माझं पहिलं प्रेम

Author: Share:

आम्ही डी एडला शिक्षण घेत असतांना कोणी स्थानिक मुलं होती. तर कोणी बाहेर गावाहुन आलेली मुलं होती.महत्वाचे म्हणजे स्थानिक ची मोजकी मुलं सोडली तर बाहेरगावावरुन च आलेली बरीचशी मुलं होती.

नगरमधुन अजीत दिघे, बुलढाण्यावरुन झाल्टे जैपुरे, अकोल्यावरुन हाडोळे, जळगावचा नंदु, धुळ्याचा नितीन, एवढे जर सोडले तर बाकी नागपुर जिल्ह्यातीलच आजुबाजूचे.

मी, खांबळकर, गजभिये, शेन्डे, डाफ, ढोले चरपे, बुधे ही मंडळी तशी नागपुरच्या आजुबाजूची. त्यातच मी जवळपास चौथीपासुन याच नागपुरमध्ये रहिवाशी होतो. वसतीगृहातच राहुन आपलं शिक्षण घेत होतो.

त्यामुळं माझे वडील मला महिण्यातुन भेटायला येत. काही पैसे देवुन जात.बाकीच्यांचे वडील चार सहा महिण्यातुन येत. कारण तिकीट त्यांना परवडायची नाही. तसेच शहराबाहेरील मंडळी ही जाणे येणे करीत असत.

मी मात्र वसतीगृहातच राहात असे. गाव जवळ असलं तरी मला परवडत नसल्याने मी गावाला जात नव्हतो. माझे वडीलच यायचे.
एकदाचा प्रसंग सांगतो. माझे वडील मला भेटायला या महाविद्यालयात आले होते. मुळात ते ग्रामीण भागातील असल्याने त्यांचा पेहराव हा ग्रामीण वेशभुषेचा होता. मला कोणीतरी सांगताच मी त्यांना भेटायला महाविद्यालयातील दरवाज्याच्या बाहेर भेटायला आलो.तसं पाहिल्यास कोणाचेच वडील महाविद्यालयात भेटायला येत नसल्याचे मी पाहात आल्याने मला त्याचं आश्चर्य वाटत होतो.

मी जसा बाहेर आलो. तसा माझ्या वडीलाच्या सोबत काही वेळ बोलत बसलो. थोड्या वेळाने ते जायला निघाले तेव्हा मी मेडीकल चौकात त्यांच्या पायावर नतमस्तक झालो. तसे ते नतमस्तक होतांना तिकडुन येणा-या सोनबर्से गुरुजींनी पाहिलं. त्यानंतर माझे वडील आपल्या घराला चालते झाले.मी मात्र माघारी महाविद्यालयात फिरलो होतो.

जसा मी महाविद्यालयात आलो. तसा मला सोनबर्से गुरुजींनी आवाज दिला.विचारलं.
“ते कोण?”
मी घाबरलो. सरांनी हा प्रश्न का विचारला याचं आश्चर्य वाटलं. पण तरीही हिंमत राखुन मी उत्तर दिलं.
“ते माझे वडील.”
थोडा वेळ मौनात गेला. सर काहीच बोलले नाहीत. ते पाहुन मीच म्हणालो.
“सर,का बरं? आपण असं का विचारलं?”

त्यावर सर म्हणाले,

“मला वाटलं की तुझे ते आजोबा असतील. खरंच त्यांनी तुझ्यावर संस्कार चांगले केलेत. नाहीतर आजची मुलं वडीलांना तेवढा सन्मानच देत नाहीत. तू वडीलाच्या पाया पडला, मला फार फार बरं वाटलं.”

आजोबा……माझे वडील माझेच आजोबा. सोनबर्से सरांचे शब्द पटण्यालायक. पण गुरुजींना तरी काय माहीत. ते आजोबा की वडील आहेत म्हणुन…..त्यांनी काय पाहिलं होतं यापुर्वी त्यांना…..नाही……कधीच पाहिलं नव्हतं. म्हणुनच हा संभ्रम.
माझे वडील दिसायला म्हातारे होते. थोडी शेती असल्याने शेतमजुर. काबाडकष्ट करता करता तरुणाई गेली होती. अगदी वितभर पोटासाठी खळ्यात राबतांना डोळ्यात चिंतेचं पाणी साठायचं. त्यातच मी शेवटचा पुत्र असल्याने माझं वय वडीलांच्या वयाला न शोभणारं होतं.शेतात उन्हातान्हात राबल्यानं म्हणा की अजुन काही….माझ्या वडीलाच्या चेह-यावर सुरकृत्या आल्या होत्या. तसेच डोक्यावरचे केस सुद्धा पांढरे झाले होते.

सोनबर्से गुरुजींनी म्हटल्याने मला राग आला नाही. उलट माझ्यात त्याबद्दल अभिमान वाटत होता.मला माझे वडील जास्त आवडायला लागले होते. तसे पाहता वडील जेवढे सर्वांना आवडतात, त्यापेक्षाही आई जास्त आवडते.मला मात्र आईपेक्षा वडील जास्त आवडत होते.पण माझ्या शिक्षणात आईनेच जास्त मदत केली आहे.

आज सोनबर्से गुरुजी हयात नाहीत.पण त्यांच्या बोलण्यानुसार आजची तरुणाई ही वाया जात चालली आहे. सतत व्हाट्सअप व फेसबुकच्या नादात लागुन अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत आहे. आईवडिलांची कवडीचीही इज्जत करीत नाहीत मुलं असे दिसते आहे. कधीकधी तर आईवडिलांना असे वाटायला लागले की या मुलांना बेकारच जन्म दिला, असे अभद्र व्यवहार मुले करतात. आईबापासमोरच अश्लीलतेचे वर्तन करणारी मुलं सध्या सगळीकडे दिसुन येतात. नव्हे तर मालमत्तेसाठी वा शौकासाठीही आईवडिलांची कत्तल करणारीही मुलं काही कमी नाही.तेव्हा तर आईवडिलांच्या पाया पडणे दुरच. माझे माझ्या आईवडिलांवर निरतिशय प्रेम होते. ते माझे पहिले प्रेम होय.आईवडिल मला देवासारखे वाटत होते. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत प्रवास केलेला आहे. ते जर उन्हात खपले नसते तर मला आज सुखाचे जीवन पाहायला मिळाले नसते हे तेवढच सत्य आहे.

आज प्रत्येक आयुष्याचा क्षण जगतांना आम्ही थोडंसं दुःख आलंच तर फार घाबरुन त्या दुःखाचा त्रागा करीत असतो. पण ते दुःखाचे क्षण माणसाला घाबरविण्यासाठी येत नसतात, तर जीवनात दुःखाला समर्थपणे तोंड देण्यासाठी हे क्षण येत असतात नव्हे तर त्यातुन हवं तर शिकता येतं. पण आपण दुःख आलंच तर त्याचा सामना न करता आम्ही दुःख- दुःख करीत बसतो. माझ्या आईवडिलांनी तर माझ्यात अशी हिंमतच भरली .त्यामुळंच की काय आजही पर्वताएवढं दुःख समोर असुनही मी तटस्थ उभा आहे.

लेखक: अंकुश शिंगाडे, नागपुर
संपर्क: ९३७३३५९४५०

Previous Article

गांधी आणि सावरकर ह्यांच्यातील अंतर !

Next Article

व्यंगनिबंधकार राज आणि मनसे

You may also like