पाण्याने गुळण्या कराव्या. नंतर थोडावेळ घरगुती कामात हातभार किंवा थोडा फॅमिली टाईम घालवून केसांत मूळाशी तेल मुरवावे. याने केसांच्या मुळाची त्वचा स्निग्ध होते,डॅण्ड्रफपासून सुटका होते, केस तुटणे, दुभंगणे, गळणे यांसारख्या तक्रारी कमी होतात. त्यानंतर कंगवा फिरवावा, याने केसांचा रक्तपुरवठा सुधारतो, कोंडा मोकळा होतो, उवा- लिका असल्यास बाहेर काढायला सोपे जाते. त्यानंतर उशीवर एखादे कापड गुंडाळावे, जेणेकरुन झोपल्याने तेलाचा डाग उशीवर न पडता, त्या कापडावर पडेल. हे कापड दुसर्‍या दिवशी धुवावे. अशी तीन कापडे तयार ठेवावीत, एक धुतल्यावर सुकले नसल्यास दुसरे उपयोगी पडते व पावसाळ्यात दुसरेही सुकले नसल्यास तिसरे उपयोगी पडते.

बर्‍याच प्रॅक्टिकल अडचणींमुळे योजना बारगळतात, म्हणून तुमचा संकल्प नव्याचे नऊ दिवसाप्रमाणे लगेच मावळू नये, यासाठी एवढे सविस्तर सांगत आहे.

केसाची चंपी केल्यावर पायाच्या तळव्याला हाताने किंवा काश्याच्या  वाटीने तेल मुरवावे. अंगठ्याने सर्व ठिकाणी दाब द्यावा व काॅटन साॅक्स घालावा. काॅटन साॅक्सचेही एकूण तीन जोड वापरात असावेत, ऐनवेळी साॅक्स ओला आहे, म्हणून तळपायांची चंपी कॅन्सल व्हायला नको ना ! पायाच्या चंपीला पादाभ्यंग असे म्हणतात, याने पायाच्या भेगा नाहीशा होतात, झोप चांगली लागते व दृष्टी सुधारते.

रात्री झोपताना एखादे शांत सुमधुर भक्तीगीत किंवा वाद्याची धुन लावून शवासनात संपूर्ण अंग ढिले सोडून झोपावे.

अर्धवट झोपेच्या अवस्थेत उद्याच्या कामाचे नियोजन डोक्यात फिड करावे. हे जमत नसेल तर झोपण्याआधी ध्यानमुद्रेत बसून एकाग्र व शांत झाल्यावर चांगली झोप येण्याविषयी, सकाळी लवकर उठण्याविषयी व उद्याच्या नियोजनाविषयी स्वयंसुचना द्याव्यात.

ज्यांचे आत्मबल चांगले असते, ते ठरवल्याप्रमाणे सकाळी विना-गजरसुद्धा वेळेवर उठतात.ज्यांच्यात शारीरीक किंवा मानसिक आळस ठासून भरलेला असतो त्यांनी गजर लावून घड्याळ किंवा मोबाईल लांब ठेउन द्यावा नाहितर सकाळी मला उठवले का नाहिस, गजर कोणी बंद केला म्हणून ओरड सुरु होते, गजर तर महाशयांनी स्वतःच बंद केलेला असतो !

अजून एक ज्यांचा काळजीखोर स्वभाव असतो, त्यांना झोपताना गजर लावल्यावर लवकर झोपच येत नाही व सारखे अजून झोप लागली नाही, किती वाजले आता कितीशी झोप मिळणार म्हणून गजर पुढे ढकलत राहतात व शेवटी गजरच बंद करतात, तेव्हा कुठे यांचा डोळा लागतो! अशा व्यक्तींनी एखाद्या सकाळीच कायमस्वरुपीचा गजर सेट करुन ठेवावा, म्हणजे रात्री झोपताना अॅन्क्झायटी (बेचैनी) होत नाही.

सकाळी उठल्यावर दंतमंजन, नेत्रस्नान, अभ्यंग, प्राणायाम, योगासने किंवा व्यायाम करुन योगनिद्रा घ्यावी.

दिनचर्येचा विषय खूप मोठा आहे, याचे सविस्तर वर्णन पुढील लेखात, तोवर एवढे तरी सुरु करा. नि इंग्रजी नवीन वर्ष जोमाने सुरु करा. आशा करतो पुढिल वर्षी असे संकल्प गुढीपाडव्याला करायची प्रथा सुरु व्हावी ! आपली कालगणना व शास्त्र याची प्रगल्भता परकियांना अचंबित करत असताना आपणास त्याचे महत्व नाही, असे व्हायला नको !

चला तर मग नव्या उमेदीने या नव वर्षाचेही जल्लोषात स्वागत करुयात, आपल्या सवयी बदलायला तसा कोणताही मुहुर्त स्वागतार्हच आहे.

डाॅ. मंगेश पांडुरंग देसाई 

यशायु पंचकर्म व रिसर्च सेंटर ,पुणे 

yashayupanchakarma@gmail.com

Previous Article

१ जानेवारी

Next Article

२०१९ च्या  पूर्वसंध्येला ३६००० वर उभे मार्केट…

You may also like