मला भावलेले मुंबईचे रूप – डॉ मंजिरी मणेरीकर

Author: Share:

मला भावलेले मुंबईचे रूप आहे ते सतत कष्ट करणाऱ्या चिरतरुण सुंदरीचे.

मी जन्मले ती दादरसारख्या मुंबईच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत भागात. शाळा चालत 7 मिनिटांवर. रेल्वे स्टेशन, बस सगळे काही जवळ. शिवाजी पार्क सारखे मैदान, रुपारेल कॉलेज, बादल, बिजली, बरखा, प्लाझा ही सिनेमगृहे, शिवाजी मंदिर सारखे नाट्यगृह हे सर्व हाकेच्या अंतरावर.

हे लिहायचे कारण म्हणजे आमच्या भागात कुठल्याही वेळी सतत वर्दळ असायची/ असते. पहाटे जाग येते ती दूध आणायला निघालेल्या लोकांच्या आवाजाने. पूर्वी शेजारच्या घरातील व्यक्ती दूध सेन्टर वर काम सुद्धा करायच्या. गिरगावात पहाटे 5 ला पाणी येते त्यामुळे गिरगावकर तर पहाटे 5 ला भांडू सुद्धा शकतात.

नंतर पेपर वाले येतात. इस्त्री चे कपडे घेऊन जाणारे व आणून देणारे, फळ वाले, भाजीवाले, सगळे काही सकाळच्या वेळेत घेऊन येतात. घरातला प्रत्येक जण आपापल्या उद्योगात मग्न असतो कारण त्याला बस नाहीतर ट्रेन पकडायची असते.

मुंबईत वाढलेल्या मुलांना आळस आणि मरगळ हे शद्बच माहीत नसावेत असे मला वाटते. आमची शाळा 11 ची तरी सकाळी लौकर उठून पोहायला जाणे, आल्यावर शेजारी जाऊन भाजी निवडणे पोळ्या लाटायला शिकणे वगैरे गोष्टी करायचे. शाळेतून आल्यावर गृहपाठ करून मग शिवाजी पार्क च्या व्यायाम शाळेत जाणे मग tv वरचे काही कार्यक्रम बघणे जेवण आणि झोप ह्यात दिवस कसा जायचा समजायचे नाही. तरी रात्री 12 वाजता पुन्हा सिनेमा सुटल्यावर गजबजाट ऐकू यायचाच.

कोणताही छंद जोपासणे इथे अगदी सहज शक्य आहे. गाणे, नृत्य, चित्रकला, शिवण, भरतकाम काय हवे ते शिकायची सोय आहे. म्हणजे ज्याला अभ्यास जमत नाही तो दुसरे कोणतंही शिक्षण घेऊन आपला चरितार्थ चालवू शकतो.
मी मुंबईला सुंदरी म्हणते कारण तिच्यातील अनेक सौंदर्यस्थळे. तिला चिरतरुण म्हणते कारण कुठल्याही क्षणी ती कुठल्याही कामासाठी तयार असते. आळस, थकवा तिला माहीतच नाही.

मी मुंबईच्या बाहेर गेल्यावर मला अनेक गोष्टी जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे हवामान. समुद्र जवळ असल्याने ना खूप ऊन्हाळा ना खूप थंडी.

मुसळधार पाऊस सोडला तर कधीच घरात बसून राहण्यासारखी परिस्थिती नसते. आणि मुसळधार पावसात सुद्धा मुंबईचे काम चालूच असते. सकाळी कितीही वाजता तुम्हाला चहा आणि नाश्ता मिळू शकतो. कुठल्याही प्रकारचे आणि किमतीचे जेवण मिळू शकते. उत्तर प्रदेशात 10 वाजल्याशिवाय कुठलही हॉटेल उघडत नाही. रात्री 8 नंतर शुकशुकाट.
थंडीत माणसे रस्त्यावर दिसतच नाहीत.

मुंबईत बस, ट्रेन पासून कार पर्यंत कोणतही वाहन मिळू शकते. मुंबईच्या लोकल चे इतके कौतुक का? कारण दर 2 मिनिटांनी असतात. मी पुण्याजवळ भोसरी येथे जॉब करत असताना लोणावळ्याला जाऊन इंद्रायणी एक्सप्रेस पकडायचे. पहिल्या दिवशी मी कासारवाडी स्टेशन वर आले तेव्हा लोकल निघून गेली होती. पुढची लोकल अर्ध्या तासाने होती. ती लोणावळ्याला जायच्या आधीच इंद्रायणी निघून गेली होती. मग एक पुणे जयपूर गाडी होती तिच्या reservation च्या डब्यात खाली बसून कल्याण पर्यंत गेले. पुढे लोकल ने रात्री 12 ला घरी पोचले. त्यानंतर पुण्यात असेपर्यंत लोकल चे टाइम टेबल सतत माझ्या जवळ होते.

मी मुंबईत जन्मले, वाढले. मुंबईतल्या उत्तम शाळेत शिकले, उत्तम कॉलेजमध्ये गेले. नंतर प्रख्यात मेडिकल कॉलेज मधून डॉक्टर झाले. टाटा सारख्या संस्थेतून MD झाले. मोठ्या सरकारी हॉंस्पिटल मध्ये तसंच खाजगी लॅब मध्ये नोकऱ्या केल्या. मला मुंबईने भरभरून शिक्षण आणि अनुभव दिला. एवढा की नंतर उत्तर प्रदेशात मी माझ्या कामाचा ठसा उमटवू शकले. मी अनेक नोकऱ्या सोडल्या पण लगेच 15 दिवसात मला दुसरी नोकरी मिळायची.

मी मुंबईत चालत, बसने, ट्रेन ने, taxi ने फिरले. कधी च भीती वाटली नाही. ढगफुटी झाली तेव्हा कमरे इतक्या पाण्यातून चालत आले. ट्रेन मध्ये बॉम्ब स्फोट झाले तेव्हा बोरिवली ला प्रचंड गर्दीच्या बस स्टॉप वर उभी होते आणि अचानक एका सासू सून जोडीने मला त्यांच्या रिक्षा तुन सायन पर्यंत सोडले आणि पुढे सहज taxi मिळाली.

नोकरी सोडून घरी बसले तरी मला कधी कंटाळवाणे वाटले नाही. इतक्या गोष्टी आपल्याला मुंबईत करता येतात. मला शिवण शिकायचे होते त्याचा क्लास घराजवळ. संस्कृत चा क्लास घराजवळ. जर्मन शिकायला मॅक्स म्युलर भवन महाग वाटत होते तर युनिव्हर्सिटीत शिकण्याची सोय. तुम्ही जी काही इच्छा कराल त्याला तथास्तु म्हणत असते मुंबई.

तर हे मुंबई चे रूप मला खूप भावते. काम करणाऱ्यांना आश्रय देणारी, प्रत्येक प्रकारच्या माणसाला आपल्या आवडीच्या क्षेत्रातले शिक्षण आणि काम देणारी, खूप छान वाहतुकीच्या सोयी असलेली निर्धोक मुंबई हीच तिची विशेषता मला आवडते. आमचे गाव खूप निसर्गसुंदर आहे पण तिथे एक दिवस छान वाटते मात्र दुसऱ्या दिवशी मुंबईची धावपळ हवीशी वाटायला लागते.

एका कवितेत थोडासा बदल करून असे म्हणेन
गडबड घाई जगात चाले आळस डुलक्या देतो पण
गंभीरपणे मुंबई बोले आला क्षण गेला क्षण
मुंबईस ह्या सदा घाई विसावा ही तो नाही पण
तीचे म्हणणे ध्यानी घेई आला क्षण गेला क्षण!

 

@डॉ मंजिरी मणेरीकर
9869456378


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज
www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

मला भावलेलं मुंबईच रूप – विरेंद्र सोनावणे

Next Article

मला भावलेलं मुंबईचे रुप – दीपक गुंडये

You may also like