वाहून गेलेली माती आणि माणसे !

Author: Share:

मंगळवारी २९ ऑगस्टला मुंबईत गेल्या बारा वर्षात एका दिवसात पडला नव्हता इतका कडा कोसळावा तसा मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असा प्रचलित शब्दप्रयोग करणे म्हणजे त्यावेळच्या भीषण परिस्थितीची चेष्टा करण्यासारखे होईल. पक्क्या बांधकामाच्या सुरक्षित वास्तुत राहणाऱ्या लोकांचेही तोंडचे पाणी त्यादवशी पळाले होते. अनेक रस्त्यावर कंबरेइतके पाणी साचल्याने त्यातून उद्भवणारा अधिक अनर्थ टाळण्यासाठी इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. अनेक तास लोकांना पाण्याच्या थेम्बावाचून राहावे लागले. अनेकांनी स्थलांतर केले. भक्कम वास्तूत तळाला निवास करणाऱ्या लोकांना दुसऱ्या दिवशी गाद्याउशा आणि अंथरूणंपांघरुणं कुजल्यामुळे फेकून द्यावी लागली. निम्मी मुंबई झोपडपट्टीत राहते. निम्न श्रेणीतील निम्मे पोलीसदलही झोपड्यातून काळ कंठितें. त्यांचे काय हाल झाले असतील ह्याचा विचार केला तरी अंगावर कांटा उभा राहतो. परंतु ह्यावेळची परिस्थिती वेगळी होती. लोकांना दु:ख आणि मनस्ताप होण्याला त्याहून अधिक काही कारणीभूत होणार होते.

मुंबईत लोक प्रतिदिवशी विविध कामांसाठी जे पाणी वापरतात ते समुद्रात वाहून जाण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी भूपृष्ठाखालून मोठ्या व्यासाच्या नलिका जोडण्यात आल्या आहेत. ह्या मालिकांमधून विनाअडथळा पाणी वाहते आहे का की त्यादृष्टीने काही दुरुस्तीची आवश्यकता आहे हे तपासण्यासाठी बहुतेक रस्त्यांवर मॅनहोलची व्यवस्था केलेली असते. मॅनहोल म्हणजे त्या मालिकांत उतरण्यासाठी रस्त्याला पाडलेले भोक. हे भोक म्हणजे एकावेळेला दोन माणसे उतरू शकतील इतके रुंद असते. एरव्ही त्यावर घट्ट लोखंडी झाकण असते. मुसळधार पावसात हे झाकण उघडले जाते. पण आत कोणी पडू नये म्हणून त्याचे भोवती सरंक्षक कवच म्हणजे अडथळा निर्माण केलेला असतो. ह्यावेळच्या परिस्थितीतले अत्यंत क्लेशदायक दुर्दैव म्हणजे मुंबईतले प्रख्यात डॉक्टर, पोटाच्या विकारांवरील धन्वंतरी श्रीमान दीपक अमरापूरकर हे मंगळवारी दुपारी परळ भागात एकफिन्स्टन रस्त्यावरील एका मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह वरळीच्या समुद्र किनाऱ्यावर सापडला. डॉ अमरापूरकर दक्षिण मुंबईतील एका रुग्नालयात काम करीत होते. त्यादिवशी ते तेथून आपल्या चारचाकीतून प्रभादेवीच्या निवासस्थानी निघाले. परळमध्ये तुंबलेल्या पाण्याची उंची पाहून त्यांनी आपल्या चालकाला गाडी सुरक्षित ठिकाणी उभी करण्यास म्हणजे सोडून देण्यास सांगितले आणि ते स्वतः: दहापंधरा मिनिटांवरील आपल्या घरी जाण्यासाठी साचलेल्या पाण्यातून पाय ओढीत आणि डोक्यावर छत्री धरील निघाले. वाटेल उघड्या गटाराने त्यांना आत ओढून घेतले. ह्या एका घटनेने सगळी मुंबादेवी दु:खी आहे. तिचा गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह निर्भेळ राहिलेला नाही. जे काही गमावले आहे ते केवळ अमरापूरकर कुटुंबीयांनी नाही तर सगळ्या मुंबईला आपल्या ओळखीचा, आपल्या घरातला एक माणूस गेला असे वाटत आहे.

संवेदनाशून्य राजकारणी लोक ह्या घटनेवर नेहमीच्या मतलबी भाषेत चर्चा करतील. आपण सामान्य लोकांनी खोलवर म्हणजे अगदी जणू त्या उघड्या गटारात उतरून वेगळ्या प्रकारची चर्चा केली पाहिजे. एखादा पडला तर तो वाहून जाऊन नये म्हणून जड पदार्थाला अटकाव करणारी लोखंडी जाळी त्या गटारात बसवायला पाहिजे. नेहमी बसवत असतील तर ती ह्यावेळी कोठे गेली होती ह्याचे उत्तर मिळाले पाहिजे. उघड्या गटाराला बांबूचे कुंपण असते. त्या ठिकाणी कसल्याही पावसात वाहून जाणार नाही असे भक्कम कुंपण पाहिजे. मुंबई हे बेट आहे. त्याच्या विस्ताराला मर्यादा आहेत. तरीपण मुंबईच्या प्रकृतीला झेपावणार नाही इतक्या लोकसंख्येचे आक्रमण तिच्यावर होईल अशा आकर्षक सुविधा येथे निर्माण करण्याची सरकारी आणि बिनसरकारी पातळीवर चढाओढ चाललेली असते. विशिष्ठ ध्येयवादासाठी आणि लोकानुरंजनासाठी काही योजना राबविल्या जातात. त्याचे घातक परिणाम झाले तर लोकांना त्यातून सुखरूप बाहेर काढण्याची योजना मात्र आपल्याकडे सिद्ध नसते.  गटारे उघडली पण त्यात कोणी पडू नये म्हणून दक्षता घेतली नाही. त्यात डॉ अमरापूरकरांचा जीव गेला. राज्यकर्त्यांच्या चुकीमुळे असे लाखांनी जीव आपण स्वतंत्र होतांना गेले आहेत. अमरापूरकरांमुळे त्यांची आठवण झाली.

भारताच्या शतकानुशतकांच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदू भूमीवर पाकिस्तान निर्माण व्हावे म्हणून आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केलेले नव्हते.. ते लढले आणि हुतात्मा झाले ते अखण्ड भारतासाठी. गांधी, नेहरू आणि काँग्रेस संस्कृतीच्या भ्रांत राष्ट्रवादामुळे देशाचे तुकडे करावे लागले. जो भाग पाकिस्तानात जाणार होता तेथील हिंदूंनी तेथून निघण्याची आणि उर्वरित भारतात येण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा गांधी, नेहरू आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना येऊ दिले नाही. सुरक्षिततेची हमी दिली. जर बलिदान करावे लागलेच तर ते हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी कारणी लागले असे समजा असा उपदेश गांधींनी केला. काँग्रेसने ठराव करून पाकिस्तानची भेट इस्लामी आतन्कवादाला दिली. ती  घेतानाही पाकिस्तानी प्रवृत्तीने दंगे केले. लूटमार केली. बलात्कार केले आणि मानवी इतिहासात झाले नसतील असे अत्याचार हिंदूंना भोगावे लागले. कारण काँग्रेसने हिंदूंच्या संरक्षणाची काही व्यवस्था केलेली नव्हती हे पाकिस्तानला माहित होते. तेव्हापासून आपल्या राज्यकर्त्या वर्गात आणि राजकीय सृष्टीत कर्तव्यभावनेचा अभाव नांदतो आहे. दायित्वशून्यतेची लाज वाटत नाहीशी झाली आहे. आपण स्वतंत्र होतांना आपल्या बायकांच्या लज्जेचे रक्षण करू शकलो नाही ह्याची आपल्याला लाज वाटेल तेव्हा डॉ अमरापूरकरांसारखा माणूस वाहून गेला म्हणजे आपण काय गमावले ह्याची पुरेशी कल्पना आपल्याला येऊ शकेल. आपण दैववादी आहोत. मानवी प्रयत्नांचे महत्व आपण अजून मानलेले नाही. म्हणून संकट निवारणाच्या आपल्या योजना परिपूर्ण नसतात. मग प्रथम माती आणि मग माणसे वाहून जातात.

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी

 

Previous Article

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

Next Article

आला श्रावण

You may also like