नांदगाव (प्रतिनिधी) – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही.जे. हायस्कूल, नांदगाव हे विद्यालय नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवीत असते. २०१७ -१८ हे वर्ष संस्था व शाळा शतक महोत्सव साजरा करीत असून वर्षभर विविध उपक्रम राबविले जात आहे.या शतक महोत्सवा निमित्त नांदगाव मध्ये शनिवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर माऊली मंगल कार्यालयात करिअर फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. करिअर फेअर चे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता नांदगावचे तहसीलदार चंद्रकांत देवगुणे,गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, माऊली मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांचे प्रमुख उपस्थित होणार आहे.
आज प्रसारमाध्यमांद्वारे समाजातील अपप्रवृतींचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर होतांना दिसते. त्यामुळे आदर्श घ्यावा अशा व्यक्तीच समाजात नाहीत, नवीन पिढी बिघडत चालली आहे अशी सर्वसामन्याची धारणा होत चालली आहे. परंतु युवा पिढीने आदर्श घ्यावा अशी अनेक मंडळी आजही समाजात आहेत फक्त आपण त्यांच्या पर्यंत पोहचत नाही अशा आदर्श व्यक्तींना व आजच्या युवा पिढीला जोडणारा दुवा म्हणजे ‘करिअर फेअर’ ज्या प्रमाणे देशाचे मोठेपण हे त्या देशातील सोन्या चांदीच्या किती खाणी आहेत या वरून ठरत नाही, तर ते ठरते त्या देशातील श्रेष्ठ नवरत्नांच्या संख्येवरून. त्याच प्रमाणे शतक महोत्सव साजरा करणाऱ्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची व व्ही. जे. हायस्कूलची खरी खरी संपत्ती म्हणजे संस्थेचे व शाळेचे माजी विद्यार्थी. नांदगाव सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेवून देखील जगाच्या कानाकोपऱ्यात हे माजी विद्यार्थी आपल्या कार्यकर्तुत्वाने शाळेचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करीत आहेत.त्याचा शाळेला व संस्थेला सार्थ अभिमान आहे.
शंभर वर्षांच्या इतिहासात शाळेने अनेक कर्तुत्ववान व नामवंत विद्यार्थी घडविले आहेत.अशा माजी विद्यार्थ्यांची संख्या अगणित आहे.त्यातीलच सध्या युवापिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन ‘करिअर फेअर’ च्या माध्यमातून केले गेले आहे. वर्षभर हा उपक्रम अशा माजी विद्यार्थ्यांना निमंत्रित करून विद्यालयात आयोजित केला जाणार आहे. त्याचे पहिले पुष्प शनिवार दि.२६ ऑगस्ट रोजी गुंफले जाणार आहे. डॉ.नेहा वैद्य (समुपदेशन) श्री.अमोल निकम (प्रशासकीय) तहसीलदार, कु. अश्विनी आहेर (आर्किटेक व जि.प.सदस्य ) कु.क्षितिजा कदम (इव्हेंट मॅनेजमेंट )या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखती होणार आहेत. या मुलाखती कु. वृषाली गढरी व सौ.गायत्री आंबेकर घेणार आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचा जीवनपट, शालेय जीवन,त्यांनी निवडलेले करिअर क्षेत्र, ध्येयपूर्तीसाठी घेतलेले परिश्रम, कसोटीचे क्षण, अनुभव, त्यांचे आदर्श, भावी पिढीला मार्गदर्शन, त्यांच्या जडणघडणीत शालेय शिक्षण व संस्काराचे योगदान इ. चा मागोवा मुलाखतीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. गत शंभर वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या वैभवशाली परंपरेचा ठेवा जतन करून भावीपिढीच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा हा उपक्रम. सध्या पालकांच्या आपल्या पाल्यांकडून असणाऱ्या अतिअपेक्षेचे ओझे, त्यातून विद्यार्थ्यांना येणारे नैराश्य व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, यावर या करिअर फेअर मधून पालकांचे व विद्यार्थ्यांचे सुद्धा समुपदेशन होणार आहे .त्या साठी या कार्यक्रमासाठी पालकांची उपस्थिती महत्वाची असणार आहे.नांदगाव शहरात अशा प्रकारचे करिअर फेअरचे आयोजन प्रथमच करण्यात आले आहे, तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालकांनी व विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक, सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, निमंत्रक जयंत निकम यांनी केले आहे.
बातमी: प्रा.सुरेश नारायणे