Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मला भावलेलं मुंबईचं रुप – मिलिंद कल्याणकर

Author: Share:

मला भावलेले मुंबईतील शिवाजीपार्क

मुंबईत असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही की ज्यांनी कधी शिवाजी पार्क पहिले नाही किंवा कधी शिवाजी पार्क च्या कट्ट्यावर बसून गप्पा मारल्या नाहीत. वयाच्या विविध टप्प्यावरील कित्येक आठवणी या शिवाजी पार्कशी जोडलेल्या असतील. शिवाजी पार्कच्या भोवतालच्या कट्ट्यावर बसल्यावर या आठवणी वारुळातील मुंग्यांप्रमाणे एका मागोमाग एक बाहेर येतात व मनाला पुन्हा एकदा सुखद संवेदना जाणवून देतात. या आठवणी अवीट व अमीट आहेत. काही काळ स्वतःला हरवून टाकण्याऱ्या या आठवणी शिवाजी पार्क चा अनुभव घेतलेल्या प्रत्येकाच्या मनात असतील. या आठवणी आपल्या नकळत आपल्याला त्या काळात घेऊन जातात.

कट्ट्यावर बसून चणे शेंगदाणे खात खात सूर्यास्त पाहणे हा आनंद मनाला नेहमीच प्रफुल्लीत करून जायचा या कट्ट्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे या कट्ट्यावर थोडावेळ टेकले तरी सगळा मानसिक तसेच शारीरिक शिणवटा क्षणार्धात पळून जातो व एकदम हवासा वाटणारा सैलपणा येतो. मनाची तसेच शरीराची मरगळ झटकून टाकण्यासाठी शिवाजी पार्क ला पर्याय नाही. शिवाजी पार्क पासून चालण्याच्या अंतरावर रहात असलेले जवळ जवळ सर्वजण दिवसातून एकदा तरी शिवाजी पार्क ला आवर्जून भेट देतात. कट्ट्यावर काही काळ टेकतात व मग आपल्या कामाला निघून जातात. कट्ट्यावर जागोजागी बसलेले समवयस्क मंडळींचे गट व त्यांचे चाललेले हास्यविनोद हे दृश्यच मनाला आल्हाद देऊन जाते. सळसळत्या तारुण्याची जोशदार तसेच जोमदार मंडळी पाहून मनाला उभारी येते. त्यांच्या त्या मनमोकळ्या गोष्टी, मर्यादा सांभाळून मुला मुलींची चाललेली चेष्टा मस्करी, परस्परांची उडवलेली टर इत्यादी गोष्टी बघून मनातील विचारांना सकारात्मकता येऊ शकते. कधी कधी गटातील कोणालातरी “टार्गेट” करून सर्व मिळून त्याची खिल्ली उडवितात.

सकाळीही सगळया वयोगटातील मंडळी असतात पण ती सगळी शारीरिक स्वास्थासाठी नेमाने शिवाजी पार्कला भेट देतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात शिवाजी पार्कला चक्कर मारतांना दिसतात अथवा दव पडून ओल्या झालेल्या हिरव्या अथवा पिवळसर हिरव्या गवतात उभे राहून शारीरिक कसरती करतांना दिसतात. काही जण कोरड्या जागेत योगासनेही करतांना दिसतात. हे सर्व करीत असतांना त्याच्यात माफक विनोदाची फवारणी होत असते. नोकरी / व्यवसाय करणारी मंडळी नेहमीची आवश्यक तेव्हढीच कसरत / जॉगिंग करून घरी पळायच्या घाईत असतात. निवृत्त मंडळींचे गट जर उशिरा येतात व जमेल तेव्हढीच कसरत करून व जमेल तेव्हढेच चालून एखाद्या झाडाच्या सावलीत अघळ पघळ गप्पा मारीत तसेच थट्टा मस्करी करीत बसतात. जसे पुरुषांचे वयोमानानुसार गट असतात तसेच महिलांचेही असतात तर कधी मिश्र गटही असतात. एव्हढे असुनीही येथे सभ्यतेचे पालन केले जाते.

शिवाजी पार्क म्हणजे विविध क्षेत्रातील कलाकारांचे तसेच कलावंतांचे माहेरघर. माहेरवाशीण जशी माहेरी आल्यावर स्वच्छंदीपणे राहते तसेच हे प्रख्यात कलाकार पार्कात मोकळेपणाचा अनुभव घेतात. नाट्य सिने क्षेत्रातील कित्येक नामवंत कलाकारांचा येथे राबता होता/आहे. शिवाजी पार्क जिमखान्याच्या समोर राहणारे रामचंद्र चितळकर म्हणजेच सी. रामचंद्र तसेच गजानन जागिरदार त्याचबरोबर समर्थ व्यायाम मंदिरासमोर रहाणारे वसंत देसाई इत्यादी प्रख्यात कलाकारांचे निवास स्थान बरोब्बर कट्ट्याच्या समोर होते. ही मंडळी नामवंत कलाकार असुनीही शिवाजी पार्कला मोकळ्या हवेत फिरण्यास येत असत. समर्थ व्यायाम मंदिराजवळील कट्ट्यावर बसले की संगीतकार वसंत देसाई यांच्या घराच्या खिडकीतून त्यांच्या घरातील भिंतीवर सुबकपणे रेखाटलेले अष्टविनायक दिसायचे.

आपल्या सर्वांचे लाडके बाबूजीही याच भागात म्हणजेच “ब्राम्हण सहाय्यक संघाच्या” बाजूच्या इमारतीत राहायचे. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत व त्यांचे पती ग. रा. कामात ही मराठी सिने सृष्टीतील विख्यात दाम्पत्य देखील याच भागातील “अल्ट्रा” सोसायटीमधील व त्यामुळेच त्यांनाही शिवाजी पार्क व कट्ट्याचा मोह पडला. त्याचप्रमाणे “धर्मकन्या” मधील अभिनेत्री अनुपमालाही या पार्काचा मोह आवरता आला नाही. बाळ कोल्हटकर, अरुण सरनाईक इत्यादी कलाकारांनीही आपली पावले शिवाजी पार्क कडे वळविली. प्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांची एक चक्कर पार्कात असतेच. अमृता सुभाष सारखी प्रतिभावंत लेखिका व कलावंत, तळपदे भगिनींसारख्या नृत्यांगना, ज्येष्ठ अभिनेत्री रीमा, प्रख्यात गायिका मधुबाला चावला, अतुल परचुरेसारखा चतुरस्त्र कलावंत इत्यादी कलावंतानी व कलाकारांनी वेळ मिळाला कि शिवाजी पार्कला भेट दिली आहे. आपल्या वैशिष्ठ्यपुर्ण लेखनानी घराघरात पोहोचलेल्या शिरीष कणेकर त्याचबरोबर द्वारकानाथ संझगिरी इत्यादी हरहुन्नरी लेखकांनी शिवाजी पार्कला आपलेसे केले आहे. ही मंडळी सामान्य माणसासारखी पार्कला चक्कर तरी मारतात किंवा कट्ट्यावर बसून गप्पा मारत असतात.

राजकारणातील व इतर क्षेत्रातील मंडळींची विद्वत्ताप्रचुर भाषणे ऐकण्यास मिळाली. आचार्य अत्रे, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, एस. एम. जोशी, जॉर्ज फर्नांडीस, कॉम्रेड डांगे, अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, पुष्पा भावे इत्यादी फर्डे वक्ते आपल्या भाषणाने शिवाजी पार्क मैदान दणाणून सोडायचे. त्याचप्रमाणे चिन्मयानंद तसेच पांडुरंग शास्त्री आठवले यांची धार्मिक प्रवचने देखील येथेच ऐकली. १ मे रोजी सैन्य दलातील विविध पथकांचे संचलन पहाणे म्हणजे जणू पर्वणीच. त्यांची शिस्त तर खरोखरच वाखाणण्याजोगी. शाहीर साबळे, पुंडलिक फरांदे, विठ्ठल उमप इत्यादी प्रभूतींना मी सर्व प्रथम येथेच ऐकले.

त्या शिवाय नवरात्रात “रामलीला” रंगत असे. त्याचवेळेस तिकडे बाजूलाच बंगाली मंडळींची “दुर्गा पूजा” संपन्न होत असे. वास्तविक “दुर्गा देवीची” महापूजा अष्टमीला होते. पण पंचमी षष्ठी पासून तो सोहळा रंगण्यास सुरुवात होत असे. ज्या ठिकाणी दुर्गा पूजा होत असे तो मंडप इतका मोठा असे की त्याचे तीन भाग केले जायचे. एका मुख्य भागात “दुर्गा देवीची” स्थापना होत असे व तेथेच अष्टमीची होम हवनासह महापूजा होत असे. त्या महापूजेची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे “दुर्गा देवीची” स्थापना झालेला मंडप धुपाने पूर्ण भरून जायच्या. त्या मंडपाच्या दुसऱ्या भागात बंगाली भाषेतील मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. बंगाली भाषेतील चित्रपटगीते तसेच इतर लोकगीतांचा कार्यक्रम होत असे. त्यावेळेस बंगाली भाषेतील शब्द कळत नव्हते पण ती मधुर गाणी कानाला खूप गोड वाटायची. त्या गीतांची चाल, संगीत, ठेका तसेच गाण्याला असलेला रवींद्र संगीताचा स्पर्श हे सगळेच श्रवणीय असायचे. कधी कधी या गीतांची चाल ऐकतांना चालीत साधर्म्य असलेले एखादे हिंदी चित्रपट गीत आठवायचे

क्रिकेट व शिवाजी पार्क यांचे नाते अतूट आहे. देशांतर्गत रणजी करंडक स्पर्धा तसेच इतर स्पर्धांसाठी मुंबई संघाला तसेच आंतर राष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघाला एका पेक्षा एक वरचढ तसेच गुणवान क्रिकेटपटू याच शिवाजी पार्क ने दिले. मुंबई संघ व शिवाजी पार्क याचे घट्ट नाते. वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये प्रथमच पराभूत करणाऱ्या संघाचा कर्णधार अजित वाडेकर शिवाजी पार्कनेच भारतीय संघाला दिला. सुनील, संदीप, रवी इत्यादी गुणवान, नामवंत, जगतविख्यात खेळाडू याच लाल मातीने भारताला व क्रिकेट विश्वाला दिले. अगदी पतौडी, सरदेसाई, जयसिंहा, इंजिनिअर, साळगावकर यांच्या सारख्या दिग्गज खेळाडूंचा खेळ या मैदानाने पहिला आहे. येथील पावसाळी वातावरणात खेळल्या जाणाऱ्या “डॉ. एच. डी. कांगा लीग” म्हणजे क्रिकेट प्रेमीना पर्वणीच. जवळच असणाऱ्या “श्री समर्थ व्यायाम मंदिरात” लाल मातीच्या हौदात कुस्ती रंगायची तर दुसऱ्या बाजूला व्यायामपटू वेगवेगळे व्यायाम करीत असत. “बास्केट बॉल”, “हुतुतू”, “खो खो”, “मल्लखांब” इत्यादीचे सामने याच “श्री समर्थ व्यायाम मंदिर” च्या प्रांगणात रंगत असत. मध्ये मध्ये संध्याकाळच्या वेळी “कबड्डी”, “खो खो” इत्यादीचे “महापौर चषक” या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे सामने प्रखर प्रकाशझोतात पाहिलेले अजुनीही आठवितात.

असे हे शिवाजी पार्क कधीच विस्मृतीत जाणार नाही.

@मिलिंद कल्याणकर
नेरुळ, नवी मुंबई
९८१९१ ५५३१८


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज
www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

मला भावलेलं मुंबईचं रुप – अंकुश शिंगाडे

Next Article

मला भावलेलं मुंबईचं रुप – मल्हार मोरे

You may also like