माझे इंजिनीरिंगचे प्रयोग

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


परीक्षेत पास होण्यासाठी फक्त मिनी झेरॉक्स महत्वाच्या नसतात. संभाव्यता हा इंजिनीरिंगमध्ये एक भाग आहे. जेवढे जास्त कॉपी तेवढी पास होण्याची संभाव्यता जास्त, म्हणून हॉलतिकीट, कंपसबॉक्सच्या आतील जागा यासारख्या ठिकाणी मुले लिहून काढतात. तसेच सर्वात महत्वाची जागा म्हणजे बेंचेस. हुशार मुलांना अभ्यासक्रमाच्या बाहेरील येऊ नये हे टेन्शन तर बाकीच्यांना पहिल्या बाकड्यावर हजेरी क्रमांक येऊ नये, हे टेन्शन. यातही पहिल्या बाकड्यावर बसूनही मजबूत छापणाऱ्या मुलांना एखादा शौर्यपदक तर नक्कीच मिळाले पाहिजे. एवढेच नव्हे,तर बाकड्यावर आणि भिंतीवर संपूर्ण उत्तरे, गणितीय सूत्रे पेन्सिलने लिहितात. जर मुंबई युनिव्हर्सिटीने उत्तरपत्रिकेसोबतच बाकडेही पुरवणी म्हणून जमा करायला सांगितले की सर्वच मुलांचा Distinction नक्की. (प्रयोग करायला काही हरकत नाही, कारण उत्तरपत्रिका गहाळ होतात, बाकडे गहाळ नाही होणार).

शिक्षक वर्गात येऊन बैठक व्यवस्था बघतात. परीक्षेत आधी उत्तरपत्रिका आणि नंतर प्रश्नपत्रिका मिळते. काही महाभाग असेही असतात की उत्तरपत्रिका हाती आल्याआल्या इकडेतिकडे लिहिलेली उत्तरे उत्तरपत्रिकेवर लिहून काढतात. म्हणजे कसं, कोणत्याही कारणांमुळे जर लिहिलेले मिटले गेले, तर टेन्शन नाही. शिक्षक प्रत्येक मुलाच्या जागी येऊन बघतात की बाकड्यावर काही लिहिले तर नाही आणि त्या बाकड्यावर दुनियभरचे उत्तरे त्यांना सापडतात. तरीही मुले बिनधास्त सांगतात की हे तर दुसऱ्या विषयाचा लिहिले आहे, मागे जे मुले येथे बसले होते, त्यांनीच लिहिले असेल. पर्यवेक्षक शिक्षक हे बहुधा दुसऱ्या ब्रांचेसचे असल्याने त्यांना या विषयावर विशेष काही माहिती नसते आणि दुसऱ्या शिक्षकांकडे जाऊन विचारपूस करणे वेळेअभावी शक्यही नसते. शिवाय इतर सगळ्या मुलांच्या जागेवर जाऊन बघितल्यावर मुले असे काही हावभाव देतात की जणू एखाद्या शास्त्रज्ञाला संशोधन करताना अडचण केलीये. बिचाऱ्या पर्यवेक्षक शिक्षकांना शांतपणे आपले काम करण्यावाचून गत्यंतर नसते.

मग शिक्षक आपली प्रश्नपत्रिका बाहेर काढतात. प्रश्नपत्रिका हाती पडेपर्यंत धाकधूक असते. आपली वाट तर नाहीना लागणार याची धास्ती असते. आता प्रश्नपत्रिका बघितल्यावर यावर पूर्ण शिक्कामोर्तब होते. आपण जे नेमके वाचायला विसरतो, तेच प्रश्न जास्त गुणांसाठी विचारलेले असतात. काही प्रश्न तर असे असतात की त्यांना बघितल्यावर वाटते की हे कधी होतं अभ्यासक्रमात!!! काही प्रश्न बघितल्यावर कळते की हे असं पण असते का!! अपेक्षित प्रश्नसंच हे आपल्याला आत्मविश्वास दाखवते आणि खरी प्रश्नपत्रिका लायकी. मग आपले लक्ष आपल्या आजूबाजूच्या मित्रांकडे जाते. बहुतांश सगळ्यांचेच चेहरे उतरलेले असतात. ज्यांना सगळं येत असते, तेही चेहरा उतरला असल्याचा अभिनय करतात कारण त्यांना कोणी प्रश्न विचारू नये. ( हे असले मित्र मी खूप बघितले आहेत. हे लोक कोणाचेच नसतात.) परंतु ज्या मित्राने कॉपी आणली आहे आणि नेमके तेच प्रश्न जर प्रश्नपत्रिकेत आला तर तो आर्किमिडीजप्रमाणे ‘युरेका युरेका’ असे ओरडायचेच बाकी राहतो. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ या समर्थांच्या प्रश्नाचे उत्तर तोच देऊ शकतो याची मला खात्री आहे.

मग सुरू होतो तो महासंग्राम. कसोटी क्रिकेटमध्ये जसे तळातले फलंदाज सामना वाचण्यासाठी खेळतात, जिंकण्यासाठी नव्हे, तसेच इंजिनीरिंग विद्यार्थी सत्र वाचण्यासाठी अभ्यास करतात, क्रमांक येण्यासाठी नव्हे. अगोदर आपली मिनी झेरॉक्स, बाकड्यावर लिहिलेली उत्तरे अशी लहान अस्त्रे संपली की मग आपले ब्रह्मास्त्र बाहेर काढली जातात. ते म्हणजे विद्यार्थी स्वतःच एक लेखक बनतो. बाजूच्या मित्राला विचारतो की “फक्त आकृती दाखव, बाकी माझा मी लिहितो”. फक्त आकृती बघून ते यंत्र बनवण्याची प्रकिया, त्या यंत्राची कार्यपद्धती, त्यात येणारे अडसर, यंत्राच्या मर्यादा, फायदे आणि तोटे यावर सविस्तर विश्लेषण फक्त इंजिनीअरच लिहू शकतो.

उत्तरपत्रिकेत सुरुवात करताना हस्ताक्षर फार सुरेख असते. पण मग जसा जसा वेळ जाऊ लागतो, तसतसे हस्ताक्षर इंग्रजीतून चायनीज भाषेत बदलत जाते. काही मुले नेमकी काय फेकफेकी केलीये, हे पकडले जाऊ नये म्हणून मुद्दाम खराब हस्ताक्षर काढतात. कारण विध्यार्थ्यांनाही माहीत असते की शिक्षकांना शेकडो उत्तरपत्रिका कमी वेळेत तपासायच्या असतात, त्यामुळे एकूण एक शब्द वाचण्यासाठी वेळ नसतो. शिवाय उत्तराला गुण किती यावर उत्तरांची लांबी ठरलेली असते. आपण माहीत नसलेल्या उत्तराची आकृती लांबून बघू शकतो, पण अक्षरे कशी दिसणार?? त्यामुळे काहीतरी लिहायचं असते,म्हणून लिहावं लागते. मजबुरी का नाम इंजिनीरिंग.

शेवटचा तास शिल्लक असताना सर्व विध्यार्थ्यांच्या अंगात शास्त्रज्ञ येतात. कोणत्याही प्रश्नांची खरी खोटी काहीही उत्तरे बिनधास्त ठोकून येतात. खऱ्याखुऱ्या शास्त्रज्ञांनी लावले नसलेले शोधही हे विद्यार्थी लावतात. बरे झाले की उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांचे नाव आणि हजेरी नंबर शिक्षकांना दिसणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. ती व्यवस्था जरी शिक्षकाने गुण देताना भेदभाव करू नये यासाठी असली तरी विद्यार्थ्यांना याचा जास्त फायदा होतो. असे महान शोध लावणारे विद्यार्थी शिक्षकांना ओळखता येत नाही. नाहीतर त्या बिचाऱ्यांचे काय हाल झाले असते!!! त्या शिक्षकलाही वाटत असेल की अशी मुले माझ्याकडून शिकून गेले हे लोकांना कळाले, तर त्याची बाहेर काय पत राहील??

असे करत करत एक एक पेपर संपतात. आणि मग हक्काची सुट्टी सुरू होते. इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी ख्रिसमसमध्ये आणि आणि उन्हाळ्याची सुट्टी पावसाळ्यात मिळते. बाकीच्यांच्या सुट्ट्या संपून त्यांचे कॉलेजेस चालू झालेले असतात. परत कॉलेज चालू झाल्यावर पुन्हा तेच रटाळ लेक्चर, असाइमेंट वगैरे चालू होतात. पण नवीन चालू झालेले असते ते म्हणजे डेज. तसे सर्व डेज हे १४ फेब्रुवारीच्या आधी संपणे अपेक्षित असते.पण कॉलेज उशिरा चालू झाल्याने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात डेज येतात. या डेजचा सर्वात जास्त राग कोणाला येत असेल तर ते मेकॅनिकल इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांना. ते कोणासोबत चॉकलेट डे, प्रपोज डे साजरे करणार? वर्गात मुलीच नसतात. बाकीच्या विभागात मात्र जोरदार डेज चालू असतात.

हे सर्व डेज संपले की येतात मागच्या परीक्षेचा निकाल. निकालाची चाहूल लागली की हमखास नापास होण्याची शक्यता असलेली मुले KT आणि Recheckingसाठी पैसे जमा करायला सुरुवात करतात. कुठल्याही ब्लॉकबस्टर सिनेमापेक्षा कुठलेही विद्यापीठ फर्स्ट डे, फर्स्ट शो जास्त पैसा येथे कमावते. इकडे पास होणारे मुले कमी आणि KT बसलेले मुले जास्त असतात. नोटबंदीच्या काळात जेवढ्या रांगा बँकेबाहेर होत्या, त्यापेक्षाही जास्त रांगा या KT आणि recheckingचा फॉर्म भरताना दिसतात.

या recheckingचा निकाल लागतानाही खूप वेळ जातो. पण खूप काही विषय सुटतात. गुण वाढतात. हे बघून बरे वाटते. त्याच दरम्यान सबमिशन, viva हेही चालू असतेच. परीक्षाही येते. असेच एकामागून एक ८ सेमिस्टर म्हणजेच ४ वर्षे (अभ्यासक्रमाची बरं का!! ड्रॉप बसलेल्या मुलांना ५-६वर्षेही लागतात)कधी निघून जातात कळतही नाही. अभ्यासक्रमाची चार वर्षे जातात, पण माणसाला इंजिनिअर बनवूनच. त्या इंजिनीअरचा पुन्हा माणूस बनणे मात्र शक्य नसते.मागे वळून बघताना ४ वर्षेही ४ क्षणात डोळ्यासमोर येतात. जेव्हा आपण डिग्री हातात घेतो, तेव्हा काहीतरी मिळवण्यासाठी आपण खूप काही गमावले आहे हेही समजून जाते. खूप लोकांना आपण आयुष्यात शेवटचे भेटणार असतो. काही मित्र राहतात संपर्कात, पण सर्वच जण कायमस्वरूपी राहणे शक्यच नसते. मागे फक्त आठवणी उरतात. खूप काही सांगायचे, व्यक्त करायचे राहून जाते. मग मात्र आयुष्याचा पुढचा प्रवास चालू होतो आणि आठवणी अजून धूसर होत जातात..
अस्तु..

@विवेक बाळकृष्ण वैद्य


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline

Previous Article

आर्थिक विश्लेषण २०१८

Next Article

सायवा “मिसेस नाशिक आयकॉन–२०१८ ची विजेती स्वाती रनाळकर”

You may also like