गुजरात निवडणुकीचा अन्वय आणि अर्थ

Author: Share:

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत निर्विवाद बहुमत प्राप्त करून तेथे भाजपाची सत्ता पुनर्प्रस्थापित केली ह्या करिता मन:पूर्वक आणि शतशः अभिनंदन ० ते गौरवास निश्चितपणे पात्र आहेत कारण पंतप्रधान म्हणून मातृस्वरूप ह्या देशाच्या भवितव्याला जो पुरुषार्थी विशिष्ठ आकार देण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे त्यादृष्टीने नम्र सेवक म्हणून वाटचाल करीत असतांना गुजरात विजयाने त्यांचे एक पाऊल ठामपणे पुढे पडले आहे ० गुजरातेत मोदींच्या लक्ष्याप्रती सुरु झालेल्या मार्गक्रमणात लहानमोठ्या आणि देशीविदेशी विरोधकांनी सुप्तासुप्त अनेक अडथळे निर्माण केले ० ते पार करीत असतांना दिसून आलेले उत्साह,चिकाटी, आवेश ,कामावरची निष्ठा,समर्पित वृत्ती,कल्पकता ,अखंड सावधानता, जिंकण्याची महत्वाकांक्षा आणि आघाडीला फलंदाजीला येऊन शेवटपर्यंत रणभूमीवर लढत राहण्याचा निर्धार इत्यादी त्यांचे गुण भाजपच्या कार्यकर्त्यांना पुढच्या आवाहनांना सामोरे जातांना दीपस्तंभाप्रमाणे सदैव मार्गदर्शन करतील ह्यात शंका नाही ०गुजरातच्या निवडणुकीत मोदींनी जिंकण्यासाठी आणि त्यांच्या विरोधकांनी त्यांना हरवण्यासाठी एव्हढा खटाटोप का केला हे समजून घेतले की १८२ जागांच्या विधानसभेत अवघ्या आठ जागांचे बहुमत मिळवूनही मोदींचा आणि भाजपचा विजय मोठा का मानला पाहिजे आणि गेल्या २२ वर्षात मिळाले नव्हते एव्हढे मोठे म्हणजे ८० जागांचे जनसमर्थन काँग्रेसला मिळण्यामागे नेमके काय कारण असू शकते ह्यांचे आकलन होण्यास थोडेफार साहाय्य होऊ शकते ०

गुजरातची निवडणूक हा मोदींच्या विशिष्ट ध्येयसृष्टीकडे चालू असलेल्या प्रवासातला एक महत्वाचा आणि मोक्याचा टप्पा होता ० तो कसा हे जाणण्यासाठी मोदी हे मूळचे संघाचे प्रचारक असल्याने संघसंस्थापक डॉ हेडगेवारांची ध्येयसृष्टी आणि त्यातील नेमकेपणा समजून घेणे भाग पडते ० प्रदीर्घ पारतंत्र्याचे विकार नष्ट करण्यासाठी आणि राष्ट्रीय जीवन सुदृढ करण्यासाठी शिवाजी,राणाप्रताप , विवेकानंद , टिळक आणि सावरकर असे महापुरुष निर्माण होऊनही सगळे काम हवे तसे तडीस जात नाही तर त्यांच्या गुणांचे तेजस्वी अंश प्रत्येक भारतीयांत उतरले पाहिजेत आणि त्यासाठी एकेक माणसावर लक्ष केंद्रित करून आणि त्याची मानसिकता आमूलाग्र बदलेल अशा प्रकारे त्याला संस्कारित केले पाहिजे हे हेडगेवारांच्या जीवनदृष्टीचे सार आहे ० प्रत्येक हिंदूला आत्मभान आले पाहिजे , व्यक्तिहितापेक्षा त्याने समष्टिहिताला प्राधान्य दिले पाहिजे,शत्रुमित्रविवेकाच्या संदर्भात त्याची न्यायबुद्धी जागृत झाली पाहिजे आणि त्याने कर्मयोग आचरणात आणला पाहिजे हे हेडगेवारांचे सांगणे आहे ० मोदींच्या काँग्रेसमुक्त भारत आणि स्वच्छ भारत अभियान ह्या दोन संकल्पना वरील परिप्रेक्ष्यामध्ये तपासून पाहू ० काँग्रेसच्या माणसांपासून नव्हे तर काँग्रेसच्या विचारांपासून मुक्त असलेला भारत मोदींना निर्माण करायचा आहे ०

काँग्रेसने राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतावाद ह्या दोन विषयात ह्या देशाच्या प्रयोगसिद्ध आणि सृजनशील अशा प्राचीन संकल्पनांशी द्रोह करीत राष्ट्रीय उर्जेला नवनिर्माणाची प्रेरणा देण्यास असमर्थ असलेल्या भ्रांत संकल्पना रुजविण्याचा चंग बांधला ०. परिणामी बहुसंख्य हिंदूंना नैतिकदृष्ट्या अनेकदा अपराधी ठरविण्याचे पाप काँग्रेसच्या हातून घडले ० मोदी जेव्हा स्वच्छ भारताविषयी बोलतात तेव्हा त्याचा संदर्भ केवळ उठसुट कुठेही थुंकण्याची सवय आणि उघड्यावर उत्सर्जनविधी इतक्यापुरता मर्यादित नसतो ० त्याचा संबंध भ्रष्टाचाराशी असतो ० हा देश माझा आहे असे वाटणे हे आध्यात्मिक अनुशासन आहे आणि त्याच्या मानमर्यादा रक्षिण्यासाठी मी प्रसंगी प्राणांचे बलिदानही सहजपणे करीन ही निष्ठा आहे ० काँग्रेसने अहिंसा आणि शांती ह्या दोन मूल्यांना फाजील महत्व दिल्याने अनुशासन आणि निष्ठा ह्या दोन प्रेरक शक्ती मातीमोल ठरल्या ० त्यातून विविध समाजघटकांमध्ये असमतोल निर्माण होऊन जे सशस्त्र आणि हिंसाचारी त्यांना पाकिस्तान उभे करणे शक्य झाले ० ह्या देशाचे जे काही करायचे ते मुसलमान करतील आणि आपल्याला देशाप्रती काही विशेष करणे नाही हे स्पष्ट झाल्यावर व्यक्तिगत स्वार्थ बोकाळला आणि मग लाच देण्याघेण्यात लोकांना गैर वाटेनासे झाले ०

भ्रष्टाचारमुक्तीनंतरचा टप्पा विकासाचा आहे ० सबका साथ सबका विकास असे मोदी म्हणतात तेव्हा त्यात सर्व भारतीय असतातच पण मुसलमानांचा विचार त्यात आवर्जून केलेला असतो ० ह्या देशाचे नागरिकत्व हा केवळ नैर्बंधिक उपचार न राहता उत्कट देशभक्तीतून ते नागरिकत्व उदित झालेले असेल तर स्वतंत्र राष्ट्रनिर्मितीची महत्वाकांक्षा आणि त्यासाठी आतन्कवादाचा स्वीकार करण्याची टोकाची वृत्ती मुसलमान सोडून देतील आणि ह्या देशावर हिंदूंप्रमाणे उत्कट प्रेम केले की आपले ऐहिक आणि पारलौकिक कल्याण सुरक्षित राहणार आहे हा विश्वास त्यांच्या निर्माण होऊ शकेल ० सबका साथ सबका विकास ह्या घोषणेत आणि कार्यक्रमात राष्ट्रीय एकात्मतेचा बीजमंत्र लपलेला आहे हे लक्षात घेतले पाहिजे ० मोदी थोडेही बेसावध राहिले असते आणि गुजरातेत बहुमत मिळविण्यात ते कमी पडले असते तर नवराष्ट्र निर्माणाचा जो संकल्प त्यांनी सोडला आहे त्याला फार मोठा धक्का बसला असता ० गुजरातची निवडणूक ही अग्निपरीक्षा होती आणि त्यात मोदी उतरले ० त्याचे असाधारण महत्व कळण्यासाठी विरोधकांच्या विचारसृष्टीचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरेल ०

काँग्रेस स्वातंत्र्य आंदोलनातला प्रमुख पक्ष होता ० भारताच्या स्वातंत्र्याशी कम्युनिष्टांचा काही संबंध नाही असे स्वतः: स्टालिन म्हणाला आहे ० काँग्रेसने हिंदूंना फसवून आधी मुसलमानांना स्वातंत्र्य दिले म्हणजे पाकिस्तान निर्माण केले आणि जे उरले ते देतांना त्यातही मुसलमानांचा पहिला वाटा आहे असे हिंदूंना दरडावून सांगितले ० हे चुकून झाले असे म्हणावे तर स्वतंत्र झाल्यावरही काँग्रेस शासनाची नीती मुस्लिम आतंकवादापुढे झुकण्याचीच राहिली ० अपराधीपणाच्या भावनेतून काँग्रेसने काश्मीरचा ४० प्रतिशत भूप्रदेश पाकिस्तानला देणगी म्हणून जणू देऊन टाकला ० मुसलमानांच्या जवळ जाण्यासाठी काँग्रेसने प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला दूर ढकलले ०जे स्वतःला अहिंदू म्हणविते ते काँग्रेसला अत्यंत प्रिय असते ० ज्यात मुसलमानांना स्वयंनिर्णयाचा हक्क आहे आणि ज्यात मुसलमानांच्या इच्छेविरुद्ध काही होणार नाही असे हिंदी राष्ट्र काँग्रेसला घडवायचे आहे ० पंतप्रधान मोदींना हवा आहे तसा भारत सुसंघटित,एकात्म आणि विजिगीषू झाला तर एकवेळ मुसलमानांना आनंद होऊ शकेल पण तो काँग्रेसला होईलच असे ठामपणे म्हणतां येणार नाही इतके काँग्रेसचे हिंदी राष्ट्रवादाचे तत्वज्ञान आणि त्यादृष्टीने झालेला व्यवहार सदोष आहे ० भारत महासत्ता होण्याइतका राजकीय,आर्थिक आणि संरक्षणदृष्ट्या प्रबळ व्हावा असे काही राष्ट्रांना वाटत नसेल तर त्यात आश्चर्य नाही ० गुजरातेत मोदी ह्यांचा पक्ष पराभूत झाला असता तर मोदींचे विचार आणि धोरणे भारतीयांनी झिडकारली असा दिंडोरा पिटत जसा काँग्रेसने विजयोत्सव साजरा केला असता तसा तो काही राष्ट्रांनी त्यांच्या पद्धतीने साजरा केला असता ० मोदी ह्यांचा पराभव हा काँग्रेस आणि भारताची शत्रूराष्ट्रे ह्यांचा समान आनंदाचा विषय झाला असता हे कळले की तसे न होऊ देऊन मोदी ह्यांनी केव्हढे यश संपादन केले आहे हे कळते . ० गुजरातेत भाजप की काँग्रेस सत्ताधीश होणार इतक्यापुरते ह्या निवडणुकीचे महत्व नव्हते ० भारताची स्वतंत्र राष्ट्र म्हणून पुढची वाटचाल कशी होणार आणि त्याला लोकांचे समर्थन मिळणार की नाही हा प्रश्न होता ० मोदींनी समाधानकारक उत्तर मिळविले हे डोंगराएव्हढे काम झाले ०

काँग्रेसला गेल्या २२ वर्षात मिळाल्या नव्हत्या एव्हढ्या ८० जागा मिळाल्या ह्याचा अर्थ काय ? मोदींना आणि भाजपाला सत्ता टिकविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला ह्याचा अर्थ काय ? आमूलाग्र परिवर्तनाचे मोठा आवाका असलेले कार्य हाती घेतले जाते त्यावेळी ते काम ज्यांना तडीस जायला नको असते असे विघ्नाससंतोषी लोक सामान्य माणसाच्या मनात संशयाचे धुके निर्माण करण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करतात ० सामान्य माणसाला त्याचे भवितव्य धोक्यात आले अशी भीती घातली जाते आणि त्याचे मन अस्थिर केले जाते ० काँग्रेसने लोकांना बिथरविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना काही प्रमाणात यश आले ० अशा प्रयोगात असे नेहमी होते ० त्याने दचकून जाण्याचे कारण नाही ० प्रबोधन,सेवा आणि योजना ह्या तीन गोष्टी भाजपने लक्षात ठेवल्या आणि तसे वर्तन केले की सामान्य माणसाचा भरभक्कम विश्वास संपादन करता येईल आणि तेव्हढ्या प्रमाणात काँग्रेसचे लोकांना उचकवण्याचे उद्योग विफल होतील ०

पुढच्या दोन वर्षात प्रत्येक नगरसेवकाच्या कार्यक्षेत्रात चर्चा मंडळे निघाली पाहिजेत आणि तेथे राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतावादी ह्यावर झडझडून चर्चा झाली पाहिजे ० प्रत्येक विधानसभा सदस्यांच्या कार्यक्षेत्रात हिंदुत्वावर शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि अधिकारवाणीने बोलणारा एकतरी वक्ता निर्माण झाला पाहिजे ० एकाही हिंदूला फाळणी नको असतांना फाळणी झाली कारण ब्रिटिश राज्यकर्ते,काँग्रेस आणि मुस्लिम लीग ह्यांनी संगनमताने घडविलेले भारतातले ते पहिले ‘ पोलिटिकल मॅच फिक्सिंग ‘ होते हे लोकांना गंभीरपणे सांगता आले पाहिजे ० प्रबोधन ज्यांचे करायचे त्यांच्याशी होणारे भाजप कार्यकर्त्यांचे वर्तन सेवावृत्तीचे पाहिजे ० सर्व समाजघटक आपले आहेत आणि सर्वांमध्ये एकात्मता आणि बंधुभाव निर्माण करायचा आहे हा वसा घेतला पाहिजे ० तितकीच महत्वाची आहे योजना ० योजना म्हणजे अखंड सावधानता ० प्रतिस्पर्ध्याच्या हालचालींचा मागोवा त्या घडण्याआधी लागला पाहिजे ० बेसावध पकडण्याची एकही संधी भाजपने काँग्रेसला देता कामा नये ० ह्या निवडणुकीत आपल्याला अपेक्षेनुसार मोठे संख्यात्मक यश मिळाले नाही कारण आपण जनसंपर्कात कमी पडलो हे आहे ० एकटे मोदी अहोरात्र काम करीत होते आणि दुसरे नेते आणि कार्यकर्ते ह्यांनी हलवायला पाहिजे होते तेव्हढे हातपाय हलविले नाहीत हे खरे आहे ० हे बदलले पाहिजे ० शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करता आले कारण प्रत्येक मावळ्याला आपण शिवाजी आहोत असे वाटत होते आणि तशी कर्तव्ये तो वेळच्यावेळी करीत होता ० राहुल गांधींविषयी अगदी वेगळ्या प्रकारे आणि आश्वासक लिहावयाचे आहे पण ते पुढच्या लेखात ० इत्यलं ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी
संपर्क: ०९६१९४३६२४४

Previous Article

देवाच्या निमित्ते मराठी चित्रपटाची व्यथा!

Next Article

आयुष्य एक संगीत साधना

You may also like