प्रा. प्रवीण वैद्य यांची राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न भूषण पुरस्कारासाठी निवड

Author: Share:

जयसिंगपूर (प्रतिनिधी) – साहित्यप्रेमी मंडळ, सोमेश्वरनगर ही संस्था गेली १२ वर्षे साहित्यसेवेत कार्यरत असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात त्यांच्या कार्याचा विस्तार झालेला आहे. साहित्यप्रेमी मंडळाच्या माध्यमातून उपेक्षित साहित्य आणि वंचित साहित्यिकांना वाव देण्याचे कार्य केले जाते. साहित्यप्रेमी मंडळाने अनेक प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रसिद्ध केले असून त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रा बाहेरील हजारो कवींच्या कविता प्रसिद्ध केल्या आहेत. साहित्यप्रेमी मंडळाकडून प्रतिवर्षी राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार आणि राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न भूषण पुरस्कार दिले जातात.

साहित्य क्षेत्रातील योगदान, साहित्याचा उत्कृष्ट दर्जा याचे अवलोकन करून जयसिंगपूरच्या प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांची राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न भूषण पुरस्कार २०१७  साठी पुरस्कार समितीने सर्वानुमते निवड केली आहे. अशी माहिती साहित्यप्रेमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. हनुमंत माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून सदर पुरस्कार वितरण माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (८६व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) आणि सौ. शर्मिला पवार (अध्यक्षा – शरयू फौंडेशन, बारामती) यांच्या शुभहस्ते आणि डॉ. सुनील दादा पाटील (संचालक – कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०१७ रोजी सोमेश्वरनगर, बारामती जिल्हा पुणे येथे समारंभपूर्वक होत आहे.

प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य हे ज्येष्ठ साहित्यिक असून त्यांची कथा व लेखसंग्रहाची आतापर्यंत सात पुस्तके प्रसिद्ध झाली असून; ‘ज्ञानभास्कर’ हे चरित्र ई-बुक आणि प्रिंट आवृत्ती अशा दोन्ही माध्यमातून जयसिंगपूर येथील ‘कवितासागर पब्लिशिंग हाऊस’ या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे. अनेक साहित्य संमेलनातून महत्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासह अनेक पुरस्कार आणि सन्मानसुद्धा त्यांना यापूर्वी प्राप्त झाले आहेत.

शिरोळ तालुक्यातील साहित्यिकाला प्रथमच राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न भूषण पुरस्काराचा मान मिळाला आहे. मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व विकासासाठी प्रयत्न करणे, मराठी भाषा व साहित्य यांच्या अभ्यासास उत्तेजन देणे, मराठी वाचकांची वाङमयीन अभिरुची वृध्दिंगत करणे आणि मराठी साहित्यिकांच्या हितासाठी व कल्याणासाठी झटणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवून व्यापक कार्य करण्यासाठी प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य कार्यरत असून अंकुर साहित्य संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राहून सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला. स्वच्छ व निस्वार्थपणाने कार्य करण्याची त्यांची पद्धत सर्वदूर परिचित आहे.

कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून लवकरच प्रा. प्रवीण वैद्य यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येत असून; पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Previous Article

आशाताई…

Next Article

महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न

You may also like