राजकारणाचा ‘फेस बुक’लणारे काही!

Author: Share:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज फेसबुक पेजचे उदघाटन केले. राजकारण आणि सोशल मीडियाचे निकटचे संबंध आज नवे नाहीत. सोशल मीडियाचा वावर आपल्या सर्वसामान्यांच्या वावरात आल्याने, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वस्तातील माध्यम राजकारण्यांनी वापरले आहे. २०१४ च्या मोदींच्या विजयात या सोशल मीडियाचा आणि मीडिया सेलचा फार मोठा भाग होता, आजही आहे हे आपल्याला माहित आहे. मात्र पेज काढणे, पोस्ट करून लाईक मिळवणे एवढाच सोशल मीडिया चा उपयोग नाही. बिग डेटा अनालिसिस चा वापर करून, सोशल मीडियाचा वापर शास्त्रीय’ पद्धतीने करून निवडणुका कशा जिंकता येतात, हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आपण पहिलेच.

फेसबुक कडे वळण्याचे कारण राज ठाकरे यांनी उदघाटनाच्या भाषणात स्पष्ट केले. मागील काही महिन्यांपासून वर्तमानपत्र किंवा मासिक काढण्याचा विचार त्यांच्या मनात होता, मात्र त्याची आर्थिक गणिते पाहता, मनसे वह बात निकाल दी! फेसबुक हे माध्यम त्या पेक्षा बरेच स्वस्त आणि व्यापक आहे, हे आता समजत आहेच. सोशल मीडियामध्ये असेलेली शक्ती छुपी नाही. “मत घडवण्याची ताकद आहे” असे म्हणणे थोडे शौर्याचे होईल, पण किमान मतभेद करण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. मते पसरवण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. दुसरीकडे, पारंपरिक मीडिया मोजक्या हातात केंद्रित झाल्याने, योग्य बातम्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, असाही आरोप त्यांनी केला.  मीडिया मनसेला आउटलाईन करीत असल्याचे दुःख मनसेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जाते. या परिस्थितीत हातामध्ये मीडिया असणे किती महत्वाचे आहे, हे कुणीही राजकारणातील व्यक्ती सांगू शकेल. राज ठाकरेंसारख्या  ‘मार्मिक’ची शक्ती जवळून पाहिलेल्या आणि व्यंगचित्राचे माध्यम समर्थपणे हाताळू शकणाऱ्या राज ठाकरेंना हे अधिकच माहित आहे. मागे एकदा फेसबुक लाईव्ह वर आल्याने लाईव्ह ची ताकदही राज ठाकरेंनी पहिली असेलच!

त्यामुळे सोशल मीडियावर छाप पाडण्याची ही संधी मनसे आता घेऊ इच्छिते. याची दोन कारणे आहेत. मीडिया हातात असणे फार महत्वाचे आहे. राज ठाकरे यांच्याकडील वागशक्ती महाराष्ट्राला सुपरिचित आहे. ही शक्ती, किबोर्डच्या माध्यमातून सोशल मीडियावर चितारली तर महाराष्ट्रात एक वादळ निर्माण करण्याची ताकद नक्की या पेज मध्ये आहे. रोज घडणाऱ्या घटनांवर विविध माध्यमातून विविध माणसे व्यक्त होत असतात. मात्र काही ब्लॉगर्स, सोशल मीडियावर लिहिणारे, कमीत कमी शब्दात उत्तम विचार मांडू शकतात. जे स्वतः विचार करू शकतात, पण लिहू शकत नाहीत, असे अनेक, या लेखकांचे विचार फॉरवर्ड करून पुढे पोहोचवत असतात. समजा , रोज राज ठाकरे यांनी लिहिलेले विचार तुमच्या व्हॉट्स एप मध्ये येत राहिले तर ते किती वेगाने पसरवले जातील?

रोज इतके फोटो व्हॉट्स एप वर फिरतात… राज ठाकरे यांची तिखट खेळकर व्यंगचित्रे रोज फिरत राहिली, तर ती का नाही फिरणार? जे चुकीचे त्यावर ठाकरे चाबूक आणि चांगल्या गोष्टींबद्दल कौतुक करणारे मेसेजेस जर उद्यापासून फिरू लागले, तर मनसे समर्थक आणि कार्यकर्तेच नव्हेत, बरेच जण आनंदाने ‘ठाकरेपोस्टी’ फॉरवर्ड करतील. यासाठी ७६६६६६२६७३ ह्या व्हॉट्स-एप नंबर वर फेसबुकपेज वरील सर्व पोस्ट मिळण्याची सुविधा करून, ठाकरे ‘व्हायरल’ राहतील याची काळजी घेतली गेली आहे.

तुलनेने फार कमी पैसा गाठीशी असल्याने, सतत जाहीर सभा घेणे, किंवा कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे, पक्षाला परवडत नव्हते. म्हणून एखादी पत्रकार परिषद घेऊन आपले विचार महाराष्ट्रभर पसरलेल्या समर्थकांमध्ये पसरवण्याची क्लुप्ती राज ठाकरे वापरत होते. आता त्याहीपेक्षा स्वस्त, सोप्पे आणि पूर्णतः आपल्या हाती असणारे माध्यम राज ठाकरे यांनी वापरायला सुरुवात केली आहे. राईट टू प्रायव्हसीचा अधिकार असल्याने, कायद्याच्या बंधनात राहून मुक्तपणे ‘फटकारे’ मारण्याची मुभा आता त्यांना असणार आहे.

भाषणात एक छान वाक्य ठाकरे यांनी वापरले. व्यंगचित्रकाराने जे “ओळींच्या मधले (between the lines) वाचले पाहिजे ते तुम्हाला दाखवण्यासाठी हे पेज सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहबांची कलाकारी नजर आणि ठाकरे असल्याने तिखट भाषा जात्याच मिळाल्याने, त्यातून निर्माण होणारी मिसळ खाण्यासाठी फक्त मनसे समर्थक नाही तर महाराष्ट्र्रातील जनताही उत्सुक असेल.

इथे एक खबरदारी मनसेला नक्की घ्यावी लागेल. पहिल्याच चेंडूवर षटकाराने सुरुवात करून पुढचे तीस चेंडू सतत बीट व्हावेत अशा रीतीने सध्या मनसे पीच वर बॅटिंग करते आहे. मागील वेळेस राज ठाकरे लोकांसमोर आल्यावर एक अपेक्षांचे वलय त्यांनी निर्माण केले होते. मागील सात वर्षात, बहुतेकांना अपेक्षभंग झाला आहे, आणि हे वास्तव राज ठाकरेही अमान्य करणार नाहीत, कारण मतपेटीतून ते स्पष्ट दिसले.

२०१९ ला दोन वर्षे असताना, ठाकरे यांनी पुन्हा एक अपेक्षेचा चेंडू टोलवला आहे. यातून खूप काही भव्य नसले तरी ‘गेम चेंजिंग’ असे निर्माण करून घराघरात चर्चिले जाण्याची संधी पुन्हा एकदा मनसे कडे आली आहे. ज्या खुराकाची पूर्ती या पेज मधून करण्याची भाषा राज ठाकरे करतात, तसाच खुराक सामान्य लोकांनाही चघळण्यासाठी नियमित पणे देण्याची गरज राज ठाकरे यांनी भागवली पाहिजे. सभेला लाखो आले म्हणजे लाखो मते पडतात असे नाही, हे जसे सूत्र त्यांना माहिती आहे, तसेच लाखोंनी पेज लाईक केले म्हणजे तेवढी मते पडतील असे नाही हे फेसबुकी सूत्र सुद्धा त्यांना माहित असेलच! सोशल मीडियात हलते राहण्यासाठी हलवणारे काही रोज आले पाहिजे.

आज भाजपच्या मीडियासेल मधून किंवा सेनेच्या आयटी सेल मधून येणाऱ्या मेसेजेस पेक्षा अधिक सातत्याने आणि अधिक दर्जेदार असे मनसे देऊ शकली तर, सोशल मीडियावरील युद्ध्यात किमान सरशी घेण्याची संधी मनसेकडे येईल. कारण, कुरकुरीत खमंग कन्टेन्ट देणारे जो “एक्स फॅक्टर” मनसे कडे आहे, ते या दोघांकडेही नाही!

शिवसेनेला, या पेजमुळे बऱ्यापैकी हादरे देण्याची संधी मनसेकडे आहे. याचा किती खुबीने वापर राज ठाकरे करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. वास्तविक, सेनेला गंभीर राजकीय धक्के देण्याचीही कुवत या माध्यमातून राज ठाकरे राखून आहेत.

एक जादूची पोतडी मिळाल्यासारखे राज ठाकरे यांना वाटत असेल तरी त्यात वावगे नाही. अर्थात, आज त्यातून काय पाहायला मिळणार याची उत्सुकता, लोकांमध्ये रोज जागरूक ठेवण्यात ते किती समर्थ ठरतात, यावर या जादूगाराची २०१९ ची किमयासुद्धा अवलंबून असेल.

उद्याचे व्यंगचित्र काय असेल हो?

 

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

Previous Article

बाबासाहेब आणि इस्लाम

Next Article

शरदा स्तवन

You may also like