Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

महामुंबईत मराठयांचा शिस्तबद्ध एल्गार! विधानसभेचाही सकारात्मक प्रतिसाद 

Author: Share:

मराठा क्रांती मूक मोर्चाच्या बहूप्रतिक्षीत शेवटचा महामोर्चा महानगरी मुंबईत दिमाखात आणि शांततेत पार पडला. सकाळी ११ वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला हा मोर्चा २ तासांनी दुपारी १ पर्यंत आझाद मैदानावर पोहोचला. हा ५८वा महामोर्चा होता.

कालपासूनच राज्यभरातून मराठा बांधव महामोर्चासाठी महानगरीत दाखल व्हायला सुरुवात जाहली होती. आज सकाळी मुंबई पुणे महारस्ता भगवामय झाल्याची दृशे दिसू लागली होती. सकाळी भायखळ्याहून मूक मोर्चास सुरुवात झाली. अतिशय शांत आणि शिस्तबद्ध रीतीने हा मूकमोर्चा दोन तासात आझाद मैदानावर पोहोचला. जेजे फ्लाय ओव्हर वरून जातानाही एक लेन मोकळी ठेवल्याचे दृश्य दिसत होते. यातून एक एम्ब्युलन्स सुद्धा कसलाही अडथळा न होता अलगदपणे पार झाली.

आझाद मैदानावर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरून, मराठा तरुणींनी सूत्रे आपल्या हाती घेऊन, आपल्या मनातील भावना समोर उपस्थित लाखो जनसमुदायापुढे मांडल्या. त्यांच्या आवाहनांना समुदायाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरक्षणाच्या मुद्द्याबरोबर मराठा आणि इतर कुठल्याही समाजातील जिजाऊंच्या लेकीकडे वाईट नजरेने पाहू नका असा सज्जड दम भरून कोपर्डी घटना आणि एकंदरीत महिला अत्याचार्यांच्या घटनांवर सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी या मुलींनी व्यासपीठावरून केली. छत्रपतींच्या , आऊसाहेबांच्या आणि शंभूराजांच्या घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले. मराठा समाजावतीने आपली भूमिका मुखमंत्र्यांपुढे मांडणाऱ्या शिष्टमंडळातही सहा मराठा तरुणी होत्या.

मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी घटनेतील आरोपीना फाशी, एट्रोसिटी कायद्यात बदलाव, छत्रपतींच्या अरबी समुद्रतील स्मारकाच्या कामाला गती, स्वामिनाथन आयोग लागू करणे ह्या मोर्चाच्या मुख्य मागण्या होत्या.

विधानसभेत, मुख्यमंत्र्यांनी या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारची भूमिका स्पष्ट केली. सरकार आणि पूर्ण विधानमंडळच मोर्चाबाबतीत सकारात्मक आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचेही आभार मानले. मराठा आरक्षणाचा मुद्दा सन्माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशावरून मागासवर्गीय आयोगाकडे वर्ग केला असून, त्यांना ठराविक वेळेत याचा निर्णय घेण्याविषयी विनंती केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. कोपर्डी प्रकरणात, विरोधी वकिलांनी एक साक्षीदार तपासण्यासाठी न्यायालयाकडून वेळ घेतला असून त्यानंतर खटला शिक्षा सुनावणीच्या स्टेज मध्ये प्रवेश करेल असे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त ६०५ अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा सरकारचा निर्णय, बार्टीच्या धरतीवर मराठा समाजाच्या समस्यांवर संशोधन आणि कृती करण्यासाठी ‘सारथी’ची निर्मिती या निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभेला दिली. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे इतर सवलती मिळणार असून, ईबीसी शिष्यवृत्तीसाठी गुणांची मर्यादा ६०% वरून ५०% करण्यात आली असल्याची घोषणा त्यांनी केली. ३ लक्ष शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याला हॉस्टेल साठी ५ कोटी रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

सर्व मराठी मीडिया झाडून या मूकमोर्च्याचे लाईव्ह कव्हरेज करीत असल्याने महाराष्ट्रभर याचे कव्हरेज पोहोचत होते. दक्षिण भागातील शाळा आज बंद ठेवण्यात आल्या होत्या. ट्राफिकसुद्धा योग्यरीतीने वळवण्यात आल्याने, नवी मुंबईपासून, चर्चगेट पर्यंत अनेक जागा भरल्याजाऊन सुद्धा त्रासिक सुर पाहायला मिळाला नाही.

सकाळी, मुंबई डबेवाल्यांनी मोर्चास पाठींबा देऊन दिवसभर आपली सेवा बंद ठेवली. रितेश देशमुखने सुद्धा ट्विटरवरून आपला पाठींबा प्रकट केला. शिवसेनेने मोर्चाला पाठींबा दिला खरा, पण मोर्चाकर्यांनी बाळासाहेबांचे पोस्टर सोडून शिवसेनेचे महामोर्चाबाबतीतलं पोस्टर फाडून टाकले.

मुंबईची सुव्यस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या मुंबई पोलिसांनी आणि ट्रॅफिक पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावले.

#मराठाक्रांतीमोर्चा, #एकमराठालाखमराठा हे लोकप्रिय हॅश टॅग राहिले.

Previous Article

जनरल अरुणकुमार वैद्य

Next Article

टिळक: भारताला असंतोष व्यक्त करायला शिकवणारा शिक्षक

You may also like