नाशिक कोर्टाला पोलीस विभागाकडील अडीच एकर जागेचा ताबा

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – अखेर जिल्हा व सत्र न्यायालयाला पोलीस पोलिस विभागाकडील अडीच एकर जागेवर ताबा देण्यात आला आहे. नाशिक बार असोसिएशनच्या माध्यमातून उच्च न्यायालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा न्यायालयासाठी शहर पोलिसांची अडीच एकर जागा देण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. गेल्या महिन्याभरापासून त्याची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागा ताब्यात देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अ‍ॅड. का. का. घुगे यांच्याकडून गेल्या दोन वर्षापूर्वी पोलीस आयुक्तालय परिसरात असणारी पाच एकर जागा कोर्टाला मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या जागेची शासनाकडून पाहणी झाली. तेव्हा अडीच एकर जागा कोर्टाला देण्यात येइल असे निश्चित करण्यात आले होते. आता जिल्हा न्यायालयाची जुनी दगडी ऐतिहासिक इमारत, अलीकडच्या काळात झालेली न्यायालयाची नवीन व मारुती चेंबर्स क्रमांक एक अशा तीन इमारती कायम ठेवून उर्वरित सर्वच इमारती या ठिकाणी काढण्यात येऊन नवीन प्लॅननुसार अत्याधुनिक स्वरुपात न्यायालयाची इमारत उभी राहणार आहे.

यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या बिल्डींग कमिटीकडून प्लॅनला मंजुरी मिळाल्यानंतर विधी विभागाकडून नवीन इमारतीचे काम नजीकच्या काळात होणार आहे. नवीन इमारतीच्या प्लॅनमध्ये नियोजित व जुन्या इमारतीत 300 ते 400 फुटांची मोकळी जागा राहणार असून यात उद्यानास्वरुपातील हिरवळ, कारंजे व इतर सुशोभिकरणाच्या काही गोष्टी साकारल्या जाणार आहेत. प्रास्तावित नवीन न्यायालयाच्या इमारतीत 8 रूम या वकिलांना बसण्यासाठी (बार रूम) राहणार आहेत. त्याचबरोबर वकिलांकरिता विविध विषयांवरील चर्चासत्र, कार्यशाळा, शिबिर यासाठी या जागेची मागणी करण्यात आली होती.

नवीन इमारतीच्या मागील भागात वकिलांसाठी बहुमजली पार्किंग केली जाणार आहे. याच पार्किंगच्या इमारतीलगत वकिलांच्या मारुती चेंबर्स २ व ३ मधील चेंबर्सची व्यवस्था केली जाणार आहे. पार्किंगमागील भागात पोलिसांकडून मिळालेल्या जागेतील रस्त्यांचा वापर आता न्यायालयासाठी करता येणार आहे. तसेच न्यायालयाच्या ब्रिटीशकालीन दगडी इमारतीची जुनी ठेवण कायम ठेवून तिचे सुशोभिकरण केले जाणार आहे. एकूणच येथील न्यायालयाच्या नियोजित कामामुळे नाशिक शहराच्या वैभवात नाशिक न्यायालय भर टाकणार आहे. अशाप्रकारे संपूर्ण जिल्हा न्यायालयाला स्मार्ट करण्याचे काम नवीन प्लॅनमध्ये होणार असल्याची माहिती नितीन ठाकरे यांनी देशदूतशी बोलतांना दिली होती.

दरम्यान आज जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक बार असोसिएशन अध्यक्ष नितीन ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व अँड. का.का. घुगे यांनी संबंधित जागेवर पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे यांच्यासोबत जागेची पाहणी केली त्यानंतर रीतसर न्यायालयाने जागा ताब्यात घेतली.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

२० सप्टेंबर

Next Article

नांदगांव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न

You may also like