Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

‘मन हे ध्यान रंगी रंगले…’

Author: Share:

“आज माझे ध्यान खूप छान झाले. ध्यान केल्यावर मन खूप शांत झाल्यासारखे वाटत आहे.” किंवा “आज माझे ध्यान खूप चांगल्याप्रकारे लागले. ध्यान केल्यामुळे मनाची चलबिचल कमी झाल्यासारखी वाटत आहे.” – असे आपण काही जणांकडून ऐकतो किंवा त्याबद्दल वाचतो. हाच अनुभव आपल्याला घेता आला तर? म्हणजे नक्की काय होते? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उद्भवतात आणि ते उद्भवायलाही हवेत! कारण हे असे प्रश्न आपल्याला जीवनविषयक तत्त्वज्ञानाकडे नेतात.

ग्रीक तत्त्वज्ञ ‘प्लॅटो’ म्हणतात, “Philosophy is a child of wonder.” अर्थात् “तत्त्वज्ञान हे आश्चर्यभावनेचे अपत्य आहे.” जिज्ञासेपोटीच आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांनीच तत्त्वज्ञानाचा जन्म होतो. म्हणजेच आपल्या मूलभूत गरजांची जेव्हा पूर्तता होते, तेव्हाच मनुष्य इतर गोष्टींचा, जगाचा विचार करायला लागतो. अशाप्रकारचे जीवनविषयक प्रश्न उपस्थित झाले की मनुष्य त्यांची उत्तरे शोधायला लागतो.

त्याचपैकी असलेले हे प्रश्न – “ध्यान करण्याचा हाच अनुभव आपल्याला घेता आला तर?”, “आपण ध्यान करतो म्हणजे नक्की तेव्हा काय होते?”

रेडियोवर आपल्याला काही ऐकायचे असेल तर आपल्याला एखादे ठराविक रेडियो स्टेशन लावावे लागते. त्या स्टेशनची फ्रिक्वेन्सी रेडियोमध्ये असलेल्या आतल्या ट्युनिंग सर्किटशी जुळली की ते स्टेशन ट्यून होते आणि आपल्याला स्वच्छ आणि स्पष्ट ऐकायला येते. हे झाले रेडियोच्या ट्युनिंग विषयी. आता आपण आपल्या शरीराविषयी पाहूया. आपल्या मस्तकाच्या वरच्या भागात मधोमध आपले सहस्रार चक्र असते. आपल्या शरीरावर अनेक ऊर्जा केंद्र आहेत; त्यापैकी मुख्य सात ऊर्जा केंद्र आहेत म्हणजेच सात चक्र. त्याचपैकी सहस्रार चक्र हे एक आहे (सात चक्र – मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार चक्र). हे सहस्रार चक्र म्हणजे जणू काही आपल्या शरीराची अँटिना! वैश्विक चेतनेचा अंश आपल्या सगळ्यांमध्ये आहे. जेव्हा आपण ध्यान करतो , तेव्हा आपली व्यक्तिगत चेतना वैश्विक चेतनेशी आपल्या सहस्रार चक्राद्वारे जोडली जाते (ट्युनिंग होते) हा संयोग म्हणजेच ‘योग.’

‘योग’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘युज्’ या शब्दापासून झाली आहे. ‘युज्’ म्हणजे एक प्रकारचा ‘संयोग.’ सामान्य भाषेत त्याचा अर्थ ‘जोडले जाणे’, ‘जुळणे’ किंवा ‘मिलाप’ असा होतो.

ध्यान,योग साधना इत्यादी नियमितपणे केल्यावर आपली व्यक्तिगत चेतना विस्तृत होऊन वैश्विक चेतनेशी त्याचे मिलन होते. या गोष्टी कदाचित ऐकायला, वाचायला कठीण वाटत असतील पण ध्यान करणे हे खरेच सोपे आहे, हे समजायला किंवा अनुभवायला वेळ लागू शकतो.

आपल्या मनात ध्यान करण्याविषयी विविध संकल्पना असतात. जसे की ध्यान करताना आपल्याला पांढरा शुभ्र प्रकाश दिसेल, दृष्टांत होईल, काहीतरी ऐकू येईल इत्यादी. असे झाले तरंच आपले ध्यान चांगले झाले; असाही गैरसमज असू शकतो. हरकत नाही. ते ओलांडून आपल्याला पुढे जायचे आहे. अर्थात् प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो. वरील नमूद केलेल्या गोष्टींप्रमाणे तसा अनुभव न येणे हा सुद्धा एक अनुभवंच आहे, असे आपण म्हणू शकतो.

माझे गुरु म्हणतात की ध्यान करणे म्हणजे खरंतर काहीही न करणे. म्हणजे नक्की काय? हे विधान प्राथमिक पाहता खूप साधे वाटत असावे कदाचित. त्याचा खोलवर अर्थ पाहिला तर तो असा आहे की आपल्याला केवळ शांतपणे डोळे मिटून, ताठ बसणे आवश्यक आहे. सगळे प्रयत्न सोडून, शरण जाऊन, स्वेच्छेने डोळे मिटून बसणे आवश्यक आहे. हा ‘सहजपणा’ आपल्यात आला की ध्यान होते. ध्यान करावे लागत नाही. आपल्याला वेगळा असा प्रयत्न करावाच लागत नाही. हळू हळू ध्यानस्थ होणे हा आपला स्वभाव होऊन जातो. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ म्हणतात ना, अगदी त्याचप्रमाणे! नित्य – नियमित साधना, मग ती केवळ १०-१५ मिनिटे का होईना अतिशय महत्त्वाची आहे. कालांतराने, टप्प्या-टप्प्याने आपण जसे या साधनेला वचनबद्ध होत जातो तसे जीवनातले वेगवेगळे पैलू आपल्याला उलगडू लागतातंच आणि त्याचबरोबर ध्यानस्थ होण्याची अवस्था, त्यात तल्लीन होण्याचा निखळ, निर्मळ आनंद आपल्या अनुभवास येतो. आपण स्वतःला एका वेगळ्या पद्धतीने ओळखायला लागतो. स्वतःचेही अनेक पैलू आपल्यासमोर येतात. बऱ्याच सर्जनशील गोष्टी आपण करायला लागतो. आपल्यात दडलेली कौशल्य विकसित होतात.

ही तत्त्वज्ञानाची एक झलक! किंबहुना हा तत्त्वज्ञानाचा एक थोडासा भाग झाला. आपल्याला माहीत असेल की ‘भारतीय तत्त्वज्ञानाला’ ‘दर्शन’ अशी संज्ञा दिली आहे. इथे ‘दर्शन’ म्हणजे ‘जीवनदर्शन’ – ‘जीवनाकडे बघण्याचा सम्यक दृष्टिकोन.’ तत्त्वज्ञान हे केवळ एक बौद्धिक क्रियाकलाप  नव्हे तर जीवन जगण्याची पद्धती आहे. एक अशी पद्धती जी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते, आपल्या जीवनाला आकार देते आणि आपल्या जीवनात स्थैर्य आणते.’तत्त्वज्ञान’ हे अतिशय अवघड, क्लिष्ट, ‘त्यापासून लांबच राहिलेले बरे!’ असे केवळ नसून ते आपल्या रोजच्या जगण्यातला एक अविभाज्य घटक आहे.

आपण आता ज्याविषयी बोललो ते सुद्धा तत्त्वज्ञानंच आहे की! आपण ते तांत्रिकदृष्ट्या शिकलो जरी नसलो तरीसुद्धा मला असे वाटते की प्रत्येकाला त्याची समज उपजतंच असते! आपल्या सगळ्यांमध्ये एक तत्त्वचिंतक (philosopher) दडलेला आहे. बऱ्याचदा आपल्याला पडलेल्या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा “नंतर बघू!” असे टाळून पुढची कामे करायला लागतो. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे आपली सगळी कामे बाजूला ठेवून एखाद्या विषयाचा कीस काढणे किंवा नुसती चर्चा करत राहणे नव्हे तर त्या प्रश्नांचा किंवा त्या विषयाचा गाभा समजून घेणे, खोलवर अभ्यास करून, मनन – चिंतन करून सर्वसमावेशक असा दृष्टिकोन घडविणे आहे. म्हणूनंच पाश्चात्य तत्त्वज्ञ ‘विल ड्युरंट’ तत्त्वज्ञानाविषयी म्हणतात ‘Philosophy is the study of experience as a whole’ अर्थात् ‘तत्त्वज्ञान म्हणजे समग्र अनुभवाचा अभ्यास.’

जसे जसे ध्यान करत आपण अधिकाधिक अंतर्मुखी होऊ, तशी तशी आपली आपल्यातल्या या तत्त्वचिंतकाशी मैत्री घनिष्ट होत जाईल. ही मैत्री अधिक घनिष्ट करण्यासाठी ध्यान रंगात रंगूया!

– आभा पांडे – बागाईतकर

aabha.akp6@gmail.com

© Copyrights reserved

Previous Article

संशोधनात्मक प्रबंध स्पर्धा

Next Article

५ मार्च 

You may also like