Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

माझे इंजिनीरिंगचे प्रयोग; भाग २

Author: Share:

Viva चालु असताना शिक्षक असे प्रश्न विचारतात की जे आपण कधी ऐकलेही नसतात. न मुलांना त्रास देण्यासाठी शिक्षक मुद्दाम अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न विचारतात. मुलांना ते कळत नाही असे काही नाही, पण शिक्षकांना याबाबत विचारणे म्हणजे शिक्षकांचा अहंकार दुखावतो. मग जाणूनबुजून कमी गुण मिळतात. असे होऊ नये म्हणून मुले खाली मान घालून अपमान सहन करतात. ( खाली मुंडी आणि पाताळ धुंडी ही म्हण यासारख्या प्रकारांमुळे तर तयार झाली नसेल???) एवढे सगळे करूनही काही मुलांना reviva ठरलेली असतेच. इथेही अभ्यासापेक्षा वशिला कामी येतो. शिक्षकांच्या ‘विशेष’ मुलांना कधी reviva लागत नाही. Reviva देताना शिक्षक मुलांना सांगतात की अगोदर सगळं वाचून ये. अहो, जिकडे आठवडाभर वाचूनही मुलांना काही कळाले नाही, तर आता एक दोन तास वाचून काय कळणार आहे. पण आले शिक्षकांच्या मना, तिथे कोणाचे काही चालेना. तिकडे दिवाळीच्या दिवसात दुनिया मिठाईच्या रांगेत उभे आणि इकडे भावी इंजिनिअर vivaच्या रांगेत.

पण काही शिक्षक हे खरंच खूप महान असतात. त्यांनाही आमची परिस्थिती कळते. म्हणून ते viva खूपच हलकेसे घेतात. आमच्या एका शिक्षकाने तर ‘बाहेरील शिक्षक (एक्सटर्नल) यायच्या आत तुमची viva द्या न घरी पळा’ असे म्हणून लगेच तासाभरात १२० मुलांच्या viva संपन्न केल्या. ( हा एक जागतिक विक्रम आहे का ते बघा जरा). मुलांना अजिबात त्रास न देणाऱ्या या शिक्षकांमुळेच या जगात माणुसकी टिकून आहे असे मला वाटते.

हे सर्व सबमिशन आणि viva झाल्यावर खूप मोठा टेन्शन निघून जाते. आता फक्त राहिलेली असते सत्र परीक्षा. या सत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५-२० किंवा कधी कधी २५ दिवसही मिळतात.या दिवसांना prepartion leave (P.L.) असे म्हणतात. या दिवसांत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. सत्र चालू झाल्यापासून आपण चाचणी परीक्षेसाठी अथवा vivaसाठी काहीतरी वाचलेलं असते. पण आपलं वाचन म्हणजे निवडणूक आल्यावर राजकारणी जसे आश्वासन देतात, त्याच प्रकारचे असते. निवडणूक झाल्या की राजकारणी आश्वासने विसरतात, तसेच या लहानमोठ्या परीक्षा झाल्या की आपण केलेलं पाठांतर विसरतो. पुढचं पाठ, मागचं सपाट, तेच ते. पण इकडे पुढचं पाठही झालेलं नसते. अगदी सुरुवातीच्या धड्यापासून सुरुवात करावी लागते.

ही सुरुवात करणेही सोपे राहिलेलं नसते. त्याअगोदर नियोजन करावे लागते. कोणत्या विषयाला किती दिवस द्यायचे याचा संपूर्ण अभ्यास करावा लागतो. त्या अभ्यासासाठी लागणारे नोट्स अथवा पुस्तके आपल्याजवळ आहेत का ते बघावे लागते. इंजिनीरिंग अभ्यासासाठी ठराविक पुस्तके नाहीत, युनिव्हर्सिटी अभ्यासक्रम देताना काही संदर्भ पुस्तकांची यादी देते. त्यात देशातील आणि विदेशातील अभ्यासकांची पुस्तके असतात. सत्र चालू होण्याअगोदर इंजिनीरिंग विद्यार्थी ठरवतात की विदेशी अभ्यासकांची पुस्तके वाचेल आणि खूप ज्ञान मिळवेल. सत्र संपायला आला की कोणत्यातरी मित्राचे क्लासेसचे नोट्स शोधायला लागतात. अगदीच काही नाही झालं की ‘techmax’ नाहीतर ‘easy solution’ झिंदाबाद. या easy solutionमध्ये मागच्या पाच वर्षांत युनिव्हर्सिटी परीक्षेत आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे असतात. पेपर सेट करणारे ठराविक प्रश्न वारंवार विचारतात, हा अनुभव असल्याने केवळ easy solution वाचून ‘काठावर पास, अभ्यास बास’ हेच करण्यासाठी मुले उत्सुक असतात.

अभ्यास करणाऱ्या मुलांचे चार मुख्य प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे विदेशी अभ्यासकांचे संदर्भ पुस्तके वाचणारे. दुसरा प्रकार म्हणजे भारतीय अभ्यासकांचे संदर्भ पुस्तके वाचणारे. तिसरा प्रकार म्हणजे संदर्भ पुस्तके न वाचता, ‘techmax’ यासारखे पुस्तके वाचणारे. तिसरा प्रकार म्हणजे ‘techmax’, ‘easy solution’ यांचे झेरॉक्स काढून ते वाचणारे. पहिला प्रकार आपल्याला मोठ्या कॉलेजमध्ये बघायला मिळतो. दुसरा प्रकार म्हणजे सामान्य कॉलेजमध्ये टॉपर होय. उरलेले ९०% मुले तिसऱ्या अथवा चौथ्या प्रकारात मोडतात.

परीक्षा चालू होण्याआधी हॉलतिकीट प्रिंट करून घ्यावे लागते. ह्या हॉलतिकीटला घेण्यासाठी कॉलेजमध्ये जावे लागते, हॉलतिकीट मिळाला की त्यावर मागच्या सत्राच्या हॉलतिकीटचा फोटो चिकटवला की सही आणि शिक्का लावून घ्यायचा. नवीन फोटो कशाला वाया घालवा? न तसाही KT लागली असेल, तर अजून एकदोन हॉलतिकीट तयार असतात आपले. सही मागताना H.O.D.(विभागप्रमुख) कडे जावे लागते. मग H.O.D. कुत्सितपणे हसत विचारतो की झालंय ना अभ्यास! त्याच्या चमच्या विद्यार्थ्यांना मात्र एकदम वैयक्तिक मार्गदर्शन. आधीच त्या चमच्या विद्यार्थ्यांना इंटर्नल परीक्षेत चांगले गुण मिळालेले असतात, न आम्हाला नापास करता येत नाही म्हणून पास केलेलं असतं. असू दे रे. जिल्लत के ज्यादा मार्क्स से अच्छा मेहनत के कम मार्क्स अच्छे (कोल्ह्याला द्राक्ष आंबट).

त्यानंतर तसेच मान खाली घालुन मिळालेले हॉलतिकीट घेऊन आम्ही घरी येतो. पुन्हा अभ्यासाला सुरुवात. पण मन लावून अभ्यास. सुरुवातीला अभ्यासासाठी मनाची तयारी करायलाच, २-३ दिवस जातात. पण एकदा मन लागले की धडाधड पाठांतर चालू होते. जे धडे आम्हाला ३ महिने वाचून समजत नाहीत, ते एका दिवसात समजायला लागतात. ही सुपरपॉवर फक्त या दिवसातच येते. एरवी हे कधी जमत नाही. आणि परीक्षा झाली की परत निघूनही जाते. दरवर्षी वाटते की P.L.मध्ये अभ्यास केला तसा अभ्यास अगोदरच सुरुवात करेल, मग ९चा पॉईंटर पक्का. पण कसलं काय!!! परीक्षा संपली की ही सगळी अभ्यासाची इच्छाशक्ती गायब.

मग हाच झालेला अभ्यास घेऊन परीक्षा केंद्रावर जायचे. परीक्षाकेंद्र म्हणजे आपलंच कॉलेज. पण परीक्षा केंद्रावर नुसतेच गेलो, तर परीक्षेचा अपमान होईल , अशी खूप साऱ्या भावी इंजिनीअरची भावना आहे. म्हणून ते फक्त लिखाणाचे साहित्य आणि हॉलतिकीट घेऊन जात नाहीत, तर महत्वाच्या विषयांच्या मिनी झेरॉक्स घेऊन जातात. या मिनी झेरॉक्स काढण्यासाठी मुलांच्या लांबच लांब रांगा परीक्षेच्या दिवशी दिसतील. काही अतिहुशार मुलांना सर्वच महत्त्वाचे वाटते. मग काय!! पुस्तकच घेऊन बसतात.( टेन्शन नाही सरचं, होऊद्या खर्च).

क्रमशः-

विवेक बाळकृष्ण वैद्य.

Previous Article

साहित्य पाठविण्यासाठी आवाहन !

Next Article

नॅक मानांकनात के टी एच एम महाविद्यालय महाराष्ट्रात अव्वल

You may also like