मर्ढेकरांच्या कविता

Author: Share:

किती तरी दिवसांत

 

किती तरी दिवसांत

नाही चांदण्यात गेलो

किती तरी दिवसांत

नाही नदीत डुंबलो

 

खुल्या चांदण्याची ओढ

आहे माझी ही जुनीच

आणि वाहत्या पाण्याची

शीळ ओळखीची तीच

 

केव्हा तरी चांदण्यात

पुन्हा जाईन निर्भय;

गांवाकाठच्या नदीत

होईन मी जलमय

 

आज अंतरात भीती

खुल्या चांदण्याची थोडी

आणि नदीचा प्रवाह

अंगावर काटा काढी

 

बरा म्हणून हा ईथे

दिवा पारवा पाऱ्याचा

बरी तोतऱ्या नळाची

शिरी धार, मुखी ऋचा

 

– बा.सी.मर्ढेकर

 

 

 

   जन्म

 

नाही कोणी का कुणाचा । बाप-लेक, मामा-भाचा,

मग अर्थ काय बेंबीचा । विश्वचक्री? ॥

 

आई गोंजारते मुला । कासया हा बाप-लळा,

बाईलप्रीतीच्याही कळा । कशास्तव? ॥

 

येतें ऊर कां भरून । जाती आतडीं तुटून,

कुणी कुणाचा लागून । नाही जर? ॥

 

कैसा बांधला देखावा । जननमरणांतून देवा,

कुशीकुशींत गिलावा । रक्तमांसीं? ॥

 

का हें बांधकाम सुंदर । फक्त नश्वरतेचेंच मखर

अथवा दर्शनी महाद्वार । मिथ्यत्वाचें? ॥

 

मग कोठे रे इमारत । जिचें शिल्पकाम अद्भुत,

जींत चिरंतनाचा पूत । वावरें की? ॥

 

जरी कुठे ऐसें धाम । ज्याच्या पायऱ्याही अनुपम

आणि चुना-विटा परम । चिरस्थायी ॥

 

तरी मग रोकडा सवाल । “कोरिसी हाडांचा महाल,

ठेविशी त्यांत हरिचा लाल । नाशवंत ॥

 

वास्तुशास्त्र कां बिलोरी । योजिशी येथेच मुरारी,

घडसी वस्तीला भाडेकरी। बिलोरीच?”

 

– बा.सी.मर्ढेकर

Previous Article

वसंत कानेटकर

Next Article

राहुल,बाळा ,तुला वास्तव कधी समजणार ? – अरविंद विठ्ठल कुळकर्णी

You may also like