Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मराठी भाषेतील गंम्मत

Author: Share:

वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे शहर, गाव, राज्य यानुसार एकाच भाषेचे अनेक प्रकारचे उच्चार तर होतातच पण त्या त्या ठिकाणानुसार, जातीनुसार वगैरे सुद्धा कोणत्याही भाषेतील शब्दांचे उच्चार भिन्न भिन्न होतात. आपण आधी मराठी भाषेबद्दल बघू या. तसेच एकाच वस्तू साठी किंवा गोष्टीसाठी शब्दही वेगळे असतात. तसेच मूळ मराठी, हिंदी किंवा इंग्रजी शब्दांचे सुद्धा विचित्र उच्चार झाल्याने ऐकायला फार गम्मत येते.

कोकणात पातेले या शब्दाला “टोप” म्हणतात, पुण्यात कोणाला टोप मागितला तर एखादी व्यक्ती पटकन राजांचा जिरेटोप घेऊन येऊ शकते. कोकणात मुलीला चेडवा म्हणतात. कोकणातील बांधव ळ चा उच्चार “ल” असा करतात. सगळं म्हणायचं असेल तर “सगला” म्हणतात. याच्यात भर म्हणून की काय कोळी बांधव “ड” चा उच्चार “र” असा करातात. होडीला होरी, झाडाला झार असे म्हणतात. उत्तर कोकण म्हणजे रायगड जिल्हा आणि तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे यातल्या भाषेत आणि उच्चार करताना जे “हेल” काढले जातात त्या देखील थोडा फार फरक आहेच. सिंधुदुर्ग आणि कोकणातील भाषेवर गुजराथी भाषेचा प्रभाव आहे. कारण कोकणात एके काळी गुजराथच्या “पुलकेशी” घराण्याने राज्य केले होते. गुजराथ मधील “डाकोरनाथ” जसा आहे, तसा कोकणात “रवळनाथ” आहे. गुजराथ मध्ये “रावळ”, “रावत” अशी आडनावे आहेत तर कोकणात राउळ, राउत अशी आडनावे आहेत.

मला जास्त गम्मत वाटते ती ही की अनेक वेळा मूळ शब्द सोपा असूनही त्याचे अवघड रूप लोक बोलत असतात. पंजाबी माणसे बोलतान “ओय ….पाजी, इसका तो स्वाल ही नाही उठता” या वाक्यात “सवाल” या सरळ शब्दाला “स्वाल” असा जोडशब्द बनवून टाकतात. तर “प्रगत सिंग” या नावाचा “परगत” सिंग” असा सुट्टा उच्चार करतात.  उत्तर भारतीय लोक [ ज्यांना आपण सर सकट भय्ये म्हणतो ते बिहारी, उत्तर प्रदेशचे, मध्य प्रदेशचे आणि  हरियाणाचे असतात. हे लोक जोड अक्षत असेल तर त्याचा उच्चार करताना मागे अ किंवा इ असा उपसर्ग लावतात. उदा. “स्पष्ट” म्हणायचे असेल तर “अ”स्पष्ट” म्हणतात. स्टेशन म्हणायचे असेल तर “इ”स्टेशन” म्हणतात. मला मजा वाटते की जर त्यांना “अस्पष्ट” म्हणायचे असेल तर मग ते काय म्हणणार? दक्षिणेकडील लोकांना आपण सरसकट “मद्रासी” किंवा  “अण्णा” किंवा “कानडी” किंवा “लुंगीवाले” म्हणतो. पण ते खरे नाही. दक्षिणेकडील कर्नाटक मध्ये कानडी भाषा, कन्नड लोक, आंध्र प्रदेश मध्ये तेलंगणा आणि उर्वरित आंध्र असे भाग आणि तेलुगु भाषा, तामिळनाडूमध्ये तमिळ भाषा आणि तमिळ लोक, पूर्वी तामिल्नादुचा भाग असलेला पण आजचा स्वतंत्र केरळ येथे मल्याळी [ मलय+आलयम-मलय पर्वत हेच ज्याचे घर आहे तो] त्यांची मल्याळी भाषा आणि परत या सर्वांच्या उपभाषा असे प्रकार आहेत.

एकदा आमच्याकडील एक मोलकरीण माझ्या सौभाग्यवतीला सांगत होत्या….मी माझ्या “मिष्टरांची” काल “दुपारी” वाट बघत “हवेवर” थांबले होते. मी ते ऐकून विचार करायला लागलो की अरे या भर दुपारी उन्हात “हवेवर” वाट बघत कशा थांबल्या असतील बरं ? म्हणून मी न राहवून त्यांना विचारलेच. तर त्या म्हणाल्या ” अहो… तो बॉम्बेला जात नाही का? हवेचा रस्ता” , हवे रोड हो….  त्याच्यावर थांबले होते. ते ऐकून मला पंख्याची हवा घ्यायची वेळ आली. हवे वर म्हणजे “हाय वे वर” ….बर बर….

शिवाय एखाद्या गावात गेल्यावर तुम्ही “पेशल” [ स्पेशल” ] मागितला तर तुम्हाला जास्त दुध घातलेला चहा मिळणार. बिगारी नापास माणसाला सुद्धा “पेशल” चा योग्य शब्द आणि स्पेलिंग नाही पण “विशेष, खास” अर्थ माहित असतो. पण काहींना चांगल्या चहालाच फक्त “पेशल” म्हणतात असे वाटते त्यांच्यापुढे मी शरण आहे.

शिकलेले आणि नवशिक्षित कोणत्या शब्दांची कशी वाट लावतात ते बघा.

१] मशीन- मिशन [ मग अंगावर जे मिशन घेतलेले असते त्याचे काय”]

२] पेट्रोल – Patrol [ त्याचा मराठी टायपिंग ने उच्चार बनत नाहीये, पण तो “Van ” मध्ये किंवा “Patroling ” गस्त मध्ये जो होतो तसा उच्चार करतात.

३] “Traffic – Troffic

४] Pocket – Pokit

५] Wallet -व्हायोलेट

६] Message –   मासेज

७] एपिसोड – Apisod …

 तसाच तुम्हाला “मुंबईच्या शुध्द मराठीत बोलायचे असेल” तर मग तुम्ही पुढील वाक्य असेच बोलणे आवश्यक आहे….

“मी त्याला ही गोष्ट सांगायला “गेलेलो” पण तो ना “ऐकायलाच मागत नाय”…..तुम्ही पुण्यात रहात असाल तर म्हणता ” मी ही गोष्ट त्याला सांगण्याचा परोपरीने प्रयत्न केला, पण काय राव…तो ऐकायलाच तयार नाही.” मुंबईचे लोक पुणेरी लोकांना “भामटे” म्हणतात तर पुण्याचे लोक मुंबईकरांना “मवाली” म्हणतात. शिवाय पुणेरी लोक “अनाडी ” गावंढळ ” माणसाला पूर्वी “पौडासून आलास काय” असे विचारीत असत. हल्ली मुंबईकर अशाच “गावंढळ” लोकांना “अलिबागसे आया है क्या” असे विचारतात. म्हणजे मला स्वत:ला “मुंबईका अलिबागसे आया हुवा पुनेका पौड जानेवाला मवाली भामटा” एव्हढी मोठी उपाधी  लागेल असे दिसतंय.हाहाहा……

खूप मोठ्या संख्येने लोक मला “ती वस्तू भेटली” ” तो Tv  भेटला असे म्हणतात. मग रस्त्यात मैत्रीण मिळाली, प्रदर्शनात माझा भाऊ “मिळाला” [ तो हरवला कधी होता? असे म्हणणार का? विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात [ हो हो] सुद्धा असे बोलणारया लोकांची संख्या खूप मोठी आहे. मग जर ट्रक वाल्यांनी ट्रकच्या मागे “पहा “पन” “प्रेमाणे” असे लिहिले तर त्यांचे काय चुकले? Tv  वर बातम्या सांगणारे, वृत्तपत्रात लिहिणारे बातमीदार “Tampo {टेम्पो नाही ] “पलटी झाला” असे लिहितात, तेव्हा हेच लोक तिथे का “उलटले” नाहीत असे वाटते….

शिवाय तुम्हाला  पुढारी बनायचे असेल तर मग भाषा थोडी वेगळी आहे. बघा….

आदरनीय मंच आनी माझ्या बंदू बगीनिंनो …

“या ठिकानी” [ हे पालुपद असून दर ४ वाक्याननंतर हे बोलायचे असते. आणि  कंटाळा आल्यावर या च्या ऐवजी “त्या ठिकानी ” असे म्हणावे]. आपण ज्या कारना साठी जमलो हाओत ते सर्वांना माहीतच हाये. आपले इरोधक “जाती जातीत भान्ण [ भांडणं ] लावायचं “काम” करतायत. म्हणून मी आपल्या आजच्या “…..समाजाच्या गरीब मानसान फुडे  बोलायला हुभा हाय”. मला निवडून दिलात तर मी “शास्नाच्या” “माध्यमातून” [ द्वारा, तर्फे, कडून हे शब्द कधीही न वापरता फक्त च्या माध्यमातून असेच म्हणावे] पान्याची [ पान्हा असा अर्थ न घेता पाण्याची असा घ्यावा] वेवस्था करेल. [व्यवस्था करेन नाही]. माझ्या पक्षाने वेळोवेळी ही “भूमिका” घेतली आहे. मी ८० टक्के समाजकारन आनी २० टक्के राजकारन करेल. ………

पण एक मात्र महत्वाचे की हे “पुढारी” भाषण करताना पांढरा शुभ्र “खादी” [म्हणजे काही जण उगाच पैसा खाणे असा अर्थ काढतात] झब्बा, लेंगा, काळा गॉगल, हातात सोनेरी पट्ट्याचे घड्याळ, पायात पांढर्या चपला, गळ्यात सोन्याचे साखळदंड आनी चेहर्यावर मग्रूर भाव असे दिसाल तर आनी तरच मतदार राजा तुमचं “भाशन ऐकल”…..नाहीतर बसा घरीच…..

@डॉ. हेमंत सहस्रबुद्दे

Previous Article

२ सप्टेंबर

Next Article

१ सप्टेंबर

You may also like