Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

गणराया, सज्जनांचा धाक असू दे…

Author: Share:

महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. परंतु त्याच वेळी हरियाणा आणि पंजाब मात्र पेटत आहे. बाबा गुरमीत राम रहीमवर बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आहे आणि त्यासाठी त्याच्या भक्तांनी हैदोस घातला आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये दंगली उसळल्या. सरकारनं हिंसाचाऱ्यांसमोर सपशेल गुडघे टेकल्याचंच दिसून येतंय, असं म्हणत कोर्टानं राज्य सरकारला फटकारले आहे. सरकार हिंसा रोखण्यास नापास झाली आहे, हे सत्य आहे. कोर्टात येताना राम रहीमच्या गाड्यांच्या ताफ्यात १०० हून अधिक गाड्या आल्याच कशा? कलम १४४ लागू केल्यानंतर पंचकुलामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने अनुयायी कसे पोहोचले? गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळूनही सरकारने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक पावलं का उचलली नाहीत? असे खडे सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारले आहेत. राज्य सरकारकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत असे नव्हे. पण प्रकरण हाताळण्यात हरियाणा आणि पंजाब सरकार नापास झालेलं आहे.

साक्षी महाराज आणि सुब्रमण्यम स्वामी ह्यांनी जखमेवर मीठ चोळावे तसे बाबाची बाजू घेतली आहे. साक्षी महाराज तर त्यांच्या वाचाळपणासाठी कुप्रसिद्ध आहेत. परंतु सुब्रमण्यम स्वामींसारख्या ज्येष्ठ नेत्याने तरी या बाबतीत संयम पाळायले हवे होते, असो. पण लोक या बाबांसारख्या दुर्जनांच्या नादी लागतातच कसे? भारत देश हा उपासना पद्धतीच्या बाबतीत नेहमीच पुरोगामी राहिला आहे. इथे अनेक उपासना पद्धती आहेत. या सर्व उपासना पद्धतींना समाविष्ट करुन हिंदू नावाचा धर्म आज ठामपणे उभा आहे. पण काही वर्षांपासून स्वयंघोषित संतांची चलती झाली. हे स्वयंघोषित संत देवाला पर्याय म्हणून समाजात वावरु लागले. म्हणजे आपल्याला ज्ञात असलेले संत म्हणजे तुकोबा, ज्ञानोबा, समर्थ रामदास, रोहिदास, कबीर. या सर्व संतांनी कधी स्वतःची पूजा करवून घेतल्याचे आपल्या ऐकिवात नाही. पण जवळ जवळ शंभर वर्षांपासून काही संत झाले ज्यांची देवाप्रमाणे पूजा होत आली आहे. त्यांच्या हयातीत त्यांना देवाची उपाधी देण्यात आली. आता तर अशा संत बाबांची रीघ लागली आहे. हे संत स्वतः देव म्हणूनच वावरत असतात. त्यांचे भक्त देवासोबत त्यांच्या फोटोची पूजा करतात, इतकेच काय तर जसे देवाचे मंत्र असतात, तसे ह्या संतांनी स्वतःचे देखिल मंत्र निर्माण केले आहेत. ह्यांचे मठ म्हणजे जणू देवालयच आहेत. हा असला भोंगळ कारभार अनेक वर्षांपासून सुरु आहे. मुळात या असल्या भोंदू बाबांच्या नादी लोक लागतातच का? हिंदू धर्मात उपासना पद्धतीसाठी सूट आहे. पण या बाबांच्या रुपात रोज नव नव्या उपासना पद्धती जन्म घेत आहेत. हे सगळे बुवाबाबा उपासना पद्धतीच निर्माण करत असतात. पण या सगळ्याचा समाजाला काहीच फायदा होत नाही. उलट आजपर्यंत समाजाचे नुकसानच झाले आहे.

राधे माचे प्रकरण जेव्हा गाजत होते. तेव्हा एका वाहिनीने या प्रकरणाची माहिती देत असताना सांगीतले की ते राधे मा सोबत रात्रभर बातमी कव्हर करत होते. एके ठिकाणी राधे मा थांबली आणि तिने चिडवण्यासाठी माध्यमांना जीभ दाखवली. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या तिच्या भक्तांना ही तिची लीला वाटली. राधे माच्या मुर्खपणाला, बाष्कळपणाला तिचे भक्त लीला म्हणतात. हा इतका मुर्खपणा भक्तांमध्ये येतो तरी कुठून? राधे मा, बाबा राम रहिम सारखे भोंदू लोक देव म्हणून वावरतात. बरे, त्यांची वर्तवणूक शुद्ध असेल तर किमान त्यांच्या देवपणावर विचार तरी करता येईल. पण हे समाजात वावरताना ह्यांच्याकडे पाहून कुणीही बुद्धी असलेला व्यक्ती हे भोंदू आहेत, असेच म्हणेल. पण तरीही भक्त ह्यांना बळी तरी कसे पडतात. हिंदू धर्मात तर कितीतरी देव आहेत. या सर्व देवांना नाकारुन नव्याने उदयाला आलेल्या भोंदूंना हे देव मानतात. या त्यांच्या देवांवार खुनाचे, बलात्काराचे, फसवणूकीचे आरोप असतात. बर्‍याचदा ते सिद्धही होतात. तरीही ह्यांची भक्ती ओसरत नाही. अशी कोणती जादू या भोंदूंनी केलेली असते. याचे मानसशास्त्र नेमके काय आहे? अजमल कसाब अल्ला हू अकबर म्हणत अनेक लोकांचे प्राण घेतो, बाबा राम रहीमचे भक्त अराजकता माजवतात, हे मरायला आणि मारायलाही सिद्ध असतात. अशी कोणती गुंगी ह्यांना झालेली असते की चांगले आणि वाईट यातील भेदही ह्यांना कळत नाही?

या भोंदूंपासून अपल्या समाजाला वाचवायलाच पाहिजे. प्रबोधनाशिवाय दुसरा मार्ग इथे नाही. मुळात माणूस हा आतून खुपच दुःखी असतो. त्याला नेहमी असे वाटत असते की आपले दुःख दूर करायला कुणीतरी प्रेषित येईल आणि त्या प्रेषिताची जागा हे भोंदू घेऊन बसतात. यातून आपला समाज पूर्णपणे बाहेर निघणे कठीणच आहे. कदाचित प्रबोधनाने किमान काही लोक या भोंदूंच्या नादी लागणार नाहीत. पण सर्वच्या सर्व लोकांचे प्रबोधन करणे कठीण आहे. कारण ह्यांच्या भोंदू बाबावर बलात्काराचे आरोप सिद्ध झाले त्यानंतरही ह्यांच्या भक्तीत काढीचाही फरक पडलेला नाही. उलट त्या लिंगपिसाट बलात्कारी बाबासाठी त्यांनी लोकांना त्रास दिला. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले. मग ह्या भक्तांचे म्हणणे तरी काय आहे? की त्यांच्या बाबांनी बलात्कार करत राहावे का? या सगळ्या विपरित गोष्टी घडतात, कारण सज्जनांचा धाक राहिलेला नाही. आपण आपल्या प्राचीन कथा वाचतो तेव्हा आपल्या राजा महाराजांचा दुर्जनांवर धाक होता, असे आपल्या लक्षात येते. शिवाजी महाराजांचा दुर्जनांवर धाक होता. तसा धाक आता राहिलेला नाही. मुळात आपल्या देशात न्याय मिळण्याची जी प्रतिया आहे, ती अतिशय मागासलेली आहे. पंधरा पंधरा वर्षे लागतात न्याय मिळवायला? मग याला न्याय तरी कसे म्हणता येईल? ही प्रक्रीया मुळात सुधारली पाहिजे. यासाठी कायदे पंडीतांनी पुढाकार घेतला पाहिजे. एखादं खोल गुंतलेलं प्रकरण असेल तर समजता येईल. पण प्रत्येक गोष्टीला इतका वेळ का लागतो? कसाब हा दोषी आहे हे जनतेला माहित असतं. पण मग न्यायालयात इतका वेळ का लागतो? अर्थात हे लिहिण जितकं सोपं आहे, तितक्या या गोष्टी सोप्या नाहीत, हे आम्हाला माहिती आहे. परंतु न्याय मिळण्याची ही दिरंगाई सुधरवली पाहिजे आणि सज्जनांनी आता जागरुक राहिले पाहिजे. सोशल मिडियाच्या या युगात सज्जन जागरुक होत आहेत, हे खरंय. पण आता सज्जनांचा धाक निर्माण झाला पाहिजे.

सरकारने सुद्धा पुढाकार घेऊन दुर्जनांमध्ये वचक निर्माण केला पाहिजे. काही लोकांना बळाचीच भाषा कळते. काश्मिरातील फुटिरतावादी ते राम रहिमच्या समर्थकांना बळानेच अद्दल घडवली पाहिजे. तरच सरकारचा धाक निर्माण होईल. स्त्रीयांच्या पदरालाही स्पर्श करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही, अशी आदर्श व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्यासाठी न्याय वेळेत मिळाला पाहिजे. त्यात दिरंगाई होता कामा नये. सज्जनांनी आपल्या अवती भोवती घडणार्‍या विपरित गोष्टींवर आवाज उठवला पाहिजे. तुम्ही चांगली व्यक्ती आहात म्हणून तुम्ही सज्जन आहात. इतके मर्यादित न राहता तुमचा धाक दुर्जनांवर निर्माण झाला पाहिजे.

आपण सर्व जण मिळून अशी शपथ घेऊया की वाईट गोष्टींविरोधात आपण आवाज उठवू, समाजाच्या भल्यासाठी आपण आपल्याला जमेल त्या मार्गाने प्रयत्न करु. दुर्जनांवर धाक निर्माण करु. सुखकर्ता दुःखहर्ता गणरायाचे आगमन झालेले आहेच. गणपती बाप्पाने अनेक दुर्जनांचा नाश केला आहे. आपण सुद्धा बाप्पाच्या पावलावर पाऊल ठेवत लोकशाही मार्गाने दुर्जनांचा नाश करुया. आपला बाप्पा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्याच्या आशीर्वादाचा हात आपल्या मस्तकावर आहे.

Previous Article

पहा जीएसबी गणपतीच्या आरतीचा व्हिडिओ..जणू तुम्ही तिथे आहात…

Next Article

२७ ऑगस्ट

You may also like