Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

आता तरी रायगडाला जाग येईल…

Author: Share:

लोकमान्यांनी गीतारहस्य लिहिले तेव्हा त्यांना कुणीतरी सुचवले की जर गीतारहस्य इंग्रजीत लिहिले गेले असते तर जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार झाला असता. तेव्हा लोकमान्यांनी त्या त्याला सांगितले की पाश्चात्य जग कर्मयोगीच आहे. त्यांना कर्मयोगाच्या संदेशाची गरज नाही. गरज भारतीयांना आहे आणि म्हणूनच गीतारहस्य मराठीत लिहिले. टिळक हे मराठी आणि गीतारहस्य त्यांनी मराठीत लिहिले. म्हणून याअर्थी गीतारहस्यावर पहिला अधिकार तो मराठी माणसाचा. केवळ अधिकार नव्हे तर गीतारहस्याची नितांत गरज मराठी माणसाला आहे, असेच कदाचित टिळकांना अभिप्रेत असेल, असे गृहित धरुन मी पुढील मुद्दे मांडणार आहे. हे मुद्दे मांडताना माझी भूमिका सर्वसाधारण मराठी तरुणाची आहे. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या हाती महाराष्ट्र आला. १९२० नंतरचं युग हे रोमॅंटिक युग योतं. चरका चला चलाके असली गाणी गांधीभक्त गात होते. स्वातंत्र्यानंतरही दे दी हमे आझादी बिना खडग बिना ढाल अशी गाणी गायली जात होती किंबहुना गायली जात अहेत. रोमॅंटिसिझमची ही झळ महाराष्ट्रालाही बसली आहे. कोणताही मुद्दा मुळातून समजून न घेता त्यावर कृती करणं, आंदोलने करणं, राजकीय वातावरण तापवणं असल्या गोष्टींना ऊत आला. या रोमॅंटिसिझमची हद्द म्हणजे एकीकडे माणसांचे मुडदे पडत होते, स्त्रीयांवर बलात्कार होत होते. अशा वातावरणात आम्ही भारतीय लोक ढोल, ताशा वाजवत व गुलाल उधळत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होतो. आम्हा भारतीयांच्या बुद्धीचे कशाप्रकारे खच्चीकरण झाले आहे त्याचे हे उत्तम उदाहरण. भारतीय रोमॅंटिक राजकारणाचा फटका महाराष्ट्रालाही बसत होता. मुळात स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचा सर्वात मोठा हात होता.

 

शिवाजीपासून वासुदेव फडकेंपर्यंत आणि लोकमान्यांपासून सावरकरांपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढणारे अनेक नेते हे मराठी होते. सर्वसामान्य मराठी माणसाला या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे. कारण मराठी माणसाचा इतिहासच पराक्रमाचा आहे. आपण अटकेपार झेंडा फडकवला… गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर कर्नाटक या ठिकाणी नवी मराठी राजघराणी उदयास आली… आपण दिल्लीचे तख्त फोडले… असे अनेक पराक्रम मराठी माणसाच्या नावावर आहेत. पण स्वातंत्र्यानंतर मात्र चित्र बदलले. दिल्लीचे तख्त फोडणरा मराठी माणूस दिल्लीचे तख्त राखू लागला. म्हणूनच हिमालयाच्या सहाय्यासाठी सह्याद्री धावून गेला अशी भाषा होऊ लागली. ग्रामीण भागात कॉंग्रेसची खुप चांगली पकड होती. पण त्यातून सरंजमशाही उदयास आली. त्याला खतपाणी वेळोवेळी घातले गेले.

 

त्यामुळे राजकारणातून मध्यमवर्गीय मराठी माणूस दुरावला गेला. त्यानंतर शिवसेनेचा उदय झाला व मराठी माणसाला आशेचा किरण मिळाल्यासारखे वाटू लागले. पण या सर्व घटकांचा मराठी माणसाच्या सामुहिक उत्कर्षावर कोणताच परिणाम झाला नाही. त्याचं कारण रोमॅंटिसिझम. कोणताही गोष्ट मूळातून समजून न घेता स्वच्छंदपणे त्यावर कृती केल्याने खोटा आत्मसन्मान प्राप्त होतो, पण खरेतर आपल्या हातून बरेच काही निसटलेले असते. अरुण सारथी महाराष्ट्राची शोकांतिका या पुस्तकात लिहितात, “आमच्या शेजारी एक प्यून राहत होता. लाडात आल्यावर तो आपल्या बायकोला म्हणत असे, भिक्ये तुला काय ठाव हाय? माझ्या बिगर सायबाचं लइ अडतंय”. आपल्याशिवाय कुणाचं तरी काहीतरी अडतंय, आपल्या धाकात सगळे आहेत या खोट्या जाणीवेला आज आपण “मराठी अस्मिता” असं म्हणतो. लोकल ट्रेनमध्ये जागेवरुन भांडण झाल्यावर कुणा परप्रांतीयाच्या(?) कानाखाली मारल्यावर आपला अभिमान सुखावतो. आपल्याला जणू तोरणा जिंकल्याचा आनंद होतो. मग आपल्याला मिळालेल्या पगारात आपला महिना जरी व्यवस्थित गेला नाही तरी चालतंय. या अशा वाह्यात गोष्टींमध्ये मराठी माणूस समाधान मानू लागला आणि मुंबईत मराठी माणूस मागे पडला.

मुंबईमध्ये मराठी माणसाची जी पिछेहाट झाली तिला मराठी पुढारी आणि स्वतः मराठी माणूसच जबाबदार आहे. आपण जबाबदारी झटकून इतरांना दोष देत राहिलो तर खुजा आत्मसन्मान नक्की मिळतो पण समस्या काही सुटत नाही. ज्याप्रमाणे एका वर्षात स्वराज्य असला बालीश प्रकार १९२० नंतर भारतात सुरु झाला. तसा १९६० नंतर महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेपी होऊ नये म्हणून मराठी माणसाने स्वतःची प्रगती करुन घेण्यासाठी एखादे आधुनिक यंत्र चालवण्याऐवजी हातात धोंडे घेतले आणि स्वतःच्या पायावरच धोंडा मारुन घेतला. खरेतर मराठी माणसाला ज्याप्रमाणे स्वातंत्र्यासाठी झगडावे लागले, त्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रासाठीही झगडावे लागले आहे. ती लढाई आजही सुरु आहे.

 

पण १९६० नंतर मराठी माणूस नित्यनेमाने लढत आहे. तो आंदोलने करीत आहे. त्याला क्षणभरही उसंत मिळालेला नाही. मी मराठी माणूस असा शब्द वापरला तो एकंदर मराठी समाजासाठी वापरला आहे. एका मराठी माणसासाठी किंवा मराठीतील विशिष्ट जातीच्या समुहासाठी नव्हे, हे कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे. मी स्वतः मुंबईकर असल्यामुळे माझ्यासमोर मुंबईतला मराठी माणूस उभा राहतो. तर मराठी माणूस सतत कोणत्या ना कोणत्या आंदोलनाखाली भरडला गेला आहे. म्हणून मराठी समाजाची स्वतःची लॉबी महाराष्ट्रात नाही.

सगळे पुढारी मराठीच्या नावे घोषणा देतात. पण विषयाच्या मूळापर्यंत कुणी जात नाही. म्हणूनच मराठी माणसाला घोषणा आवडते. एखाद्या पुढार्‍यानं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपण लगेच जय म्हणतो. इथेच आपलं मराठीपण सुखावतं. स्वतःच स्वतःची काही समजूत मराठी समाजाने करुन घेतली आहे. घरात बायकोला मारहाण करण्यार्‍या दारुड्या नवर्‍यापासून सुटका करुन घेण्याऐवजी बायको घरातली भांडी आपटून स्वतःचं खोटं समाधान करुन घेते. भांडी आपटल्याने कलह दूर होणार नाही आणि मारहाण करुन वर्चस्व गाजवणार्‍या नवर्‍याकडून सुटकाही मिळणार नाही. पण भांडी आपटल्यावर तिला समाधान मात्र मिळतं. तसंच खुळं समाधान मराठी माणूस वेळोवेळी परंप्रतीयांवर हल्ला चढवून किंवा गरज नसलेले आंदोलन करुन मिळवत असतो.

मूळ समस्येचं निराकरण कधीच होत नाही. म्हणूनच परप्रांतीयांना शिव्या घालूनही, त्यासाठी वेळोवेळी आंदोलने करुनही उपयोग शून्य. मुंबईचा विचार केला तर परप्रांतीयांचे लोंढे थांबवणे खुपच कठीण आहे. जर कुणाला वाटत असेल की ते थांबवणे शक्य आहे, तर त्याने तसे करुन दाखवावे. पण मराठी माणसाने जर ठरवले तर या लोंढ्यांमध्येही तो उठून दिसू शकतो. परवडत नाही म्हणून त्याला मुंबईबाहेर जाण्याची गरज नाही. तर महाराष्ट्रातील धंद्यांमध्ये सहकारी साखर कारखाने, मुंबईतील रसाचा गुर्‍हाळा, फुल बाजार, भाजी बाजार, मासे विक्री व्यवसाय यावर मराठी माणसाची मक्तेदारी आहे. पण आता तर या धंद्यांवरही अमराठी लोकांनी छाप पाडली आहे. रस्त्याच्या कडेला कितीतरी अमराठी लोक धंदे करताना दिसतात. मग यांना संरक्षण पुरवतो कोण? आपलेच मराठी नगरसेवक किंवा स्थानिक मराठी गुंडच ना?

काही पैशांसाठी आपणच आपला स्वाभिमान विकून खाल्ला आहे. कितीतरी मराठी माणसांनी आपल्या जमीनी बिल्डरांना विकून टाकल्या आहेत. मुंबईच्या अनेक जमीनींवर मराठी माणसाचा ताबा होता. हे सगळ होत असताना मराठीचे कैवारी म्हणवून घेणारे पुढारी काय करत होते? आपल्याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते आधी स्वहित पाहतात, मग पक्षहित आणि उरले सुरले हित जनतेचे. त्यात त्यांचे राजकीय गणित असते. ते असावेच. कारण सर्वसामान्य माणसाला जे वर्ज्य असते ते राज्यकर्त्यांना मुळीच वर्ज्य नसते. राजकारणात पटत नसलेल्या अनेक गोष्टी कराव्याच लागतात. पण त्या करताना समाजाचे भान सुद्धा ठेवावे लागते, हे राजकीय नेते विसरतात.

 

अजून एक महत्वाचा मुद्दा मराठी समाजाला बाधला तो म्हणजे जातीयवाद. १९२० नंतर ब्राह्मणेतर समाजातील लोक नेते म्हणून पुढे येत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर महाराष्ट्राभर सरंजमशाही निर्माण झाली. कॉंग्रेसमधील ज्येष्ठ मराठी नेते कुणाच्या तरी कृपेने दुय्यम स्थान मिळावे म्हणून धडपडत असत. या आधुनिक सरंजामशाहीत जातीयवाद प्रचंड वाढला. महाराष्ट्र हा शाहू, फुले व आंबेडकरांचा मानला जाऊ लागला. त्यात सावरकर व लोकमान्यांना स्थान नव्हते. शाहू, फुले, आंबेडकर हे महान होतेच. यात शंकाच नाही. पण इतरांची महानता ते ब्राह्मण असल्यामुळे नाकारली गेली.

गांधीहत्येनंतर ब्राह्मणांवर अत्याचार झाले ते त्यांच्या मनात ब्राह्मणांच्या विरोधात इतकी वर्षे धुमसत असलेला प्रतिकार नव्हे, तर ते आपल्या बौद्धिक नपुंसकत्वाचं प्रतिकच होतं. कारण भारत स्वतंत्र झाला होता व सत्ताकेंद्रे बदलली होती त्यामुळे त्यांच्या या विकृत कृतीचं समर्थन करणारे लोक सत्तेत होते हे त्यांना माहित होतं. अर्थात मराठी माणसाच्या शोकांतिकेमध्ये सर्वात मोठा हातभार लागला तो जातीयवादाचा. त्यामुळे मराठी माणूस एकजूट होऊ शकला नाही. मराठी कुटुंब रचना सुद्धा मराठी समाज म्हणून घडवण्यास पुरेशी नव्हती. जशी मारवाड्यांमध्ये चूल जरी वेगळी झाली तरी व्यवसाय वेगळे होत नाही.

 

जर धाकटा भाऊ नेतृत्वात कुशल असेल तर थोरल्या भावाने मागे होऊन व्यवसायाचे नेतृत्व धाकट्यास करु द्यावे. पण सांस्कृतिक आणि सामाजिक नेतृत्व मात्र थोरल्या भावाकडेच असावे. कुटुंबाचा प्रमुख थोरलाच. वहिनी-बहिणी यांमध्ये खर्चाची स्पर्धा न लागता, बचत कसे करता येईल याकडे कुटुंबप्रमुखाने लक्ष द्यावे. व्यवसायात सत्तरीनंतर त्या माणसाने फक्त सल्ला द्यावा व ऐंशीनंतर केवळ धाक असू द्यावा. अशाप्रकारची कुटुंब रचना या उद्योगी समाजाने जोपासली आहे. यांच्या स्त्रीया सुद्धा उद्योगात त्यांच्या कुवतीनुसार किंवा कौशल्यानुसार योगदान देतात. या सर्व गोष्टी तुम्हाला डॉ. गिरीश जाखोटिया लिखित “यशस्वी उद्योगाचे ३६ मंत्रे” या पुस्तकात वाचायला मिळतील. इथे हे मुद्दे देण्याची आवश्यकता अशी की आपण ज्यांना कंजुस मारवाडी वगैरे म्हणून हिणवतो. ते आपल्यापेक्षा किती वेगळा आणि प्रगत विचार करतात.

शैलेश लोढा हे एक कलाकार, त्यांची बयको ही कौंसलर आहे. शैलेस लोढा एकदा म्हणाले “मारवाडी माणसाला कुणी शिव्या दिल्या तरी तो म्हणतो. कुणी काहीतरी देऊन गेलाय ना आपल्याकडून काही घेऊन तर गेला नाही”. विनोदाचा भाग आहे. पण मुद्दा अस की हा समाज एक समाज म्हणून पुढे गेला आहे. ते कुणाला शिव्या देत नाहीत, कुणाला बदडवत नाहीत. तरी सुद्धा त्यांची स्वतःची अस्मिता आहे.

माझ्या सांगण्याचा मुद्दा असा की आपण मराठी लोक समाज म्हणून भरकटलो आहोत. याला आपले नेते आणि अर्थात आपण स्वतःच जबाबदार आहोत. इतरही यासाठी जबाबदार असतील. पण माझ्या बिगर सायबाचं लइ अडतंय, यातच आपण समाधान मानत गेलो. छत्रपती शिवाय महाराज की म्हणणारे पुढारी आता आपल्याला नको आहेत. तर छत्रपतींचं महाराष्ट्राविषयीचं धोरण सत्यात उतरवणारे पुढारी आपल्याला हवे आहेत. वेळ पडल्यास आपल्यालाच पुढारी व्हायचे आहे.

 

आता काळ बदलत आहे. मराठी तरुणही बदलत आहेत. मराठी तरुण उद्योजकतेकडे वळत आहेत. कुणाचे डोके फोडून आपले भले होणार नाही तर योग्य ठिकाणी डोके लावून आपले भले होणार आहे, हे मराठी तरुणाला कळून चुकले आहे. मराठी तरुणाने प्रत्येक क्षेत्रात जायला हवे, सर्व प्रकारचे उद्योग असो, शासकीय नोकर्‍या असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या नोकर्‍या असो. राष्ट्रीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही, सगळीकडे मराठी माणसाचे वर्चस्व असले पाहिजे.

 

मराठी माणूस मुळातच खुप जिद्दी आहे, शूर आहे, कष्टाळू आहे, जर भारत जगाचे नेतॄत्व करणार असेल तर मराठी माणूस भारताचं नेतृत्व करु शकतो. पण सत्तेसाठी आसुसलेल्या पुढार्‍यांच्या मागे पुढे न करता मराठी तरूणाने स्वतःचा उत्कर्ष करुन घेतला पाहिजे.

 

आता यापुढे मराठी माणसाने राजकीय नेत्यांच्या नादी लागून उगाच कोणतेही आंदोलन करु नये. आता आंदोलन त्याने स्वतःच्या मनातच करावे आणि मिशनरी वृत्तीने कार्य करत खर्‍या अर्थाने “मराठी अस्मिता” निर्माण करावी. आपण अपेक्षा करुया की आता तरी रायगडाला जाग येईल. कारण सकारात्मकता मराठी माणसाच्या नसानसात भिनायला हवी…

Previous Article

मातोश्री वृध्दाश्रमात तरुणाईने रंगवली “गप्पा, गोष्टी अन् बरचं काही” या कार्यक्रमाची मैफिल

Next Article

मिरा भाईंदरमध्ये कमळ फुलणार की बाण निशाण्यावर लागणार?

You may also like