मनाचा गाभारा

Author: Share:

आमच्या घराजवळच एक शांत मंदिर आहे. “जागृत स्थान” अशी प्रसिद्धी झाली नसावी कदाचित म्हणून ते मंदिर अजून तरी गजबजलेलं नाही आणि म्हणूनच देव अजूनही त्या वास्तूत टिकून आहे अशी एक माझी श्रद्धा आहे.  त्या शांत मंदिरात गेलं नं की गाभाऱ्यात गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. परिसरातल्या गडबड हालचाली आवाज बाहेरच रावखुळलेले असतात. गाभाऱ्यात बऱ्याच वेळा मी आणि समोर देवाची हसरी मूर्ती असते आणि एक वेगळीच रिक्ततेतून येणारी शांतता देवाच्या गाभाऱ्यात भरलेली असते. त्या शांततेत तो शब्दांशिवाय बोलत असतो अणि मी ते अनाहत ऐकण्याचा बऱ्याच वेळा अयशस्वी प्रयत्न करत असतो. अयशस्वी आशासाठी की त्याच्या गाभाऱ्यात शांतता असली तरी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात मात्र अगदी हाय डेसिबेल गोंगट सुरु असतो.

कितीतरी वेळा त्या गोंगाटात माझी प्रार्थना मागणीत आणि मागण्या अपेक्षांमध्ये कधी बदलायच्या ते माझं मलाच ऐकू यायचं नाही. आणि मग देवानी माझी प्रार्थना का ऐकली नाही हा प्रश्न पडायचा. आणि कदाचित म्हणूनच, मी जातो ते देऊळ, आणि देव दोघंही जागृत नाहीत असं लोक म्हणत असावे असा विचारही मनाला एक-दोन वेळा चाटून गेला. गम्मत कशी असते पहा माणसाचा स्वभावच मुळी अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा असतो त्यात देव सुद्धा सुटत नाहीत कधी कधी.

मग एकदा काही कारणांनी अचानक मनात अखंड चाललेला स्वार्थाचा हाय डेसिबेल DJ बंद झाला. आणि शांततेचा नाद किती सुंदर असतो याची प्रथमच जाणीव झाली. आणि एकदम अचानक लक्षात आलं की मनःशांती चा स्रोत आहे कुठे ते !  आणि नंतर हे ही जाणवलं की लोक मनःशांती मिळावी म्हणून मंदिरात जातात, पण खरं तर त्यांनी आधी मनःशांती मिळवावी आणि मग मंदिरात जावं. कारण ?

कारण , जेव्हा असा शांत मनाचा गाभारा घेऊन आपण मंदिरात जाऊ तेव्हाच मनात मागण्या नसतील, अपेक्षा नसतील. एखाद वेळा काही शब्दबद्ध प्रार्थनाही नसेल. मनाचा गाभारा पूर्ण रिकामा असेल किंवा कदाचित भरलेला असेल तो त्याचाच परिचित अनाहताने. आणि केवळ त्याच वेळी आपल्या शांतावलेल्या मनाच्या गाभाऱ्यात उमटणारी ती अनाहत प्रार्थना त्याच्या गाभाऱ्यात सतत स्फुरत असणाऱ्या अनाहताशी प्रतिध्वनीत होईल आणि आमचीच प्रार्थना आमच्याच मनाच्या गाभाऱ्यात त्याचं आशीर्वचन होऊन ऐकायला यायला लागेल.

आणि त्यावेळी जागृत होईल ते देऊळ नाही तर आपलंच मन !!!

लेखक: राजेंद्र वैशंपायन

संपर्क: 91 93232 27277

ईमेल: rajendra.vaishampayan@gmail.com

 

Previous Article

नांदगाव येथील मविप्रच्या महाविद्यालयात माती व पाणी परिक्षण होणार

Next Article

२१ सप्टेंबर

You may also like