नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन

Author: Share:

नवी मुंबई – मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या वेगाने पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत, ते पाहता 2022 पर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचा कायापालट झालेला आपण पाहाल, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीची प्रशंसा केली. हवाई वाहतूक आणि जलवाहतूक क्षेत्रातही झपाट्याने विकास होत असून यामुळेदेशाला जागतिकीकरणाचा खरा लाभ मिळेल. मुंबईमधील जल, भूमी आणि आकाश अशा ठिकाणी सुरु असलेल्या विविध कामांमुळे खऱ्या अर्थाने विकास होईल, त्याचप्रमाणे शिवरायांचे प्रेरणा देणारे स्मारक देखील समुद्रात उभे राहिलेले असेल, असेही ते म्हणाले.

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचे लोकार्पण इलेक्ट्रॉनिक पध्दतीने कळ दाबून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उलवे गावाजवळील कोंबडभुजे येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य मैदानावर आयोजित या शानदार सोहळ्यास राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौकानयन व जलस्त्रोतमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री पी. अशोक गजपथी राजू, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ.प्रशांत ठाकूर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी असलेल्या या रायगड भूमीमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, या स्वराज्य भूमीला माझा प्रणाम.” छत्रपती शिवरायांची जयंतीच्या आदल्या दिवशी जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनलचे उद्घाटन आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन अशा दोन संधी मिळणे हा चांगला योगायोग आहे. सागरी शक्तींचे महत्त्व ओळखणारे छत्रपती शिवराय हे पहिले राष्ट्रपुरुष होते. ते किती दूरदृष्टी असलेले होते याची कल्पना आज जेव्हा आम्ही सागरी शक्तींमध्ये वाढ करीत आहोत तेव्हा लक्षात येते.

आज देशाला लाभलेल्या 7 हजार 500 कि.मी. सागरी किनाऱ्याचा सर्वांगीण विकास करून सागरी शक्ती वाढविण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले की, 100 हून अधिक जलमार्गाचे नियोजन आम्ही केले आहे.  नवी मुंबईत उभारण्यात येणारे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वातंत्र्यानंतरचे पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ असेल.

Previous Article

सागरमाला प्रकल्पामुळे कोकणातील मच्छिमारांना मोठा फायदा-भुमिपुत्रांना नोकऱ्या – नितीन गडकरी गडकरी

Next Article

शिवजयंती तिथीनुसार कि तारखेनुसार

You may also like