बोलायला हवं

Author: Share:

बोलायला हवं..हो..बोलायला तर हवचं, कारण काही गोष्टी, काही विषय इच्छा नसेल, तरीही विचार करायला लावतात.

          एक काळ होता जेव्हा मला अस वाटायचं की ज्याची भाषा अलंकारीक असते, केवळ त्याच व्यक्तीला मुक्त संवाद करावयाची परवानगी असते.आज पुन्हा एकदा ब-याच दिवसांनी मोकळ होण्याची संधी मिळाली. आजच्या महिला कतृत्ववान आहेत का? हा प्रश्न न जाणे कित्येक दिवस सर्वांच्या मनात खोलवर दडून बसलेला आहे. आपल्या नजरेत येणारी दररोजची गोष्ट म्हणजे, काही महिला कामावर जाणा-या तर काही महिला घर सांभाळताना दिसतात.

ब-याच पुरुषांचा हा समज आहे की, बाई कमावत असली तरीही तिचे मूळ काम घर सांभाळणे हेच आहे आणि घर सांभाळण्यासाठी काही विशेष कतृत्व लागत नाही. तर मला या संकुचित विचारी पुरुषांना सांगावंस वाटेल की घर सांभाळणारी हीच बाई सकाळी सर्वांत आधी उठून रात्री सर्वांपेक्षा उशिरा झोपते. आता या दिवसभरात ती गप्पा-टप्पा किंवा नट्टा-पट्टा करत असेलच, असे काहीही नाही.

          एक स्त्री कधीकाळी एक चिमुकली असते. तिलाही इतरांसारख फार शिकायचं असतं.. बाबांची लाडकी कधी मेरीटमध्ये येते तर कधी कबड्डी, खो-खो मध्ये प्रथम क्रमांकाची खेळाडू होते.. नेहमीच विविध दर्जाच्या विविध उपक्रमांमध्ये हौसेने सहभागी होणारी ती चिमुकली मोठी होते,मोठी होत असताना कधी आज्जीने केलेला भाऊ आणि तिच्यातला भेदभाव तिला कळत असतो, तिच्या हिंडण्या-बागडणावर येणारी बंधनं तिला जाणवत असतात.हसत-खेळत, मुकं गिळत मोठी झालेली बाबांची लाडकी या अशा अनेक बंधनात जखडलेली बोहल्यावर चढते आणि मग…मग काय? *शुभमंगल सावधान*… लग्न झाल्यावर तिच्या आयुष्याचा दुसरा पडाव सहजपणे सुरु होतो.. मग सासू, सासरे, दिर, नणंद, नवरा आल्या-गेल्याची उठबस, घरचा किराणा, खाणं-पिणं, खरकटी भांडी घासणं आपसुक तिच्या नशिबी लिहिलं जातं..या सगळ्याच गोष्टी होत असताना, तिचा पुन्हा एकदा नव्याने जन्म होतो, तो “आई” म्हणून.. आता ही स्त्री, कुणाची मुलगी, कुणाची ताई, कुणाची सखी, कुणाची बायको, कुणाची सून आणि चिमुकल्याची ‘आई’ असते.ही आई दिवसभर राबते, काबाड-कष्ट  करते, कधी-कधी स्वतःच्या पोटी चिमटा काढून लेकराला ताट वाढते..

या अशा क्षणी मला एका सुंदर काव्याच्या दोन ओळी आठवतात,

     “हंबरुन वासराले,चाटती जवा गाय,

      तवा मले,तिच्यामंधी,दिसती माझी माय..

या अशा नानारुपी स्त्रीचे कतृत्व शब्दांमध्ये काय आणि कसे मांडावे हेच कळत नाही.

          “आई राजमाता जिजाईने शिवबा घडवला,राणी लक्ष्मीबाईने लेकरु पाठीशी बांधून लढा दिला”, “किरण बेदींसारखी लढाऊ वृत्त्तीची जेलर होऊन गेली.”

या तीळ-तीळ जीव तोडून घडवलेल्या जगातील आज प्रत्येकजण या स्त्रियांना ओळखतो आणि तरीही आज घरी तान्ह बाळ ठेवून,खांद्याला बँग लावून,कामासाठी बाहेर पडलेल्या,जीन्स घालणाऱ्या आईवर तिच्याकडे तिच्याच बाळासाठी पदर नसल्याची गंभीर,दुःखदायी टिका करतात.

          घरी वाट पाहणारी बायको,उपाशीपोटी राहणारी आई दिवसभर घराकडे लक्ष देत असते.चार भिंतींच्या खोलीला मायेने घर बनविणारी ही माता कतृत्ववान असू शकत नाही का?

कतृत्व पैसा कमावण्यात किंवा फोटोफ्रेम मध्ये राहून काम करण्यात नाही..

कतृत्व दुस-यांच्या हास्याचं, आनंदाच कारण बनण्यात आहे,कतृत्व भुकेल्याला दोन घास भरवण्यात आहे,कतृत्व नम्रपणात आहे आणि या सर्व बाबी असणाऱ्या माझ्या, तुमच्या आणि सर्वांच्या आईस या विशेष कतृत्वाबाबत माझा मानाचा मुजरा!

अजूनही आजच्या स्त्रींच्या कतृत्वाबाबत शंका असेल, तर आपल्या वेळेतील मोलाचे काही क्षण घरातील स्त्रीसोबत घालवा,तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपसुक मिळून जाईल.

या संपूर्ण लेख दरम्यान कूणाच्या भावना दुखावल्या असल्यास मनःपूर्वक क्षमस्व..

धन्यवाद !!

लेखिका: कु.विशाखा प्रमोद महाडिक.

Sybcom- Sydenham college

9768128037

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

Previous Article

शिक्षकांचे संस्कार महत्वाचे; जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांचे प्रतिपादन

Next Article

आग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा…!

You may also like