माझे इंजिनीरिंगचे प्रयोग भाग: १

Author: Share:

इंजिनीरिंग म्हणजे अभियांत्रिकी असे मराठीत बोलू शकतो. पण त्यात काही मज्जा नाही. असा वाटते की बाबा आदमच्या जमान्यात राहतो. आता मला सांगा, मोबाईलला भ्रमणध्वनी बोलले, तर काय इज्जत राहील यार.. तर असो आजचा आपला मुद्दा माझ्या इंजिनीरिंगवर आहे. हो इंजिनीरिंगवरच.. तीच विज्ञानाची शाखा जी सर्वांत जास्त सुशिक्षित बेरोजगार तयार करते. तीच इंजिनीरिंग ज्याच्या विद्यार्थ्यांना इंजिनीरिंग सोडून बाकी सगळ्यातल सगळं कळते. तीच इंजिनीरिंग ज्याचे विद्यार्थी महाविद्यालयात आल्यापासून ‘अरे काय शिकवतात यार. काहीच कळत नाही’, ते ‘भाई, पहिली ओळ सांग, बाकीचा मीच लिहितो’ इथपर्यंत हुशार होतात.

त्या ‘ थ्री इडिअट्स’ने मुलांना इंजिनीरिंग घेण्यास प्रवृत्त करून एक पूर्ण पिढी नासवली, हजारो मुले कामयाब होण्यासाठी नाही तर काबिल होण्यासाठी इंजिनीरिंगला गेली आणि आता ‘कुणी नोकरी देता का रे नोकरी, काठावर पास झालेल्या इंजिनिअरला कोणी नोकरी देता का रे?’ असे बोलत दारोदार हिंडत आहेत. आणि ज्यांचा कुठं काही वशिला असेल तर ठीक नाहीतर कुठल्याही छोट्या मोठ्या कंपनीमध्ये ८-१० हजारांवर काम करत आहेत. त्या ‘थ्री इडिअट्स’चा दुसरा मोठा दुष्परिणाम म्हणजे इंजिनीरिंग कॉलेजमध्ये फोटोग्राफर पोरांची संख्या वाढली. ‘नासा’ने केलेल्या संशोधनानुसार (हो तीच रिकामटेकडी संस्था जी दिवाळीत रात्री भारताचे फोटो काढते) जर आपण इंजिनीरिंग कॉलेजमध्ये जर कोणत्या मुलाला दगड मारला, तर तो दगड एका फोटोग्राफरला लागण्याची संभाव्यता ही एक तृतीयांश असते. नासाचे संशोधन बाबा. आपण काय बोलणार!!

एवढेच नाही, तर युनेस्कोने केलेल्या सर्वेक्षणात (हीसुद्धा दुसरी रिकामटेकडी संस्था आहे जी सर्व देशांचे राष्ट्रगीत ऐकत बसते आणि त्यानंतर त्यांनी भारताला सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीताचा दर्जा देते) असे दिसून आले की भारतात मुले पहिल्यांदा इंजिनीरिंगला जातात आणि मग ठरवतात की मला पुढे आयुष्यात काय करायचं आहे. विज्ञान शाखेतील बहुतांश मुले एकतर मेडिकलला प्रवेश घ्यायची अथवा कमी तिथला प्रवेश हुकला की इंजिनीरिंगला जायची. आता बऱ्यापैकी हे चित्र बदलल्याने खूप मुलांची आयुष्य वाचलीत. हे चित्र बदलण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आमच्यासारखे इंजिनिअर .(तेपण काय सांगायला लागते का राव!!! ) देशात समाजसेवेचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे ,’ ओ भाऊ,तुमच्या गाडीची हेडलाईट चालू आहे’ हे सांगणारे. दुसरा प्रकार म्हणजे ‘ओ भाऊ, बाईकचा स्टँड बाहेर आहे’ आणि सर्वात मोठी समाजसेवा म्हणजे,’ नको घेऊस इंजिनीरिंग, पस्तावशील.’ आमच्यासारखे इंजिनीअर तिसऱ्या प्रकारात मोडतात. याचप्रमाणे सर्वात मोठे समाजविघातक कृत्य म्हणजे ,’इंजिनीरिंग घे, खूप स्कोप आहे’, असे म्हणून लहान मुलांचे भविष्य खराब करणे. अरे कुठे फेडाल हे पाप?

इंजिनीरिंगला ऍडमिशन घेतल्यावर पहिल्याच काही दिवसात पश्चात्ताप होण्यास सुरुवात होते. ते वर्गात बसणे,तासंतास शिक्षकांचं बोलणे ऐकणं खूप रटाळ वाटते. ते शिक्षकपण कोणत्या भाषेत बोलतात, ते कळतच नाही. त्यांची भाषा ही बाहुबलीमधील त्या कालकेयची भाषा वाटते. फक्त काही टॉपर मुलांना समजते. तास संपायला आला की शिक्षक विचारतात, कोणाला काही समजला नाही असं आहे का. आम्ही शक्यतो हात वर करत नसू. कारण शंका यायला अगोदर काही समजायला तरी हवं. आणि तरीही आम्ही जर शंका सांगितली की विचारतात ,’लक्ष कुठे होतं. बाकीच्यांना समजलं न मग तुला का नाही?’ अरे हेच उत्तर द्यायचा होता तर का विचारतात समजलं का म्हणून? उगाच चार चौघात आमचा फालुदा. म्हणून सर्वात शहाणी मुले तीच जी डिफॉल्टर लिस्टमध्ये नाव आले की वर्गात येतात, हो हो बोलतात, हजेरी लावतात आणि निघून जातात.

इंजिनीरिंगमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल, (जी आमची कधी झालीच नाही.). विषय आणि प्रॅक्टिकल या दोघांत खूप फरक आहे. विषय म्हणजे सगळं गणितीय पद्धतीने बरोबर आहे, पण प्रत्यक्षात चालत नाही. प्रॅक्टिकल म्हणजे सगळं प्रत्यक्षात दिसते, पण कोणीही सांगू शकत नाही, की असंच का चालतेय. आमच्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलमध्ये विषय आणि प्रॅक्टिकल एकत्र असायचे. प्रत्यक्षात काहीच चालायचे नाही आणि कोणीही सांगू शकत नसायचा की का चालत नाही. आता महाराष्ट्रात विरोधी पक्ष कोण, एवढाच गहन प्रश्न आमचे प्रॅक्टिकल का झाले नाही, हा असायचा.

असाइंमेंट हा प्रकार म्हणजे पर्यावरणाची नासाडी आहे. शिक्षक काही प्रश्न देणार आणि आपण काही पानांवर त्याची उत्तरे देऊन त्यांना परत करायची. मग त्यावर शिक्षक आपल्याला १ ते १० पैकी गुण देणार. यात शिक्षकांच्या चमच्या विद्यार्थ्यांना जास्त गुण असायचे. आणि तसाही असाइंमेंट एकच कोणीतरी लिहितो आणि बाकीचे सर्वजण उतरवुन घेतात( ये है आम जिंदगी). एकाने लिहिलेली असाइंमेंट बाकीचे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात(ये है इंजिनीरिंग जिंदगी). या असाइंमेंटबाबत सर्वात मोठा गैरसमज म्हणजे लिहिताना पाठांतर होईल आणि परीक्षेत मुलांना फायदा होईल. अहो मुले कानात इअरफोन घालून नाहीतर टीव्ही बघत असाइंमेंट छापतात. आणि हल्ली प्रत्येक मुलाकडे स्मार्टफोन असल्याने असाइंमेंटचे फोटो लगेच इकडून तिकडे फिरतात. न मग कसला अभ्यास न काय!! आणि असाइंमेंट पुर्ण करण्यासाठी कितीही दिवस मिळो, इंजिनीरिंगची मुले असाइंमेंट जमा करायच्या एक दिवस आधीच लिहिणार. कारण हिरा हा नेहमी दबावातच तयार होतो. (खाज, दुसरं काय).

मेकॅनिकल इंजिनीरिंग मुलांचे आकृत्या काढणे हा तर दुसऱ्या डोकेदुखीचा कार्यक्रम. पण त्यातही त्यांनी G.T. (glass transparent) चा पर्याय शोधून काढला आहे. यात आधी एकाने काढलेल्या आकृतीवर काच ठेवून त्यावर ज्यावर आकृती काढायची आहे, तो कागद ठेऊन प्रकाशाचा वापर करून आकृती काढली जाते. (टॅलेंट आहे भाई, टॅलेंट). विद्यापीठाने चाचणी परीक्षा इंजिनीरिंगला चालू करून, बऱ्याच मुलांना फर्स्ट क्लास मिळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. इकडे आरामात २० पैकी १५ तरी मिळतात. (पण काही शिक्षकांना तेही झालेलं बघवत नाही. इंटर्नल kt लावतात.)

सगळे प्रॅक्टिकल, असाइंमेंट जमा करायचा दिवस म्हणजे सबमिशनचा दिवस. या दिवशी स्वाभिमान, self respect, अहंकार, ego या सगळ्या गोष्टी गुंडाळून कपाटात ठेवायच्या असतात. ज्या शिक्षकांना आपण कधी गुड मॉर्निंग पण बोललो नाही, त्यांचा पाया पडायला लागतो. ‘ओ सर, घ्याना सबमिट करून’, अशा विनवण्या कराव्या लागतात. शिक्षकांचे चमचे सबमिट करून मुलांमध्ये भाव खात असतात.(एरवी या चमच्या मुलांना कोणीही विचारत नाही). पाण्यात बुडून नाकातोंडात पाणी गेल्यावर पाण्यातून बाहेर पडल्यावर जी मुक्तता मिळते, तीच मुक्तता खडूस शिक्षकांच्या नाकावर टिच्चून अपुऱ्या फाईल सबमिट केल्यावर मिळते.त्यासाठी टपोरी मुलांनाही सभ्यतेचा आव आणावा लागतो.(पोटापाण्यासाठी करावं लागतं गरिबांना).

तोंडी परीक्षा (Viva) म्हणजे एक मोठा द्राविडी प्राणायाम असतो. तसे पाहायला गेलो तर जीन्स आणि टीशर्ट हा इंजिनीअरचा राष्ट्रीय गणवेश आहे. Vivaसाठी फॉर्मल कपडे घालून येणे बंधनकारक असते. एवढी मेहनत करून वाढलेली दाढीही कापावी लागते. केस विंचरावे लागतात. नंतर सबमिट झालेली फाईल घेऊन शिक्षकांसमोर जावे लागते. मग सुरू होतो प्रश्नांचा भडिमार. आपण कधी न ऐकलेले प्रश्न शिक्षक विचारतात. आपण काही उत्तर दिले, की लगेचच त्यात चुका काढणे चालू होते. एरवी साधेसुधे आणि अडाणी दिसणारे शिक्षक अचानक महापंडित दिसू लागतात. भाव खाऊ लागतात. मुलेही त्यांना भाव खाऊन देतात, कारण त्यांना माहीत आहे की याच एकमेव दिवशी त्यांना आपली भडास काढता येईल.

क्रमशः

लेखक: विवेक बाळकृष्ण वैद्य

 

Previous Article

भगवंतांची LIC पॉलिसी

Next Article

शारीरिक साईड इफेकट्स

You may also like