निगलीजन्स!!

Author: Share:

परवा मुंबईत पाऊस पडला. मुंबई तुंबली. पालिकेच्या अपयशावर विरोधी पक्ष आणि सामान्य नागरिकांनी टीका केली. सत्ताधारी आणि त्यांच्या समर्थकांनी, निसर्गावर खापर फोडून आपले हात झटकले. २००५ च्या पावसानंतर केलेल्यात सुधारणा आणि त्यानंतर आलेला बदलावं यावरही ते बोलले. उत्तर प्रदेश मध्ये झालेली घटना अत्यंत लाजिरवाणी आणि थरकाप उडवणारी आहे. त्यावरही सत्ताधारी पक्षावर प्रचंड टीका झाली. निर्भयानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर मुंबईत मिल्स चे प्रकरण घडले. २००६ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईची सुरक्षा व्यवस्था हादरली होती पण २००८ च्या  मुंबईवर झालेल्या हल्ल्यापर्यंत मुंबईकरांवरची धोक्याची तलवार टळली नाही. अशा कैक घटना सांगता येतील, लहान मोठ्या, ज्यात चुकांची पुनरावृत्ती झाली आहे. आणि त्या पुनरावृत्तीत एक गोष्ट कायम असते..

निगलीजन्स! अक्षम्य दुर्लक्ष!

स्वतःच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करण्याची दुर्दैवी वृत्ती सर्वपक्षीय, सर्व पातळीवर भारतीय राजकारणात दिसून येते. त्याहून दुर्दैव हे कि आपल्याला भोगावी लागणारी स्थिती हेच आपले प्राक्तन असल्याप्रमाणे, सामान्य नागरिक स्वतःच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतात. एका उत्तम लोकशाहीचा पाया असतो सजग नागरिक. भारतीय नागरिक सजग नाही. स्वतःच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे आणि त्याची कारणे देणे हा भारतीय लोकशाहीला लागलेला एक डाग आहे, जो लवकरात लवकर पुसण्याची गरज आहे . मात्र तो आपण पुसत नाही, कारण आपणही स्वतःच्या नागरिक म्हणून कर्तव्यांकडे अक्षम्य दुर्लक्षच करतो! एकंदरीत, ते आणि आपण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्षानी भारताच्या विकासात अडसर निर्माण करीत आहोत.

भारताला राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळ्यांवर आणि सर्व क्षेत्रामध्ये, उत्तम दबावगटांची आवश्यकता आहे. नुकतेच राज्य सरकारने पक्षपातीपणाचा आरोप करून न्यायमूर्ती ओकांकडून ध्वनिप्रदूषणाची केस दुसऱ्या पिठास वर्ग करऊन घेण्याचा प्रयत्न केला. पण वकील, न्यायाधीश, सामाजिक संस्थांच्या दबावामुळे त्यांना परत मुख्य न्यायमूर्तींना त्यांना परत आणणे भाग पडले. दबाव गटाची ताकद ही आहे.

भारतात विचारवंतांची कमी नाही. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेली अनेक माणसे आहेत. ज्यांना स्वतःचा विचार आहे. सामान्य माणसे, जी कुठल्या पक्षाच्या विचारसरणीने बद्ध नाहीत, त्यांनाही, निःपक्षपातीपणे विचार करणे जमते. काय चांगले काय वाईट हे ते समजू शकतात. एवढेच काय, पण अनेक पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक सुद्धा पक्षाच्या एखाद्या निर्णयावर खासगीत का होईना नाराजी व्यक्त करतात. सद्सद्विवेक बुद्धी नावाची काही गोष्ट, भारतीय विचारक्षितिजावर नेहमीच जिवंत असते, हे भारतासारखी अजस्त्र लोकशाही जिवंत राहण्याचे मुख्य कारण आहे.

आपण एकाच विचाराने बांधलेले आहोत, आपल्या देशाच्या कल्याणासाठी जे जे आवश्यक आहे, ते केले गेले पाहिजे, ते करण्यात कुठलीही यंत्रणा कुचराई करीत असेल, तर आपल्या वैयक्तिक आवडी-प्रेमाला दूर सारून, प्रश्न विचारता आले पाहिजेत, आणि त्याची उत्तरे मिळवून, काम करून घेता येणे आवश्यक आहे.

दुर्दैवाने, शब्दात आणि लेखणीत सामर्थ्य असणारे सर्वच बोलतात असे नाही. साहित्यिकांवर हा आरोप अनेकदा होतो. साहित्यिक बाजू घेत नाहीत. कलाकार बोलत नाहीत, किंवा ते फक्त स्वतःच्या पुरत्या विषयांवर सोयीप्रमाणे बोलतात.

साहित्यिक, कलाकार, खेळाडू यांच्याकडून आता बोलण्याची गरज आहे. आणि त्यासाठी कुठलीही अराजकता वगैरे येण्याची आवश्यकता नाही. सरकार, मग ते कुणाचेही असो, आपले विश्वस्त आहे! जेथे त्याचे काही चुकत असेल तर आणि तेंव्हा बोलण्याची आवश्यकता आहे. नुसते  बोलणे नव्हे करून घेण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजॆ.

दबाव म्हणजे विरोध नव्हे. आणि दबाव म्हणजे फक्त आम्ही बरोबर असेही नव्हे. वर सांगितल्याप्रमाणे निगलीजन्स फक्त सरकार कडून, यंत्रणेकडून होत नाही.. आमच्याकडूनही होतो. सामान्य नागरिकालाहि चार खडे बोल सुनावण्याची आवश्यकता आहे.

आणि हे सर्व कधी बोलावे एखादी घटना घडल्यावर नव्हे. फक्त मेणबत्त्या घेऊन जाणार्यांविषयी आम्ही बोलत नाही. गुणवत्ता सुधारण्याचे एक तत्व आहे. एका मोठया दुर्घटनेमागे, खुपश्या घडून गेलेल्या लहान घटना असतात. तेंव्हाच, काळजी घेतली असती, तर ही मोठी दुर्घटना घडली नसती. मेनहोल बंद करणे, सर्व गटारांची तोंडे बंद ठेवणे याविषयी आम्ही सजग असतो, आणि जेंव्हा ती उघडून ठेवणे आवश्यक आहे, तेंव्हा आवश्यक ती खबरदारी जसे मोठा झेंडा रोवणे.. तर.. डॉ अमरापूरकर सारखी दुर्दैवी आणि लांच्छनास्पद घटना घडली नसती. अशी अनेक उदाहरणे देता येतील.  दबाव गट हवा आहे, तो अशाच लहान घटनांवर तातडीने उपाययोजना करवून घेण्यासाठी!

सरकारे येतील, जातील.. आजचे नेते उद्या नामशेष होतील. आजचा पक्ष उद्या कुणाच्या गावीही नसेल .. तेंव्हाही एक गोष्ट कायम असेल!

आपल्या देशाचे भाग्यविधाता, आपण आहोत! आणि आपण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही!

Previous Article

डाग..!!

Next Article

सर्वपल्ली राधाकृष्णन

You may also like