नटवर्य मामा पेंडसे अर्थात चिंतामणी गोविंद पेंडसे

Author: Share:

जन्म :  २८ ऑगस्ट, १९०६  मृत्यू : १२ जानेवारी १९९१

चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे  हे मराठी नाट्य-अभिनयातील एक पूजनीय नाव.

वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले.

शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी मामांनी शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये  नाटकांत कामे केली. मामांनी पुढे नाटकांचे बोर्ड रंगवायला सुरुवात केली. ते करताकरता मामांना नाटकांत काम करायची संधी मिळाली.

डॉ विठ्ठल प्रभू यांनी अनुराधा मासिकासाठी घेतलेल्या एका मुलाखतीत किर्लोस्कर कंपनीच्या पहिल्या नाटकात काम कसे मिळाले, ही हकीकत एका मुलाखतीत मामांनीच सांगितली आहे..

“माझी पहिली भूमिका टिपणीसांच्या ‘राजरंजन’ या नाटकातील सय्यदअलीची. त्याचं असं झालं. नानासाहेब चापेकरांनी चालवलेल्या किर्लोस्कर मंडळीचा मुक्काम आमच्या गावी सांगली येथे होता. शंकरराव गायकवाड पडदे रंगवायला किर्लोस्कर मंडळीतच होते. शंकररावांना कामाचा व्याप आटपेना म्हणून त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी पुन्हा माझी नेमणूक झाली. एकदा रात्री नऊ वाजता ‘राजरंजन’चा प्रयोग होता. दुपारी दोन वाजता बातमी आली की सय्यद अल्लीची भूमिका करणारे नारायणराव फाटक यांचं एकाएकी ऑपरेशन ठरल्यामुळे ते हजर राहू शकणार नाहीत. सर्वांची बोबडी वळली. आयत्या वेळी कुणाला उभं करायचं हा प्रश्न पडला. अरे तो पेंटरचा गडी पेंडसे फावल्या वेळात नाटकातले उतारे म्हणत असतो ; त्याला पाहू या आज उभा करून ! ” अशी सूचना आली. मीही तयार झालो. सय्यद अल्लीचा पोशाख चढवला, दाढी, मिशी चिकटवली, फेटा बांधला आणि स्टेजवर जाऊन राजाला मुजरा ठोकला. सहज प्रेक्षकांकडे लक्ष गेलं मात्र, ऐन थंडीच्या दिवसात अंगाला दरदरून घाम फुटला. हातपाय लटपटू लागले, खास नेमलेल्या प्रॉम्प्टरने सांगितलेली वाक्यं कशीबशी उरकली आणि एकदाचा विंगेत सहीसलामत सटकलो. पडदा पडल्यावर चापेकरांनी शाबासकी दिली आणि म्हणाले, ” छान ! आता तुला नाटकात कामं द्यायला हवी.”

१९३६ साली मामांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्र्‍याहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. पुढे ’समर्थ नाटक मंडळी’, महाराष्ट्र नाटक मंडळी’, ललितकलादर्श अशा नामांकित नाटक कंपन्यात मामांना कामे मिळू लागली.

मामा पेंडसे यांनी आंधळ्यांची शाळा, संशयकल्लोळ, खडाष्टक, दुरितांचे तिमिर जावो, तुझे आहे तुजपाशी, शारदा, आग्ऱ्याहून सुटका, बेबंदशाही, पुण्यप्रभाव, वाहतो ही दुर्वांची जुडी, पंडितराज जगन्नाथ, सन्यस्त खङग अशा त्या काळी गाजलेल्या नाटकांमध्ये भूमिका केल्या. भाऊबंदकी आणि तोतयाचे बंड या नाटकांमधील नाना फडणीसांची भूमिकाही बरीच गाजली.

याशिवाय सवाई माधवरावाचा मृत्यू आणि सत्तेचा गुलाम हि नाटके मामांनी दिग्दर्शितसुद्धा केली. तोतयाचे बंड आणि शिवसंभव ह्या चित्रपटांतदेखील त्यांनी काम केले.

मामांना अनेक सन्मानही मिळाले. लोकांनी सन्मानाने त्यांना नटवर्य ही उपाधी दिली. याव्यतिरिक्त विष्णुदास भावे सुवर्णपदक, मराठी नाट्य परिषदेचे सुवर्णपदक, महाराष्ट्र सरकारने दिलेले मानपत्र, दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार हे सन्मान देऊन त्यांच्या प्रदीर्घ नाट्यसेवेचा गौरव महाराष्ट्राने केला आहे.

१९७२ साली ठाणे शहरात झालेल्या ५३व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा मामा पेंडसे यांनी भूषविले होते.

डॉ विठ्ठल प्रभू यांनी अनुराधा मासिकासाठी घेतलेल्या मुलाखतीत मामांनी आपले अंतरंग उलगडून दाखवले आहेत.

“केशवराव दाते हे माझे गुरू. नव्हे, रंगमंचावरील दैवत. दाते, औंधकर, अण्णासाहेब कारखानीस, चिंतामणराव कोल्हटकर, परशुराम शाळिग्राम हे भूमिकांचा ऊहापोह करायला लागले, तासनतास चर्चा करायला लागले म्हणजे नुसतं ऐकत राहावं. नाटकाचं खरं शिक्षण घडलं ते या महाभागांच्या चर्चेतून. भूमिका समजायला लागली ती यांच्या संभाषणातून. नटांनी करावयाची मेहनत ही काय  ते केशवराव दात्यांकडून शिकावं. ते भल्या पहाटे हातात सूरपेटी घेऊन आवाज तयार होण्यासाठी खर्ज लावून बसत. मोठमोठे उतारे पाठ करून आवाजाच्या चढउताराची तालीम करीत. तसंच हुंकार, होकार, शब्दोच्चार, शब्दावरचं वजन, मुद्राभिनय, भावप्रदर्शन यांचा अभ्यास, रोज तासभर श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करीत. दधीचीच्या भावनेने मेहनत करणारे हे महर्षी मार्गदर्शनासाठी लाभले हे आमचे भाग्य…. नाटकाबद्दल चर्चा करायची असते, हे केशवराव दाते यांनी आम्हाला शिकवलं. त्यापूर्वी लेखकाने लिहिलेली वाक्यं पाठ करायची, दिग्दर्शकाने दाखवलेल्या हालचाली लक्षात ठेवायच्या आणि प्रेक्षकांकडून दोनचार वेळा हशा-टाळ्या घेतल्या की भूमिका चांगली झाली असा माझा समज. हा समज पुढे गैरसमज ठरला आणि कायमचे डोळे मिटण्यापूर्वी आमचे डोळे उघडले”

मामा पेंडसे यांनी ’केशराचे शेत’हे आत्मचरित्र लिहिले आहे.

या थोर नटास स्मार्ट महाराष्ट्रचा मुजरा!

“मी रंगभूमीचा स्वीकार व्यवसाय म्हणून केला. व्यवसायाला नीतिनियम  लागू असतात. म्हणूनच रंगभूमीवर नीती नसते हे मला मान्य नाही. निष्ठेशिवाय कलेची कृपा होत नाही. कलाकार स्वतःतील ‘मी’ विसरून आपल्या भूमिकेशी एकरूप होतो तेव्हाच त्याच्या डोळ्यात ग्लिसरीनशिवाय पाणी उभं राहू शकतं, त्याचा प्रवाह प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोचू शकतो. नाहीतर कलाकाराचा नकलाकार होतो… “– मामा पेंडसे

 

________________________________________________________

संदर्भ: १. मराठी विकिपीडिया

२. “मैत्री २०१२”: न संपणारी नाती-११: नटवर्य मामा पेंडसे : डॉ विठ्ठल प्रभू यांनी ‘अनुराधा’ मासिकासाठी घेतलेली मुलाखत,

www. maitri2012.wordpress.com

Previous Article

बलात्कारी रामरहीमवर रहम नाही: वीस वर्षांचा कारावास

Next Article

पणजी मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ४८०३ मतांनी विजयी

You may also like