मेरी ख्रिसमस बोलल्याने खरंच हिंदू धर्म छोटा होतो?

Author: Share:
हिंदू धर्माचा अभ्यास करणाऱ्यांना तुम्ही हे विचारलेत की एखाद्या दुसऱ्या धर्माच्या शुभेच्छा दिल्याने हिंदू धर्म बाटतो का बाबा! तर ते हसतील. मुळात ज्याला हिंदू धर्म समजला (अभ्यास सोडून द्या) त्याला हे कळेल कि हिंदू धर्माचे महात्म्यच सर्वसामावेशकतेत आहे. हिंदू धर्माची वैशिष्ट्ये सांग असे कधीही कोणत्याही काळी कुणीही हिंदू धर्म माहित असलेल्याला विचारले तर तो सांगेल, हिंदू धर्म प्रचंड परिवर्तनशील धर्म आहे. तो बद्धकोष्ठ झाल्यासारखा पुरातन गोष्टींमध्ये अडकून राहणरा नाही आणि परिवर्तनाने त्यातील सनातनत्व नष्टही होत नाही. एखाद्या उष:काला सारखा तो आहे. रोजची प्रभा नवीन रंग दाखवून जाते, ऋतूंप्रमाणे सकाळचे रूप बदलते पण सकाळ हि सकाळच राहते. हिंदू धर्म ही विश्वाच्या अध्यात्मिक सांस्कृतिक क्षितिजावर उगवलेली सकाळ आहे.
 
मेरी ख्रिस्तमस बोलल्याने हिंदू धर्म भ्रष्ट होतो का? हिंदू धर्म इतका व्यापक आहे, की एखादा हिंदू रामाच्या पाय पडून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागले त्याच्याही पाया पडेल. पुढे गौतम बुद्धाची मूर्ती दिसली त्याच्याही पाया पडेल. गौतम बुद्धांना नमस्कार करण्यासाठी त्याला राम, शंकराचे अस्तित्व नाकारावे लागत नाही. एखाद्या ख्रिस्ताला रामाला नमस्कार करण्यासाठी मात्र येशूचे अस्तित्व नाकारावे लागेल. असे हिंदू धर्माचे नाही. अगदी मनोभावे त्याने येशूला जरी नमस्कार केला तरी तो हिंदूच राहतो. कारण जे तत्व त्याच्यात आहे तेच तुझ्यात आहे आणि तेच त्याच्यातही आहे हे एकदा मान्य केले की त्याच्यालेखी येशू हा इतर कुठल्याही अभ्यासक विचारवंतासारखाच राहतो, आणि ज्याने निर्माण केलेल्या धर्मवाक्यावर आज इतके कोट्यवधी लोक विश्वास ठेऊन वागत आहेत, राष्ट्रेच्या राष्ट्रे स्वतःला अभिमानाने ख्रिश्चन म्हणवत आहेत, अशा माणसाच्या महत्तमतेला तो मनोभावे वंदन करतो इतकेच! त्याच्यात धर्म बाटण्यासारखे काही नाही. एवढे विशाल वैशिष्ट्य, आपण संकुचित मनोवृत्तीच्या विचारांनी का नाकारतो आहोत? मी हिंदू धर्माला का डाग लावतो आहोत वगैरे विधान करणार नाही. कारण चार डास समोरून उडाले म्हणून सूर्याचे तेज कमी होत नाही. उलट मेरी ख्रिसमस च्या शुभेच्छा देणाऱ्या हिंदूंना मूर्ख ठरवून आपल्याला हिंदू म्हणजे काय ते कळलंच नाही हे जगाला आपण दाखवून देतो.
 
व्हेलेंटाईन दिवसाचेही तसेच. व्हॅलेंटाईन दिवस हिंदू लोकांनी साजरा करू नये यासाठी मग व्हेलेंटाईन कसा माणूस होता वगैरे मेसेजेस सुरु होतात. अरे वाल्याचा वाल्मिकी झाला ह्याचा गौरव करणारी संस्कृती आपली, व्हॅलेंटाईन राक्षस का असेना, त्याच्या नावाने प्रेमाचा दिवसच साजरा होतोय ना? आणि पुन्हा त्यात हा दिवस आई बाबांवरील प्रेमाचा देखील आहे वगैरे वकिली भाषा हवीय कशाला? ते प्रेम बायकोवरचं किंवा प्रेयसी वरचं असलं तर अशुद्ध होतं का? काही मूर्ख माणसे ह्या दिवशी राजगुरू सुखदेव भगतसिंग ला फाशी दिली अशा कांड्या पिकवतात. ती माणसे स्वतःचे अज्ञानच नाही पण भारताच्या थोर सुपुत्रांप्रती आपला असलेला निष्काळजीपणादेखील सिद्ध करतात.
 
नवीन वर्ष.. हिंदूंचे नवीन वर्ष गुढीपाडवा आहे अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. ह्या मंगल दिवसाचा आम्हाला अभिमान आहे. ह्या दिवशी मांगल्याच्या पावित्र्याच्या वातावरणात आम्ही उत्सव साजरा करतो याचाही आम्हाला अभिमान आहे, पण म्हणून ३१ डिसेंबरवर राग का? १ जानेवारीला २०१९ च लिहिणार आहात ना? कि २०१८ लिहूनच काम करू शकणार आहात? मग तुमच्याही लेखी वर्ष बदललेच ना? मग त्याचा आनंद साजरा करायला राग कशाला? आणि एखाद्याने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या की लगेच ‘बाटला बघ हा हिंदू’ म्हणून वृथा किंकाळ्या कशाला फोडायच्या?
 
महापुरुषांचा विपर्यास त्यांचे अनुयायीच करतात, तसा हिंदू धर्माचा विपर्यास करणारेही असे स्वतःला हिंदू धर्म रक्षणाचे टिळे स्वतःच लावून घेतलेले करतात. हिंदू धर्माची पताका सतत उंचावत राहिलीच पाहिजे. आणि ती राहणारच आहे, कारण तो स्वयंभू आहे. सूर्याला कुणी तेज उसने देऊ शकत नाही. एखादा पडदा लावून बसला असेल तर तो पडदा दूर करून ह्या तेजाचा आनंद त्याला देण्याचे काम आपण करू शकतो. हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेतलेल्यांचे काम लोकांच्या समोरून हे पडदे दूर करण्याचे आहे. मी सूर्याला तेज देतो आहे अशा वल्गना कुणी करू लागले तर लोक त्याला मूर्खातच काढतील.
 
हिंदू धर्माचे तेज लोकांना वाटण्यासाठी स्वामी विवेकानंद संपूर्ण वाचले पाहिजेत. त्यांचे हिंदू धर्माचे विचार, लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व पसरवले पाहिजे.आद्य शंकराचार्य वाचून ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. वेद वेदांत आणि भग्वद्गीतेचे महान तत्वज्ञान लोकांपर्यत नेले पाहिजे, अर्थात दुसऱ्याच्या धर्माचा, विचारांचा, तत्वांचा संपूर्ण आदर ठेऊन!
 
एखाद्याला मेरी ख्रिसमस म्हटले, ईद मुबारक म्हटले, व्हॅलेंटाईन डेला आपल्या बायकोला- प्रेमिकेला गुलाबाचे फुल दिले (एकत्र दोघींना दिलेत तर ते मात्र चुकीचे होईल) म्हणून हिंदू धर्माचे तेज तसूभरही कमी होत नाही हे कृपया ध्यानात ठेवा. आणि जर कुणी पाठवलाच तुम्हांला असा काही मेसेज, तर त्याच्या डोळ्यावरील पडदा दूर करून हिंदू धर्माचे सृयतेज त्याच्यापर्यंतही पोहोचू द्या!
 
हर्षद माने
Previous Article

२०१९ च्या  पूर्वसंध्येला ३६००० वर उभे मार्केट…

Next Article

२७ डिसेंबर

You may also like