भारतातील कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे

Author: Share:

भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात.

नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे कन्हेरसर.त्यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. त्यांना दिवसातून १४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे;

परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना  २३ सप्टेंबर १८९० रोजी स्थापनकेली. ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते. त्यांच्या प्रयत्‍नांमुळे १० जून १८९० पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुटी मिळू लागली.

लोखंडे हे महात्मा फुल्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण मानली जाते. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले. हे नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकाचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे. लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते.

सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधूमधून वाचा फोडली.

मुंबईत १८९३मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले. या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली. तसेच त्यांनी कामगारांसाठी केलेल्या कामगिरीची दखल देऊन त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

मुंबईत १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचे देहावसान झाले.

संदर्भ: मराठी विकिपीडिया

Previous Article

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेवर २२ गुन्हे: भारतातील सर्वाधिक गुन्हे अंगावर असलेले मुख्यमंत्री 

Next Article

९ फेब्रुवारी 

You may also like