Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मला भावलेल मुंबईचं रूप – वैभव पाटील

Author: Share:
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून मनोरंजनाचे सर्वात मोठे केंद्र म्हणून समजले जाते. आज मुंबईची लोकसंख्या उपनगरे धरून दोन कोटींच्या वर आहे. देशाचे आर्थिक व राजकीय सत्ताकेंद्र म्हणून मुंबईचे राष्ट्रीय महत्व अधोरेखित आहे. मुंबईला लाभलेले मोठे वाहतूक बंदर आज जवळपास 50 टक्के जलवाहतुकीचे माध्यम आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाला देशाचे प्रवेशद्वार समजले जाते. मुंबईत अनेक हेरिटेज व ऐतिहासिक वास्तू दिमाखात उभ्या असून त्या मुंबईची शान अधिकच वाढवत आहेत. दक्षिण मुंबईत नुसता फेरफटका मारला तर अनेक ब्रिटिशकालीन इमारती दृष्टिपथात पडतात. हॉटेल ताज, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका, जीपीओ, विधानभवन, मंत्रालय, भाऊचा धक्का, गिरगाव चौपाटी, म्युझिअम, वानखेडे स्टेडियम, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मध्यवर्ती भागातील जिमखाने ह्या सर्व गोष्टी मुंबईचे ऐतिहासिक महत्व वाढवणाऱ्या आहेत.
खरेतर मुंबईला मुंबई हे नाव मुंबा किंवा महा अंबा या देवीच्या नावावरून पडले आहे. मुंबा किंवा महा अंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई असे नाव या नगरीला प्राप्त झाले. आताची मुंबई ही सात बेटांवर वसली आहे. अगदी पाषाण युगापासून येथे वस्ती असल्याचे पुरावे आहेत. मुंबईवर मौर्य राजांनीही राज्य केले. अशोकाच्या प्रचंड साम्राज्याचा मुंबई एक भाग होती. १३४३ पर्यंत शिलाहार राजांनी मुंबई आपल्या ताब्यात राखली. पण त्यानंतर गुजरातच्या शहाकडे मुंबईची सत्ता गेली. पोर्तुगीजांचे मुंबईत आगमन १५३४ साली झाले.
पोर्तुगीजांनी इंग्लडचा राजा चार्ल्स दुसरा याला हुंड्यात चक्क हे बेट आंदण म्हणून दिले. या राजाने पोर्तुगीज राजाच्या मुलीशी लग्न केलं म्हणून त्याला त्यांनी ही भेट दिली. पुढे ब्रिटिश इस्ट इडिया कंपनीने हे बेट राजाकडून १६६८ मध्ये दहा पौंडाच्या वार्षिक भाड्याने आपल्या ताब्यात घेतले. पुढे ब्रिटिशांनीच मुंबईचा खर्‍या अर्थाने विकास केला.
पोर्तुगीजांनी व इंग्रजांनी मुंबईचे बॉम्बे केले. ब्रिटिशांना तत्कालीन उपखंडात आपले बंदर विकसित करायचे होते, त्यांना मुंबई त्यासाठी अगदी योग्य वाटली. म्हणून त्यांनी सूरतहून आपले मुख्यालय मुंबईला हलविले. मुंबईमध्ये बाहेरचे लोक येण्यास सुरवात झाली ती यावेळेपासून. आजतागायत मुंबई हे केवळ स्थलांतरित होणाऱ्या लोकांचे स्थान असल्यामुळे परप्रांतातील लोकांच्या प्रचंड लोंढ्यामुळे मूळ स्थानिक मुंबईकर दिसेनासा झाला आहे. तरीदेखील दादर, भायखळा, गिरगाव सारख्या समुद्रकिनाऱ्याच्या भागात ब्राम्हण, कोळी, आगरी समाजातील बरीच लोकवस्ती आजही पूर्वापारपासून वास्तव्यास असल्याचे आढळते ज्यामुळेच ‘आमची मुंबई’ असे जिव्हाळ्याने म्हणणाऱ्या मूळ मुंबईकरांची संख्यादेखील इथे लक्षणीय आहे. ब्रिटिशांच्या व्यापारी धोरणामुळे मुंबईची लोकसंख्या अगदी झटपट वाढली. १६६१ मध्ये दहा हजाराची लोकसंख्या १६७५ मध्ये साठ हजारांवर जाऊन पोहोचली.
ब्रिटिशांच्या ताब्यात हे शहर गेल्यानंतर त्यांनी त्याची सुव्यवस्थित रचना केली. अतिशय कलात्मक अशा इमारती उभारल्या. १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे या दरम्यान त्यावेळी पहिली रेल्वे धावली. त्यांनतर मुंबई हे जगातील कापड व्यवहाराचे एक प्रमुख केंद्र बनली. १९०६ मध्ये मुंबईची लोकसंख्या दहा लाखावर गेली होती. तत्कालीन कोलकत्यानंतर सर्वांत जास्त लोकसंख्येचे हे शहर होते. पुढे ब्रिटिशांविरोधात भारतीय जनतेचा लढा सुरू झाला, त्यावेळी या सगळ्या चळवळीचे केंद्र मुंबईच होते. महात्मा गांधींनी भारत छोडो ही चळवळ मुंबईच्या आझाद मैदान येथून केली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याची राजधानी बनली.
१९५५ मध्ये मुंबई राज्याची पुनर्रचना होऊन महाराष्ट्र व गुजरात असे त्याचे भाग करण्यात आले. त्यावेळी मुंबई शहर हे स्वायत्त शहर करावे अशीही एक मागणी होती. पण संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईची मागणी लावून धरली. त्यासाठी मोठी चळवळ सुरू केली त्यासाठी १०५ जणांनी आपले प्राण दिले. त्यांनी दिलेल्या प्राणामुळेच १ मे १९६० मध्ये अखेर मुंबई महाराष्ट्रात आली. आज मुंबई चालवण्यासाठी महानगरपालिका व राज्य सरकारची म्हाडा, एमएमआरडीए अशी अनेक प्राधिकरणे कार्यरत आहेत. पर्यटन व सौंदर्याबरोबरच 26/11 चा अतिरेकी हल्ला, जुलै 2005 ची अतिवृष्टी, बॉम्बस्फोटांची मालिका, विविध संघटनांची व राजकीय पक्षांची आंदोलने, एल्फिनगस्टनची चेंगराचेंगरी यांमुळेदेखील मुंबई आपल्या डोळ्यांसमोरून पटकन सरकते. येथील सध्याचा मुंबईकर केवळ नोकरी धंद्यासाठी इथे स्थायिक झालेला असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली तरी पटकन सावरतो व मुंबई त्याच जोमाने पुन्हा धावू लावते हे मुंबईचे आणखी एक वैशिष्ट्य. खरेतर अवाढव्य लोकसंख्येबरोबरच मुंबईची आजची प्रमुख समस्या आहे ती म्हणजे बेसुमार वाहनांमुळे होत असणारे वायू प्रदूषण व नद्यांमधील जलप्रदूषण. घटनेने आपणा सर्वांना अप्रदूषित आणि स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार दिला आहे. या अधिकाराचे, आपल्या पर्यावरणाचे, वन्यजीवांचे प्रत्येक शहराने रक्षण करणे आवश्यक आहे.
मात्र हा अधिकार आपल्याला मिळत आहे का, हा खरा प्रश्न आहे. या अधिकारांचे रक्षण आपण स्वतः कधीही करत नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे. मुंबईची लुप्त होत चाललेली निसर्गसंपदा व वाढत चाललेले सिमेंटचे जंगल हीदेखील एक ज्वलंत समस्या आहे. मुंबई शहराला मुळात नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभले आहे. मात्र हे वरदान सध्या केवळ मिरवण्यापुरते मर्यादित राहते. त्याची जोपासना करण्यामध्ये मात्र आपण पुढाकार घेत नाही. मुंबईतील दहिसर, पोयसर, ओशिवरा, मिठी या नद्या आणि इतर अनेक जलप्रवाह मुंबईच्या टेकड्यांमध्ये उगम पावतात. या नद्या खाड्या आणि मग समुद्रामध्ये मिसळून जातात.
२६ जुलै २००५ रोजी आलेल्या पुराने आपल्याला या नद्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवून दिले. अनेक जणांनी आयुष्य गमावले, अपरंपार आर्थिक नुकसान झाले, नद्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, कोट्यवधींची तरतूद केली गेली. अजूनही ही तरतूद होत आहे. मात्र ही कार्यवाही योग्य दिशेने होत नाही, हे सध्याच्या नद्यांच्या रूपावरून स्पष्ट होत आहे. नद्यांना नाल्याचे स्वरूप मिळाले आहे. या नद्यांच्या पात्रातील जलचरांचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. पाणथळ वनस्पतीही अभावानेच दिसतात. या नदीपात्रामध्ये पावसाचे पाणी झिरपायचे. मात्र काँक्रीटीकरणामुळे नदीपात्रात आता हे पाणी झिरपणे बंद झाले आहे. या नदीपात्रांमधील नैसर्गिक शुद्धीकरण व्यवस्थाच नष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे नदी प्रदूषित पाणी समुद्रापर्यंत घेऊन जाते. यात रसायनांचाही समावेश होतो.
हे प्रदूषित पाणी डासांसाठी प्रजनानाची जागा बनले आहे. प्रदूषित पाण्यातून निर्माण होणाऱ्या घातक वायूंमुळे परिसरातील नागरिकांना प्रदूषित हवेमध्ये श्वासोच्छ्वास करावा लागत आहे. गोड्या पाण्याची गरज, स्वच्छ हवेची गरज आणि इतर देशांप्रमाणे नद्यांच्या काठी होऊ शकणाऱ्या पर्यटनस्थळांचा विकास या दृष्टिकोनातून मुंबईकरांनी मुंबईच्या लुप्त होत चाललेल्या प्रदूषित नद्यांचा विचार करायला हवा. नदीपात्रात होणारे काँक्रीटीकरण हे थांबणे गरजेचे आहे. नदीपात्रात डेब्रिज, सिमेंट फेकले जाते. यावर नियंत्रण यायला हवे. नदीपात्रात कोणतेही बांधकाम होऊ नये. झालेली बांधकामे हटवायला हवीत. नदीत सोडले जाणारे सांडपाणी हे शुद्धीकरण प्रक्रियेतून पुढे जावे. नदीचा प्रवाह, पात्र बदलले जाऊ नये. खारफुटींवर होणारे अतिक्रमण थांबणे गरजेचे आहे. मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे. प्यायला स्वच्छ पाणी नाही, हवेमध्ये वाढणारे प्रदूषणाचे प्रमाण, त्यातून उदभवणारे आजार असा भविष्यकाळ नको असेल तर या गोष्टी अखेर आपल्याच मुळावर येणार आहेत हे जाणून मुंबईकरांनी जागरुक होणे गरजेचे आहे. मुंबईचे सौंदर्य व ऐतिहासिक पार्श्वभूमी जतन करण्याची जबाबदारी सर्व सर्वस्वी आपणा मुंबईकरांचीच आहे.
@वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
मोबाईल क्रमांक 09819112885

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज
www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

मला मुंबईचं भावलेलं रुप – शुचि बोरकर

Next Article

मला भावलेलं मुंबईचं रुप – निलेश बामणे

You may also like